::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 4/10/2019)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संररक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. विरूध्द पक्ष क्र.1 व 2हे गुरूनानक प्रॉपर्टी डिल्स रिअल इस्टेट,वरोरा शिवालय नगर लेआऊटचे पार्टनर असून त्यांचा प्लॉट करिता जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी त्यांच्या मालकीच्या मौजा बोर्डा, तह.वरोरा,जि.चंद्रपूर येथे स.न.166 आराजी 1.04 हे.आर.पैकी प्लॉट परावर्तीत/लेआऊट करून ‘शिवालय नगर’ या नावाने विक्रीकरिता उपलब्ध करून दिले व सदर प्लॉटची विक्री ही पूर्ण हप्ते दिल्यानंतर ग्राहकांना करून देण्याचे ठरले होते. वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 व2 यांचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर असून त्यांना सदर शिवालय नगर लेआऊटमधील प्लॉटची बुकींग करून ग्राहकांकडून रक्कम घेऊन पावती देण्याचा पूर्ण अधिकार आहे. वि.प.क्र.3 यांनी सदर प्लॉटकरीता स्विकारलेली रक्कम ते वि.प.क्र.1 व2 यांना देतात. तक्रारकर्तीने वि.प.यांचेकडून सदर शिवालय नगर लेआऊटमधील 1 प्लॉट एकूण आराजी 1852.06 चौ.फुट प्रती रु.60/- चौ.फुटाप्रमाणे एकूण किंमत रू.1,11,123.60/- मध्ये विकत घेण्याकरीता दि.10.5.2008 रोजी वि.पक्षांसोबत करारनामा केला व त्यानुसार सदर प्लॉटची रक्कम हप्तेवारीने देण्याचे ठरले. तक्रारकर्तीने वि.प.क्र.1 व2 यांना हप्तेवारीने एकूण रक्कम रू.75,123/- वि.प.क्र.3 मार्फत दिली व ती त्यांनी स्विकारलेली आहे व त्याबाबत वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.1 व2 तर्फे सदर रक्कम स्विकारल्याच्या पावत्यासुध्दा दिल्या आहेत. तक्रारकर्ती ही वि.प.क्र.1 व 2 यांना सदर प्लॉटची पूर्ण रक्कम देण्यांस तयार असूनसुध्दा वि.प. हे सर्वरक्कम घेण्यांस तयार नव्हते. वि.प. हे तक्रारकर्तीस सदर प्लॉटची तिच्या नांवे नोंदणी करून ताबा देण्यांस टाळाटाळ करीत असल्याने तिने दि.31/10/2017 रोजी अधिवक्ता श्री.आर.सोमाणी मार्फत वि.प.यांना नोटीस पाठविला. वि.प. क्र.1 व 2 यांना पोस्ट ऑफीसने सुचना दिल्यानंतरही त्यांनी हेतुपूरस्सर स्वतःला गैरहजर दाखवून सदर नोटीस परत केला. वि.प.यांनी तक्रारकर्तीस करारनाम्याप्रमाणे सदर प्लॉटची पूर्ण रक्कम स्विकारून विक्री करून ताबा द्यावयास पाहिजे होता परंतू तक्रारकर्तीने, वि.प.यांनी मागणी करूनही नोंदणी न करून ताबा न देवून तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तक्रारकर्तीने वि.पक्षांविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीस शिवालय नगर लेआऊटमधील प्लॉट एकूण आराजी 1852.06 चौ.फुट प्लॉटची पूर्ण रक्कम स्विकारून नोंदणीकृत करून सदर प्लॉटचा ताबा तक्रारकर्तीस देण्याचा आदेश वि.पक्षांनी सदर प्लॉट नोंदणीकृत करून न दिल्याने तक्रारकर्तीस भाडयाच्या घरात राहावे लागत असल्याने सदर घरभाडयाची रक्कम रू.1,08,000/- व तिला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.20,000/- आणी नोटीस खर्च रू.5000/- विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीस द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्षां विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष 1ते 3 हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प.क्र.1 व 2 यांनी आपले संयुक्त लेखी कथन दाखल करून त्यामध्ये दि.10.5.2008 रोजी प्लॉटकरीता इसारपत्र करण्यात आल्याचे मान्य करून तक्रारकर्तीचे उर्वरीत कथन नाकबूल करून विशेष कथनामध्ये नमूद केले की तक्रारकर्तीने वि.प.क्र.3 यांचेसोबत संगनमत करून वि.प.क्र.1 व 2 यांना फसविण्यासाठी त्यांचेविरूध्द सदर तक्रार दाखल केली आहे व यापूर्वीच वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र. 1 व 2 यांचेविरूध्द मा.दिवाणी न्यायाधिश, क.स्तर, वरोरा येथे तथाकथित कमिशनच्या मिळकतीकरीता दावा दाखल केला असून तो प्रलंबीत आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी त्यांच्या शेतजमिनीवर अकृषक परवानगी घेऊन निवासी वापराकरिता लेआऊट टाकून त्याला शिवालय नगर नाव देऊन सदर प्लॉट विकण्याची योजना आखली त्यावेळी वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 व 2 यांचेकडे स्वतः आले व त्यांनी सदर प्लॉटकरीता ग्राहक आणण्याची तयारी दर्शविली व त्याकरिता आपल्या इच्छेप्रमाणे कमिशन देण्यांस सांगितले. त्यानुसार वि.प.क्र.3 हे सदर प्लॉटकरीता ग्राहक आणून देत व इसाराचे रकमेतून वि.प.क्र.3 यांना वि.प.क्र.1 व2 हे कमिशनची रक्कम देत असत.अनेकदा मनिष जेठाणी व मुरली जेठाणी हे ग्राहकांकडून स्वतः आधीच पैसे घेत व वि.प.क्र.1 व 2 यांना कमिशनची रक्कम कापून पैसे देत होते व ब-याच वेळा आगाऊ रक्कम आधीच कापून घेत असत. ही बाब वि.प.क्र.1 व2 यांचे निदर्शनांस आल्यावर त्यांनी वि.प.क्र.3 यांना विचारणा केली असता त्यांनी कमिशन व्यतिरीक्त घेतलेल्या आगाऊ रकमेचा कधीच हिशोब दिला नाही, याशिवाय वि.प.क्र.3 यांनी ग्राहकांकडून सौद्याच्या रकमेपैकी उर्वरीत रक्कम घेऊन पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याची बाब वि.प.क्र.1 व 2 यांचे लक्षात आल्याने त्यांनी वि.प.क्र.3 तर्फे महेश व मुरली जेठाणी सोबतचे व्यवहार व संबंध संपूष्टात आणले. वि.प.क्र.3 यांनी सौदा केलेल्या प्रस्तावीत खरेदीदारांकडून उभय पक्षात झालेल्या कराराची याग्य अवधीत पुर्तता न केल्याने त्यांचेमुळे वि.प.क्र.1 व2 यांना आर्थीक नुकसान सोसावे लागले. तक्रारकर्तीने करारनाम्यानुसार दि.10/11/2009 पर्यंतच संपूर्ण रक्कम देऊन विक्रीपत्र नोंदवून घ्यायला पाहिजे होते परंतु तक्रारकर्तीने तसे केले नाही वा तशी तयारीसुध्दा दर्शविली नाही व त्यानंतरचा तक्रारकर्ती व वि.प.क्र.3 यांचा परस्पर झालेला व्यवहार वि.प.क्र. 1 व 2 यांचेवर बंधनकारक नाही. तक्रारकर्तीची कोणतीही रक्कम वि.प.क्र.1 व 2 यांना मिळाली नाही.वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र. 1 व 2 यांचेविरूध्द दि.13/9/2012 रोजी दावा दाखल केल्यानंतर तक्रारकर्तीकडून कोणतीही रक्कम स्विकारावयास नको होती. वि.प.क्र.1 व 2 यांनी सन 2012 मध्ये वि.प.क्र.3 तर्फे मुरली व महेश जेठाणी सोबतचे संबंध संपूष्टात आलेले होते त्यामुळे तक्रारकर्ती जर कोणतीही रक्कम मिळण्यांस पात्र असेल तर ती देण्याची वि.प.क्र.1 व2 यांची जबाबदारी नसून वि.प.क्र.3 यांची आहे. सबब तक्रारकर्तीची तक्रार त्यांचेविरूध्द खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
4. विरूध्द पक्ष 3 हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प.क्र. 3 यांनी आपले लेखी कथनात नमूद केले की विरूध्द पक्ष क्र.1 व 2हे गुरूनानक प्रॉपर्टी डिल्स रिअल इस्टेट,वरोरा शिवालय नगर लेआऊटचे पार्टनर असून त्यांचा प्लॉट करिता जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वि.प.क्र.1 व 2 यांनी त्यांच्या मालकीच्या मौजा बोर्डा, तह.वरोरा, जि.चंद्रपूर येथे स.न.166 आराजी 1.04 हे.आर.पैकी प्लॉट परावर्तीत/लेआऊट करून ‘शिवालय नगर’ या नावाने विक्रीकरिता उपलब्ध करून दिले व सदर प्लॉटची विक्री ही पूर्ण हप्ते दिल्यानंतर ग्राहकांना करून देण्याचे ठरले होते. वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 व2 यांचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर असून त्यांना सदर शिवालय नगर लेआऊटमधील प्लॉटची बुकींग करून ग्राहकांकडून रक्कम घेऊन पावती देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तक्रारकर्तीने वि.प.यांचेकडून सदर शिवालय नगर लेआऊटमधील 1 प्लॉट एकूण आराजी 1852.06 चौ.फुट प्रती 60/- चौ.फुटाप्रमाणे एकूण किंमत रू.1,11,123.60/- मध्ये विकत घेण्याकरीता दि.10.5.2010 रोजी वि.पक्षांसोबत करारनामा केला व त्यानुसार सदर प्लॉटची रक्कम हप्तेवारीने देण्याचे ठरले. तक्रारकर्तीने वि.प.क्र.1 व2 यांना प्लॉटच्या किमतीचे हप्त्यांची वि.प.क्र.3 मार्फत रक्कम दिली व ती त्यांनी स्विकारलेली आहे. त्याबाबत वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.1 व 2 तर्फे सदर रक्कम स्विकारल्याच्या पावत्यासुध्दा तक्रारकर्तीला दिल्या असून तक्रारकर्तीकडून सदर प्लॉटकरीता स्विकारलेली संपूर्ण रक्कम वि.प.क्र.1 व 2 यांना दिली आहे. सदर प्लॉटचे विक्रीपत्र नोंदणीकृत करून देण्याचा अधिकार फक्त हा वि.प.क्र.1 व 2 यांनाच आहे. वि.प.क्र.3 हे फक्त प्लॉट बुकींग व पावत्या देण्याचे काम वि.प.क्र.1 व 2 यांचे करारनाम्यानुसार व सांगण्यानुसार करतात. वि.प.क्र.1 व 2 यांनी जसे वि.प.क्र.3 यांना सांगितले त्याप्रमाणेच तक्रारकर्तीस कळवून पुढील पावत्या देण्याचे थांबविले, यात वि.प.क्र.3 यांची काहीही चुक नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने सर्व नुकसान-भरपाई व सदर प्लॉटचे विक्री नोंदणीकृत करून घेण्याचे काम वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून करून घ्यावे. मंचाने सदर प्लॉटची पूर्ण रक्कम स्विकारण्याचे आदेश वि.प.क्र.3 यांना दिल्यास ते सदर रक्कम तक्रारकर्तीकडून स्विकारण्यांस तयार आहेत. सबब वि.प.क्र.3 यांचे लेखीउत्तर.
5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्तीची तक्रार व दस्तावेजांनाच शपथपत्र समजण्यात यावे अशी दि. 16/8/2018 रोजी नि.क्र.14 वर दाखल केलेली पुरसीस, तक्रारकर्तीचा लेखी युक्तीवाद तसेच विरूध्द पक्षांचे लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तरालाच वि.प.क्र.1 व 2 चा पुरावा समजण्यांत यावा अशी दि. 12/11/2018 रोजी नि.क्र.15 वर दाखल केलेली पुरसीस, वि.प.क्र.3 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तर वदस्तावेजांनाच वि.प.क्र.3 चा पुरावा समजण्यांत यावा अशी दि. 12/3/2019 रोजी नि.क्र.16 वर दाखल केलेली पुरसीस, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व विरूध्द पक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्ती प्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र.1 व 2 सोबत करारनामा केला होता ही बाब विरूध्द पक्षांसदेखील मान्य असून सदर करारनामा नि.क्र.5 वरील दस्त क्र.1 वर दाखल आहे. सदर करारनाम्यात तक्रारकर्तीने वि.प.यांचेकडून त्यांच्या मौजा बोर्डा, तह.वरोरा,जि.चंद्रपूर येथे स.न.166 आराजी 1.04 हे.आर.पैकी प्लॉट परावर्तीत/लेआऊट शिवालय नगर लेआऊटमधील प्लॉट क्र.46, एकूण आराजी 1852.06 चौ.फुट प्रती 60/- चौ.फुटाप्रमाणे एकूण किंमत रू.1,11,123.60/- मध्ये विकत घेण्याकरीता दि.10.5.2008 रोजी वि.पक्षांसोबत करारनामा केला व त्यानुसार सदर प्लॉटची रक्कम हप्तेवारीने देण्याचे ठरले. तक्रारकर्तीने वि.प.क्र.1 व 2 यांना एकूण रक्कम रू.73,123/- वि.प.क्र.3 मार्फत दिली व ती त्यांनी स्विकारलेली आहे व त्याबाबत वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्र.1 व2 तर्फे सदर रक्कम स्विकारल्याच्या पावत्यासुध्दा दिल्या आहेत.सदर पावत्या नि. क्र.5वरील दस्त क्र 2 ते 2 इ वर दाखल आहेत. यावरून तक्रारकर्ती ही विरूध्द पक्षांची ग्राहक आहे हे सिध्द होते. शिवाय सदर वाद हा पैसे स्विकारूनही भुखंडाचे विक्रीपत्र करून न दिल्याबाबतचा असल्यामुळे तक्रारीला कारण हे सातत्याने घडत असून तक्रार ही मुदतीत दाखल करण्यांत आलेली आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्यामध्ये भुखंड विक्रीबाबत उपरोक्त प्रमाणे करारनामा होवून दाखल पावत्यानुसार तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र.3 यांचेमार्फत विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडे भुखंडाच्या किंमतीचे रकमेपैकी रू.73,123/- जमा केले. परंतु विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी उर्वरीत रक्कम स्विकारून भुखंडाचे विक्रीपत्र करून दिलेले नाही. यासंदर्भात विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्र.3 मार्फत भुखंडाची रक्कम भरल्याची बाब मान्य केलेली आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष क्र.3 हे विरूध्द पक्ष क्र.1 व 2 करीता अभिकर्त्याची भुमिका बजावीत होते हे निर्विवाद आहे. अशा परिस्थितीत विरूध्द पक्ष क्र.1 व 2 आणि विरूध्द पक्ष क्र.3 यांच्यात काही व्यवहारांमुळे आपसी विवाद उत्पन्न झाले असले तरी देखील सदर विवादाचा प्रस्तूत व्यवहाराशी प्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. मालक वि.प.क्र.1 व 2 हे अभिकर्ता वि.प.क्र.3 ने केलेल्या व्यवहारांकरीता जबाबदार असल्यामुळे प्रस्तूत प्रकरणी वि.प.क्र.1 व 2 यांना सदर जबाबदारी टाळता येणार नाही. तक्रारकर्तीने भुखंडाच्या एकूण किंमतीपैकी बहुतांश रक्कम चुकती केली असून उर्वरीत रक्कम चुकती करून ती भुखंडाचे विक्रीपत्र करून देण्याबाबत तिने विरूध्द पक्षांना नोटीसदेखील पाठवली . असे असूनही विरूध्द पक्ष क्र.1,2 व 3 यांनी तक्रारकर्तीला भुखंडाचे विक्रीपत्र करून न देवून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करून तिला त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरूध्द पक्षांकडून तिने भुखंडापोटी जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यांस तसेच झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.206/2017 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या
तक्रारकर्तीला भुखंडाचे किंमतीपोटी जमा केलेली रक्कम रू.73,123/-
त्यावर तक्रार दाखल दिनांक 18/12/2017 पासून रक्कम अदा
करेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत द्यावी.
(3) विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तरीत्या
तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी
नुकसान भरपाई रू.10,000/- व तक्रार खर्चापोटी रू.5,000/-
द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.