ग्राहक तक्रार क्र. 39/2013
अर्ज दाखल तारीख : 02/03/2013
अर्ज निकाल तारीख: 20/11/2014
कालावधी: 01 वर्षे 08 महिने 18 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) प्रमोद प्रभाकरराव देशपांडे,
वय -35 वर्ष, धंदा – नौकरी,
रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) श्री. नेरकर अच्यूत नारायण,
सहाय्यक अभियंता,
म.रा.वि.वि.कं. मर्या.
सर्कल कार्यालय, तेर,
ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.जी.देशपांडे.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार हे काजळा येथील रहिवाशी असून विरुध्द पक्षकार मयत प्रभाकर देशपांडे यांचा मुलगा असून त्यांच्या वडीलांनी घरगुती वापराकरीता सामनेवाला यांच्याकडुन विदयुत पुरवठा घेतला असून याचा ग्रा. क्र.590180192753 असा असून वडीलांच्या मृत्यू नंतर तक्रारदार हा वीज बिले भरत आला आहे व त्याच घरात तक्रारदार राहतो त्यामुळे तक्रारदार हा विपचा ग्राहक आहे असे तक्रादाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराचा वीज वापर जास्तीत जास्त 30 ते 50 युनिट प्रति महिना आहे. जोपर्यंत बीले येत होती तोपर्यंत तक्रारदार थकबाकीत गेला नव्हता दि.29/11/2012 रोजी स्पॉट इन्सस्पेक्शन करुन त्याचा वापर 2 टयूब दोन बल्ब, एक फॅन, व एक टी.व्ही. असा दाखविला आहे त्यावरुन तक्रारदाराचा वापर अत्यअल्प आहे ही बाब स्पष्ट होते. विपने माहे मे-12 चे 36 युनिट व माहे जुलै-12 मध्ये 42 युनिटचा, माहे जुन-12 चा एकदम वापर 1609 युनिट असा विज वापर दाखविला असून माहे जुन-12 ला एकदमच रु.13,893/- इतके अधिक व अवास्तव बील सामनेवालाने दिले व तेथुन पुढे आम्ही बील दुरुस्त करुन देतो असे सांगुन तर कधी वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देवून पार्ट पेमेंच्या स्वरुपात रु.4,000/-, 5,000/- रक्कम वसुल करत आला. अचानक वाढविलेल्या युनिटचे वसुली करण्यासाठी सप्टेंबर 12 पासून माहे जाने-13 पर्यंत वीज वापर 180 ते 200 युनिट पर्यंत रिडींग न बघताच दाखवू लागले. माहे जाने-2013 चे दिलेले वीज बील देयक दुरुस्त करुन दयावे, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व सेवेत त्रुटी केलेबाबत रक्कम रु.10,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश करावा. अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत जानेवारी-13, जुलै-12, मे-12 ची वीज बिले स्पॉट पंचनामा, पैसे भरल्याच्या दोन पावत्या, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.10/06/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
तक्रारदार आतापर्यंत वेळेवर तसेच संपुर्ण बील भरत आलेला नाही. तक्रारदार यांच्या मागणी प्रमाणे जानेवारी 2013 चे बील खाते उतारा प्रत्यक्ष पाहून दुरुस्त करुन देतो असे सांगितले असता तक्रारदाराने थोडे न थांबता तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी मे, जुन मध्ये दाखविलेले युनिट हे तक्रारदार यांनी वापरलेल्या युनिटपेक्षा फारच कमी दाखविलेले आहेत व तक्रारदार यांचा जुन 2012 मध्ये प्रत्यक्ष 1609 युनिट वापर केलेला असल्यामुळे सदर युनिट प्रमाणे तक्रारदार यास विज बिल देण्यात आलेले आहे. तक्रारदार यांचे सप्टेंबर 2012 पासून ते जानेवारी 2013 पर्यंत विज वापर 180 ते 200 युनिट रिडींग न बघताच दाखवू लागले हे खरे नाही. एप्रिल 2011 ते जानेवारी 2014 या कालावधीत तक्रारदार यास देण्यात आलेले बिल रु.43,180.80 पैसे मधून जास्त लागलेले बिल रु.16,347.10 पैसे कमी करुन रु.26,833.08 पैसे देण्यात आलेले आहे. मार्च 2013 पासून तक्रारदार यांनी कोणतेही बिल अदयाप भरलेले नसुन तक्रारदार थकबाकीत आहे. तक्रारदार यांची मिटरच्याबाबत कोणतीही तक्रार नसल्यामुळे विपने नियमाप्रमाणे व वापराप्रमाणे दुरुस्त करुन योग्य असे बिल दिलेले असल्यामुळे तक्रारदारयाने भरणे आवश्यक आहे. म्हणून तक्रारदार यांची तक्रार खर्चासह खारीज करावी असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
4) मुददा क्र.1 व 2 चे उत्तर:
तक्रारदाराचे म्हणणे आहे की त्याचा विज वापर घरगूती स्वरुपाचा असून दरमहा त्याचा 30 ते 50 युनिट विज वापर होतो. दि.29/11/2012 रोजी विप तर्फे स्पॉट इन्सपेक्शन घेण्यात आले. त्यात 2 टयूब, 2 बल्ब, 1 फॅन, 1 टी.व्ही. असा तक्रारदाराचा विज वापर दिसुन येतो. उलट विपचे म्हणणे आहे की जुन 2012 मध्ये तक्रारदाराचा पत्यक्ष विज वापर 1609/- युनिट होता व त्यामुळे सदरच्या वापराप्रमाणे त्याला विज बिल देण्यात आले आहे.
5) तक्रारदाराने जानेवारी 2013, जुलै 2012 व मे 2012 चे बील हजर केलेले आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की त्याचा विज वापर दरमहा 30 ते 50 युनिट होता. विज बिलाचे निरीक्षण केले असता असा विज वापर दिसुन येतो परंतु सप्टेंबर 2011 मध्ये 662 युनिट विज वापर दाखविला आहे. त्यानंतर साधारणपणे 50 पेक्षा थोडे अधिक किंवा थोडे कमी युनिट असा विज वापर दाखविला आहे. यांचा अर्थ स्पष्ट आहे की विप मार्फत महिन्याच्या महीन्याला मिटर रिडींग घेतले गेले नाही. मनाप्रमाणे मिटर रिडींग टाकून विज बिल दिले जाते. काही महीन्यानंतर प्रत्यक्ष मिटर रिडींग आल्यानंतर अचानक मोठा विज वापर दिसुन येतो.
6) विपने दि.29/11/2012 चे विप तर्फे केलेले स्पॉट इन्सपेक्शन रिपोर्ट हजर केलेले आहे. त्याप्रमाणे 2 टयूब, 2 बल्प, 1 फॅन, 1 टीव्ही वापर दाखविलेला आहे. अशा परिस्थितीत जुन महिन्यात एकदम 1609 युनिट विज वापर दाखविला आहे. असा वीज वापर अचानक वाढला होता यावर विपतर्फे चकार शब्द काढलेला नाही. उलट मागील वीज वापरासाठी जुन महीन्यात जादा बील दिले असे म्हणणे आहे.
7) त्यानंतर जुलै 2012 चे बिल पाहीले असता मागील रिडींग 2720 व सध्याचे रिडींग 2762 दाखविली आहे म्हणजेच महीन्याचा विज वापर 42 युनिट दाखविला आहे. त्यानंतरचे बिल पाहीले असता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 180 ते 195 युनिट वापर दाखविला आहे. सध्या प्रश्न असा आहे की जुन 2012 मध्ये अचानक तक्रारदाराने 1609 युनिटचा वापर केला म्हणजेच त्या महीन्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम करुन पटीने विज बिल वाढले काय ? याबददल विपने एक शब्दही उच्चारला नाही. विपचे म्हणणे आहे की सन 2011 पासून तक्रारदार वापरत असलेल्या विजेपेक्षा कमी युनिटचे बिल भरत आलेला आहे. हयाचे कारण हे आहेकी विप हा तक्रारदारास कमी युनिटचे बील देत आला आहे म्हणजेच नियमित रिडींग घेत आलेला नाही. विपचे असे म्हणणे आहे की त्यांनी एप्रिल 2011 ते जानेवारी 2014 मध्ये युनिटची विभागणी केली एकूण रु.43,180.80 पैसे या बिलामधून रु.6,347.10 पैसे बिल कमी केले आहे. नंतर रु.26,833.08 पैसे बिल दिलेले आहे. तक्रारदाराने मार्च 2013 पासून कोणतेही बिल भरलेले नाही. वास्तविक पाहता जुन 2012 चे बिल रु.16,893/- हे पुढील महीन्यात थकबाकी म्हणून दाखविले आहे. तक्रारदाराच्या मागणी जानेवारी 2013 चे विज बिल दुरुस्त करण्यात यावे अशी आहे. जानेवारी 2013 चे बिल पाहीले असता थकबाकी रु.18,344/- दाखविले आहे. तर त्या महीन्याचे बिल रु.1374 दाखविली आहे. अंतरीम आदेश देतांना या मंचाने विदयूत देयक रु.19,720 पैकी 50 टक्के रक्कमेपैकी रु.4,000/- वजा जाता उर्वरीत रक्कम भरण्याचे आदेश दिलेले आहे. त्याचे कारण तक्रारदाराने रु.4,000/- आधीच भरलेले होते. जुन 2012 च्या मागणीपैकी रक्कम 2011 च्या महीन्यात अॅडजस्ट करून नंतर मागणी रु.16,893/- ची करण्यात आली. हे दाखविण्यासाठी सुध्दा विप यांनी कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाही. म्हणून महीन्याच्या महीन्याला मिटर रिडींगने न घेवून विपने सेवेत त्रुटी केली आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे जुन 2012 ची मागणी रु.16,893/- पैकी निम्मी रक्कम भरण्यास तक्रारदार पात्र आहे. असे आमचे मत आहे. त्यामुळे मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप यांना तक्रारदाराकडून विज देयक जुन 2012 चे बील रुपये 16,893/- पैकी
निम्मी रक्कम वसूल करता येईल.
3) तक्रारदाराने सदरहू रक्कम आधीच भरलेली असल्यास विपने ती वसूल करु नये.
4) विपने यापुढे तक्रारदारास प्रत्यक्ष वापराप्रमाणेचे वीज देयक दयावे.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.