द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 31 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार विकसित करत असलेल्या मौजे हडपसर, सर्व्हे नं. 302/3 येथील इमारतीत सदनिका विकत घेण्यासंदर्भात उभय पक्षकारात दिनांक 16/10/2008 रोजी लेखी करार झाला. करारानुसार सदनिकेची किंमत रुपये 3,00,000/- निश्चित करण्यात आली होती, ही रक्कम तक्रारदारांनी जाबदेणार यांना अदा केली. करारानुसार 19 महिन्यात जाबदेणार सदनिकेचा ताबा देणार होते. त्यानंतर बराच कालावधी उलटून गेल्यावरही जाबदेणार यांनी सदनिकेचा ताबा दिला नाही. तक्रारदारांचे पती सैन्यदलात कामाला होते. नोकरीमुळे त्यांच्या वेगवेगळया राज्यात बदल्या होत असत. त्यामुळे जाबदेणारांबरोबर संपर्क साधणे कठीण होऊ लागले. नंतर तक्रारदारांचे पती आजारी पडले व दिनांक 23/4/2009 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदारांनी वारंवार विनंती करुनही जाबदेणार यांनी सदनिकेचा ताबा दिला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 3,00,000/- पैकी रुपये 2,50,000/- जानेवारी 2011 पर्यन्त अदा केले, परंतू उर्वरित रुपये 50,000/- मागणी करुनही परत दिले नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 50,000/-, रुपये 3,00,000/- वर 12 टक्के दराने दिनांक 16/10/2008 पासूनचे व्याज, नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात दिनांक 16/10/2008 रोजी नोंदणीकृत करारनाम्याचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून मौजे हडपसर, सर्व्हे नं. 302/3 येथील इमारतीत सदनिका विकत घेण्यासाठी कराराच्या कलम तीन नुसार जाबदेणार यांना सदनिकेची किंमत रुपये 3,00,000/- अदा केलेली असल्याचे, रक्कम मिळाल्याचे जाबदेणार यांनी मान्य केल्याचे दिसून येते. कराराच्या पान क्र.4 वरील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जाबदेणार यांनी इमारतीचे बांधकाम 18 महिन्यांच्या आत करावयाचे होते. परंतू जाबदेणार यांनी कराराप्रमाणे बांधकाम वेळेमध्ये पुर्ण केले नाही, तक्रारदारांच्या पतींचे निधन झाले, त्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 3,00,000/- मधून रुपये 2,50,000/- दिल्याचे तक्रारदारांना मान्य असल्याचे तक्रारीवरुन स्पष्ट होते. तक्रारदारांकडून सदनिकेचा संपुर्ण मोबदला स्विकारुनही, करारात नमूद केलेल्या कालावधीत बांधकाम पूर्ण न करणे ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून उर्वरित रक्कम रुपये 50,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 10,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 10,000/- देण्यात येत असल्यामुळे तक्रारदारांची व्याजाची मागणी अमान्य करण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 50,000/- आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रितरित्या रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.