जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांकः 22/12/2008 आदेश पारित दिनांकः 01/12/2010 तक्रार क्र. - 749/2008 तक्रारकर्ता : अमर मोतीरामजी खोब्रागडे, वय : 37 वर्षे, व्यवसाय : खाजगी, रा. संत गजानन मंदीराजवळ, चिखली, कळमना मार्केट, वार्ड नं. 27, नागपूर-35. //- विरुध्द -// गैरअर्जदार : राजू सुखदेव दुधनकर, प्रोप्रा. लक्ष्मी प्लॉट अँड जमीन सेवा केंद्र, खंडवानी ऑफीसच्या वर, क्वार्टर नं.106, शांतीनगर (तुलसी नगर कॉलनी), नागपूर. तक्रारकर्त्यातर्फे : ऍड. श्री. संजय कस्तुरे.. गैरअर्जदारातर्फे : एकतर्फी कारवाई. गणपूर्तीः 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष. 2. श्री. मिलींद केदार - सदस्य. मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 01/12/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांकडून सन 2001 मध्ये बयानादाखल रु.8,500/- दि.19.12.2001 रोजी देऊन मौजा कळमना, प.ह.क्र.16, ख.क्र.60, 600 चौ.फु.क्षेत्रफळ असलेला प्लॉट क्र. 36 हा रु.18,000/- मध्ये घेण्याचा करार केला व उर्वरित रक्कम रु.9,500/- हे विक्रीपत्र करुन देण्याचे वेळेस ठरले. विक्रीपत्राची मुदत ही 19.12.2001 पासून 19.02.2002 पर्यंत ठरविण्यात आली होती. यानंतर तक्रारकर्त्याने रु.7,500/- वेळोवेळी गैरअर्जदारास दिले. यानुसार एकूण रु.16,000/- गैरअर्जदाराला तक्रारकर्त्याने रक्कम दिली व उर्वरित रक्कम रु.2,000/- देण्याची तयारी दर्शवून विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने रक्कमही परत केली नाही व विक्रीपत्रही करुन दिले नाही. यानंतर गैरअर्जदार फेब्रुवारी 2008 मध्ये तक्रारकर्त्याकडे येऊन रु.10,000/’ रकमेची अतिरीक्त मागणी केली. तक्रारकर्त्याच्या मते सदर मागणी ही अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब गैरअर्जदार करीत असल्याचे निदर्शनास येत असून कराराप्रमाणे गैरअर्जदार कृती करीत नसल्याने सेवेत त्रुटीदेखील करीत आहे. याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला कायदेशीर नोटीसही पाठविला. परंतू त्यास गैरअर्जदाराने दाद दिली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन उर्वरित रक्कम गैरअर्जदाराने स्विकारुन प्लॉटचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा विवादित प्लॉटची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत व्याजासह द्यावी, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला. पोस्टाच्या अहवालानुसार गैरअर्जदाराने नोटीस नाकारलेला आहे. तसेच गैरअर्जदाराने सदर तक्रारीस लेखी उत्तरही दाखल केले नाही व हजरही झाले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द दि.26.10.2010 रोजी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता मंचासमोर 16.11.2010 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. मंचाने सदर प्रकरणी दस्तऐवज क्र. 2 वरील सौदा चिठ्ठीचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने मौजा कळमना, प.ह.क्र.16, ख.क्र.60, 600 चौ.फु.क्षेत्रफळ असलेला प्लॉट क्र. 36 हा रु.18,000/- मध्ये तक्रारकर्त्याला विकण्याचा करार केलेला आहे व त्यावर उभय पक्षांनी स्वाक्ष-या केलेल्या आहेत. तसेच बयानादाखल रक्कम मिळाल्याचेही गैरअर्जदाराने मान्य केलेले आहे. यावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 5. तक्रारकर्त्याने विवादित प्लॉटच्या किंमतीच्या संदर्भात रकमा दिल्याच्या पावत्या व हफ्तेवारीने रक्कम दिल्याचा तपशिल दाखल केलेला आहे. सदर पावत्यांवरुन व तपशिलावरुन गैरअर्जदाराला तक्रारकर्त्याने बयाना म्हणून रु.8,500/- व रु.7,500/- हफ्तेवारीने दिल्याचे स्पष्ट होते. तसेच सौदा चिठ्ठीमध्ये विवादित प्लॉट रु.18,000/- मध्ये विकण्याचा करार झाल्याचे निदर्शनास येते. म्हणजेच तक्रारकर्त्याने एकूण किमतीपैकी रु.16,000/- गैरअर्जदारास दिले व उर्वरित रु.2,000/- देण्यास तयार आहे. परंतू वारंवार विक्रीपत्र करुन देण्याची मागणी करुनही व त्याबाबत नोटीस पाठवूनही गैरअर्जदार प्रतिसाद देत नाही. प्लॉटबाबत रक्कम स्विकारुन त्याचे विक्रीपत्र करारनाम्यानुसार करुन न देणे म्हणजे सेवेत निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट होते. तसेच सौदा चिठ्ठीमध्ये नमूद कालावधीमध्ये विक्रीपत्र करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची होती. ती पूर्ण न करुन गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे, म्हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्ता गैरअर्जदाराने किंमतीपैकी उर्वरित रु.2,000/- स्विकारुन विवादित प्लॉटचे विक्रीपत्र करुन मिळण्यास पात्र आहे. तसेच विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्याने सोसावा. जर गैरअर्जदार विक्रीपत्र करुन देण्यास काही अपरिहार्य कारणास्तव असमर्थ असतील तर त्यांनी तक्रारकर्त्याला रु.16,000/- ही रक्कम दि.13.02.2002 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज दरासह प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावी. 6. दस्तऐवजांच्या यादीनुसार दस्तऐवज क्र. 7 वरुन ते कोणी कोणाला उद्देशून लिहिलेले पत्र आहे की, केवळ नोंद आहे याचा काहीच अर्थबोध होत नाही, कारण सदर दस्तऐवजावर नाव अथवा स्वाक्षरी नाही. परंतू गैरअर्जदाराने सदर प्रकरणी हजर होऊन तक्रारीतील कथने नाकारली नाहीत किंवा ते खोडून काढण्याकरीता दस्तऐवजही दाखल केलेले नाही, म्हणून मंचाचे मते तक्रारकर्त्याने शपथपत्रावर दाखल केलेली तक्रार सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. 7. तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू त्यादाखल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. मंचाचे मते जरीही तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराच्या कृतीमुळे मानसिक व शारिरीक त्रास झाला असला तरीही तक्रारकर्त्याची सदर मागणी ही अवास्तव अवाजवी वाटते. तथापि, तक्रारकर्ता हा शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.10,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने मौजा कळमना, प.ह.क्र.16, ख.क्र.60, 600 चौ.फु.क्षेत्रफळ असलेला प्लॉट क्र. 36 चे विक्रीपत्र उर्वरित रक्कम रु.2,000/- घेऊन करुन द्यावे. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्याने सोसावा. किंवा गैरअर्जदार विक्रीपत्र करुन देण्यास काही अपरिहार्य कारणास्तव असमर्थ असतील तर त्यांनी तक्रारकर्त्याला रु.16,000/- ही रक्कम दि.13.02.2002 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज दरासह प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावी. 3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |