निकालपत्र :- (दि.22/09/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सदरची तक्रार कायदेशीर प्रक्रियाशिवाय बळाचे जोरावर वाहन ओढून नेले व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार हे नमुद पत्त्यावर कायमपणे त्यांची पत्नी, आई, वडील व मुले यांचेसह रहात आहेत. तक्रारदार व्यवसायाने टेम्पो चालक आहेत. टेम्पो चालवून येणा-या पैशातून ते त्यांचा व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. सन 1998 मध्ये तक्रारदार यांनी व्यवसायाकरिता टाटा 407 क्रमांक MH-09-Q-4548, चेसीसी नंबर 357011एल 93 812199 इंजिन नंबर-497एस.पी.21एल.93 722383 वाहनाचा रंग-लाईट ग्रीन, वाहनाचा रजिस्टर नंबर-MH-09-Q-4548,वाहनाची रजिस्ट्रेशन तारीख-26एप्रिल-1999 चा टेम्पो रक्कम रु.2,60,000/- इतक्या रक्कमेस विकत घेतला. सदर वाहन तारणावर हायर पर्चेसने रक्कम रु.80,000/- चे कर्ज सामनेवाला यांचेकडून दि.21/02/2006 रोजी घेतलेले होते. सदर कर्जापोटी तक्रारदार यांनी रक्कम रु.1,00,000/- फेड केलेली आहे. सदर कर्जाची मुदत दि.21/02/2008 पर्यंत होती. एकूण 24 हप्तेपैकी काही हप्ते तक्रारदार यांनी भरलेले आहेत. त्याची एकूण रक्कम रु.55,000/- इतकी भरलेली आहे. असे असताना सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे कर्ज रिन्यु करुन दि.01/07/2008 रोजी रक्कम रु.1,02,000/- इतके जादा व अवास्तव कर्ज दाखविले आहे. सदर कर्जाची मुदत दि.01/06/2010 पर्यंत असून तक्रारदार यांनी रक्कम रु.37,000/- सामनेवालांकडे जमा केली आहे. असे असतानादेखील दि.10/02/2010 रोजी लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ, एच.पी.गॅस एजन्सी ऑफिसजवळ, तक्रारदार यांनी गॅरेजमध्ये सदर वाहन दुरुस्तीसाठी उभे केले होते. त्यावेळी सामनेवाला कंपनीचे कर्मचारी श्री अनिरुध्द जोशी, श्री आदिनाथ व श्री विकास जाधव आणि इतर तीन अनोळखी गुंड इसम यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करुन त्यांचेकडील बनावट चावीचा वापर करुन व तक्रारदारास धक्काबुक्की,शिवीगाळ, मारहाण करुन सदर टेम्पो क्र.MH-09-Q-4548 जबरदस्तीने, दांडगाव्याने, धाक दडपशाहीने, बेकायदेशीर रितीने पळवून नेलेला आहे. सामनेवाला कंपनीचे अधिका-यांनी सदर वाहनाचा हप्ता भरुनदेखील वाहन देणार नाही लिलाव करणार अशा प्रकारची धमकी तक्रारदारांना दिली. ब) त्यांनतर तक्रारदार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता सामनेवाला कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात बोलाविले. त्यावेळी सामनेवाला कंपनीचे मॅनेजर यांनी टेम्पो सोडतो, केस करु नका, फक्त हप्ते वेळेवर भरतो असे स्टॅम्पवर लिहून दया उदया दि.11/02/2010 रोजी सकाळी गाडी सोडतो असे सांगितले. तक्रारदार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक,कोल्हापूर यांचेकडे सदर सामनेवाला कंपनी व त्यांचे कर्मचारी आणि गुंड इसमाविरुध्द रितसर तक्रार दिली आहे. तसेच मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,कोल्हापूर यांचे कोर्टात प्रायव्हेट कंम्प्लेट दाखल केली असून सदर कामी तपास चालू आहे. क) तक्रारदार यांनी दि.12/12/2009 रोजी रक्कम रु.6,000/-, दि.17/12/2009 रोजी रक्कम रु.4,500/- व दि.05/01/2010 रोजी रक्कम रु.4,000/- इतकी रक्कम सामनेवालांकडे जमा केलेली आहे. असे असताना तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारची नोटीस, सुचना न देता बेकायदेशीरपणे शिवीगाळ व मारहाण करुन तक्रारदार यांचे वाहन डुप्लीकेट चाव्या वापरुन पळवून नेलेले आहे. ड) सबब तक्रारदार सदर कर्जाचे हप्ते यापुढे मे. कोर्टात भरणेस तयार आहेत. तसेच सामनेवाला यांनी जप्त केलेले वाहन रिलीज करणेविषयी आदेश व्हावा व सदर वाहनाचा ताबा तक्रारदार यांना मिळावा. सदर वाहन लिलाव करणेस स्थगिती मिळावी. सामनेवाला कंपनीने लावलेला जादा व्याजदर दंड कमी व्हावा. तक्रारदाराचे आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.40,000/- तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिलेला तक्रार अर्ज, तक्रारदाराचे टेम्पो या वाहनाचे आर.सी.बुक, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिले कर्जाबाबतचे रिसीट, सामनेवाला कंपनीस तक्रारदार यांनी जमा केले रक्कमेची रिसीट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.09/06/2010 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी दिलेल्या रक्कमांच्या रिसीटच्या झेरॉक्सच्या प्रती दाखल केल्या आहेत.तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या आपले लेखी म्हणणेनुसार तक्रारदार यांनी खोटी विधाने करुन मे.कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे व स्वत:ची चुक सामनेवाला यांचे माथी मढवत आहेत. सबब तक्रारदारांचा सदरचा तक्रार अर्ज मे. कोर्टात न्यायीक तत्वावर व वस्तुस्थितीन्वये चालण्यास पात्र नाही. सामनेवालांनी तक्रार अर्ज कलम 2 मधील वाहनाची महिती वगळता अन्य मजकूर तसेच कलम 3 ते 5 मधील मजकूर काही अंशी वगळता उर्वरित मजकूर मान्य व कबूल नसलेचे प्रतिपादन केले आहे. तक्रार अर्जातील कलम 6 मधील मागण्या मान्य करता येणार नाही यातील संपूर्ण मजकूराचा सामनेवाला हे स्पष्टपणे इन्कार करतात. (5) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, वस्तुस्थिती अशी आहे की, यातील तक्रारदार यांनी त्यांचे वाहन क्र. MH-09-Q-4548 करिता सामनेवाला यांचेकडून कर्ज मागणी केली त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी सर्व अटी व नियमावली कंपनीने दिलेले झेरॉक्स प्रत आपल्या नातेवाईकांना दाखवून व आपल्या वकीलांना दाखवून येईल असे सांगून त्यानंतर दोन दिवसांनी आपल्या जामीनदार मुबारक बाबासाहेब दहीकत हयांच्या सोबत येऊन करार क्रमांक 0001637 अन्वये सामनेवाला यांना करार लिहून दिलेला आहे. सदर कराराप्रमाणे तक्रारदारास वेळोवेळी नोटीस बजावून सदर सामनेवाले यांना देय असलेली रक्कम तक्रारदारांनी अदा केलेली नाही व तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये झालेल्या करारातील नमुद अटी व कराराने प्राप्त झालेल्या अधिकाराने तक्रारदाराचे सदरचे वाहन सील करण्यात आले आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला करार क्र.TSLKLPR0001637 व सदर वाहनाचे हायर लेजर डिटेल्स व स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद व तक्रारदारचे वकीलांचे तोंडी युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. तक्रारदार नमुद वाहन ताब्यात मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- सामनेवालांनी दाखल केलेल्या कर्जाच्या कागदपत्रातील लोन कम हायपोथीकेशन अॅग्रीमेंटचे अवलोकन केले असता शेडयूल 1 व 2 नुसार तक्रारदाराने रक्कम रु.1,02,000/- चे 24 महिनेचे मुदतीने कर्ज घेतलेचे दिसून येते. सदरचे कर्ज टाटा 407 क्रमांक MH-09-Q-4548,चेसीसी नंबर 357011एल 93 812199 इंजिन नंबर-497एस.पी.21 एल.93 722383 वाहनाचा रंग-लाईट ग्रीन, वाहनाचा रजिस्टर नंबर- MH-09-Q-4548, वाहनाची रजिस्ट्रेशन तारीख-26एप्रिल-1999 नमुद वाहनावर घेतलेचे दिसून येते. त्यासाठी व्याजदर हा 17.10 टक्के असून एकूण देय रक्कम ही रु.1,36,884/- देय आहे. व सदरची देय रक्कम ही प्रतिमाह रु.5,704/-चे 23 हप्ते व रु.5,692/- चा एक हा 24 वा हप्ता या प्रमाणे अदा करणेचे आहे. प्रस्तुतचे कर्जाचे अग्रीमेंटची तारीख आणि ठिकाण नोंद केलेली नाही. तसेच साक्षीदारांच्या सहया दिसून येत नाहीत. मात्र दि.22/05/2008 रोजी स्टॅम्प डयुटी भरलेचा शिक्का दिसून येतो. सदर अॅग्रीमेंटवर कर्जदार, जामीनदार व सामनेवालांचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या सहया दिसून येतात. शेडयूल 1 व 2 वरही सहया दिसून येतात. तसेच नमुद कर्जापोटी नोटरी पब्लीक कोल्हापूर यांचेसमोर तक्रारदाराने सदर कर्जाच्या करारासंदर्भात दि.15/05/2008 रोजी रु.100/- चे स्टॅम्पपेपरवर शपथपत्र लिहून दिलेले आहे. सदर शपथपत्रात सदर मंजूर रक्कम पूर्णत: न देता रक्कम रु.89,775/- हे तक्रारदाराचे जुने कर्ज खाते क्र.TSLKLP-0070751 या खातेस जमा करणेत यावे व सदर खाते बंद करणेत यावे व उर्वरित रक्कम रु.12,225/- टॅक्स व व्याज रक्कम भरणेकरिता सदर रक्कमेचा चेक/डी.डी.आर.टी.ओ. यांचे नांवे काढणेत यावा यास तक्रारदाराची मान्यता असलेचे नमुद केले आहे. तसेच दि.12/05/2008 चे नोटराईज्ड शपथपत्र दाखल केले आहे व सदर शपथपत्रानुसार तक्रारीतील नमुद वाहनावर तक्रारदाराने सामनेवाला कंपनीकडून हायपोथीकेशन लोन घेतलेले आहे व त्याचा बोजा आर.सी.बुकवर नोंद आहे. सदरचे कर्ज रिन्यु करणेचे आहे. मात्र आर.सी.बुकचे काम आर.टी.ओ.कोल्हापूर यांचे कार्यालयात चालू आहे. सदर काम झालेवर ते कंपनीत हजर करणेबाबत लिहून दिलेले आहे. त्याप्रमाणे सामनेवालांनी डील फॉरवर्ड शिट दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे रक्कम रु.12,225/- आर.टी.ओ.ला तर रु.89,775/- एच.टी.एफ.सी.कोल्हापूर यांना तक्रारदाराचे जुने कर्ज खाते क्र.TSLKLP-0070751 ला देणेबाबच्या नोंदी केलेल्या आहेत. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत जुने कर्ज हे दि.21/02/2006 मध्ये रक्कम रु.80,000/- चे घेतलेले होते व त्याची मुदत दि.21/02/2008 अखेर होती. सदर रक्कमेपैकी रक्कम रु.55,000/- कंपनीत जमा केले व सदर कर्ज रिन्यु करुन दि.01/07/2008 रोजी रक्कम रु.1,02,000/- इतके जादा व अवास्तव कर्ज दाखवले आहे व सदर कर्जाची मुदत दि.01/06/2010 पर्यंत असून रक्कम रु.37,000/- इतकी रक्कम भरणा केलेली आहे. प्रस्तुत कर्जातील काही हप्ते थकीत गेलेले आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावरुन दि.01/07/2008 ते 01/10/2008 अखेर हप्ते भरलेले दिसून येत नाहीत. तसेच दि.01/07/2009 ते दि.01/11/2009 अखेर हप्ते भरलेले दिसून येत नाहीत. तसेच दि.01/02/2010 नंतरही हप्ते भरलेचे दिसून येत नाही. याचा अर्थ तक्रारदाराने प्रस्तुत कर्जाचे हप्ते थकीत घालवलेले आहे. तक्रारीतील नमुद वाहन दि.10/02/2010 रोजी सामनेवालांनी बळाचे जोरावर ताब्यात घेतलेचे नमुद केले आहे. याचा विचार करता कर्ज थकीत गेल्यास सामनेवाला वाहन ताब्यात घेऊ शकतात मात्र त्यासाठीची कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. सदर वाहन ताब्यात घेणेपूर्वी सामनेवालांनी तक्रारदारास कोणतीही नोटीस दिलेचे दिसून येत नाही. अथवा तक्रारदारास थकीत हप्ते भरुन वाहन ताब्यात घेणेबाबत कळवलेचे दिसून येत नाही. सामनेवालांनी सदर वाहन थकीत हप्त्यापोटी वाहन जप्त करणेबाबतची कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला होता याबाबतचा कोणतेही कायदेशीर कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेली नाहीत. याचा विचार करता सामनेवालांनी बेकायदेशीरपणे बळाचे जोरावर तक्रारदाराचे वाहन ओढून नेलेले आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. अशा पध्दतीने बळाचे जोरावर वाहन ओढून नेणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे व याबाबत मा.राष्ट्रीय आयोग, मा.राज्य आयोग, व मा. सर्वोच्च न्यायालय यांचे पूर्वाधार विचारात घेता सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:-तक्रारदाराने जुन्या कर्जाच्या हिशोबाबाबत वाद उपस्थित केलेला आहे. सदर कर्जाचा येणे देणे हिशोब होऊन प्रस्तुतचे कर्ज रिन्यु केलेचे दिसून येते व त्याप्रमाणेचा हिशोब तक्रारदाराने नोटराईज्ड शपथपत्रामध्ये मान्य केलेला आहे. तसेच तक्रारदाराने त्या संदर्भातील कोणतीही कागदपत्रे सदर मंचास दाखल केलेली नाहीत. तक्रारदाराने नमुद शपथपत्राचे अवलोकन केले असता शपथपत्रातील मजकूराप्रमाणेच सामनेवालांनी दाखल केलेल्या डील फॉरवर्डींग शिटनुसार रक्कम रु.12,225/- आर.टी.ओ.कोल्हापूर रक्कम रु.89,775/- तक्रारदाराचे जुने कर्ज खाते क्र.TSLKLP-0070751 वर वर्ग केलेले आहेत. सबब जुन्या कर्जासंदर्भात उपस्थित केलेला वाद कोणत्याही कागदपत्राच्या आधाराशिवाय केलेला आहे. तसेच सदर कर्ज संपुष्टात आलेले आहे. नवीन कर्ज रक्कम रु.1,02,000/- चा कर्ज हप्ता हा रक्कम रु.5,704/- असून नियमितपणे 24 मासिक हप्ते भरणेचे होते. सदर कर्जावर तक्रारदाराने दि.14/11/008 रोजी रक्कम रु.5,000/- दि.04/03/2009 रोजी रक्कम रु.8,000/-, दि.22/04/2009 रोजी रक्कम रु.5,000/-, दि.05/06/2009 रोजी रक्कम रु.4,500/-, दि.12/12/2009 रोजी रक्कम रु.6,000/-, दि.17/12/2009 रोजी रक्कम रु.4,500/-, दि.05/01/2010 रोजी रक्कम रु.4,000/- असे एकूण रक्कम रु.37,000/- भरलेले आहेत हे दाखल पावत्यावरुन व खातेवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने शेवटीची रक्कम दि.05/01/2010 रोजी भरलेली आहे. सदर खातेच्या शेडयूलप्रमाणे दि.01/01/2010 अखेर 5,704/- प्रमाणे एकूण 19 मासिक हप्ते एकूण रक्कम रु.1,08,376/- देय होते. पैकी फक्त रक्कम रु.37,000/- तक्रारदाराने सदर खातेपोटी भरलेले आहेत. उर्वरित रक्कम देय असून सदर कर्जाची मुदत दि.01/06/2010 रोजी संपलेली आहे. सबब पुढील पाच हप्त्याची रक्कमही अदयापि देय आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी शेडयूलप्रमाणेची देय रक्कम भरुन घ्यावी त्यावर कोणतेही दंडव्याज अथवा अन्य जादा आकार घेऊ नये. सदरची रक्कम भरणा केली नंतर तक्रारदाराचे वाहन तक्रारदाराच्या ताब्यात दयावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:-सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतीही सुचना न देता तसेच कोणतीही नोटीस न देता प्रस्तुतचे वाहन बळाचे जोरावर ओढून नेलेले आहे. सदरचे वाहन सध्या सामनेवाला यांचे ताब्यात आहे. तक्रारदारास पूर्व सुचना दिली असता किंवा नोटीस दिली असती तर तक्रारदारास नमुद थकीत रक्कमा देणेबाबत संधी राहिली असती मात्र सामनेवालांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता प्रस्तुतचे वाहन ओढून नेल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. सामनेवालांच्या या कृत्यमुळे तक्रारदारास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेत तक्रार दयावी लागली आहे. सामनेवालांच्या बेकायदेशीर कृत्यमुळे प्रस्तुतीच तक्रार दाखल करावी लागल्यामुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रककम मिळणेस पात्र आहे तसेच तक्रारदाराने हप्ते थकीत घालवलेले आहेत सबब तक्रारदार आर्थिक नुकसानीपोटी रक्कम मिळणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील नमुद वाहन शेडयूल 3 प्रमाणे निर्धारित असणारे 24 देय हप्त्यापैकी 37,000/-(रु.सदतीस हजार फक्त) वजा जाता उर्वरित रक्कम भरणा करुन घ्यावी सदर रक्कमेवर कोणत्याही प्रकारचे दंडव्याज अथवा अन्य प्रकारचे जादा आकार घेण्यात येऊ नयेत. सदर कायदेशीर देय रक्कमेचा भरणा केले नंतर प्रसतुतचे वाहन तक्रारदाराचे ताब्यात दयावे. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त)व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- (रु. दोन हजार फक्त) त्वरीत अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |