निकालपत्र
( दिनांक 10-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार सचिन गौतम गायकवाड रा. मिल रोड, नांदेड यांनी गैरअर्जदार 1 यांच्याकडून दिनांक 14.01.2014 रोजी रक्कम रु. 5800/- ला मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल खरेदी केला. त्याची पावती क्र. 8133 असून मॉडेल ए-66 असा आहे. मोबाईल खरेदी केल्यानंतर सदर मोबाईल नादुरुस्त झाला. त्याचा टच स्क्रीन काम करीत नव्हता व चार्जींगचाही प्रॉब्लेम होता. अर्जदाराने सदर समस्येसाठी गैरअर्जदार यांच्या सांगण्यावरुन मोबाईल वॉरंटी काळात असल्याने गैरअर्जदार क्र. 2 या सर्व्हीस सेंटरकडे दिनांक 06.8.2014 रोजी दुरुस्तीसाठी दिला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर मोबाईल 8 दिवसात दुरुस्त करुन देतो असे सांगितले परंतू त्यांनी तो 8 दिवसात दुरुस्ती करुन दिलेला नाही. त्यानंतर दिनांक 13.09.2014 रोजी अर्जदार गैरअर्जदार 2 कडे गेला असता सदर मोबाईल दुरुस्ती होणार नाही असे गैरअर्जदार 2 यांनी कळविले. त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना मोबाईल बदलून देण्याची विनंती केली असता त्यांनी त्यास नकार दिला. अर्जदार हा ड्रायव्हर असून त्याची गाडी तो भाडयाने चालवत असतो. त्यासाठी अर्जदाराला नेहमी ग्राहकांचे कॉल येत असतात. त्यासाठी अर्जदारास मोबाईलची अत्यंत आवश्यकता आहे. गैरअर्जदार यांनी मोबाईल दुरुस्ती करुन किंवा बदलून न दिल्यामुळे अर्जदारास नवीन मोबाईल विकत घ्यावा लागला. त्यामुळे अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या मोबाईलची किंमत रक्कम रु. 5,800/- त्यावर दिनांक 14.01.2014 पासून 12 टक्के व्याजासह रक्कम अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- देण्याबाबत आदेश करावा अशी विनंती तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
2. गैरअर्जदार क्र. 1 यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे.
अर्जदारास गैरअर्जदाराविरुध्द तक्रार करण्याचा काहीही अधिकार नाही व सदर अर्ज खारीज करण्यायोग्य आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे व मोबाईल विक्री केल्यानंतर गैरअर्जदार हे ग्राहकास त्याची रितसर पावती देतात व या पावतीवर सर्व सेवा व अटीचा उल्लेख असतो. अर्जदारास ही पावती क्र. 8133 ही दिलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही सेवा त्रुटी दिली नाही. गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा.
3. गैरअर्जदार 2 यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे.
मायक्रोमॅक्स कंपनीकडून ग्राहकासाठी दुसरा मोबाईल फोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संदर्भात ग्राहकास दिनांक 31.12.2014 व दिनांक 08.1.2015 रोजी कळविण्यात आले होते. तसेच ग्राहकास स्टॅन्डबाय मोबाईल देण्यास तयार होते. त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदार यांनी कोठलीही सेवेत त्रुटी दिलेली नाही.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर ते मंचात हजर झाले पण त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केलेले नाही.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
5. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या सदर मोबाईल विकत घेतलेल्या पावतीच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे व ते गैरअर्जदार यांना मान्य आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्यांच्या म्हणण्यात असे कथन केले आहे की, अर्जदार यांना कंपनीने दुसरा मोबाईल देवू केला होता. याचाच अर्थ अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार यांना मान्य आहे. म्हणून ते अर्जदारास मोबाईल बदलून देण्यास तयार आहेत. सदर नवीन मोबाईलचा EMIE नंबर देखील गैरअर्जदार यांनी दिलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांच्या कथनाप्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 31.12.2014 रोजीच नवीन मोबाईल बदलून देण्यासाठी पत्र लिहिलेले आहे. सदर ऑफर गैरअर्जदार यांनी अर्जदाराने मंचात दिनांक 09.10.2014 रोजी तक्रार दाखल केल्यानंतर दिलेली दिसून येते. यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने मंचात तक्रार दाखल करण्यापूर्वी अर्जदारास कोठलीही ऑफर दिलेली नाही व अर्जदारास मंचात तक्रार करणे भाग पडले. गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांच्या पावतीवर ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीच्या विरोधातील अटी लिहिलेल्या आहेत. जे की, अयोग्य आहेत. तसेच त्यांनी अर्जदारास मोबाईल दुरुस्त अथवा बदलून मिळण्यासंबंधी कोठलीही मदत केलेली दिसून येत नाही. असे करुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे व मानसिक त्रास दिलेला आहे. अर्जदार यांनी दुसरा मोबाईल विकत घेतलेला असल्याने अर्जदारास मोबाईलची किंमत गैरअर्जदाराकडून मिळणे योग्य आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास मोबाईलची खरेदी किंमत रक्कम रु. 5,800/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.