नि. 17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 131/2010 नोंदणी तारीख – 5/5/2010 निकाल तारीख – 10/8/2010 निकाल कालावधी – 95 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सुवर्णसिंग परशुराम यादव मु.पो.शेणोली, ता. कराड जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री ए.पी.कदम) विरुध्द 1. कार्यकारी अधिकारी, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कं.लि. रा.101-105, शिव चेंबर्स, बी विंग, सेक्टर 11, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई 400 614 2. शाखा अधिकारी श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कं.लि. शाखा सातारा, विसावा नाका, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री उमेश शिंदे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे शेणोली ता. कराड येथील कायमचे रहिवासी आहेत. त्यांनी टाटा 909 हे वाहन खरेदी करण्याचे ठरविले. त्यासाठी ते जाबदार क्र.2 यांचेकडे गेले असता त्यांनी अर्जदार यांना जाबदार यांनी थकबाकीदारांकडून ओढून आणलेले जुने वाहन घेण्यास गळ घातली. त्यावर विश्वास ठेवून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून कर्ज रक्कम रु.3,35,000/- कर्ज घेवून वाहन खरेदी केले. जाबदार यांनी कर्जाबाबतचे कागदपत्रांतील मजकूर स्वतःच भरला. अर्जदार यास इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही. सदरचे कर्जासाठी हप्ता रु.13,000/- प्रतिमाह ठरला होता. वाहनापासून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तरीसुध्दा अर्जदार सदरचे कर्ज प्रामाणिकपणे परत करीत होते परंतु जाबदार यांनी बरीच कारणे दाखवून बरीच रक्कम वेगवेगळया कारणे खर्ची टाकली आहे. तदनंतर दि.6/3/2010 रोजी जाबदार यांनी अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता अर्जदारचे वाहन ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अर्जदार यांनी जाबदार यांचे कार्यालयात जावून थकीत रक्कम भरणेस तयार आहे वाहन परत द्या अशी मागणी केली परंतु जाबदार यांनी कर्जाची सर्व रक्कम आत्ताच भरा अन्यथा वाहनाची विल्हेवाट लावू अशी धमकी दिली. मे. कोर्टाने आदेश दिलेस अर्ज दाखल तारखेपर्यंतची थकीत रक्कम जाबदार यांचेकडे भरणेस अर्जदार तयार आहेत. सबब ताब्यात घेतलेले वाहन व त्याची कागदपत्रे परत मिळावीत, प्रतिदिन नुकसान भरपाईपोटी रु.2,000/- मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी त्यांचे वाहन हे व्यावसायिक कारणासाठी घेतलेले आहे त्यामुळे अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून कर्ज उचलून टाटा फायनान्सचे कर्ज फेडलेले आहे. अर्जदार यांनी करारनामा समजून घेवून त्यावर इंग्रजीमध्ये सही केलेली आहे. अर्जदार यांनी सुरुवातीपासूनच कर्जाचे हप्ते थकविण्यास सुरुवात केली. त्यांचे कर्जखात्याचा उतारा जाबदार यांनी दाखल केला आहे. सदरचे कर्जखात्यात विमाहप्ता वगळता इतर कोणतेही चार्जेस समाविष्ट नाहीत. अर्जदार हे 5/6/2010 पर्यंत रु.97,113/- इतकी थकीत रक्कम देणे लागत आहेत. अर्जदार यांनी त्यांचे वाहन स्वखुशीने ताब्यात दिले आहे. अर्जदार यांचे ड्रायव्हरची रिकव्हरी शीटवर सही आहे. सदरचे ड्रायव्हर यांनी जाबदार यांचेविरुध्द कोणत्याही स्वरुपाची फौजदारी स्वरुपाची कारवाई केलेली नाही. अर्जदार यांनी थकीत रक्कम रु.97,113/- भरल्यास जाबदार आजही वाहन देणेस तयार आहेत, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे वकील श्री कदम यांनी व जाबदारतर्फे वकील श्री शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच जाबदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 15 ला पाहिला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि.11 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 12 सोबतची व नि.14 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय, अंशतः. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पाहता त्यांनी जाबदार यांचेकडून कर्ज घेवून वाहन खरेदी केले. सदरचे कर्जाचे हप्ते ते प्रामाणिकपणे परत करणेचा प्रयत्न करीत असताना जाबदार यांनी त्यांचे वाहन कोणतीही पूर्वसूचना न देता ओढून नेले आहे. मे. कोटाने आदेश दिल्यास अर्जदार अर्ज दाखल तारखेपर्यंतची थकित रक्कम जाबदार यांचेकडे भरणेस तयार आहेत. सबब वाहन परत मिळावे असे अर्जदार यांचे कथन आहे. 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की अर्जदार यांनी वेळेवर हप्ते भरलेले नाहीत. त्यांनी मार्च 2010 पर्यंत फक्त रु.52,000/- इतकी रक्कम भरलेली आहे. अर्जदार हे दि.5/6/2010 पर्यंत रु.97,113/- इतकी रक्कम देणे लागतात. सदरची रक्कम अर्जदार यांनी भरल्यास जाबदार अर्जदारचे वाहन त्यांचे ताब्यात देण्यास आजही तयार आहेत. 8. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीतील कथनाचे समर्थनार्थ अर्जदार यांचे कर्ज खात्याचा उतारा दाखल केला आहे. सदरचा उतारा पाहिला असता अर्जदार हे जाबदार यांना दि. 5/6/2010 पर्यंत रु.97,113/- एवढी रक्कम देणे लागतात हे दिसून येते. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की सदरची रक्कम अर्जदारने भरल्यास जाबदार हे वादातील वाहन अर्जदारचे ताब्यात देण्यास तयार आहेत. अर्जदार यांनीही त्यांचे तक्रारअर्जात असे स्पष्ट कथन केले आहे की, अर्जदाखल तारखेपर्यंत म्हणजे दि. 5/5/2010 पर्यंत थकीत असणारी रक्कम अर्जदार हे भरण्यास तयार आहेत. यावरुन अर्जदार हे थकीत रक्कम भरणेस तयार आहेत हे दिसून येते तसेच जाबदार हेही थकीत रक्कम स्वीकारुन वाहनाचा ताबा अर्जदारास देणेस तयार असल्याचे दिसून येते. वरील दोन्ही बाबी विचारात घेता अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे थकीत रक्कम रु.97,113/- भरावी व जाबदार यांनी संबंधीत वाहन आर.सी.टी.सी.बुक इ. कागदपत्रांसहीत अर्जदारचे ताब्यात द्यावे असा आदेश याकामी करणे न्याय व योग्य ठरणारे आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे वाहन क्र. एमएच 11/एम 5052 या वाहनाचे कर्जापोटी थकीत असलेली रक्कम रु.97,113/- (रु.सत्त्यान्नव हजार एकशे तेरा फक्त) भरावी. 3. वर आदेश क्र.2 मध्ये नमूद केलेप्रमाणे अर्जदारने जाबदारकडे रक्कम भरलेनंतर जाबदार यांनी तात्काळ अर्जदार यांना त्यांचे वाहन क्र. एमएच 11/एम 5052 आर.सी.टी.सी.बुक इ. कागदपत्रांसहीत ताब्यात द्यावे. 4. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 10/8/2010 रजेवर/- (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य प्रभारी अध्यक्ष अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |