::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-30/06/2020)
1. तक्रारकर्ता यांच्या मालकीची मारुती गाडी असून त्याचा क्रमांक एम एच 34/AA/2193 असून त्याचे रजिस्ट्रेशन दिनांक 3/8/2010 आहे. तक्रारकर्ते यांचे सदर गाडीमध्ये दिनांक 22 /8 /2017 रोजी बिघाड झाल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 23/8/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्र.1 यांचे परफेक्ट कार रिपेरिंग व सर्विस सेंटर येथे दुरुस्तीला दिली. तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्ती करीता रू. 4,000/- ॲडव्हान्स विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांना दिले. परंतू विरूद्ध पक्ष क्र. 1 यांनी, त्यांच्याकडे गाडी दुरुस्तीचा परवाना नसल्याचे सांगून क्रमांक 2यांचे दुकानाचे लेटरपॅडवर सामान व मजुरीचा खर्च 6,970/- रुपये चे बिल दिले व तक्रारकर्त्यास पाच ते सात दिवसांनी सदर कार दुरुस्त करून मिळेल असे सांगितले. विरुद्ध पक्ष क्र.1 व विरुद्ध पक्ष क्र.2 यांचे दुकान लागून असल्यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी विरूध्द पक्ष क्रं. 2 यांचे लेटरपॅडवर दिशाभूल करणारे बिल देऊन तक्रारकर्त्याची फसवणूक केली. त्यानंतर विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी दिनांक- 27/ 8/2017 रोजी तक्रारकर्त्याला उपरोक्त गाडी दुरुस्त झाल्याचे सांगून सर्विस सेंटरला बोलावले व त्याच्याकडून रुपये 1500/-नगदी घेतले परंतु त्याची पावती दिली नाही परंतु विरूद्ध पक्ष क्र. 1 ने गाडी दुरुस्त केली नव्हती. त्याकरीता तक्रारकर्ता यांनी विरुद्धधपक्ष क्रं.1 यांच्याकडे चार पाच वेळा जाऊन गाडी दुरुस्त केल्याबाबत विचारणा केल्यानंतरही त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले म्हणून तक्रारकर्ता हे परत दिनांक 21/11/2017 रोजी त्यांचेकडे गेले व त्यांनी विचारणा केली असता सदर गाडी दुरुस्त केली नाही म्हणून सांगितले व तेव्हा त्यांनी तक्रारकर्त्या सोबत वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली व तक्रारकर्त्याने सदर गाडी नेली नाहीतर विकून टाकू असे विरुद्ध पक्ष क्र. एक व दोनने धमकावले. म्हणून तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांचे विरुद्ध दोन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. उपरोक्त गाडी विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी दुरुस्त करून न दिल्यामुळे तक्रारकर्ता हे एलआयसीचा व्यवसाय करू शकले नाहीत व त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 30/10/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्रमांक एक यांना नोटीस पाठवली, परंतु विरुद्ध पक्ष यांनी खोटे उत्तर दिले. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व दोन यांचेदुकान लागून असल्यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 1हे क्रमांक दोन चे दुकानाचे नावाची लेटरपॅडवर बिल दिले असल्यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी उपरोक्त गाडी दुरुस्त करून न दिल्यामुळे झालेल्या आर्थिक मानसिक नुकसान विरुद्ध पक्ष क्रमांक दोन सुद्धा जबाबदार आहे. सबब तक्रारकर्ता यांनी विरुद्ध पक्षांविरुद्ध विरुद्ध तक्रार दाखल करून त्यामध्ये अशी मागणी केली की विरुद्ध पक्ष यांनी बिलामध्ये दिलेल्या रकमेनुसार उपरोक्त गाडी पूर्णपणे दुरुस्त करून तक्रारकर्त्यास द्यावी तसेच तक्रारकर्त्याचे व्यवसायाचे नुकसान झाल्यामुळे 1 व 2 यांनी संयुक्तरीत्या नुकसान भरपाई रक्कम रुपये 3,00,000 /- द्यावे तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये 1,00,000/- ,तक्रारीचा खर्च रुपये 15,000/- द्यावा अशी विनंती केली.
2 तक्रारकर्ता यांची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्षांना नोटीस काढण्यात आले. विरुद्ध पक्ष क्रमांक एक व दोन उपस्थित राहून त्यांनी आपले लेखी कथन दाखल केले विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी आपले लेखी जबाबात ते परफेक्ट कार रिपेरिंग सेंटर या नांवाने चार चाकी गाडी दुरुस्तीचे काम करतात तसेच दिनांक 23/08/2017 रोजी तक्रारकर्ता यांनी त्यांचे दुकानाचे आवारात स्वतःची कार दुरुस्तीकरिता आणली होती तसेच विरुद्ध पक्ष क्रमांक एक व विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांचे दुकान लागून आहे ह्या बाबी मान्य केल्या असून तक्रारकर्त्याचे उर्वरित कथन नाकबूल केले आहे. पुढे आपल्या विशेष कथनामध्ये विरुद्ध पक्ष यांनी नमूद केले की तक्रारकर्ता हे विरुद्ध पक्ष क्रमांक एक यांचेकडे दिनांक 23/8/2017 रोजी एक मारुती कार घेऊन आले व दुरुस्ती करण्यायोग्य आहे काय व किती खर्च येणार अशी चौकशी केली. त्यावेळी सदर गाडीचे निरीक्षण करून इंजिनचे काम करावे लागेल व त्या करिता अंदाजे रुपये 25,000/- ते 30,000 /- खर्च येणार असे सांगितले परंतु सदर गाडीही जुनी आहे व ती विकल्यास त्याची किंमत रुपये 25,000/- ते 30,000/-येण्याची शक्यता आहे ही बाब तक्रारकर्त्यास माहिती असल्याने गाडी दुरुस्त करणे परवडणार नाही म्हणून त्याने नकार दिला. परंतु तक्रारकर्त्याची गाडी नादुरुस्त असल्याने त्यांनी विरुद्ध पक्ष क्र.1यांचे आवारात ठेवून ते निघून गेले. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सदर गाडी त्यांच्या आवारातून नेण्यास सांगितले. त्यावेळी तक्रारकर्त्याने तुम्ही गाडी दुरुस्तीची जास्त रक्कम का सांगितली व तुम्ही लोकांना फसविता अशा शब्दात वाद घातला व मी माझी गाडी केव्हाही घेऊन जाणार अशी धमकी दिली विरुद्ध पक्ष यांनी गाडी दुरुस्त केली नाही त्यामुळे विरूद्ध पक्ष्यांना काही रक्कम देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. विरुद्ध पक्ष यांनी कोणतीही रक्कम घेतली नाही आणी तक्रारकर्त्याने गाडीसाठी काही सामान विकत घेतले असल्यास त्याचा विरुद्ध पक्ष क्रमांक एक यांच्याशी काही संबंध नाही. सदर गाडी ही फार जुनी असल्याने निकामी झाली आहे व तक्रारकर्त्यास गाडी न मिळाल्याने त्याचे काही नुकसान झाले नसेल कारण त्यांचे उत्पन्न एक लाख असते तर त्यांच्याकडे श्रीराम सिटी फायनान्स चे कर्जाची थकबाकी नसते. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांच्याकडे सदर गाडी दुरुस्ती करिता दिली नव्हती व वास्तविकतः गाडी वापस नेण्याची जबाबदारीही त्याची होती व आहे. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांचे विरोधात खोटी तक्रार दाखल करून विरुद्ध पक्षांना मानसिक त्रास दिला सबब तक्रारकर्त्याची तक्रार रक्कम रुपये पन्नास हजार खर्च बसवून खारीज करण्यात यावी अशी विनंती केली .
3. प्रस्तुत प्रकरणात मंचाने काढलेल्या नोटीस अनुषंगाने विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांनी मंचा समक्ष उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याने त्यांचेकडून कारचे कोणतेही सुटे भाग खरेदी केले नसून त्या संदर्भात तक्रारकर्त्याने दाखल केलेली पावती ही बनावट असल्याचे नमूद केले आहे. तक्रारकर्ता हे विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांचे ग्राहक नसल्यामुळे प्रस्तूत तक्रार विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांचे विरुद्ध खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी अनुक्रमे नि.क्र.7व 19वर दाखल केलेले लेखी उत्तर, नि.क्र.27व 24वर दाखल केलेले शपथपत्र, दस्तावेज, नि.क्र.34व 35वर दाखल केलेले लेखी युक्तिवाद आणि उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यांचा विचार करता मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षांचा ग्राहक आहे काय?
होय
2. विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याप्रति न्यूनतापूर्ण नाही
सेवा दिली आहे काय?
3. आदेश काय? अंतिम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रमांक 1 बाबत..
5. तक्रारकर्ता यांच्या मालकीची मारुती गाडी क्रमांक एम एच 34/AA/2193 मध्ये दिनांक 22/8/2017 रोजी बिघाड झाल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 23/8/2017 रोजी विरुद्ध पक्ष क्र.1 यांचे परफेक्ट कार रिपेरिंग व सर्विस सेंटर येथे दुरुस्तीला दिली. त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांना रू. 4,000/- ॲडव्हान्स दिले तेव्हा विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी त्यांच्याकडे गाडी दुरुस्ती चा परवाना नसल्याचे सांगून विरुद्ध पक्ष क्रमांक दोन या कारच्या सुटे भाग विक्रेता यांचे दुकानाचे लेटरपॅडवर सामान व मजुरीचा खर्च 6,970/- रुपये चे बिल दिले असे तक्रारकर्त्याने नमूद केले आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी आपले लेखी उत्तरामध्ये,त्यांच्या परफेक्ट कार रिपेरिंग सेंटर येथे चार चाकी गाडी दुरुस्तीचे काम करता दिनांक 23/08/2017 रोजी तक्रारकर्ता यांनी त्यांचे दुकानातील आवारात दुरुस्तीकरिता आणली होती, विरुद्ध पक्ष क्रमांकएकव विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांचे दुकान लागून आहे ह्या बाबी मान्य केल्या आहेत. शिवाय तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांचे दुकानातून कारचे सुटे भाग विकत घेतल्या बाबतच्या पावतीची मूळ प्रत प्रकरणात निशाणी क्रमांक 5 वर दस्तक्र.1वर दाखल केलेली आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांनी सदर पावती नाकारली असली तरी अशा परिस्थितीत खोट्या व बनावट पावती बद्दल त्यांनी तक्रारकर्त्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विधिग्राह्य मार्गांचा अवलंब करून कायदेशीर कारवाई केल्याचा एकही पुरावा उपस्थित केलेला नाही. यावरून सदर पावती ही खरी असल्याचे निदर्शनास येते त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुद्ध पक्ष क्रमांक एक व दोन यांचे ग्राहक आहेत ही बाब सिद्ध होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत
6. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचेकडून विकत घेतलेल्या सुट्या भागांच्या पावतीतच विरुद्ध पक्ष क्र. एक सर्विस सेंटर यांना द्यावयाच्या दुरुस्ती खर्चापैकी आगाऊ रक्कम आकारण्यात आली असे तक्रारकर्ता यांनी म्हटले आहे. मात्र तसे सिद्ध करणारा कोणताही पुरावा प्रकरणात उपलब्ध नाही. याउलट विरुद्ध पक्ष क्रमांक एक व दोन हे दोन वेगवेगळे व्यवसायिक असल्याचे सिद्ध करणारे आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र मुंबई दुकाने व संस्था अधिनियम, 1948 अंतर्गतचे दस्तावेज विरुद्ध पक्ष क्रमांक एक व तसेच विरूध्दपक्ष क्रं. 2 यांनी सुध्दा त्यांचे दुकानाचे आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र हे दस्ताऐवज दाखल केलेले आहेत. शिवाय तक्रारकर्त्याच्या कारच्या इंजिनचे काम करावे लागणार असल्यामुळे त्यावर मोठा दुरुस्ती खर्च अपेक्षित होता व तो देण्यास तक्रारकर्ता यांनी नकार दिल्यामुळे सदर वाहन विरुद्ध पक्ष क्रमांक एक ह्यांनी दुरुस्त केले नाही असे विरुद्ध पक्ष क्रमांक एक यांचे म्हणणे आहे.एकदा गाडीच्या इंजिनचे काम करावयाचे असल्यास गाडीचे संपूर्ण इंजिन उघडल्याशिवाय त्यास किती व कोणते स्पेअर पार्टस लागतात इंजिन न उघडता कुठल्याही एक्स्पर्ट मेकॅनिकलला कुठले व कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्टस लागतील हे सांगता येत नाही करीता तक्रारकर्त्याच्या वाहनाचे संपूर्ण काम आगाऊ दिलेल्या रकमेतच वा कमी रकमेत करावे व तसे न केल्यास सेवेतील त्रृटी होऊ शकत नाही .विरुद्ध पक्ष क्रमांक एक हे जास्त दुरुस्ती खर्च आकारीत होते असा आक्षेप तक्रारकर्त्याने देखील तक्रारीत नमूद केलेला आहे. अशा परिस्थितीत विरुद्ध पक्ष क्रमांक एक यांनी विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांचे पावतीवर तक्रारकर्त्या कडून दुरुस्ती खर्चाची आगाऊ रक्कम घेतली हा आक्षेप ग्राह्य धरता येत नाही. तसेच विरुद्ध पक्ष क्रमांक दोन यांनी पुरविलेल्या सुट्या भागांबाबत तक्रारकर्त्यांनी कोणतीही तक्रार नोंदविलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुद्ध पक्ष क्रमांक एक व दोन यांचे विरुद्ध केलेले आरोप हे कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून ते सिद्ध करू शकले नाहीत व परिणामतः तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी नोंदवण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत
7. वरील मुद्दा क्रमांक 1 व 2 मधील निष्कर्षांच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
(1). तक्रारकर्त्याची तक्रार क्रमांक 207/2017 खारीज करण्यात येते.
(2). उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे) (श्रीमती.कीर्ती वैदय(गाडगीळ)(श्री.अतुल डी. आळशी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.