नि.32 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 240/2010 नोंदणी तारीख – 14/10/2010 निकाल तारीख – 11/2/2011 निकाल कालावधी – 117 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री धैर्यशील हरिचंद्र पवार रा.सर्व्हे नं.77/6 अ, मौजे कोंडवे, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री संग्राम राजेभोसले) विरुध्द श्री राजेंद्र अरविंद साळुंखे रा.171, गुरुवार पेठ, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री वसंतराव भोसले) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांचे मालकीचे मौजे कोंडवे येथील मिळकतीमध्ये घर बांधावयाचे ठरविले. जाबदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. अर्जदार व जाबदार यांचेमध्ये बांधकामाबाबत लेखी करारनामा झाला. त्यानुसार बांधकामाची किंमत रु.18,90,000/- इतकी ठरली. जाबदार यांनी संपूर्ण बांधकाम करुन घराचा कब्जा डिसेंबर 2009 मध्ये अर्जदार यांना दिला. परंतु पावसाळा सुरु झाल्यानंतर अर्जदार यांचे निदर्शनास आले की, पावसाळयात घराचा संपूर्ण पहिला मजला गळत आहे व त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण पहिला मजला वापरण्यायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांना त्रास हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पहिल्या मजल्यावरील रंग व पार्कींगचा रंग पूर्णपणे खराब झाला असून तो पूर्ववत करण्यासाठी रु.70,000/- इतका खर्च येणार आहे. तसेच अर्जदार याचे फर्निचरचे नुकसान रु.80,000/- इतके झाले आहे. तसेच वॉटर प्रूफिंगसाठी रु.1,50,000/- इतका खर्च येणार आहे. अशा प्रकारे जाबदार हे अर्जदार यांना रु.3 लाख इतके देणे लागतात. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी नोटीस स्वीकारली नाही. सबब जाबदारकडून अर्जदार यांना रु.3,27,000/- मिळावेत, व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 19 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचे घराचे बांधकाम करताना काही जादा कामे केली आहेत त्या बाबी अर्जदार यांनी तक्रारअर्जात नमूद केलेल्या नाहीत. जाबदार याने बांधकाम व्यवसायात सातारा परिसरात चांगले नाव कमावलेले आहे. ठरलेप्रमाणे बांधकाम चालू असताना अर्जदार यांनी वेळोवेळी त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केल्या. त्यांचे सुचनेनुसार इमारतीमध्ये अंतर्गत बदल केले. तसेच जादा टॉयलेट, किचनकट्टा बसविण्यात आला आहे. तसेच करारात ठरल्यापेक्षा जादा क्षमतेच्या खिडक्या बसविल्या आहेत. याशिवाय इतरही जादा कामे जाबदार यांचेकडून अर्जदार यांनी करुन घेतलेली आहेत. त्याचा सविस्तर तपशील जाबदार यांनी कैफियतीचे कलम 4 मध्ये नमूद केला आहे. सदरच्या जादा कामाची किंमत अर्जदार यांनी जाबदार यांना अदा केलेली नाही. जाबदार यांस अर्जदारकडून अद्याप रु.2,25,702/- इतकी रक्कम येणे आहे. इमारतीचे स्लॅबचे वॉटर प्रूफिंग करण्याचे ठरले नव्हते. जादा कामाची रक्कम द्यावी लागू नये म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्त्यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.35 ला पाहिला. जाबदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 34 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, त्यांनी जाबदार यांचेकडून त्यांचे घराचे बांधकाम करुन घेतलेनंतर घराचा ताबा घेतला. परंतु पावसाळयात त्यांचे घराचा पहिला मजला संपूर्ण गळत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे अर्जदारचे मोठे नुकसान झाले सबब सदरचे नुकसानीपोटी रक्कम रु.3,27,000/- मिळावेत अशी अर्जदार यांनी मागणी केली आहे. अर्जदार यांनी त्यांचे सदरचे कथनांचे पृष्ठयर्थ नि.15 ला बांधकाम क्षेत्रातील शासनमान्य तज्ञ व्यक्ती श्री उमेश भोसले यांचा अहवाल दाखल केला आहे. तसेच नि.5/5 ला इमारतीचे फोटो दाखल केले आहे. सदरचा श्री उमेश भोसले यांचा अहवाल व इमारतीचे फोटो पाहिले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, अर्जदार यांचे स्लॅबला गळती असून त्यामुळे अर्जदारचे घराचे व साहित्याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. श्री उमेश भोसले यांनी त्यांचे अहवालाचे समर्थनार्थ नि.16 ला शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीत असे कथन केले आहे की अर्जदार व जाबदार यांचेमध्ये वॉटर प्रुफिंगचे काम ठरलेले नव्हते. परंतु सदरचे कथनाशी हा मंच आजिबात सहमत होत नाही कारण अर्जदारचे घराचे स्लॅबमधून जर गळती होत असेल तर स्लॅबचे बांधकाम जाबदार यांनी योग्य प्रकारे केलेले नाही हे त्याचे एकमेव कारण आहे. त्याचा वॉटर प्रूफिंग करणेशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारे वरील कारणांचा विचार होता जाबदार यांनी सदोष बांधकाम करुन अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 6. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये रंगकाम पूर्ववत करणेसाठी रु.70,000/-, फर्निचरचे नुकसानीपोटी रु.80,000/- व स्लॅबची गळती थांबविण्याकरिता वॉटर प्रुफींग करण्यासाठी रु.1,50,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व नोटीस खर्च रु.2,000/- अशी एकूण रु.3,27,000/- ची मागणी केली आहे. परंतु अर्जदार यांनी श्री उमेश भोसले यांचा जो अहवाल दाखल केला आहे त्यामध्ये नुकसानीपोटी व गळती थांबविण्याकरिता होणा-या खर्चाची अंदाजित रक्कम रु.2,17,000/- इतकी नमूद केली आहे. सबब सदरचे तज्ञ व्यक्ती श्री उमेश भोसले यांचे अहवालाचा विचार करता अर्जदार हे जाबदार यांचेकडून रु.2,17,000/- एवढी रक्कम अर्ज दाखल तारखेपासून होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीत असे नमूद केले आहे की, त्यांनी अर्जदार यांचे सांगणेवरुन त्यांचे घराचे जादा काम केले आहे त्याची रक्कम अर्जदार यांनी जाबदार यांना दिलेली नाही. परंतु सदरचे कथन प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी विचारात घेता येणार नाही. जर तशी वस्तुस्थिती असेल तर जाबदार हे अर्जदार यांचेकडून जादा बांधकामाच्या मोबदल्यापोटी रक्कम वसुलीसाठी योग्य त्या न्यायालयात अर्जदारविरुध्द दाद मागू शकतात. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. रक्कम रु.2,17,000/- द्यावेत व या रकमेवर अर्ज दाखल तारीख 14/10/2010 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे देय होणारे व्याज द्यावे. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 11/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |