निकालपत्र :- (दि.07/03/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(01) दि.26/2/2010 चा मंचाचे आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी कोल्हापूर यांना अनुक्रमांक 3 वर सामनेवाला पक्षकार म्हणून समाविष्ट केलेले आहे व त्याप्रमाणे तक्रारदाराने दुरुस्ती करुन घेतलेली आहे.
(02) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला.
सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियाशिवाय बळाचे जोरावर सामनेवाला यांनी वाहन ओढून नेऊ नये व वाहनाची एन.ओ.सी.मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
(03) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- सामनेवाला क्र.1 ही भारतीय कंपनी कायदा 1956 अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लि. कंपनी आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे सांगली येथील शाखाधिकारी आहेत. सामनेवाला क्र.3 हे सामनेवाला क्र.1 यांचे कोल्हापूर येथील विभागीय कार्यालय आहे. तक्रारदार हे कोल्हापूर येथे 12 वर्षे ट्रकचे मॅकेनिकल म्हणून व्यवसाय पहात होते. त्यांना जुना वापरता ट्रक घ्यावयाचा होता. पनवले जि. रायगड येथील MH-06-K-8579 Chesis No.373341LVZ51414 विकणेचा आहे असे समजल्यावरुन सदर ट्रक मालकाशी संपर्क साधून ट्रक खरेदी करणेचे ठरवले. रक्कमेच्या उपलब्धतेसाठी सामनेवाला क्र.2 यांचेकडे संपर्क साधला. तक्रारदार यांनी रु.6,35,000/- रक्कमेस वर नमुद ट्रक खरेदी घेणेचे ठरला. त्यानुसार रक्कम रु.55,000/- रोख ट्रकचे मूळ मालकाला दिले. व रक्कम रु.5,75,000/- चे कर्ज प्रकरणी कर्जकराराने सामनेवालांकडे करुन सदर रक्कमेची परतफेड रु.18,840/- चे 16 हप्ते, रु.15,039/- चे 43 हप्ते व रु.150/- चा एक हप्ता असे मासिक हप्त्यामध्ये फेडावयाचे ठरवले. सामनेवाला कंपनीने नमुद वाहनाची रककम रु.5,75,000/- मूळ मालकास परस्पर अदा केली. नमुद वाहन तक्रारदाराचे नांवे आरटीओ कोल्हापूर येथे नोदलेले आहे. प्रस्तुत कर्जाची मुदत दि.25/11/12 अखेर आहे. प्रस्तुत कर्ज हायपोथीकेशन असलेने तक्रारदाराकडून पुढील तारखेचे 12 चेक सिक्युरिटी म्हणून घेतलेले आहेत. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी निरनिराळया छापील व को-या कागदपत्रांवर सहया घेतलेल्या आहेत व सदरची कागदपत्रे योग्यरित्या नंतर भरण्यात येतील त्याचा दुरुपयोग करणार नाही असे दर्शवून सदर कर्जरक्कमेमध्ये व्याज रक्कमेचा अंतर्भाव करणेत आलेला आहे. तक्रारदाराने एकूण रु.18,840/- चे 16 व रु.15,039/- 10 असे एकूण 26 हप्ते भरलेले आहेत व सदर हप्ते भरणेसाठी झालेल्या विलंबाचा दंडही जमा केलेला आहे.
प्रस्तुतचा ट्रक हा इंडॉलसाठी बॉक्साईट नेणेसाठी वापरत होते. सदर कंपनीत मंदी आलेने तक्रारदाराचा व्यवसाय सदर काळात बंद होता. त्यामुळे तक्रारदाराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले व तक्रारदाराचे 7 हप्ते थकलेले आहेत. तक्रारदाराने सामनेवालांशी संपर्क साधून सदर वस्तुस्थितीची माहिती देऊन कर्ज परतफेडीकरिता मुदत मागणारा लेखी अर्ज दिला असता तो स्विकारणेस नकार दिला आहे. सामनेवालांचे वसूली अधिकारी श्री प्रताप कदम हे आहेत. सामनेवालांनी नेमलेले गुंड प्रवृत्तीचे लोकांनी व पदाधिकारी यांनी वसुलीसाठी तक्रारदारास त्रास देणे चालू केले. अश्लील शिवीगाळ करुन मारहाण करणेचे तसेच ट्रक ओढून घेऊन जाणेची धमकी दिलेली आहे. दि.21/01/2010 रोजीची प्रस्तुतची घटना तक्रारदाराचे पत्नीसमोर त्याचे घरात घडलेली आहे.दि.22/01/2010 रोजी रात्री दोन वाजता प्रताप कदम व त्याचे चार साथीदार मिळून हप्त्याची व दंडाची मागणी करुन पत्नीसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सदर वेळी तक्रारदाराचा नमुद ट्रक ओढून नेला तसेच गाडीच्या सर्व मूळ कागदपत्रांची फाईल सामनेवाला क.2 चे प्रताप कदम यांनी ताब्यात घेतली व सर्व रक्कम एकरकमी भरा व मगच गाडी घेऊन जा असे बजावले. दि.23/01/2010 रोजी पावती क्र.5519256 अन्वये रु.30,000/- दि.25/01/2010 रोजी पावती क्र.1357118 अन्वये रु.12,000/- दि.29/01/2010 रोजी पावती क्र.1357440 अन्वेय रु.19,500/- अशा एकूण रु.61,500/- रक्कमेचा रोख भरणा केला. सदर रक्कम तक्रारदाराने पत्नीचे दागदागिने विकून व दुस-याकडून हातउसने घेउुन भरलेले आहेत. दि.25/02/2010 अखेर रु.90,215/- भरणा न केलेस ट्रक ओढून नेणेची धमकी सामनेवाला यांनी दिलेली आहे. दि.18/02/2010 रोजी प्रकाश कदम यांनी फोन नं.9970272121 दुपारी 4.55 मिनिटांनी तसेच दि.19/02/2010 रोजी रात्री 7.05 मिनिटांनी धमकी दिली.
सदरचा ट्रक सामनेवाला क्र.2 यांनी देवकर पार्कींग यार्ड येथे ठेवला होता. दि.29/01/2010 रोजी नमुद ट्रक तक्रारदाराचे ताब्यात दिलेला आहे. सामनेवालांनी नमुद ट्रक ताब्यात घेतेवेळी डिझेल टाकीमध्ये 360 लिटर डिझेल शिल्लक होते. मात्र प्रत्यक्षात तक्रारदाराने ट्रक ताब्यात घेतेवेळी त्यामध्ये 100 लिटरच डिझेल शिल्लक होते. तसेच गाडीची बॅटरी बदलून दुसरी बॅटरी बसवलेली होती. तसेच ट्रकची ताडपत्री काढून दुसरी बसवलेली होती. त्यामुळे तक्रारदाराचे रु.19,000/- इतके आर्थिक नुकसान झालेले आहे. दि.22/01/2010 रोजी ओढून नेलेला ट्रक दि.29/01/2010 रोजी परत केलेला आहे. त्यामुळे दरमहा रु.2,500/- इतकेप्रमाणे रु.20,000/- इतके नुकसान झालेले आहे. तसेच ट्रक ओढून नेलेने इंडॉल कंपनीने करार रद्द केलेला आहे. सध्या प्रस्तुत ट्रक दारात उभा असलेने तक्रारदाराचे बरेच नुकसान झालेले आहे. सामनेवाला हे कोणत्याही कायदेशीर तरतुदीचे पालन न करता बेकायदेशीरपणे परत एकदा ट्रक जप्त करतील व नाममात्र किंमतीने त्याची विल्हेवाट लावतील जेणेकरुन तक्रारदारास जबर शारिरीक व मानसिक त्रास होईल. तक्रारदारास झालेल्या नुकसानभरपाईसाठी सामनेवाला जबाबदार ठरतील. दि.21/01/2010 प्रस्तुतचा ट्रक सामनेवाला क्र.2 यांनी बेकायदेशीररित्या ओढून नेला व तक्रारदारास धमकी व शिवीगाळ केली त्यावेळी तक्रारीस कारण घडलेले आहे व वेळोवेळी कारण घडलेले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत यावी. सामनेवाला अथवा त्यांचे इसमांनी नमुद ट्रक जप्त करु नये असा आदेश व्हावा, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, नुकसान भरपाई पोटी रु.1,00,000/- तक्रारीचा खर्च रु.15,000/- तक्रारदारास सामनेवालांकडून देणेचा आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केलेली आहे.
(03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ MH-06-K-8579 या वाहनाचे आर.सी.बुक व परमिटची प्रत, तक्रारदाराचा खातेउतारा, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे भरलेल्या रक्क्मांच्या पावत्या, सामनेवाला यांनी ओढून नेलेला ट्रक परत दिलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात की, सामनेवाला कंपनीचे ऑफिस चेन्नई येथे आहे. प्रस्तुत कंपनी ही नॉन बँकींग फायनान्शीयल कंपनी असून त्याची गणना एनबीएफ मध्ये मोडते. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदार यांनी दि.19/11/2007 मध्ये वाहन क्र.MH-07-K-8579 या टाटा कंपनीच्या वाहनाकरिता कर्जाची मागणी केलेली होती. त्याप्रकरणी अटी व शर्तीची माहिती तक्रारदारास सांगून एक प्रत तक्रारदारास दिली. तसेच त्यासोबतचे आवश्यक ती सर्व कागदपत्रेदेखील दिली. सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत तक्रारदारास देणेत आली. तक्रारदाराने नातलगांना व वकीलांना करारपत्र दाखवूनही तसेच आपला जामीनदार श्री सुनिल लक्ष्मण हुंदकेरी यास घेऊन येऊन सदर करार क्र. STFC-TSL sangali 0000615 या नंबरने वाहन क्र.MH-07-K-8579 या वाहनाकरिता कर्ज घेतले. सर्व अटी व शर्ती समजून घेऊनच तक्रारदारने सामनेवालांना करार लिहून दिलेला आहे. तसेच नमुद जामीनदाराने करार लिहून दिलेला आहे.तसेच नमुद वाहनावर बोजा नोंद करुन स्वत: तक्रारदाराने सांगली शाखेत आणून दिलेला आहे. तक्रारदाराने सामनेवालाविरुध्द चेक व कागदपत्रे सिक्युरिटी म्हणून ठेवून घेतलेबाबत तसेच तक्रारदारास शिवीगाळ, मारहाण, धमकी दिलीबाबत, गुंडगिरी केलेबाबत कोणत्याही प्रकारचा पुरावा अथवा एफआयआर दाखल केलेला नाही. सदर कर्ज वेळेत भरणेचे व हप्ते ठरलेप्रमाणे अदा करणेचे होते. तसे न करता तक्रारदाराने हप्ते वेळोवेळी न भरता वाहन न दाखवता सामनेवालांना खोटे आश्वासन देऊन टोलवा टोलवी व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागलेने नाइ्रलाजास्तव तक्रारदाराचे ताब्यातून वाहन घ्यावे लागले. नमुद वाहन स्क्रॅपला टाकणेचा दु्ष्ट हेतू तक्रारदार बाळगून होते. तक्रारदार स्वत: मिस्त्री असलेने व त्यास सर्व गोष्टीची माहिती असलेने प्रस्तुत वाहन सामनेवाला यांनी ताब्यात घेतले नसते तर तक्रारदाराने सदर वाहनाची विल्हेवाट कधीच लावली असती. वस्तुत: नमुद कराराप्रमाणे व ठरलेल्या नियमावलीप्रमाणे सामनेवाला सदरचे वाहन कधीही जप्त करु शकतात. मात्र तसे न करता तक्रारदारास वारंवार सुचना देऊन व नोटीस देऊन ही तक्रारदार हा थकीत कर्जदार होते व आहेत. सामनेवालांची देय असलेली रक्कम अदा न करता वाहन परस्पर आपल्या ताब्यात ठेवून प्रस्तुत वाहनाचा उपभोग ते घेत आहेत. सामनेवाला जरी फायनान्स कपंनी असली तरी त्यामध्ये शेअर स्वरुपी अनामत सर्वसामान्य लोकांची असलेमुळे जर एखादया अशा तक्रारदाराने मे. मंचाचा आधार घेऊन खोटे आरोप करुन आदेश प्राप्त करणेच्या हेतूने प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारीस कारण प्रस्तुत स्थलसिमीत घडलेले नाही. सबब ग्राहक संरक्षण कायदा 1986कलम 11 अन्वये तक्रार चालणेस बाधा येते. तसेच कलम 2(1) (डी) ची बाधा येते. तक्रारदाराने दाखल केलेली रिसीट पाहता ती टेम्पररी रिसीट असून त्याची वैधता 15 दिवस आहे. प्रस्तुतचा तक्रार अर्ज खोटा, रचनात्मक असून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
(05) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांचे अॅफिडेव्हीट, तक्रारदार यांचे नांवाचे इन्शुरन्स पॉलीसीच्या रिसीट इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे उभय पक्षकारांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
1. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय? --- होय.
2. काय आदेश? ---शेवटी दिलेप्रमाणे.
मुद्दा क्र.1 व 2:-तक्रारदाराने त्यांचे तक्रार अर्ज कम 5 मध्ये सामनेवालांकडून रु.5,75,000/- इतके कर्ज घेतलेचे मान्य केलेले आहे. तसेच प्रस्तुत कर्ज फेडी रु.18,840/- चे 16 हप्ते, रु.15,039/- चे 43 हप्ते व रु.150/- एक हप्ता असे मासिक हप्त्यात फेडणेचे ठरले होते. प्रस्तुत कर्जाची मुदत दि.25/11/12 पर्यंत आहे. प्रस्तुत हप्त्यापैकी रु.18,840/-चे 16 व रु.15,039/- चे 10 असे एकूण 26 हप्ते भरलेचे मान्य केले आहे. तसेच हप्ते भरणेसाठी झालेल्या विलंबाचा दंडही सामनेवालांकडे जमा केलेला आहे. त्या अनुषंगाने रक्कमा भरणा केल्याबाबतच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच तक्रारदाराकडून 7 मासिक हप्ते थकलेले असलेचे कलम 7 मध्ये नमुद केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउता-याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने अॅग्रीमेंट नं.TSL sangali 000615 दि.27/11/2007 अन्वये रु.5,75,000/- इतकी कर्ज रक्कम घेतलेचे दिसून येते. प्रस्तुत कर्जासाठी 12.98 टक्के व्याजदर नमुद आहे. 60 महिनेसाठी कर्ज आहे. सदर कालावधीचे व्याज रु.3,73,267/- असून एकूण परतफेडीची रक्कम रु.9,48,267/- अशी आहे. नमुद कर्जासाठी MH-06-K-8579 TATA मेकचे वाहन तारण दिलेले आहे. प्रस्तुत कर्ज हायपोथिकेशन कर्ज आहे. प्रस्तुत कर्जासाठी सुनिल हुंडेकरी जामीनदार आहेत. कर्जाची मुदत दि.25/11/12 रोजी संपते. कर्जाचा पहिला हप्ता दि.25/12/07 रोजी होता. रु.18,840/- चे 16 रु.15,039/- चे 43 व रु.150/- चा एक अशा मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणेची होती. सदर हप्ता दर महिन्याचे 25 तारखेस देय होता. दाखल खातेउता-यावरुन तक्रारदाराने काही काळ नियमितपणे रक्कमा भरलेचे दिसून येते. मात्र दि.25/01/2010 नंतर रक्कमांचा भरणा केलेचे दिसून येत नाही. दि.25/01/2010 अखेर रु.4,51,830/- येणे रक्कमेपैकी रु.3,98,510/- रक्कमा भरणा केलेचे दिसून येते. तसेच पेमेंटपोटी रु.36,895/- खर्ची पडलेचे दिसून येते. सदर तारखेअखेर रक्कम रु.90,215/- देय असलेचे दिसून येते. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने दि.23/02/2010 रोजी दाखल केलेली आहे. तदनंतर तक्रारदाराने काहीही रक्कम त्याचे कर्जखातेवर भरलेली नाही. सबब दि.25/01/10 पासून मुद्दल, व्याज व अन्य आकार इत्यादी रक्कमा थकीत आहेत ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
तक्रारदाराने तक्रारदाराच्या वेगवेगळया को-या कागदपत्रांवर सहया घेतलेचे नमुद केलेले आहे. तसेच पुढील तारखेचे पाच चेक कर्जासाठी तारण घेतलेचे नमुद केले आहे. मात्र प्रस्तुतची बाब तक्रारदार सिध्द करु शकलेला नाही. तसेच चेकचा दुरुपयोग झालेचे निदर्शनास आलेले नाही. तक्रारदाराचे नमुद ट्रक हा इंडॉल कंपनीच्या बॉक्साईट वाहतूकीसाठी वापरला जात असे. मात्र सदर कंपनीस मंदी आलेने प्रस्तुत ट्रक वाहतूक बंद होती. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक फटका बसलेला होता व सदर कालावधीत कर्जफेडीचे 7 मासिक हप्ते थकले. प्रस्तुत रक्कम भरणेसाठी मुदत मागणेसाठी लेखी अर्ज घेऊन तक्रारदार गेला असता तक्रारदारास सामनेवाला यांनी हाकलून लावलेले आहे अशी तक्रारदाराची तक्रार आहे. मात्र असा मुदत मागणीचा लेखी अर्जाची मुळ प्रत अथवा सत्य प्रत प्रस्तुत कामी दाखल नाही. तसेच प्रस्तुत अर्ज सामनेवाला यांनी घेणेस नकार दिला असता तर तक्रारदारास तो नोंदपोच डाकेने पाठवता आला असता तसे केलेचे प्रस्तुत प्रकरणी दिसून येत नाही. सबब तक्रारदाराचे कथनाव्यतिरिक्त कायदेशीर पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही.
तक्रारदार थकबाकीदार झालेने सामनेवाला यांनी तक्रारदार हा थकबाकीदार झालेने दि.22/01/2010 रोजी सामनेवालांचे अधिकारी व गुंड प्रवृत्तीचे इसमाने तक्रारदाराचे नमुद वाहन पत्नीसमोर शिवीगाळ करुन बळाचे जोरावर ओढून नेले. तसेच गाडीची मुळ कागदपत्रे नेली व रक्कम भरणा केलेशिवाय वाहन ताब्यात देणार नसलेचे धमकी दिलेचे कथन केलेले आहे. सदर बाबीचा विचार करता तक्रारदारने तक्रारीत नमुद केलेप्रमाणे वेळोवेळी रु.61,500/-भरलेनंतर दि.29/01/10 रोजी नमुद ट्रक तक्रारदाराचे ताब्यात दिला असलेचे प्रतिपादन केले आहे. प्रस्तुत ट्रक बेकायदेशीररित्या ओढून नेलेने तकारीस कारण घडलेचे नमुद केले आहे. मात्र विनंती कलमामध्ये त्याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. तक्रारदार हा थकबाकीदार असलेचे तक्रारदाराने मान्य केलेले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास धमकी, शिवीगाळ व बळाचा जोर वापरला असेल तर तक्रारदाराने त्यांचेविरुध्द फौजदारी कारवाई करावयास हवी होती. तसे केलेचे दिसून येत नाही. सबब कथनाव्यतिरिक्त सदर कथनास सबळ पुरावा नाही. याउलट सामनेवाला यांनी तक्रारदाराचे कर्जसंदर्भातील शपथपत्र, वाहनाचे सर्टीफिकेट कम पॉलीसी शेडयूल इतयादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. प्रस्तुत तक्रारीतील नमुद वाहनाचा विमा सामनेवाला यांनी उतरविलेचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने त्याचे तक्रारीत नमुद ट्रकमध्ये सामनेवाला यांनी ताब्यात घेतला त्यावेळी 360 लिटर डिझेल शिल्लक होते; मात्र नमुद ट्रक तक्रारदाराचे ताब्यात देतेवेळी त्यामध्ये 100 लिटरच डिझेल शिल्लक होते. तसेच गाडीची बॅटरी बदलून दुसरी बॅटरी बसवलेली होती तसेच ट्रकची ताडपत्री काढून घेतली होती असे नमुद केले आहे. मात्र तक्रारदाराने कथनाव्यतिरिक्त अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराने तक्रारीच्या कथन व्यतिरिक्त सबळ पुरावा दाखल केला नसलेने तक्रारदारच्या तक्रारी तक्रारदार सिध्द करु शकला नसलेने सामनेवाला यांनी सेवात्रुटी केलेचे निदर्शनास येत नाही. तसेच तक्रारदार हा थकीत कर्जदार असलेने व वेळोवेळी रक्कमा भरणा करणेबाबत सुचना देऊनही रक्कमा भरणा केला नसलेने तसेच तक्रारदार हा मेस्त्री असलेने त्याला नमुद वाहनाचे तांत्रिक माहिती असलेने तसेच सदर वाहन त्याने तारण दिलेले होते व नमुद वाहन तपासणीसाठी न दाखवता टोलवाटोलवी केलेने सामनेवालांकडे नमुद वाहन जप्त करणेशिवाय पर्याय राहिला नसलेचे प्रतिपादन केलेले आहे. तसेच नमुद वाहन जप्त करणेपूर्वी तोंडी व लेखी सुचना दिलेचे प्रतिपादन केलेले आहे. तसेच थकीत रक्कम भरणा केलेनंतर तक्रारदाराचे वाहन तक्रारदाराचे ताब्यात दिलेले आहे. सदरचे वाहन अदयापही तक्रारदाराचे ताब्यात आहे. सामनेवाला यांनी स्वत:हून तडजोडीसाठी प्रयत्न करुनही तडजोड झाली नाही. सबब वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता नमुद वाहन तक्रारदाराचे ताब्यात आहे व सामनेवाला यांनी सदर वाहन ताब्यात दिलेनंतरही थकीत असणारे हप्ते व रक्कमांबाबत अदयाप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अथवा कोणतीही बेकायदेशीर कृत्य केलेचे निदर्शनास आलेले नाही. सामनेवाला फायनान्स कंपनीस कर्ज वसुली करणेचा कायदेशीर अधिकार आहे. सदर वसुली प्रचलित कायदयाचे तरतुदीस अधिन राहून तसेच कायदेशीर प्रक्रिया राबवून वसुली करणेस सामनेवाला बांधील आहेत. याची जाणीव सामनेवाला यांना आहे. सबब प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे वसुली केलेचे निदर्शनास आलेले नाही. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
कर्ज रक्कमांची परत फेड करणेची कर्जदाराची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. मंदी अथवा अन्य व्यावसायिक अडचणीमुळे येणा-या आर्थिक उत्पन्नास फटका बसलेने काही वेळा हप्ते भरणेस विलंब होतो अशी वस्तुस्थिती असली तरी सदर परिस्थितीचा विचार करता रक्कमा भरणेसाठी मुदत देणेचा सर्वअधिकारी सामनेवाला फायनान्स कंपनीस आहे. त्यामध्ये हे मंच हस्तक्षेप करु शकत नाही. सामनेवालांनी तडजोडीचे प्रयत्न केलेले आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी दाखल केलेल्या लेखी युक्तीवादामध्ये सेटलमेंट करिता जादा दंडव्याज न पकडता सामनेवालांचे देय असणारी रक्कम रु.9,40,620/- पैकी तक्रारदाराने जमा केलेली रक्कम रु.3,44,950/- वजा जाता देय असणारी रक्कम रु.5,95,670/- भरणा करणेबाबत तडजोड रक्कम दिलेली होती. मात्र त्यास तक्रारदाराने प्रतिसाद दिला नसलेचे सामनेवालांचे वकीलांनी प्रतिपादन केले आहे. सबब तक्रारदारास खरोखरच प्रस्तुत रक्कम एकरकमी भरणा करणे असलेबाबतची प्रवृत्ती होती तर सदर तडजोडीस तक्रारदाराने संमत्ती दर्शविलेली नाही. वस्तुत: दि.25/11/12 अखेर ठरले कराराप्रमाणे तक्रारदार रु.9,48,267/- देय आहे. तक्रारदाराने रु.3,44,950/- जमा केलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. प्रस्तुत कर्जाचा कालावधी संपणेस केवळ 8 महिन्याचा कालावधी बाकी आहे. वादाकरिता सदर मुदतीपर्यंत रक्कम भरणा करावयाची झाली तरी रु.9,48,267/- मधुन रु.3,44,950/- जाता असता उर्वरित रक्कम रु. 6,03,317/- देय राहते. तसेच त्यावरील दंडव्याज व अन्य आकारही देय राहतात याचा विचार करता सामनेवाला यांनी रु.5,95,670/- तडजोडीसाठी तक्रारदारास सुचविलेली आहे. मात्र तक्रारदाराने त्यास प्रतिसाद दिलेला नाही. सबब प्रस्तुत प्रकरणातील गुणदोषाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.