निकालपत्र :- (दि.14.12.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 व 6 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, उभय पक्षकार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. सबब, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हे मंच प्रस्तुतची तक्रार गुणावगुणावर निकाली काढीत आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदार हे नृसिंहवाडी येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांच्या शेतीच्या व्यवसायातून मिळणा-या उत्पन्नातून स्वत:चे व कुटुंबियांचे नांवे मुदत बंद ठेवींच्या स्वरुपात तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतीनंतर मिळणारी व्याजरक्कम | 1. | 681 | 39843/- | 03.08.2007 | 03.08.2008 | 6914/- | 2. | 682 | 29965/- | 21.09.2007 | 21.09.2008 | 4984/- | 3. | 683 | 40000/- | 13.09.2007 | 13.09.2008 | 6666/- | 4. | 684 | 28304/- | 13.09.2007 | 13.09.2008 | 4710/- | 5. | 685 | 40000/- | 01.09.2007 | 01.09.2008 | 6666/- | 6. | 686 | 40000/- | 01.09.2007 | 01.09.2008 | 6666/- | 7. | 687 | 20403/- | 31.05.2007 | 31.05.2008 | 4080/- | 8. | 688 | 38051/- | 27.05.2007 | 27.05.2008 | 7610/- | 9. | 689 | 23438/- | 27.05.2007 | 27.05.2008 | 4886/- | 10. | 690 | 40000/- | 27.05.2007 | 27.05.2008 | 8000/- | 11. | 691 | 40000/- | 27.05.2007 | 27.05.2008 | 8000/- |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्कमांची आर्थिक अडचण असल्याने आवश्यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.23.03.2009 रोजी सामनेवाला संस्थेचे चेअरमन यांचेविरुध्द सहा.निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ यांचेकडे लेखी तक्रार देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, संचालकांची यादी, सहा.निबंधक यांचेकडे दिलेली सामुहिक तक्रार इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.2 व 6 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्थेवर दि.26.06.2009 रोजीपासून नविन संचालक मंडळ नियुक्त झाले आहे, त्यास तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी पक्षकार केलेले नाही. प्रस्तुत सामनेवाला हे संचालक नसलेबाबतचा दि.20.05.2009 रोजीचा सहा.निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ यांचा आदेश सादर केला आहे. सदर आदेशानुसार प्रस्तुत सामनेवाला हे संचालक म्हणून काम करणे अपात्र ठरविले आहे. तेंव्हापासून प्रस्तुत सामनेवाला यांनी संस्थेच्या कारभारामध्ये संचालक या नात्याने भाग घेतलेला नाही. त्यामुळे सदर तारखेनंतर संस्थेच्या व्यवहाराशी कायदेशिररित्या संबंध राहिलेला नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.2 व 6 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत सहा.निबंधक यांचा दि.20.05.2009 रोजीचे आदेश, दि.26.06.2009 रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेचे प्रोसिडींग उतारा इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) सामनेवाला क्र.14 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्थेत नोकरी केली तीही चेअरमन व संचालक यांचे आज्ञेने व सांगणेवरुन केली. सामनेवाला संस्थेतील आर्थिक व्यवहार मंदावल्याने जुलै 2008 पासून पगार नसलेने प्रस्तुत सामनेवाला हे रोजंदारी करुन उदरनिर्वाह करीत आहेत. प्रस्तुत सामनेवाला यांची आर्थिक स्थिती काहीही नाही. त्यामुळे कुठल्याही बाबतीत खर्च करण्यास असमर्थ आहेत. सबब, प्रस्तुत सामनेवाला यांची जबाबदारी नसलेचे ठरवावे अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला क्र.14 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत रेशन कार्ड, गांवकामगार तलाठी यांचेकडील दाखला, मुलीचा अंपगत्वाचा दाखला इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (9) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला क्र.2 व 6 यांनी त्यांच्या म्हणण्यात दि.20.05.2009 रोजीच्या सहा.निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ यांच्या आदेशानुसार प्रस्तुत सामनेवाला हे संचालक म्हणून काम करणे अपात्र ठरविले असलेने तक्रारदारांच्या ठेवी देणेबाबत त्यांचे जबाबदारी येत नसल्याचे कथन केले आहे. सदर आदेशाचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.2 व 6 यांना सामनेवाला संस्थेच्या संचालक पदावर काम करणेस अपात्र ठरवून त्यांना संचालक पदावरुन कमी करणेत आलेचे दिसून येते. तथापि, सदर सामनेवाला यांना सामनेवाला संस्थेच्या जबाबदारीतून अथवा ठेवीदारांच्या ठेवी परत करणेच्या जबाबदारीतून मुक्त करणेत आलेबाबतचा कोणताही आदेश नाही. जरी सामनेवाला क्र.2 व 6 यांना संचालक पदावरुन कमी केले असले तरी तक्रारदारांनी त्यांच्या ठेवी सामनेवाला क्र.2 व 6 हे संचालक पदावर कार्यरत असताना ठेवल्या असल्यामुळे तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह परत करणेची त्यांची जबाबदारी टाळू शकत नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 13 ची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.14 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 681 | 39843/- | 2. | 682 | 29965/- | 3. | 683 | 40000/- | 4. | 684 | 28304/- | 5. | 685 | 40000/- | 6. | 686 | 40000/- | 7. | 687 | 20403/- | 8. | 688 | 38051/- | 9. | 689 | 23438/- | 10. | 690 | 40000/- | 11. | 691 | 40000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |