नि.31
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2216/2009
तक्रार नोंद तारीख : 04/11/2009
तक्रार दाखल तारीख : 06/11/2009
निकाल तारीख : 26/06/2013
---------------------------------------------------
1. श्री इकबाल हमीद बागवान
2. सौ रिहाना इकबाल बागवान
3. इम्रान इकबाल बागवान
रा. मिरज मार्केट, गाळा नं.4,
मिरज, ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
मिरज, मंगळवार पेठ, शनिमारुती देवळासमोर, मिरज
करिता संचालक
2. श्री निळकंठ पांडुरंग माळकर,
रा.कवलापूर, ता.मिरज
3. सौ माधुरी सुरेश चरणकर,
रा.अयोध्या अपार्टमेंट, शिवनेरी चौकाजवळ,
ब्राम्हणपुरी, मिरज
4. श्री श्रीपाल किसन भागवत,
रा.अंकलखोप, ता.मिरज जि.सांगली
5. श्री सुभाष गणपती कांबळे,
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
6. श्री महालिंग गुरुलिंग माईनकर
रा.कासार गल्ली, म्हसोबा देवालयजवळ,
तासगांव
7. श्री रविंद्र बापूसो कुपवाडे,
रा.द्वारा माजी चेअरमन, महालक्ष्मी पतसंस्था
आष्टा मु.पो.आष्टा
8. श्री बापूसो महादेव फल्ले,
रा.कामेरी, ता.मिरज जि. सांगली
9. श्री जगन्नाथ यशवंत देशमाने,
रा.अंबाबाई देवळाजवळ, मंगळवार पेठ, मिरज
10. श्री महालिंग शंकर फल्ले
रा.चिंचणी ता.तासगांव जि. सांगली
11. श्री रावसाहेब सातलिंग विभुते,
रा.अंकलखोप, ता.मिरज जि.सांगली
12. श्री यशवंत आण्णा सावंत,
रा.जलशुध्दीकरण केंद्र, मिरज ता.मिरज
13. श्री महादेव लक्ष्मण देशमाने,
रा.शिराळा, ता.शिराळा. जि.सांगली
14. श्री बापूसो दत्तोबा बनसवडे,
मु.पो.बेडग, ता.मिरज जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड आर.एम.शिंदे
जाबदारक्र.1, 2, 4 ते 14 : एकतर्फा
जाबदार क्र.3 : वगळले
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली दाखल केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार हे जाबदार क्र.1 संस्थेचे ठेवीदार आहेत. जाबदार क्र.2 सदर संस्थेचे चेअरमन/अध्यक्ष असून जाबदार क्र.3 ते 14 हे संचालक आहेत. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 संस्थेच्या दामदुप्पट ठेव योजनेमध्ये तक्रारदार क्र.1 इकबाल हमीद बागवान यांचे नावे पावती क्र.2957 अन्वये रक्कम रु.11,000/-, पावती क्र.2975 अन्वये रु.8,000/- व पावती क्र.2994 अन्वये रक्कम रु.12,000/-, दि.20/4/08, 2/5/08 व 17/6/08 रोजी अनुक्रमे जमा केली आहे, तर तक्रारदार क्र.2 रिहाना इकबाल बागवान यांचे नावे ठेव पावती क्र.2964 अन्वये रक्कम रु.10,000/- दि.28/4/08 रोजी तर तक्रारदार क्र.3 इम्रान इकबाल बागवान यांचे नावे ठेव पावती क्र.3026 अन्वये रक्कम रु.12,000/- दि.16/9/08 रोजी जमा केली होती. मुदत संपलेनंतर तक्रारदारांनी जाबदारांकडून सदर रकमांची मागणी कली असता जाबदारांनी त्यास रक्कम देण्यास टाळाटाळ व चालढकल चालविली. दोन-तीन वर्षे हेलपाटे मारुन देखील जाबदार क्र.1 तर्फे तक्रारदारास त्यांच्या रकमा परत केल्या नाहीत. अखेरीस दि.2/12/08 रोजी तक्रारदारांनी जाबदारास नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली. सदर नोटीस काही जाबदारांनी स्वीकारली तर काहींनी स्वीकारली नाही. जाबदार रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. करिता तक्रारदारास सदर तक्रार दाखल करण्यास दाव्यास कारण निर्माण झाले आहे. जाबदार हे सदर संस्थेचे संचालक सदस्य व पदाधिकारी असल्याने ते वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदाराची रक्कम देण्यास जबाबदार आहेत अशा कथनांवरुन तक्रारदारांनी जाबदारकडे असणारी वर नमूद केलेली ठेवींची रक्कम हिशोबी व्याजासह जाबदार क्र. 1 ते 14 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या वसुल करुन मागितला आहे. त्याचबरोबर जाबदारांनी तक्रारदारास दिलेल्या आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- दंडस्वरुपात मागितले असून सदर तक्रारीचा संपूर्ण खर्च त्यांचेकडून वसूल करुन मागितला आहे.
3. तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 ला आपले शपथपत्र दाखल करुन नि.5 या फेरिस्तसोबत एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. प्रस्तुत प्रकरणात, जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 यांना यथायोग्यपणे बजावून देखील जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 हे मंचासमोर हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा कामकाज चालवावे असा आदेश पारीत करण्यात आला. जाबदार क्र.3 यांना याकामी तक्रारदाराने मे.मंचाचे आदेशानुसार वगळले आहे.
5. तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणात तोंडी पुरावा दिलेला नाही व तशी पुरसिस नि.29 ला दाखल केली आहे. तक्रारदाराचे विद्वान वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद नि.30 ला सादर केला आहे.
6. जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 हे प्रस्तुत प्रकरणात हजर झालेले नाही व त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश झाल्याने तक्रारीत नमूद केलेल्या कथनांवरुन प्रस्तुतची तक्रार मंजूर करता येऊ शकते. तथापि त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने नि.3 ला शपथपत्र दाखल करुन मूळ कागदपत्रे दाखल केली आहेत. शपथपत्रातील कथने, ठेवपावत्या व तक्रारदारांनी जाबदारांना पाठविलेली नोटीस यावरुन हे स्पष्टपणे शाबीत होते की, तक्रारदाराने वेळोवेळी जाबदार क्र.1 मध्ये मुदत ठेवी ठेवल्या व त्यांच्या मुदती संपून देखील तक्रारदारांना त्यांच्या रकमा जाबदारांनी दिलेल्या नाहीत व त्यायोगे तक्रारदारास दूषीत सेवा दिली आहे. करिता तक्रार संपूर्णतया मंजूर करण्यास पात्र आहे. जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 हे सदर दूषित सेवेस जबाबदार आहेत व त्यांना तसे जबाबदार धरण्यात येते. मुदत संपून देखील व वारंवार मागणी करुन देखील तक्रारदारांची जमा रक्कम त्यांना मिळत नसल्याने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यास नुकसान भरपाई दाखल मागितलेली रक्कम रु.5,000/- ही देखील मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. कुठलेही संयुक्तिक कारण नसताना मुदत ठेवीची मुदतीनंतर तक्रारदारास देय असणा-या रकमा जाबदारांनी अडवून ठेवल्याने व त्या देण्यास टाळाटाळ केल्याने त्या रकमांवर व्याज देण्यास जाबदार हे जबाबदार आहेत. सबब प्रस्तुतची तक्रार मंजूर करण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारदारास तक्रारअर्जातील मुदत ठेवींच्या मुदतीनंतरच्या देय रकमा तक्रारदारास द्याव्यात. सदरच्या देय रकमांवर ठेवपावतीची मुदत संपले तारखेपासून तक्रार दाखल तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे व तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्षरित्या तक्रारदारास देईपावेतो सदर रकमांवर द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने व्याज द्यावे.
3. जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारदारास आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.1,000/- द्यावा.
4. जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 यांनी सदर संपूर्ण रकमा या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात अन्यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करता येईल.
सांगली
दि. 26/06/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष