नि का ल प त्र :- (दि.12/06/2012) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी वकिलामार्फत हजर राहून म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. सामनेवाला तसेच त्यांचे वकील गैरहजर.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 4 यांचेकडून अॅपे थ्री-व्हिलर गाडी (PIAGGIO-APE) आर.टी. ओ. रजिस्ट्रेशन नं. MH-09-BC-4982 इंजिन नं. AOCO 323890 चेसिस नं. MBXOOO DHLCO 11419 ही गाडी सामनेवाला क्र. 5 वित्तिय कंपनीकडून कर्ज घेऊन खरेदी केली आहे. सदर वाहनावरती सामनेवाला क्र. 1 ते 3 या विमा कंपनीचा विमा उतरविला आहे. त्याचा पॉलिसी क्र. 215063/31/10/009666 असा आहे. व सदर पॉलिसीचा कालावधी हा दि. 27/03/2010 ते 26/03/2011 असा आहे.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांनी इन्शुरन्स पोटी 4,246/-, आर.टी. ओ. रजिस्ट्रेशन चार्जेस पोटी रु. 15,500/- इत्यादी रक्कम रु. 1,56,146/- इतक्या रक्कमेचे कोटेशन तक्रारदारांना दिले होते. त्यानंतर दि. 23/03/2010 रोजी रक्कम रु. 22,000/-, दि. 25-03-2010 रोजी रक्कम रु. 49,791/- अशी रोख रक्कम सामनेवाला क्र. 5 यांचेकडून कर्जाऊ घेऊन सदर रक्कम सामनेवाला क्र. 4 यांचेकडे जमा केली आहे. सुरुवातीस सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदारांना नोंदणी क्र. टी.सी. 187 असा दिला होता. त्यानंतर मुदतीत रजिस्ट्रेशन पुर्ण करुन कागदपत्रे दिलेले नव्हते. मात्र तक्रारदारांनी तगादा लावल्यानंतर सदर सामनेवाला यांनी वाहनाचा नंबर एम.एच. 09 बीसी 4496 असा असलेचे सांगितले. व कागदपत्र नंतर देत असलेचे सांगितले. त्यानंतर सदर वाहनास सदर नंबरची नंबर प्लेट लावली. दरम्यान सदर विमाकृत वाहनाचा दि. 18/05/2010 रोजी पलटी होऊन अपघात झाला. त्यावेळी तक्रारदारांनी तगादा लावून सामनेवाला क्र. 4 यांचेकडून कागदपत्र उपलब्ध करुन घेतली असता सदर वाहनाचा क्रमांक एम.एच. 09 बीसी 4496 हा नजरचुकीने दिल्याचे तक्रारदारांना कळविले व वाहनाचे रजिस्ट्रेशन नंबर एम.एच. 09 4982 असल्याचे तक्रारदारांना समजले. व तक्रारदारांना अन्य इसमाचे वाहनाचा नंबर चुकीने दिलेला आहे असे तक्रारदारांना कळले. सामनेवाला क्र. 4 यांच्या चुकीमुळे चुकीचा नंबर प्लेट लागलेचे कारण पुढे करुन सामनेवाला क्र 1 ते 3 विमा कंपनी तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे. याबाबत सामनेवाला विमा कंपनीकडे सबळ पुरावाही दिलेला आहे.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे सांगतात अपघात झालेल्या वाहनाचा रितसर सर्व्हे होऊन दि. 25-05-2010 रक्कम रु. 54,927/- चे बील इस्टीमेट त्यांचे सर्व्हेअर मार्फत झालेले आहे. व दि. 27/06/2010 रोजी रक्कम रु. 10,293/- चे पुरवणी इस्टीमेट झाले आहे. नुकसान भरपाईची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 ते 5 यांची आहे. सबब, विमा क्लेम रक्कम रु. 65,000/-, आर्थिक त्रासापोटीची रक्कम रु. 15,000/- वनोटीस खर्च रु. 1,500/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- , तक्रार अर्जाचा खर्च व इतर रु. 15,000/- अशी एकूण रक्कम रु. 1,21,500/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजाने देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत वाहनाची विमा पॉलीसी, विमाकृत वाहन नं. एम.एच. 09 4982 च्या आर.सी. व टी.सी. बुकाची प्रत, तक्रारदार यांचे ड्रायव्हिंग लायसेन्सची प्रत, विमाकृत वाहनाचे टी.सी. नंबर बाबत आर.टी.ओ. चे पत्र, सामनेवाला क्र. 4 यांचेकडील विमाकृत वाहनाचे कोटेशन, वाहनाबाबतची रोख रक्कम सामनेवाला क्र. 4 कडे भरलेबाबतची रक्कम रु. 22,000/- व रु. 49,791/- ची पावती, सामनेवाला क्र. 4 कडील वाहन खरेदीबाबतचा इनव्हाईस, वाहनाबाबत डिलेव्हरी कम सेल सर्टीफीकेटची प्रत, विमाकृत वाहन नं. एम.एच. 09 4982 वाहनाबाबतची आरटीओकडील माहितीपत्र, विमाकृत अपघाती वाहनाचे सर्व्हे इस्टीमेट, व पुरवणी इस्टीमेट, नंबर प्लेटमधील बदलाबाबत सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदार यांची सही घेऊन पाठविले पत्राची प्रत, सामनेवाला विमा कंपनीने क्लेम नाकारलेबाबतचे पत्राची प्रत, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविले नोटीसीची प्रत व त्याबाबतची पोहोच पावती, सामनेवाला क्र. 4 यांनी तक्रारदार यांचे नोटीसीस दिलेले उत्तर व दि. 3/10/2011 रोजी तक्रारदार यांचे अपघातातील वाहन दुरुस्तीबाबत सामनेवाला क्र. 4 यांचेकडील दुरुस्तीबाबतचे रक्कम रु. 47,007/- व रु. 4,300/- ची बीले, दुरुस्तीबाबत झालेले खर्चाचे कोल्हापूर डिझेल्स यांचेकडील बील, तक्रारदार यांना दुरुस्तीबाबत झालेले खर्चाचे समरी स्टेटमेंट व दि. 5/01/2012 रोजी तक्रारदारांतर्फे तक्रारदार यांचे सामनेवाला क्र. 5 यांचेकडील कर्जाबाबतचे पासबुक व नोंदणी विलंबाबात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लि कडील मार्गदर्शन सुचनाबाबतचे परिपत्रकाची प्रत व दि. 12/06/2012 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांचेकडील अपघाती वाहनाचे रजिस्ट्रेशनबाबत माहिती कळविलेले पत्राची प्रत इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसारच पुढीलप्रमाणे घटना घडलेचे दिसून येते. त्यामध्ये दि. 27/06/2010 रोजी सदर वाहनावरती सामनेवाला कंपनीचा विमा उतरविलेला आहे. दि. 30/03/2010 रोजी सदर वाहनाची तात्पुरता नोंदणी क्रमांक टी. सी. 187 देऊन तक्रारदारांना वाहन ताब्यात दिलेले आहे. दि. 18/05/2010 रोजी वाहनास अपघात झालेला आहे. तसेच सदर दिवशी पोलिस स्टेशनला अपघाताची खबर दिली आहे. तसेच सदर दिवशी अपघाती वाहनाचा पंचनामा केलेला आहे. दि. 21/05/2010 रोजी सर्व्हेअर यांची नेमणूक झाली आहे. दि. 25/05/2010 रोजी खर्चाचे अंदाजपत्रक दाखल केले आहे. दि. 26/05/2010 रोजी क्लेम मागणी दाखल केला आहे. दि. 18/06/2010 रोजी सदर वाहनास आर.टी. ओ. कोल्हापूर यांनी नोंदणी क्र. एम.एस. 09 बीसी 4982 असा दिलेला आहे. दि. 27/06/2010 रोजी जादा खर्चाची पुरवणी अंदाजपत्रक दाखल केलेले आहे. दि. 05/07/2010 रोजी वाहनाचा टॅक्स दिलेला आहे. दि. 07/07/2010 रोजी सर्व्हेअर यांनी अहवाल दिलेला आहे. दि. 12/07/2010 रोजी मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार अटींचा भंग केला असल्याकारणाने तक्रारदारांना क्लेम नाकारलेला आहे. दि. 24/11/2011 रोजी आर.टी. ओ. कार्यालयाने वाहन रजिस्ट्रशन नं. एम.एच. 09 4982 तक्रारदारांचे नांवे नोंद केलेचे पत्र दिले आहे. तसेच दि. 24/11/2010 रोजी एम.एच. 09 बी.सी. 4496 हा श्री. डी.एम. खांदुरे यांचे नावे सदर वाहन नंबर असल्याचे आर.टी. ओ. चे पत्र आहे.
उपरोक्त कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीच्या अटींचा भंग केला आहे. तसेच खोटे कर्जाचे अंदाजपत्रक दाखल केले आहे. वाहन क्र. एम.09 बी.सी. 4496 या वाहनाचा अपघात झालेला आहे. याबाबतची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु. 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(5) सामनेवाला क्र. 4(डिलर) यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी वाहन खरेदी करण्याबाबतचे कोटेशन दिलेले होते. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दि. 24/03/2010 रोजी रक्कम रु. 22,000/- व दि. 25/03/2010 रोजी रक्कम रु. 49,791/- व दि. 29/03/2010 रोजी रक्कम रु. 75,109/- अशी एकूण रक्कम रु. 1,46,900/- इतकी रक्कम सामनेवाला यांचेकडे भरलेली आहे. परंतु सदर वाहनाची इन्शुरन्सची रक्कम तक्रारदारांनी सदर सामनेवाला यांचेकडे भरलेली नाही व सामनेवाला क्र. 1 यांचेंकडे परस्पर भरलेली आहे. सदर सामनेवाला यांचेकडे इन्शुरन्स व्यतिरिक्त रक्कम आलेनंतर दिनांक 30/03/2010 रोजी ताबडतोड वाहनाचा ताबा तक्रारदारांना दिलेला आहे. व त्याआधी आर.टी. ओ. टॅक्स व नोंदणी फीच्या रक्कमा भरल्याचे तक्रारदारांनी हजर केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते.
सदर सामनेवाला क्र. 4 त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, विमा व आर.टी. ओ. रजिस्ट्रेशन ही कागदपत्रे देण्याची सदर सामनेवाला यांची जबाबदारी नाही. कायद्याप्रमाणे कोणतेही वाहन हे रस्त्यावर फीरविण्यापूर्वी ते आर.टी.ओ. कडे नोंदवावे लागते. त्याबाबतची जबाबदारी सदर सामनेवाला यांनी पार पाडली आहे. तक्रारदारांना एम.एच. 09 बी.सी. 4496 असा नंबर असल्याचे सदर सामनेवाला यांनी सांगितलेले नाही. सदरच्या वाहनाची नोंदणी आर.टी. ओ. ने दि. 18/06/2010 रोजी केल्याचे दिसून येते. तो नंबर एम.एच. 09 बी.सी. 4982 असल्याचे आर.टी. ओ. च्या दाखल्यावरुन दिसून येते. याबाबत तक्रारदारांची तक्रार चुकीची असल्याने खर्चासह फेटाळण्यात यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु. 10,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(6) सामनेवाला क्र. 5 यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर कंपनी ही चारचाकी वाहनासाठी कर्जपुरवठा करते. कर्ज देतेवेळेस वाहनाचा विमा असावा अशी प्राथमिक अट आहे. सदर कंपनी विमा कंपनीचे एजंट म्हणून नाहीत. सदरच्या कंपनीची जबाबदारी ही कर्ज देणेबाबत आहे. व त्याबाबत तक्रारदारांची कोणतीही तक्रार नाही. सबब, विमा क्लेम रक्कम देणेबाबत सदर कंपनी ही कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.
(7) या मंचाने तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तीवाद विस्तृत व सविस्तरपणे ऐकला आहे. तसेच सामनेवाला यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे अॅपे थ्री-व्हिलर (PIAGGIO-APE) हे वाहन तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 4 या डिलरकडून खरेदी केलेले आहे. व सदर वाहन खरेदी केलेनंतर सामनेवाला विमा कंपनीकडे सदर वाहनाचा विमा उतरविलेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच सदर वाहनास दि. 18/05/2010 रोजी अपघात होऊन वाहनाचे नुकसान झालेले आहे. सामनेवाला विमा कंपनीचे पॉलिसीचे अवलोकन केले असता सदर वाहनाचा असलेला इंजिन नं. AOCO 323890 चेसिस नं. MBXOOO DHLCO 11419 सदर पॉलिसीच्या असलेल्या कागदपत्रांवरुन दिसुन येतो. केवळ नंबर चुकीचा आहे या कारणावरुन विमा क्लेम नाकारलेला आहे हे दिसून येते. वास्तविक पाहता आर.टी.ओ. कार्यालयाने सदर वाहनास नंतर नंबर दिलेला आहे याचा अर्थ असा की, वाहनास रजिस्टर नंबर देणेबाबत कोणतेही कायदेशीर अडचण आलेली नाही. वाहन हे रजिस्टर नंबर देणेबाबत सक्षम होते ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालकाच्या चुकीमुळे अथवा वाहनातील असलेल्या दोषांमुळे अपघात झालेला आहे हे पोलिस स्टेशनकडील असलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. अपघात झालेल्या सदर वाहनाचा इंजिन नंबर व चेसीस नंबर हाच पॉलिसीमध्ये नमूद आहे. वाहन रजिस्टर करण्याबाबत कोणतीही कायदेशीर अडचण दिसून येत नाही. त्यामुळे वाहन रस्त्यावर चालविणेस सक्षम होते ही बाब हे मंच विचारात घेत आहे. वास्तविक पाहता विम्याचा मुळ हेतू विचारात घेणे आवश्यक आहे. विमा हा वाहनावर उतरविलेला आहे. तांत्रिक बाबी उपस्थित करुन सामनेवाला विमा कंपनीने विमा क्लेम नाकारलेला आहे. सदरची बाब व उपरोक्त विवेचन विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी झाल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे.
(8) वाहनाचा अपघात झालेनंतर सामनेवाला विमा कंपनीने रेळेकर सर्व्हेअर यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली आहे. व त्यांनी प्रस्तुत प्रकरणी सदरचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर सर्व्हे अहवालाचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. एकूण नुकसान भरपाई रक्कम रु. 37,539.50 पैसे ही निश्चित केलेली आहे. सदर अहवालाप्रमाणे निश्चित केलेली रक्कम व्याजासह मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत. सदर रक्कम व्याजासह मिळण्यास तक्रारदार हे पात्र असल्याने तक्रारदारांना आर्थिक व मानसिक त्रासापोटी केलेली मागणी हे मंच विचारात घेत नाही. सामनेवाला क्र. 4 हे वाहनाचे डिलर आहेत व सामनेवाला क्र. 5 हे वित्तिय कंपनी आहे. त्यामुळे विमा क्लेम रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र. 1 ते 3 विमा कंपनी यांची आहे. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रुपये 37,540/- (अक्षरी रक्कम रुपये सदतीस हजार पाचशे चाळीस फक्त) द्यावेत. व सदर रक्कमेवर दि. 18/05/2010 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 2,000/-(अक्षरी रक्कम रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
Prounounced on dated 12th June, 2012