::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-20 एप्रिल, 2017)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे मे.कामधेनू एक्सपेलर इंडस्ट्रीज आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांचे विरुध्द दोषपूर्ण सयंत्रा संबधाने दाखल केली आहे.
02. तक्रारकर्ती तर्फे दाखल तक्रारीचा थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही सुशिक्षीत बेरोजगार असून तिने स्वंयरोजगार अंतर्गत जिल्हा उद्दोग केंद्र नागपूर यांचे मार्फतीने मा.प्रधानमंत्री रोजगार योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर तिने घोगली, तालुका जिल्हा नागपूर येथे ऑईल मिल सुरु करण्यासाठी बँक ऑफ इंडीया, शाखा कडबी चौक, नागपूर यांचे कडून व्यवसाया करीता कर्ज घेतले. तिने विरुध्दपक्ष क्रं-1) यांचे कडून सदर ऑईल मिल चालविण्या करीता आवश्यक असलेल्या सयंत्राचे कोटेशन दिनांक-27.01.2010 रोजी घेतले व सौदा केल्या नंतर बयाना दाखल नगदी स्वरुपात दिनांक-29.01.2010 रोजी रुपये-2,25,000/- विरुध्दपक्ष क्रं-1) ला दिले. तसेच बँक ऑफ इंडीया, शाखा कडबी चौक, नागपूर यांनी नांक-19.08.2010 रोजी डी.डी.स्वरुपात रुपये-6,00,000/- विरुध्दपक्ष क्रं-1) ला दिलेत. त्यानंतर बँक ऑफ इंडीया आणि नागपूर नागरी बँके तर्फे दिनांक-02.12.2010 ते दिनांक-03.03.2011 या कालावधीत धनादेशांव्दारे रुपये-2,20,000/- विरुध्दपक्ष क्रं-1) ला अदा केलेत. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) ला एकूण रुपये-11,45,000/- सयंत्रापोटी देण्यात आलेत. विरुध्दपक्ष क्रं-1) ने रक्कम प्राप्त झाल्या नंतर ऑईल मिल चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सयंत्राचे साहित्य पुरविले.
तक्रारकर्तीने पुढे असेही नमुद केले की, तिने बँक कडून कर्ज घेतले असल्याने सदर्हू उद्दोगाचा विमा विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी कडून दिनांक-24.02.2011 ते दिनांक-21.02.2012 या कालावधीसाठी काढला. विरुध्दपक्ष क्रं-1) ने ऑईल मिल करीता आवश्यक सयंत्राची स्थापना करुन दिली तसेच दोन वर्ष पर्यंतची हमी दिली. तक्रारकर्तीने एप्रिल-2011 पासून सुरुवात केली. दिनांक-01/06/2011 पर्यंत जवळपास 5000 किलोग्रॅम तेल ऑईल स्टोअर टँक मध्ये जमा करण्यात आले. दिनांक-01.06.2011 रोजी ऑईल स्टोअर टँकच्या निकृष्ट दर्जामुळे वॉल तुटून संपूर्ण तेल जवळपास रुपये-5,00,000/- किम्मतीचे वाहून गेले. सयंत्राचा वाल्व कमी चुडीमुळे तुटल्याने नुकसान झाले व तेंव्हा पासून ऑईल मिल पूर्णपणे बंद आहे परंतु विद्दुत बिल व अन्य बाबींवर खर्च करावा लागत आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) कडे वेळोवेळी भेटी देऊन नुकसानीची पाहणी करावी अशी विनंती केली परंतु त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही व भेट दिली नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) चे मागणी प्रमाणे तज्ञ श्री खेडकर इंडस्ट्रीयल टेक्नीकल एक्स्पर्ट यांनी दिनांक-12.08.2011 रोजी मोक्यावर भेट देऊन दिनांक-16.08.2011 रोजी अहवाल दिला. अहवाल तसेच सयंत्राचे फोटो विरुध्दपक्ष क्रं-1) ला देऊन नुकसान भरपाईची मागणी केली असता विरुध्दपक्ष क्रं-1) ने नविन सयंत्र बसवून देण्याचे कबुल केले परंतु त्यानंतर नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्तीने दोन्ही विरुध्दपक्षानां कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्त होऊनही प्रतिसाद मिळाला नाही वा उत्तरही दिलेले नाही.
म्हणून शेवटी तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन पुढील मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षां कडून नुकसानीची रक्कम रुपये-5,00,000/- वार्षिक-18 टक्के दराने दिनांक-01 जून, 2011 पासून व्याजासह मिळावी.
(02) निकृष्ट दर्जाचे सयंत्रा ऐवजी उत्कृष्ट सयंत्र देण्याचे विरुध्दपक्ष क्रं-1) ला आदेशित व्हावे.
(03) दिनांक-01 जून, 2011 पासून कारखाना बंद पडल्यामुळे प्रतीमाह रुपये-50,000/- प्रमाणे नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रं-1) कडून मिळावी
(04) विरुध्दपक्षां कडून तक्रारीचा खर्च मिळावा.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सयंत्र निर्माता/विक्रेत्याने लेखी उत्तराव्दारे नमुद केले की, तक्रारकर्तीने व्यवसाया करीता सयंत्र विकत घेतलेले आहे, त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही. तक्रारकर्ती ही फक्त वर्ग-1 पास आहे त्यामुळे तिला सुक्षिक्षीत म्हणता येणार नाही. तसेच ती विवाहित स्त्री आहे त्यामुळे स्वतःच्या उपजिविकेसाठी ती व्यवसाय करीत आहे असेही म्हणता येणार नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) हा कामधेनू एक्सपोलर इंडस्ट्रीजचे मालकाचा मुलगा असून तो सदर कपंनी मध्ये भागीदार आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या कोटेशनवर पार्टनर किंवा प्रोप्रायटरची सही किंवा शिक्का नाही. तक्रारकर्तीने दिनांक-29.01.2010 रोजी रक्कम रुपये-2,25,000/- दिलेले नाही आणि खोटी रसिद दाखल केलेली आहे, या बद्दल त्यांनी पोलीस स्टेशनला तिचे विरुध्द तक्रार दाखल केलेली असून पोलीस तपासात ती रसिद खोटी असल्याचे निष्पन्न झालेले आहे परंतु ती पोलीस स्टेशनला भेट देण्याचे टाळत आहे. अन्य रसिदा पाहता रुपये-2,25,000/- ची रसिद ही वेगळी दिसून येते. यंत्रसामुग्रीतील वॉल हे विरुध्दपक्ष क्रं-1) कडून खरेदी केलेले नाही वा तो खरेदी केल्या बाबत रसिद पावती दिलेली नाही. तक्रारकर्तीने काढलेला विमा हा व्यवसायिक कारणासाठीचा आहे. तक्रारकर्तीने विमा सर्व्हेअर यांचा अहवाल दाखल केलेला नाही. ज्यावेळेस सयंत्र दिले होते ते उत्कृष्ट होते परंतु तिने ते प्रशिक्षीत व्यक्ती कडून स्थापित केलेले नाही. सयंत्रा मध्ये 5000 टन तेल उत्पादनाची क्षमता आहे परंतु तक्रारकर्तीने 5000 टन तेल संग्रहित केल्याचे नमुद केलेले आहे. अतिरिक्त वजनामुळे सुध्दा वॉल तुटून गेला असावा. तिने दिलेल्या नोटीस मध्ये नमुद केलेले आहे की, क्षमते पेक्षा 500 टन तेल जास्त साठविले होते. उर्वरीत रक्कम द्दावी लागू नये म्हणून तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार ही खोटी असल्यामुळे ती खारीज करण्यात यावी असा उजर विरुध्दपक्ष क्रं-1) सयंत्र निर्माता/विक्रेता याने घेतला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विमा कंपनी तर्फे लेखी उत्तरात नमुद करण्यात आले की, व्यवसायिक कारखान्यातील सयंत्र निर्मिती दोषा बाबत ही तक्रार असल्याने तक्रारकर्ती ही ग्राहक या सज्ञेत येत नाही त्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. विमा पॉलिसी मध्ये निर्मिती दोष अथवा उत्पादन क्षमतेच्या दोषासाठी कोणतेही विमा संरक्षण नाही, त्यामुळे विमा दावा देय नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी कडून करण उद्दोग यांना दिनांक-24.02.2011 ते दिनांक-23.02.2012 या कालावधीत स्टॅन्डर्ड फायर स्पेशन पेरील पॉलिसी शर्ती व अटीच्या आधिन राहून दिली होती. पॉलिसी अंतर्गत व्याज, प्रासंगिक नुकसान व इतर कोणताही खर्च देय नाही. विमापत्रा अंतर्गत विमाधारकाने प्रतीपुर्ती संदर्भात दाव्या संबधात कोणतीही सुचना दिलेली नाही व आवश्यक दस्तऐवज पुरविलेले नाही. तक्रारकर्तीची तक्रार ही चुकीची असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्तीचे वकील तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला तसेच उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवज तसेच तक्रारकर्ती तर्फे दाखल लेखी युक्तीवादाचे अवलोकन करुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने स्वयंरोजगारा अंतर्गत घोगली येथे ऑईल मिल सुरु करण्यासाठी बँक ऑफ इंडीया, शाखा कडबी चौक, नागपूर यांचे कडून कर्ज घेऊन विरुध्दपक्ष क्रं-1) यांचे कडून ऑईल मिल करीता आवश्यक सयंत्र विकत घेतले व त्या प्रित्यर्थ्य विरुध्दपक्ष क्रं-1) ला वेळोवेळी एकूण रुपये-11,45,000/- अदा केलेत. विरुध्दपक्ष क्रं-1) ने दिनांक-29.01.2010 रोजीची रुपये-2,25,000/-ची रसिद त्यांची नसल्या संबधीचा मुद्दा उपस्थित करुन ती रसिद नाकारली परंतु त्या संबधी योग्य असा सक्षम पुरावा सादर केलेला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) चे सदरचे म्हणणे ग्राहय धरल्या जात नाही.
07. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष कामधेनू एक्स्पेलर इंडस्ट्रीज, नागपूर यांना खालील प्रमाणे रकमा दिल्या बाबत पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत-
Sl.No. | Date of Receipt | Paid Amount |
1 | 29/01/2010 | 2,25,000/- |
2 | 19/08/2010 | 6,00,000/- |
3 | 27/12/2010 | 60,000/- |
4 | 31/01/2011 | 50,000/- |
5 | 07/02/2011 | 50,000/- |
| Total | 9,85,000/- |
तक्रारकर्तीने तक्रारीत वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं-1) ला सयंत्रासाठी वेळोवेळी रुपये-11,45,000/- दिल्याचे जरी नमुद केले असले तरी दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन तिने एकूण रुपये-9,85,000/- विरुध्दपक्ष क्रं-1) ला अदा केल्याची बाब दिसून येते, त्यामुळे तेवढी रक्कम तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-1) सयंत्र निर्माता/विक्रेता यांना दिल्याचे मंचा तर्फे हिशोबात धरण्यात येते.
08. दोन्ही विरुध्दपक्षां तर्फे तक्रारकर्तीने व्यवसाया करीता सयंत्र खरेदी केले असल्याने ती ग्राहक या सज्ञेत मोडत नसल्याचा आक्षेप घेतलेला आहे परंतु तिने मा.पंतप्रधान योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असून स्वंयरोजगारा अंतर्गत उद्दोग सुरु केल्यामुळे व्यवसायिक हेतू असे म्हणता येणार नाही, त्यामुळे दोन्ही विरुध्दपक्षांचे या आक्षेपात मंचास तथ्य वाटत नाही.
09. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने एप्रिल-2011 पासून ऑईल मिलला सुरुवात केली. दिनांक-01/06/2011 पर्यंत जवळपास 5000 किलोग्रॅम तेल ऑईल स्टोअर टँक मध्ये जमा करण्यात आले. दिनांक-01.06.2011 रोजी ऑईल स्टोअर टँकच्या निकृष्ट दर्जामुळे वॉल तुटून संपूर्ण तेल जवळपास रुपये-5,00,000/- किम्मतीचे वाहून गेले. सयंत्राचा वाल्व कमी चुडीमुळे तुटल्याने नुकसान झाले व तेंव्हा पासून ऑईल मिल पूर्णपणे बंद आहे.
10. विरुध्दपक्ष क्रं-1) सयंत्र निर्माता/विक्रेत्याने संपूर्ण तक्रारच नाकारलेली आहे. त्याने तो कामधेनू एक्सपेलर इंडस्ट्रीज मध्ये भागीदार असून उत्कृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री तक्रारकर्तीला पुरविली असल्याचे नमुद केले परंतु वॉल पुरविला नव्हता असाही आक्षेप घेतला परंतु ज्याअर्थी सयंत्र पुरविले त्याअर्थी वॉलचा त्यामध्ये समावेश असणे गृहीत आहे. त्याने पुढे असेही नमुद केले की, सयंत्रा मध्ये 5000 टन तेल उत्पादनाची क्षमता असून तक्रारकर्तीने क्षमते पेक्षा 500 टन तेल जास्त साठविले असल्याने वॉल तुटला. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) यंत्रसामुग्री निर्माता/विक्रेत्याचे या म्हणण्यात फारसे तथ्य दिसून येत नाही. याचे कारण असे की, तक्रारकर्तीने एप्रिल-2011 मध्ये ऑईलमिल चालविण्यास सुरुवात केली आणि त्याच वर्षातील दिनांक-01.06.2011 रोजी सयंत्रातील वॉल तुटल्याने त्यातील तेल वाहून गेले. एवढया कमी कालावधीत वॉल तुटल्याने त्यामध्ये निर्मिती दोषच राहू शकतो. विरुध्दपक्ष क्रं-1) ने असाही आक्षेप घेतला की, तक्रारकर्तीने अप्रशिक्षीत व्यक्ती कडून सयंत्र बसविले परंतु याही आक्षेपात फारसे तथ्य दिसून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता/विक्रेत्याने आपला बचाव करण्याचे उद्देश्याने मोघम स्वरुपाची विधाने केलेली आहेत परंतु योग्य तो पुरावा ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेला नाही.
11. या उलट तक्रारकर्तीने पुराव्यार्थ खेडकर असोसिएटस कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे श्री पी.पी.खेडकर चार्टड इंजिनिअर यांचा दिनांक-16.08.2011 रोजीचा अहवाल दाखल केला त्यांनी ब्रोकन व्हॉल्व्हचे फोटोग्राफ सुध्दा अहवाला सोबत दाखल केलेले आहेत. त्यात त्यांनी असे नमुद केलेले आहे की, सयंत्रा मध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य असून त्यामध्ये वॉल हा अयोग्य पध्दतीने बसविलेला होता.
12. श्री खेडकर, चार्टड इंजिनिअर यांचे निरिक्षण अहवालास विरुध्दपक्ष क्रं-1) सयंत्र निर्माता/विक्रेता यांनी आव्हान दिलेले नाही वा त्यांची उलट तपासणी इत्यादीची मागणी केलेली नाही. श्री खेडकर यांचा अहवाल अमान्य करण्या सारखे दिसून येत नाही. सयंत्र विकत घेतल्या नंतर अगदी दोन-तीन महिन्यात त्यामधील वॉल तुटणे हा सर्व प्रकार उत्पादकीय दोष (Manufacturing defects) असल्यामुळेच घडू शकतो.
13. विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे उत्तरात विमा कंपनी कडून करण उद्दोग यांना दिनांक-24.02.2011 ते दिनांक-23.02.2012 या कालावधीत स्टॅन्डर्ड फायर स्पेशल पेरील पॉलिसी त्यातील अटी व शर्तीच्या अधिन राहून दिली होती विमा पॉलिसी मध्ये निर्मिती दोष अथवा उत्पादन क्षमतेच्या दोषासाठी कोणतेही विमा संरक्षण नाही, त्यामुळे विमा दावा देय नसल्याचे नमुद केले. परंतु विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीने विम्यातील अटी व शर्तीचा दस्तऐवज दाखल केलेला नाही परंतु सर्व साधारण व्यवहारात निर्मिती दोष हा भाग विम्या अंतर्गत जोखीम मध्ये येत नाही. त्यामुळे वॉल तुटल्यामुळे उदभवलेल्या निर्मिती दोषसाठी विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यास बाध्य करु शकत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
14. तक्रारकर्तीचे असेही म्हणणे आहे की,वॉल तुटल्यामुळे तिचे तेल वाहून गेले आणि त्यामुळे तिचे रुपये-5,00,000/- रकमेचे नुकसान झाले परंतु या संदर्भात योग्य असा पुरावा समोर आलेला नसल्याने तिची ही मागणी मान्य होऊ शकत नाही. तक्रारकर्तीने प्रतीमाह रुपये-50,000/- प्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे परंतु ही मागणी जशीच्या तशी स्विकारता येत नाही.
15. विरुध्दपक्ष क्रं-1) यंत्रसामुग्री निर्माता तथा विक्रेता यांनी तक्रारकर्तीला ऑईल मिलसाठी पुरविलेल्या यंत्रसामुग्री मध्ये निर्मिती दोष असल्याची बाब सिध्द झालेली असल्यामुळे यंत्रसामुग्रीतील दोषा संबधी जी काही नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आहे ती विरुध्दपक्ष क्रं-1) चीच आहे.
16. वरील वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ती सौ.आशा गणेश खंगार, प्रोप्रायटर मे. करण उद्दोग घोगली, तालुका जिल्हा नागपूर हिची विरुध्दपक्ष क्रं-1) मेसर्स कामधेनू एक्सपेलर इंडस्ट्रीज, नागपूर, वाठोडा रोड, नागपूर तर्फे प्रोप्रायटर/मार्केटींग मॅनेजर महेश हरीभाऊ हटवार याचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रं-1) ला आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्ती कडे पुरविलेले निकृष्ट दर्जाचे सयंत्र बदलवून त्याऐवजी त्याच मॉडलचे त्याच कंपनीचे नविन उत्कृष्ट दर्जाचे सयंत्र कोणतेही शुल्क न स्विकारता कारखान्यात बसवून द्दावे व असे सुस्थितीत, नविन व योग्य उत्कृष्ट सयंत्र बसवून मिळाल्या बाबत तक्रारकर्ती कडून लेखी पोच घ्यावी.तसेच नविन सयंत्राचे संपूर्ण दस्तऐवज देऊन नव्याने वॉरन्टी द्दावी.
(03) निकृष्ट यंत्रसामुग्रीमुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) सयंत्र निर्माता/विक्रेत्याने तक्रारकर्तीला नुकसान भरपाई दाखल/तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार फक्त) द्दावेत.
(04) तक्रारकर्तीच्या अन्य मागण्या या पुरेश्या पुराव्या अभावी नामंजूर करण्यात येतात.
(05) विरुध्दपक्ष क्रं-2) व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(06) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) ने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत करावे.
(07) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.