निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार यानी त्याच्या नोकरीचा सेवाकाळ संपल्यानंतर कुटूंबाच्या भविष्यातील उदरनिर्वाहासाठी वाहन खरेदी करुन उपजिविका चालविण्याची योजना आखली. परंतू वाहन घेण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने तो गैरअर्जदार यांच्याकडे गेला. गैरअर्जदार यांनी काही अटी व शर्ती तसेच अर्जदाराची विनंती मान्य करुन कर्जपुरवठा दिला. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडे रक्कम रु. 1,00,000/- जमा करावेत अशी गैरअर्जदार यांनी सुचना केली. त्यानुसार दिनांक 28/09/2009 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडे रक्कम रु. 1,00,000/- जमा केले. अर्जदार यांनी रक्कम भरणा केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास वाहन क्र. एमएच-26 एच-4263 ही दिली. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडे ठरलेल्या रि-पेमेंट डि प्रमाणे हप्तेवार रक्कम भरणा केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे भरणा केलेल्या रक्कमेचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम वेळोवेळी परतफेड केलेली आहे. अर्जदाराने एकूण रक्कम रु. 2,78,290/- एवढी दिलेली असतांनाही गैरअर्जदार 1 व 2 यांचे कर्मचारी व अधिकारी हे अर्जदारास अजून कर्ज बाकी आहे बाकी कर्ज भरणे गरजेचे आहे नसता आम्ही तुमची गाडी ओढून नेवू किंवा विकून टाकू अशी धमकी देत आहेत. अर्जदाराने घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,05,670/- ची परतफेड वर नमूद केल्याप्रमाणे व्याजासह रु. 2,78,290/- ही गैरअर्जदार 1 व 2 यांच्याकडे केलेली आहे त्यामुळे गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र दयावेत असे आदेशीत करण्यात यावे याकरीता अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र अर्जदाराचे नावे देण्यात यावे. तसेच सदर वाहन खरेदी करतेवेळी अर्जदाराने अदा केलेली रक्कम रु. 1,00,000/- दिनांक 28/09/2009 पावती क्र. 2398 ही कर्जखाती वळतीकरुन घेण्याबाबत आदेश गैरअर्जदार यांना दयावा तसेच अर्जदाराने दिलेल्या सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/-, दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इत्यादी बाबींची मागणी तक्रारीद्वारे अर्जदाराने केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर प्रकरणामध्ये वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी जबाब दाखल केले. गैरअर्जदार 1 यांचा लेखी जबाब खालील प्रमाणे आहे.
गैरअर्जदार 1 हा अकोला येथे श्री मोटर्स या नावाने स्पोर्ट इंडिया कंपनीची डिलरशीप चालवतो. अर्जदाराने गैरअर्जदार 2 व 3 यांच्याकडे वाहन खरेदीकरीता कर्ज घेवून गैरअर्जदार 1 यांच्याकडून वाहन घेतलेले आहो. सदर वाहनाची मुळ किंमत रु.2,50,000/- इतकी होती व आर.टी.ओ. अधिक विमा व इतर कर्जाचे रु.33,000/- असे एकूण रक्कम रु. 2,83,000/- किंमत होत होती. त्यापैकी रु. 1,71,299/- फायनान्स कंपनीकडून गैरअर्जदार 1 यांना प्राप्त झाले व रु. 1,00,000/- तक्रारदाराकडून प्राप्त झाले असे एकूण रक्कम रु. 2,71,299/- एवढी रक्कम अर्जदाराकडून मिळालेली आहे. उर्वरीत रक्कम रु. 11,701/- अदयाप अर्जदाराकडून गैरअर्जदार 1 यांना मिळणे बाकी आहे. त्याबाबत गैरअर्जदार 1 यांनी वेळोवेळी अर्जदाराकडे रक्कमेची मागणी केली त्यामुळे चिडून जावून कुठलेही कारण नसतांना अर्जदाराने सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार 1 यांना पार्टी केलेले आहे. अर्जदाराने फायनान्स कंपनीकडे वाहन घेतल्यानंतर कर्जाची परतफेड केली किंवा नाही याबाबत सुध्दा गैरअर्जदार 1 यांचा संबंध नाही. गैरअर्जदार 1 हे अकोला येथील असल्यामुळे वाहनाची सर्व बिलींग ही अकोला येथूनच झाली आहे त्यामुळे सदर तक्रार ही मा. न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही त्यामुळे रक्कम रु. 10,000/- च्या दंडासहीत सदरील तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार 1 यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार 2 व 3 यांचा लेखी जाबाब थोडक्यात पुढील प्रमाणे.
4. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये वाहन खरेदीसाठी कर्ज करार झालेला आहे. सदरील करारातील अर्टीकल 30 प्रमाणे वाद निर्माण झाल्यास फक्त चैन्नई येथील न्यायालयात तो चालविण्याचा अधिकार आहे. तसेच करारातील अर्टीकल 29 प्रमाणे कराराच्या संदर्भात वाद उदभवल्यास फक्त अर्बिट्रेशन अँड कन्सलेशन अंतर्गत अर्ब्टिेशन नियम केलेले असेल व अर्ब्टिेशनने दिलेला निर्णय हा दोन्ही पार्टीवर बंधनकारक असेल त्यामुळे सदरील न्याय मंचास सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम रु. 2,05,670/- साठी कर्जाची विनंती केली. त्यानुसार गैरअर्जदाराने अटी व नियमाबाबत कर्ज करार करुन अर्जदारास रक्कम रु. 2,05,670/- कर्ज दिले. सदर करार हा 47 महिन्याच्या कालावधीसाठी होता. अर्जदाराने मुदतीत हप्त्याद्वारे रक्कमेची परतफेड करावयाची होती परंतू अर्जदाराने कर्जाची दरमहा हप्ते नियमित भरलेले नाहीत. अर्जदाराच्या दिनांक 16/05/2013 च्या खातेउता-याप्रमाणे अर्जदाराकडे अदयाप गैरअर्जदार 2 व 3 यांचे कर्ज रक्कम रु. 1,14,771/- येणे आहे. अनेकवेळा सुचना करुन सुध्दा अर्जदार त्याचे कर्जाचे हप्ते करारातील अटी प्रमाणे भरण्यास असमर्थ ठरलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार फायनान्स कंपनीकडे रक्कम रु. 2,78,290/- इतक्या रक्कमेची परतफेड केलेली नाही. अर्जदाराने सदर तक्रार ही खोटी व बनावट मुदया आधारे कोणत्याही कायदेशीर तत्वाचे पालन न करता दाखल केलेली आहे. अर्जदाराने वाहन खरेदी करतेवेळी गैरअर्जदार 1 यांना रक्कम रु. 1,00,000/- दिले असे अर्जदाराचे म्हणणे आहे परंतू त्या रक्कमेशी फायनान्स कंपनीचा काही एक संबंध नाही. अर्जदाराच्या करारातील खातेउता-यात तो डिफाल्टर असल्याचे स्पष्ट दिसून येते. अर्जदार हा गैरअर्जदाराविरुध्द प्रथमदर्शनी तक्रार सुध्दा करु शकत नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदार 2 व 3 यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
5. अर्जदाराने पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांनी शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 श्री मोटार्स यांचेकडून वाहन क्र. एमएच-26 एच-4263 खरेदी केलेले आहे. वाहन खरेदी करतेवेळी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 श्री मोटार्स यांना रक्कम रु. 1,00,000/- नगदी दिलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांचेकडून सदर रक्कम Booking and down payment of M4 Super यासाठी स्विकारलेली असल्याचे दाखल पावतीवरुन सिध्द होते.
अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 व 3 चोलामंडलम फायनान्स यांचेकडून रक्कम रु.2,05,670/- एवढे कर्ज वाहन क्र. एमएच-26 एच-4263 खरेदीसाठी घेतलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी कर्जाचे रिपेमेंट शेडयूल्ड तसेच कराराची प्रत व लोन एप्लीकेशन फॉर्म दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार चोलामंडलम यांनी गैरअर्जदार क्र. 1 श्री मोटार्स यांना रक्कम रु.1,71,299/- दिलेले आहेत ही बाब गैरअर्जदार क्र. 1 श्री मोटार्स यांनीही मान्य केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या कराराची प्रत रिपेमेंट शेडयूल्डचे अवलोकन केले असता Asset Value रक्कम रु.2,41,967/- असल्याचे स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदार क्र. 1 श्री मोटार्स यांनाही वाहनाची किंमत रक्कम रु.2,80,000/- आहे असे लेखी जबाबामध्ये मान्य केलेले आहे. परंतु त्या संदर्भातील पुरावा दिलेला नाही. त्यामुळे वाहनाची किंमत रक्कम रु.2,41,967/- इतकी असल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दाखल केलेल्या लोन एप्लीकेशन फॉर्मचे अवलोकन केले असता त्यामध्ये खालील बाबी नमूद आहेतः-
Asset Value = Rs.2,41,967
Discount = o
Cost Net amount = Rs.2,41,967
Margine = Rs.36,297 in 15%
Amount financed = Rs.2,05,670
Tenure 48 Repayment in 47
Rate 10.08%
Service charges = Rs.1000 PDC charg Rs.2000
Service charges = Rs.3500
Delay fund = Rs.8000
M.I. = Rs.0,082
Brokarage amount = Rs.2100
P.A.C. = Rs.1500
Decumentation charges = Rs.250
यावरुन असे निदर्शनास येते की, वाहनाची किंमत रक्कम रु.2,41,967/- एवढी असून अर्जदाराने त्याच्या 15टक्के म्हणजेच रक्कम रु.26,297/- एवढे मार्जीन मनी गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना दिलेले असून उर्वरीत रक्कम रु.2,05,670/- चे कर्ज अर्जदारास गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दिलेले आहे. तसेच नमुद केलेल्या Personal Accident coverage Rs.1500/-, Motor insurance- Rs.10,082/-, documentation charges- Rs.250/-, service charges- Rs.1000/- असे एकूण (1500 +10082+250) रुपये 12,632/- हे योग्य आहे. परंतु पुन्हा वसूल केलेले service charges- Rs.3500/- ,delay fund- Rs.8000/-, payment delay charges PDC- Rs.2000/-, brokerage amount- Rs.2100/- हे कशाचे घेतले याचा अर्थबोध होत नाही. कारण कर्जाच्या सुरुवातीलाच delay fund व PDC इत्यादी बाबीसाठी रक्कमा वसूल करता येत नाही. तसेच brokerage amount बद्यलही साशंकता निर्माण होते. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदाराकडून रक्कम रु.15,000/- जास्तीचे घेतलेलेअसल्याचे स्पष्ट होते. त्याही पुढे जाऊन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास रक्कम रु.2,05,670/- एवढे कर्ज दिलेले असून वाहन विक्रेता म्हणजेच गैरअर्जदार क्र. 1 यांना फक्त रक्कम रु.1,71,299/- एवढीच रक्कम दिलेली आहे व अर्जदाराकडून मात्र रक्कम रु.2,05,670/- व्याजासहीत वसूल करत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे.
तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनीही अर्जदाराकडून डाऊन पेमेंट म्हणून रक्कम रु. 1,00,000/- स्विकारलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 यांनी वाहनाची उर्वरीत किंमत (Rs.2,41,967 - Rs.1,00,000/-) = रु.1,41,967/- फक्त फायनान्स कंपनीकडून स्विकारणे बंधनकारक होते. परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांना रु.1,71,299/- इतकी रक्कम गैरअर्जदार क्र. 2 व 3 फायनान्स कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराकडून डाऊन पेमेंट घेतलेले असून गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनीही मार्जीन मनी घेतलेले आहे. दोन्ही गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून डाऊन पेमेंट व मार्जीन मनी स्विकारुन सेवेत गंभीर त्रुटी दिलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कर्ज परतफेडीपोटी रक्कम रु.2,78,290/- एवढी रक्कम जमा केलेली आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनाही अर्जदाराकडून कर्ज पुरवठाकरतेवेळस बेकायदेशीरीत्या जास्तीची रक्कम वसूल केलेली आहे. यावरुन कर्जाची संपूर्ण परतफेड झालेली असल्याचे स्पष्ट होते. असे असतांनाही गैरअर्जदार अर्जदार यांचेकडून अजूनही कर्ज रक्कम येणे बाकी आहे असे नमूद करतात ही बाब अत्यंत चुकीची व बेकायदेशीर आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये फक्त ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी व मानसिक त्रासाबद्यल रक्कम मागीतलेली असल्याने गैरअर्जदार यांनी जास्तीची वसूल केलेली रक्कम परत करावी असा आदेश मंच देऊ शकत नाही. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास 15 दिवसाच्या आत ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी रक्कम रक्कम रु.20,000/- अर्जदारास दयावेत.
4. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत
5. वरील आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पूर्ततेच्या
अहवालासाठी ठेवण्यात यावे.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.