जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/29 प्रकरण दाखल दिनांक – 27/01/2009. प्रकरण निकाल दिनांक – 26/05/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. प्रल्हाद भ्र. भीमराव वर्ताळे वय,60 वर्षे, धंदा शेती, अर्जदार रा.आलेगांव ता.कंधार जि.नांदेड. विरुध्द 1. श्रीकृष्णा कृषी सेवा केंद्र, तर्फे प्रोप्रायटर, भोपाळवाडी फाटा, पो. गांधीनगर, कलंबर (बु) ता.लोहा जि.नांदेड. गैरअर्जदार 2. नुजीविडू सिडस (प्रा.)लि. तर्फे प्रोप्रायटर, जे-48, एम.आय.डी.सी. फेझ -3 अकोला-444 104. अर्जदारा तर्फे. - अड.एम.डी.देशपांडे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अड.नरेंद्र धुत. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकारा बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे प्रगतीशिल शेतकरी असून त्यांनी आपल्या आलेगांव ता.कंधार येथील शेत जमिन गट क्र. 466 मधील 1 हेक्टर 21 आर जमिनीत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून सोयाबीन बियाणे दि.16.6.2007 रोजी खरेदी केले व दि.17.6.2007 रोजी त्यांचे जमिनीत बियाण्याची लागवड केली. लागवडीचे वेळेस खत, युरिया इत्यादी खते देण्यात आली व यानंतर दिड महिन्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने एन्डोसल्फान, इमिक्रीन, मुद्रा, सेव्हर इत्यादी किटकनाशके फवारण्यात आले. दोन महिन्यानंतर झाडास लागलेलया शेंगाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळून आले व ज्या शेंगा लागल्या होत्या त्या पूर्णपणे भरलेल्या नव्हत्या व पिकावर भुरशीजन्य रोग पडलेला असून शेंगा काळया पडल्या होत्या. त्यामूळे अर्जदार यांना दूषीत बियाणे असल्याबददलची शंका आली त्यांनी गैरअर्जदार क्र.1 याचेंकडे तक्रार केली परंतु त्यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केल्यानंतर बियाणे उगवे पर्यतची जबाबदारी आमची आहे यापूढील नाही असे म्हणून उडवून लावले. अर्जदाराच्या तक्रारीवरुन दि.18.9.2007 रोजी गट विकास अधिकारी कंधार यांनी तक्रार मिळाल्यावरुन दि.23.9.2007 रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला. यात सूरभी सोयाबीन पिकास शेंगा कमी लागल्या, 50 टक्के शेंगा दाणेयूक्त नव्हत्या व पिकांवर भुरशीजन्स रोग पडला असल्यामूळे बियाणे भेसळयूक्त आहे असे म्हटले आहे. यानंतर सोयाबीन पिकामध्ये कोणतीही सूधारणा झाली नाही त्यामूळे पिकाची कापणी केल्यानंतर खळयाचे वेळेस दि.6.11.2007 रोजी अर्जदाराच्या तिन एकर शेतात पंचासमक्ष 5 क्विंटल 92 किलो एवढेच उत्पन्न झाले. एक एकरात सरासरी 10 ते 11 क्विंटल उत्पन्न गृहीत धरल्यास 25 क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न अपेक्षित होते. त्यावेळी भाव रु.2,000/- प्रतिक्विंटल असा होता त्यामूळे अर्जदाराचे रु.50,000/- चे नूकसान झाले, शिवाय मशागत, बियाणे, खते या बददल वेगळा खर्च झालेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी नूकसान भरपाई मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, नूकसानी बददल रु.50,000/- इतर खर्च रु.16,605/- तसेच मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- असे एकूण रु.81,605/- व्याजासह मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस तामील झाली ते वकिलामार्फत हजर ही झाले परंतु त्यांनी आपले म्हणणे न दिल्याने नो से आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांची तक्रार अमान्य व नाकबूल आहे. नूजीवूडी सिडस कंपनी ही उत्कृष्ट बियाणे तयार करणारी कंपनी असून बियाण्याची लागवड केल्यानंतर तेथील वातावरणाचा दर्जा, उपलब्ध हवामान,केली जाणारी अंतर्गत मशागत, योग्य खते व किटकनाशक फवारणी यांचा योग्य प्रकारे वापर झाला नाही व कमी किंवा जास्त प्रमाणात झाल्यास पिकांचा दर्जा कमी होती. पिक न येण्याकरिता बियाणे हा एकमेव घटक जबाबदार नाही त्यामूळे कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. सोयाबीन बियाणे हे नाजूक बियाणे असते. या बियाण्याच्या बँगेची हाताळणी एकमेव घटक नाही. कारण जर बँगेची आदळआपट झाल्यास किंवा बँगेवर घरामधील लहान मूले खेळल्यास त्या बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. तसेच बियाणे शक्यतोवर विकत घेतल्यानंतर लगेच पेरणी करणे आवश्यक असते. अर्जदाराने सोयाबीन बियाण्याची खरेदी दि.16.6.2007 रोजी केली होती व बियाण्याची पेरणी दि.17.7.2007 रोजी केली. म्हणजे बियाणे विकत घेतल्यानंतर अर्जदाराने तब्बल 31 दिवसांनी पेरणी केलेली आहे. सोयाबीन बियाण्याची आर्द्रता ही योग्य प्रकारे ठेवावी लागते अन्यथा उगवण शक्तीवर परीणाम होते असे कृषीशास्ञ सांगते. त्यामूळे कमी उत्पन्न होणे अपेक्षित आहे. अर्जदाराने 7/12 वर त्याचं नांवाने 1 हेक्टर 21 आर जमीन केलेली आहे. व लागवड 3 एकरात केली असे म्हटले आहे. त्यामूळे उपलब्ध जमिनीपेक्षा पेरा जास्त झाला हे कसे शक्य आहे. महाराष्ट्र शासनाने शेतक-याची तक्रार आल्यानंतर पिक पाहणी करिता जिल्हास्तरीय तक्रार निवारण कमिटी गठीत केलेली आहे. यासाठी विवीध कृषी खात्यातील सात तज्ञाची नेमणूक केलेली आहे. समितीतील सर्व सदस्य सोबत जाऊन पिकाची पाहणी करतात त्यांचा संयूक्त पंचनामा व अहवाल आवश्यक आहे. कोणत्याही एका व्यक्तीला अहवाल देण्याचा अधिकार नाही. त्यामूळे दि.24.9.2007 चा पंचनामा अनाधिकृत आहे. पंचायत समितीच्या कृषी अधिका-याने जो अहवाल दिलेला आहे यात बियाण्याची उगवण 35 टक्के झालेली आहे परंतु उगवण कमी का झाली यांचा संयूक्तीक कारणे दिलेली नाहीत. अर्जदाराने असेही नमूद केलेले आहे की, वादातील बियाणे संबंधी त्यांने दूसरे बियाण्याची लागवड केली, एकञितपणे केलेली आहे. अर्जदाराच्या स्वतःच्या चूकीमूळे होणा-या नूकसानीस तो स्वतः कारणीभूत आहे. पिकावर जो भूरशीजून्य रोग आढळला आहे त्याकरिता बियाणे हा घटक जबाबदार नसून रोगांचा प्रार्दूभााव रोखण्याकरिता आवश्यक असणारे उपाय जर शेतक-याने योजले नाही तर रोंगाचा समुळ नाश पिकावरुन होत नाही व त्यामूळे उत्पादन कमी होऊ शकते. रोगाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी योग्य ते किटकनाशके फवारणी आवश्यक आहे.एकंदरीत अर्जदाराची तक्रार खोटी असून ती फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार सिध्द होतो काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्र यांचेकडून सोयाबीन 335 या जातीचे 30 किलोच्या चार बँग व सूरभी 20 किलोचे चार बँग खरेदी केल्याचे दि.16.6.2007 रोजीचे बिल दाखल केलेले आहे. दाखल 7/12 यावरुन अर्जदार यांच्या हिस्सास 1 हेक्टर 21 आर शेत व त्यांची पत्नी हिस 1 हेकटर शेत असल्याबददलचा उल्लेख आहे. परंतु तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जात आपल्या पत्नीच्या हक्काचे शेताचा उल्लेख केलेला नाही. नमूना नंबर 12 वर सोयाबीन पिकाची नोंद 1.80 क्षेञावर दाखविण्यात आलेली आहे व गैरअर्जदार क्र.2 यांचा आक्षेप आहे की, उपलब्ध जमिनीपेक्षा पेरा अर्जदाराने जास्तीचा दाखविलेला आहे. पण या त्यांच्या पत्नीचा हिस्सा गृहीत धरल्यास तेवढा पेरा होऊ शकतो परंतु बियाणे भेसळयूक्त व निकृष्ट असल्याबददलची तक्रार अर्जदाराने केल्यावर गुणवत्ता नियंञण निरीक्षक यांनी दि.24.09.2007 रोजी जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला यात शेंगा कमी लागल्या असून , 50 टक्के शेंगा दाणेयुक्त नाहीत व पिकावर बुरशीजन्य रोग पडलेला आहे व काळया रंगाच्या शेंगा झालेल्या आहेत. यांच पिकाच्या बाजूस सोयाबीन जेएस 335 हे वांण चांगले आले आहे. यावरुन पिकाच्या बियाणेमध्ये भेसळयूक्त दोष आढळून येतो. हा पंचनामा कायदेशीर नाही असा आक्षेप गेरअर्जदार क्र.2 यांनी घेतलेला आहे. शेतक-याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जायमोक्यावर जाऊन पंचनामा हा जिल्हास्तरीय तक्रार निवारण कमिटीनेच केला पाहिजे असे परिपञक आहे. ते परिपञक गैरअर्जदार यांनी या प्रकरणात दाखल केलेले आहे. यावर बियाण्याचा लॉट नंबर, उत्पादनाचे नांव यांची सर्व माहीती असणे आवश्यक आहे. कमिटीमध्ये जिल्हा अधिकारी, जिल्हा बिज प्रमाणीकरण अधिकारी, कृषि विद्यापिठाचे प्रतिनीधी, इत्यादी तज्ञ व्यक्तीचा समावेश आहे. यांनी पिकाची पाहणी करुन आपसात चर्चा करुन कोणता दोष आहे यांचा निष्कर्ष काढून अहवाल दयावयाचा असतो. प्रस्तूत प्रकरणात एका कृषी अधिका-याने पंचनामा केलेला आहे. यात तज्ञाचा अहवालही नाही, शिवाय गुणवत्ता नियंञण निरीक्षक यांनी आपला पंचनामा 50 टक्के शेंगा लागलेल्या आहेत व शेंगा कमी लागलेल्या आहेत व ज्या शेंगा आहेत त्यात दाणे नाहीत. त्यामूळे हे बियाणे भेसळयूक्त आहे असे म्हटले आहे. हे त्यांचे म्हणणे व अभिप्राय संयूक्तीक वाटत नाही. कमी प्रमाणात बियाणे आले यांचा अर्थ ते भेसळयूक्त आहे असे होत नाही. यासाठी अर्जदाराने स्वतः दोन प्रकारचे जे बियाणे पेरल्याचा उल्लेख केला आहे त्यामूळे हे बियाणे भेसळयूक्त आहे हे सिध्द होत नाही. हे सिध्द करण्याचे असल्यास ते प्रयोगशाळेत पाठवून त्यांची चाचणी करावी. पिकावर रोग पडणे हे हवामान, जमिनीची प्रत, इत्यादी प्रकार बघीतले जातात व पिकावर अशा प्रकारचे रोग पडत असताना त्यावर योग्य किटकनाशके फवारणे आवश्यक आहे. पिकावर रोग पडणे म्हणजे बियाणे भेसळयूक्त आहे असे म्हणणे संयूक्तीक नाही. अर्जदाराने जो तलाठयाचा पंचनामा दि.6.11.2007 रोजीचा दाखल केला आहे. त्यात त्यांना पाच क्विंटल 92 किलो सोयाबीन झाल्याचे म्हटले आहे म्हणजे पिक हे आलेले आहे पण उतारा कमी आला. यासाठी बियाणे हे भेसळयूक्त आहे असे ठरविल्या जाऊ शकत नाही. गैरअर्जदार यांनी कृषी अधिका-यांना तपासणीसाठी एक प्रश्नावली दाखल केली होती ती प्रश्नावली बारकाईने पाहिली असता असे दिसून येते की, शासकीय परिपञकानुसार राज्य शासनाने पंचनामा करण्याचे अधिकार हे एक कृषी अधिका-यास दिलेले नाहीत. यांला उत्तर म्हणून तातडीची कारवाई करण्यासाठी कृषी अधिका-याने त्यांचे स्वेच्छीक अधिकारा अंतर्गत पंचायत समितीचे कृषी अधिका-यांना सोबत घेणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. सूरुवातीस नौकरीत अशा प्रकारे स्वेच्छा अधिकार कोणत्याही अधिका-यांना देण्यात आलेला नाही असे अधिकार फक्त राष्ट्रपती यांनाच आहे. कृषी अधिका-याने जिल्हास्तरीय कमिटी आवश्यक आहे, यात कमिटीची मते नोंदवली आहे असे उत्तर देऊन कबूली दिलेली आहे. पिकावरील रोग हे मशागत दर्जा व औषधाचा मारा याप्रमाणे असू शकतात. भेसळयूक्त बियाणे तपासणीसाठी बियाणे कायदा 1966 व नियम-68 नियम 23 (अ) प्रमाणे तपासणी अहवाल मागणे बंधनकारक केलेले आहे. बिज प्रमाणीकरण अधिकारी यांचेकडून चाचणी करुन बँगेवर तसा उल्लेख केला जातो. मा. महाराष्ट्र राज्य आयोग यांचे 2006(3) सी.पी.जे. पान नंबर 269 खांमगांव तालूका बागायतदार शेतकरी व फळे विक्री सहकारी संस्था विरुध्द बाबू कूटटी डॅनियल यात जर बियाण्याची उगवण शक्ती 20 टक्के असेल व उगवण शक्तीबददल योग्य कारणाचा उल्लेख नसेल तर उत्पादक कंपनीस जबाबदार धरता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच मा. राज्य आयोग उत्तर प्रदेश सी.पी.जे.2006(2) पान नंबर 488 सचिव क्षेञिय सदन सहकारी समिती विरुध्द ज्ञान चंद्रा शारदा व इतर यात बियाण्याची उगवण शक्ती प्रमाणीत केली असेल पिकावर किडीचा प्रादूर्भाव झाला असेल तर त्यासं प्रतिबंध करण्यासाठी अर्जदाराने काळजी घेतली नाही असे होते. बियाणे कंपनीची यात जबाबदारी येत नाही. मा. राज्य आयोग, महाराष्ट्र सी.पी.जे. 2003 (3) पान नंबर 628 बेंजो शितल सिडस प्रा.लि. व इतर विरुध्द शिवाजी अनाजी घोले, या प्रकरणात तज्ञाचा रिपोर्ट नसल्याकारणाने तक्रार नांमंजूर केली आहे., वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री. सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |