(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :08/08/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 04.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्ता उल्हास हिरालाल गोंडाने, यांची तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांचे न्यु पुनम अपार्टमेंट ब्लॉक-इ या फ्लॅट स्कीममधील फ्लॅट नं.3-अ विकत घेण्याचा करार एकूण रु.6,00,000/- मधे केला व कराराचे वेळी रु.1,50,000/- व उर्वरित रक्कम कराराप्रमाणे दिली. तसेच संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने नोंदणीकृत करारनामा करुन फ्लॅटचा ताबा तक्रारकर्त्यास दिला मात्र त्यांचेशी वारंवार संपर्क साधून विक्रीपत्र करुन घेण्याचा प्रयत्न केला असता गैरअर्जदार हे टाळाटाळ करीत आहेत. तक्रारकर्ते हे जहाज कंपनीत नोकरीला आहेत, त्यामुळे ते बहूतांश कालावधीसाठी विदेशात राहतात व त्यांना वेळ मिळत नाही आणि नागपूर येथे आल्यावर गैरअर्जदारांस भेटावयास गेले असता ते भेटत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दि.07.06.2010 रोजी गैरअर्जदारास वकीला मार्फत नोटीस दिली, ती त्यांनी स्विकरली नाही त्यामुळे ती परत आली. करीता तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे वादातील फ्लॅटचे विक्रीपत्र गैरअर्जदारांनी करुन द्यावे, मानसिक, शारीरिक त्रासाकरीता रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता त्यांचा सुचना देऊनही त्यांनी नोटीस स्विकारली नाही असा अहवाल पोष्ट खात्याने दिलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदारांविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.02.05.2011 रोजी पारित केलेला आहे.
5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 4 विक्रीचा करारनामा, वकीलातर्फे पाठविलेला नोटीस, पोष्टाची पावती व परत आलेल्या लिफाफ्याची छायांकित प्रत इत्यादी जोडलेले आहेत.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.25.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर, गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फी आदेश पारित. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. यातील तक्रारकर्त्याची तक्रार व संपूर्ण दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंचाच्या निदर्शनास खालिल बाबी आल्या...
तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे न्यु पुनम अपार्टमेंट ब्लॉक-इ या फ्लॅट स्कीममधील फ्लॅट नं.3-अ विकत घेण्याचा करार एकूण रु.6,00,000/- मधे केला व कराराचे वेळी रु.1,50,000/- व उर्वरित रक्कम रु.4,50,000/- कराराप्रमाणे दिल्याचे दस्तावेज क्र.1 व 2 वरुन दिसुन येते. तसेच वारंवार गैरअर्जदारांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ केली व नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही. प्रस्तुत बाब गैरअर्जदारांकडून त्यांचे सेवेत त्रुटी झाल्याचे सिध्द करते. तसेच तक्रारकर्त्याने दि.07.06.2010 रोजी गैरअर्जदारास वकीला मार्फत नोटीस दिली, ती त्यांनी स्विकरली नाही त्यामुळे ती परत आली. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यांस पात्र आहे. सबब खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला न्यु पुनम अपार्टमेंट ब्लॉक-इ या फ्लॅट स्कीममधील फ्लॅट नं.3-अ चे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे व विक्रीपत्राला येणारा खर्च तक्रारकर्त्याने करावा.
3. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदाराने वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 2 महीन्याचे आंत करावे.