::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांच्यानांवे असलेली हायवा ट्रक क्र.ओ आर 19 डी 0388 सामनवाले क्र.2 व 3 यांच्यामार्फत विक्री करावयाचा आहे असे समजल्याने तक्रारदारांनी दिनांक 22/2/2011 रोजी सामनेवाले क्र.1 ते 3 यांच्याकडून विक्रीपत्र तयार करून एकत्रित रक्कम रू.7,75,000/- निश्चीत करून त्यापैकी रक्कम रू. 2,86,000/- दिनांक 22/2/2011 रोजी सामनेवाले क्र.1 व 2 यांना अदा केले. व उर्वरीत रक्कम रू.4,89,000/- श्रीराम फायनान्स कडे जमा करण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे दिनांक 5/10/2011 रोजी धनादेश क्र.604524 अन्वये रक्कम रू.4,88,000/- श्रीराम ट्रांस्पोर्ट यांच्याकडे जमा केले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 ते 3 यांना सदर वाहन तक्रारदारांच्या नांवे करून देण्याबाबत कळवूनही सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी त्याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. दिनांक 22/2/2011 पासून आजपर्यंत सदर वाहन तक्रारदारांच्या नांवे नसल्याने सदर वाहनाचा उपयोग तक्रारदाराला करून घेता येत नसल्याने कायदेशीर पुर्तता करणेकामी सामनेवाले क्र.1 ते 3 यांना दिनांक 11/11/2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून सदर व्यवहारापोटी सामनेवाले क्र.1 ते 3 यांच्याशी झालेल्या कराराप्रमाणे वाहन खरेदीपोटी अदा केलेली रक्कम रू.7,75,000/- तक्रारदारांस परत करावी अशी मागणी करणारी नोटीस सामनेवाले क्र.1 ते 3 यांना प्राप्त होऊनदेखील पुर्तता न केल्याने सदर रक्कम व्याजासह, नुकसान-भरपाई व खर्चासह परत मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर तक्रारअर्जात केलेली आहे.
3. सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी तक्रारीतील मुद्यांचे खंडन करून तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 व 3 यांचे ग्राहक नसून सामनेवाले क्र.1 व 3 तक्रारदारांचे सेवा पुरवठादार नाहीत. प्रस्तूत तक्रार मुदतबाहय असल्याने अमान्य करण्यांत यावी. सामनेवाले क्र.1 व 3 यांनी तक्रारदारासोबत केलेला करारनामा प्रस्तूत तक्रार दाखल करण्यांस कायदेशीर कारण नसून वाहनाचा ताबा 11/2/2011 रोजी तक्रारदारांस दिला असून त्यानंतर तक्रारदारांनी सदर वाहन आपल्या नांवे करून घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर उपाययोजना न केल्याने तसेच दिनांक 11/11/2013 रोजी बेकायदेशीर नोटीस पाठवून प्रस्तूतची बेकायदेशीर तक्रार दाखल केली असल्याने प्रस्तूत तक्रार खर्चासह अमान्य करण्यांत यावी अशी विनंती सामनेवाले क्र.1 व 3 यांनी केली आहे.
4. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारीतील मुद्यांचे खंडन करून तक्रारदारांनी प्रस्तूत खरेदी व्यवहारामध्ये सामनेवाले क्र.2 यांनी कोणतीही सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केला नसून तक्रारदारांनी प्रस्तूत वाहन नांवे करून घेण्यासाठी कोणतीही उपाययोजना केल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. प्रस्तूत तक्रारीमधील वाहन व्यवहाराची रक्कम परत मिळावी अशी विनंती मान्य करण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नसून त्याबाबतचे अधिकारक्षेत्र दिवाणी न्यायालयांस आहे. तक्रारदार मागील 3 वर्षांपासून सदर वाहनाचा उपभोग घेत असून सामनेवाले क्र.2 यांचेविरूध्द तक्रार खर्चासह अमान्य करण्यांत यावी अशी विनंती सामनेवाले क्र.2 यांनी केली आहे.
5. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, वि.प.क्र.1 व 3 यांचे लेखी म्हणणे, वि.प.क.2 यांचे लेखी म्हणणे, तक्रारदारांचे लेखी युक्तिवादाबाबतची पुरसीस, व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(1) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांस वाहन विक्री
करारनाम्यानुसार सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिध्द करतात काय ? होय
(2) सामनवाले क्र.1 ते 3 तक्रारदारांस नुकसान भरपाई
देण्यांस जबाबदार आहेत काय ? होय
(3) आदेश ? तक्रार अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 व 2
6. सामनेवाले क्र.1 यांचे वाहन सामनेवाले क्र. 2 व 3 यांचेमार्फत तक्रारदारांनी दिनांक 22/2/2011 रोजी विक्रीपत्राद्वारे खरेदी केले असून श्रीराम फायनान्स यांचे वाहन कर्ज बेबाक झाल्यानंतर तक्रारदार यांचे नांवे वाहन करून घेण्याची जबाबदारी तक्रारदार यांची राहील असे नमूद आहे. परंतु सामनेवाले क्र.1 यांनी वाहन हस्तांतरण होणेकामी सदर कार्यालयात उपस्थीत राहणे आवश्यक होते. त्याबाबत सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांस न्यायोचीत सहकार्य करणे आवश्यक होते. तक्रारदाराने सामनेवाले यांना वेळोवेळी सुचीत करूनदेखील सामनेवाले यांनी कोणतेही सहकार्य न केल्यामुळे अद्याप करारनाम्यातील बाबींची पुर्तता होवूनदेखील वाहन तक्रारदार यांचे नांवे हस्तांतरीत झालेले नाही. सबब सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी कराराप्रमाणे पुर्तता न करून तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब सिध्द होते. दिनांक 22/2/2011 पासून आजपर्यंत तक्रारदारांस वाहनाचा कायदेशीरपणे उपभोग घेता आला नसल्याबद्दल कागदोपत्री पुरावा असल्याने सामनेवाले क्र.1 ते 3 तक्रारदारांस न्यायोचीत नुकसान-भरपाई देण्यांस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) ग्राहक तक्रार क्र. 46/2014 अंशतः मान्य करण्यात येते.
(2) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर
करण्यांत येते.
(3) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे हायवा ट्रक क्र. ओआर 19 डी 0388 या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांच्या आंत तक्रारदारांचे नांवे करून द्यावा.
(4) वर नमूद क्रमांक 3 ची पुर्तता विहीत मुदतीत करणे शक्य नसल्यांस वाहन क्रमांक हायवा ट्रक क्र. ओआर 19 डी 0388 तक्रारदारांनी, सामनेवाले क्र.1 ते 3 यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांच्या आंत परत करावा.
(5) तक्रारदारांनी वर नमूद क्र.4 ची पुर्तता केल्यास सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदारांस रक्कम रू.7,75,000/- दिनांक 5/10/2011 पासून अदा करेपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह अदा करावी.
(6) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदारांस शारिरीक, मानसीक त्रास व तक्रार खर्चापोटी एकत्रित नुकसान भरपाई रक्कम रू.50,000/- या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
(7) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(अध्यक्ष) (सदस्या)