नि. 10 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 128/2010 नोंदणी तारीख – 29/4/2010 निकाल तारीख – 6/7/2010 निकाल कालावधी – 67 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ----------------------------------------------------------------------------------- श्री सत्यजीत अरुण महादार रा.22, पुरस्कार, रिमांड होम समोर, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री उमेश शिंदे) विरुध्द श्री मंगेश कमलाकर बोधे रा. पूर्वीचा पत्ता – 6, गराडेवाडा, केसकर कॉलनी, व्यंकटपुरा पेठ, सातारा सध्याचा पत्ता – 653, कसबा पेठ, गुंडाचा गणपतीजवळ, पुणे ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांचे महादार हॉस्पीटल सेंटर व एक्सीडेंट हॉस्पीटल या नावाचे सातारा येथे हॉस्पीटल आहे. जाबदार यांना 6, गराडे वाडा, केसकर कॉलनी, व्यंकटपुरा रोड, सातारा येथे मेडीकल व हॉस्पीटल इन्स्ट्रुमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. अर्जदार यांना ऑपेरशन थिएटरमध्ये ऑटोग्लोव्ह या मशिनची जरुरी असल्याने त्यांनी जाबदार यांचेशी संपर्क साधला. जाबदार यांनी अर्जदार यांना त्यांचे व्यवसायाचे ठिकाणी ऑटोग्लोव्ह मशिनची किंमत रु.35,500/- इतकी असून सदरचे मशिन हे सर्जिकल प्रॉडक्टस ऑफ इंडिया या कंपनीचे उत्पादित असलेले सांगितले व यासाठी उपरोक्त रकमेच्या चेकची मागणी केली. त्याप्रमाणे अर्जदार यांनी जाबदार यांना दि. 29/8/2008 रोजी रु.35,500/- चा बँक ऑफ इंडिया, सातारा या शाखेचा 515048 या क्रमांकाचा चेक दिला. सदरचा चेक जाबदार यांनी बँकेतून वटविला व त्या अनुषंगाने अर्जदार यांना बिल क्र.186 सहीशिक्क्याने दिले. तसेच एक महिन्याच्या आत मशिन देतो असे सांगितले. अर्जदार यांना चेक प्राप्त झालेनंतर त्यांनी जाबदार यांना एक महिन्याच्या आत मशिन देणे बंधनकारक असताना त्यांना आजतागायत मशिन दिलेले नाही. तसेच अर्जदार यांनी मशिन न मिळालेबाबतची जाबदार यांना वेळोवेळी फोनवरुन तसेच प्रत्यक्षात भेटून विचारणा केली असता जाबदार यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून अर्जदार यांना टाळणेस सुरुवात केली व आजतागायत अर्जदार यांना मशिन दिलेले नाही. सदरचे मशिन अर्जदार यांच्या उपजिविकेचे साधन असून पेशंटचे उपचारासाठी त्यांना मशिनची नितांत गरज होती. परंतु जाबदार यांनी जाणुनबुजून फसवणूक करणेचे हेतूने मशिन अर्जदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी मशिन न मिळाल्यामुळे वकीलांमार्फत दि. 28/12/2009 रोजी तक्रारीत नमूद केलेल्या दोन्ही पत्त्यांवर जाबदार यांना नोटीसा पाठविल्या व सदर नोटीशीमध्ये मशिनच्या रकमेची व सोबत मानसिक त्रास व आर्थिक त्रासाच्या नुकसानीची मागणी केली. जाबदार यांनी पुण्याच्या पत्त्यावर पाठविलेली नोटीस स्वतः न स्वीकारता पत्नीमार्फत स्वीकारली व काहीही प्रतिसाद दिलेला नाही. तदनंतर अर्जदार यांनी सातारा शहर पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज दिला. सबब, अर्जदार यांनी रु.35,500/- मशिनपोटी अदा केलेली किंमत, रु.15,000/- त्रासापोटी व्याजासह मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केले नाहीत. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 9 ला पाहिला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांचे तक्रारअर्जानुसार अर्जदार हे आर्थोपेडीक सर्जन असून त्यांचे हॉस्पीटल आहे. सदरचे हॉस्पीटलसाठी त्यांना ऑटोक्लोव्ह या मशीनची गरज असलेने त्यांनी जाबदार यांचेशी संपर्क साधला व सदरचे मशिनची किंमतीपोटी रु.35,500/- जाबदार यांना चेकद्वारे अदा केले. सदरचा चेक मिळाल्यानंतर जाबदार यांनी अर्जदार यांना त्याचे बिल दिले. परंतु जाबदार यांनी आजतागायत अर्जदार यांना मशिन दिलेले नाही असे कथन केलेले आहे. अर्जदार यांनी सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.5 सोबत जाबदार यांनी अर्जदार यांना दिलेली पावती हजर केलेली आहे. त्यामध्ये जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून 35,500/- चा चेक मिळाल्याबाबत शिक्क्यानिशी सही केलेचे दिसून येत आहे. नि.5/1 ला अर्जदार यांनी जाबदार यांनी दिलेले बिल दाखल केलेले असून त्यामध्ये त्यांनी मशिनचा तपशील व त्याची किंमत नमूद केलेली आहे. सदरचे दोन्ही कागद पाहता अर्जदार यांचेकडून जाबदार यांना ऑटोक्लोव्ह मशिनचे किंमतीपोटी रु.35,500/- मिळाल्याचे स्पष्ट दिसून येते. नि.5/3 ला अर्जदार यांनी जाबदार यांचेविरुध्द सातारा शहर पोलिस स्टेशन यांचेकडे दिलेल्या तक्रारअर्जाची प्रत दाखल केली आहे. नि.5/4 ला अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. परंतु तरीही जाबदार यांनी अर्जदार यांना मागणी केलेले मशिन पुरविलेले नसलेचे दाखल कागदपत्रांवरुन व अर्जदारचे शपथपत्रावरुन दिसून येत आहे. जाबदार यांनी अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन व त्यासोबतची कागदपत्रे त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन नाकारलेली नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार करता जाबदार यांनी अर्जदार यांना मशीन न देवून सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदार हे जाबदार यांचेकडून मशिनचे किंमतीपोटी दिलेली रक्कम रु.35,500/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 3. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. मशिनचे किंमतीपोटी घेतलेली रक्कम रु.35,500/- (रु.पस्तीस हजार पाचशे फक्त) चेकची ता. 29/8/2008 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्यावी. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 6/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) सदस्य प्रभारी अध्यक्ष
| , | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | , | |