निकालपत्र
निकाल दिनांक – १६/०३/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्र.१ ही नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून सामनेवाले क्र.३ ते १८ हे सदर पतसंस्थेचे संचालक आहेत. सामनेवाले हे ग्राहकांकडुन ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे अशाप्रकारचा वित्तीय व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सामनेवालेकडे मुदतठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविलेली होती. सदर ठेवींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ.नं. | मुदत ठेव रक्कम | खाते नंबर | ठेव ठेवल्याची तारीख | ठेव परत मिळण्याची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
१) | १,४०,५३७/- | १०२७६ | ०४/०१/२०१४ | ०४/०१/२०१५ | १,५७,३९८/- |
२) | २,००,०००/- | १०१६० | ३०/१२/२०१३ | ३०/१२/२०१४ | २,२४,०००/- |
३) | २,५०,८८०/- | ११३१० | १५/०१/२०१४ | १५/०१/२०१५ | २,८०,९८५/- |
४) | ७०,२६७/- | १०२७७ | १७/०१/२०१४ | १७/०१/२०१५ | ७८,६९९/- |
५) | २,००,०००/- | ११०१७ | २०/०६/२०१४ | २०/०६/२०१५ | २,२४,०००/- |
६) | २,००,०००/- | ११०१६ | २०/०६/२०१४ | २०/०६/२०१५ | २,२४,०००/- |
एकुण रक्कम रूपये ११,८९,०८२/- |
तक्रारदाराने सदर मुदत ठेवीच्या रकमा मुदतीपूर्तीनंतर सामनेवाले यांना मागितल्या असता सामनेवाले यांनी त्या दिल्या नाहीत व त्यावरील व्याजदेखील दिले नाही. वर नमुद मुदत ठेवी द.सा.द.शे. १२% व्याजदराने १ वर्षाकरीता सामनेवालेकडे ठेवलेल्या होत्या व आहेत. सदर मुदतठेवींची सव्याज रक्कम सामनेवाले यांनी अद्यापपावेतो तक्रारदार यांना दिलेली नाही व कर्तव्यात कसुर केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने सदर अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाले क्र.१ ते १८ यांचेकडुन मुदत ठेव पावती/ खाते नं.१०२७६, १०१६०, ११३१०, १०२७७, ११०१७, ११०१६ या पावत्यांवरील एकुण रक्कम रूपये ११,८९,०८२/- देण्याबाबत हकूम व्हावा. सदर रक्कम मिळेपावेतो मुदतठेवीच्या मुदतपूर्ती दिनांकापासून प्रत्यक्ष ती रक्कम तक्रारदार यांचेकडे सुपूर्त करण्याच्या दिनांकापर्यंत त्यावर द.सा.द.शे. १८ % दराने व्याज देण्याचा सामनेवाले यांना हुकूम व्हावा. तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रूपये ३०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रूपये १५,०००/- सामनेवालेकडून मिळावा.
३. तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्ट्यर्थ नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ६ वर दस्तऐवज यादीसोबत मुदतठेव पावतींच्या छायांकीत प्रती, अपर निबंधकांचे जिल्हा उपनिबंधकास दिलेल पत्र, जिल्हा उपनिबंधकांनी सामनेवालेंना दिलेले पत्र दाखल केले आहे. निशाणी ३६ वर सरतपासणीकामीचे शपथपत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदारांची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस प्राप्त होऊन सामनेवाले क्र.१८ यांनी नि.३० वर खुलासा दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खरा नाही व या सामनेवालेस मान्य व कबुल नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१८ यांना सदर अर्जात विनाकारण सामील केले असल्यामुळे सदर तक्रारीस मिस जॉईंडर ऑफ पार्टीजच्या तत्वाची बाध येते. सामनेवाले क्र.१८ यांनी सामनेवाले क्र.१ पतसंस्थेमध्ये सचिव म्हणुन नोकरी करीत होते व दिनांक ०१-०२-२०१५ रोजी त्यांनी राजीनामा दिलेला आहे व तो सामनेवाले क्र.१ पतसंस्थेने मंजुर केला आहे. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाले क्र.१८ यांच्यामध्ये कोणताही व्यवहार कधीही झालेला नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.१८ तक्रारदारास कोणतीही रक्कम देणे लागत नाही. तसेच तक्रारदाराने तक्रार मुदतीत दाखल केली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.१८ यांनी केली आहे.
सामनेवाले क्र.१८ यांनी खुलाश्याचे पुष्ट्यर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तसेच निशाणी ३२ वर दस्तऐवज यादीसोबत तक्रार क्रमांक १५७/१५ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर यांची निकालाची प्रत, सामनेवाले क्र.१८ यांनी सचिव पदाचा दिलेला राजीनामा व सदर राजीनामा मंजुर कलेचा ठरावाचे पत्र दाखल केले आहे. निशाणी ३७ वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
५. सामनेवाले क्र.१,२,३,८,९,१०,१२,१५ व १६ यांनी निशाणी ३४ वर कैफियत दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खरा नाही व या सामनेवालेस मान्य व कबुल नाही. वास्तविक परिस्थितीमध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले संस्थेत ठेवलेल्या फिक्स डिपॉझिट बाबतचा मजकुर हा खरा असुन सामनेवाले यांना मान्य व कबुल आहे. सामनेवालं क्र.१ या संस्थेचे संचालक मंडळाने ठेवीच्या रकमेतुन नियमानुसार कर्जवाटप केलेले आहे. सदरील संस्थेचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांनी कामकाज करतांना संगनमत करून, कटकारस्थान करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून संस्थेचे ठेवीदाराची रक्कम तसेच कर्ज खात्यातील रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर करून सुमारे चार कोटी २७ लाख रूपयांचा अपहार केलेला आहे. याबात पोलिस स्टेशन कर्जत यांच्याकडे फिर्याद दिलेली आहे. कर्जदार यांच्याकडुन येणे असलेली रक्कम वसुल होत नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे. सामनेवाले हे तक्रारदार यांना रक्कम प्राप्त झाल्यानंतर मे.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कर्जत यांचे आदेशाप्रमाणे देण्यास तयार आहेत. तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ या संस्थेत ठेव ठेवली असल्याने तक्रारदार हे संस्थेचे सभासद/ मालक असल्याने सामनेवाले संस्थेचे ग्राहक होऊ शकत नाही. तसेच ग्राहक या संज्ञेत येऊ शकत नसल्याने तक्रारदार यांना सदरचा अर्ज मे. कोर्टात दाखल करण्याचा अधिकार नाही व सामनेवाले यांचेकडुन नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
६. सामनेवाले क्र.४ ते ७, ११,१३,१४ यांना नोटीस मिळूनही ते प्रकरणात हजर झाले नाही म्हणुन त्यांचेविरूध्द प्रकरण ‘एकतर्फा’ चालविणेचा आदेश पारीत करण्यात आला.
७. तक्रारदाराने दाखल तक्रार, शपथपत्र, दस्तऐवज सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा यांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार हे सामनेवालेंकडुन नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
८. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्थेमध्ये मुदतठेव पावती क्रमांक १०२७६, १०१६०, ११३१०, ११३१०, १०२७७, ११०१७, ११०१६ मध्ये रकमा गुंतविल्या होत्या. याबाबत ठेव पावतींच्या छायांकीत प्रती तक्रारदाराने निशाणी ६ सोबत दाखल केलेल्या आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत, हे स्पष्ट होते. म्हणुन मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदवण्यात येत आहे.
९. मुद्दा क्र. (२) : तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्थेमध्ये मुदतठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविलेली होती. याबाबत तक्रारदाराने निशाणी ६ सोबत दाखल केलेल्या मुदतठेव पावतींची पडताळणी केली असता त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ.नं. | खाते नंबर | मुदत ठेव रक्कम | ठेव ठेवल्याची तारीख | एक वर्षासाठी व्याजदर | ठेव परत मिळण्याची तारीख |
१) | १०२७६ | १,४०,५३७/- | ०४/०१/२०१४ | १२% | ०४/०१/२०१५ |
२) | १०१६० | २,००,०००/- | ३०/१२/२०१३ | १२% | ३०/१२/२०१४ |
३) | ११३१० | २,५०,८८०/- | १५/०१/२०१४ | १२% | १५/०१/२०१५ |
४) | १०२७७ | ७०,२६७/- | १७/०१/२०१४ | १२% | १७/०१/२०१५ |
५) | ११०१७ | २,००,०००/- | २०/०६/२०१४ | १२% | २०/०६/२०१५ |
६) | ११०१६ | २,००,०००/- | २०/०६/२०१४ | १२% | २०/०६/२०१५ |
वरील मुदत ठेव पावतींमधील मुदतपुर्तीनंतर मिळणारे रकमेची मागणी तक्रारदाराने सामनेवालेकडे केली असता सामनेवाले यांनी रकमा दिल्या नाही. सामनेवाले क्र.१८ यांनी पतसंस्थेमध्ये सचिव पदावरून राजीनामा दिलेला होता त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले पतसंस्थातर्फे जमा केलेली रकमेचा कोणताही संबंध नाही, असा बचाव घेतला. परंतु पतसंस्थेचे कामकाज व झालेल्या व्यवहाराची जबाबदारी सामनेवाले क्र.१८ यांना टाळता येत नाही. कारण ज्यावेळी तक्रारदाराने मुदत ठेव पावती केली त्यावेळी सामनेवाले क्र.१८ हे या पतसंस्थेत कार्यरत होते. त्यामुळे तक्रारदार त्यांचासुध्दा ग्राहक आहे व त्यांना जबाबदारी टाळता येत नाही. तसेच सामनेवाले क्र.१,२,३,८,९,१०,१२,१५ व १६ यांनी सामनेवाले संस्थेचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांनी कामकाज करतांना संगनमत करून, कटकारस्थान करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून संस्थेचे ठेवीदाराची रक्कम तसेच कर्ज खात्यातील रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर करून सुमारे चार कोटी २७ लाख रूपयांचा अपहार केलेला आहे. कर्जदार यांच्याकडुन येणे असलेली रक्कम वसुल होत नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे, सदर बाबही ग्राह्य धरता येत नाही. सामनेवालेने तक्रारदार यांची रक्कम मुदत ठेव म्हणुन स्विकारूनही मुदत संपल्यानंतर परत केलेली नाही. म्हणुन सामनेवाले क्र.१ ते १८ यांनी तक्रारदार यांच्याप्रती न्युनतम सेवा दर्शविली आहे, असे सिध्द होते. सबब मु्द्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी म्हणून नोंदविण्यात येत आहे.
१०. मुद्दा क्र. (३) : मुदतठेव पावतींमधील देय रक्कम तक्रारदाराने मागणी करूनही दिली नाही, ही बाब वरील मुद्यात स्पष्ट झाली आहे. सदर मुदत ठेव पावतींवर देय रक्कम नमुद नाही परंतु देय व्याज दर हा एक वर्षाकरीता द.सा.द.शे. १२ टक्के, असा नमुद आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे एक वर्षासाठीची मुदत ठेव पावती क्रमांक १०२७६, १०१६०, ११३१०, ११३१०, १०२७७, ११०१७, ११०१६ मधील एकूण देय रक्कम रूपये ११,८९,०८२/- व त्यावर देय दिनांकापासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.९ % प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच सदर मुदत ठेव पावतींमधील देय रकमा सामनेवाले यांनी दिलेल्या नसल्यामुळे तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला व तक्रार अर्जाचा खर्चही करावा लागला म्हणून तक्रारदार हे सामनेवालेकडून वैयक्तिकरीत्या व संयुक्तिकरीत्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये ५,०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रूपये ३,०००/- मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्द क्र.३ चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
११. मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्र.१,२ व ३ यांच्या विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
अंतीम आदेश
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले क्र.१ ते १८ यांनी वैक्तिगत किंवा संयुक्तिकरीत्या खालील नमुद तपशीलाप्रमाणे मुदत ठेव पावतींमधील देय रक्कम देय दिनांककपासुन ९ % द.सा.द.शे. व्याज तक्रारदार यांना द्यावे.
अ.नं. | मुदत ठेव पावती/ खाते नंबर | मुदत ठेव रक्कम | देय दिनांक | देय रक्कम |
१) | १०२७६ | १,४०,५३७/- | ०४/०१/२०१५ | १,५७,३९८/- |
२) | १०१६० | २,००,०००/- | ३०/१२/२०१४ | २,२४,०००/- |
३) | ११३१० | २,५०,८८०/- | १५/०१/२०१५ | २,८०,९८५/- |
४) | १०२७७ | ७०,२६७/- | १७/०१/२०१५ | ७८,६९९/- |
५) | ११०१७ | २,००,०००/- | २०/०६/२०१५ | २,२४,०००/- |
६) | ११०१६ | २,००,०००/- | २०/०६/२०१५ | २,२४,०००/- |
३. सामनेवाले क्र.१ ते १८ यांनी वैक्तिगत किंवा संयुक्तिकरीत्या तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रूपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- द्यावे.
४. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
५. सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्यात यावी.