::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 19/07/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याचे विरुद्ध पक्ष यांचेकडे क्रमांक 437 हे बचत खाते असून तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचेकडे वेगवेगळया रकमेचे वेगवेगळे मुदती ठेव खाते होते व त्या सर्व खात्यांची परिपक्वता रक्कम तक्रारकर्त्याला प्राप्त झाली आहे.परंतु तक्रारकर्त्याने दिनांक 24/9/2009 रोजी मुदती ठेवी खाते क्रमांक 3859 मध्ये 36 महिन्यांकरीता रू.75,000/- व दिनांक 13/9/2009रोजी मुदती ठेवी खाते क्रमांक 3855 मध्ये रू.70,000/- ही रक्कम 36 महिन्यांच्या मुदतीकरीता जमा केले. परंतु विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या वरील दोन्ही मुदती ठेवींची मासीक प्राप्ती योजनेअंतर्गत देय व्याजासह रक्कम वारंवार विनंती करूनही तक्रारकर्त्याला दिली नाही. सबब तक्रारकर्त्याने दिनांक 10/4/2017 रोजी विरुद्ध पक्ष यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली असता विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या दिनांक 11/4/2017 चे उत्तरात, तक्रारकर्त्याच्या वर नमूद मुदती ठेवी खाते क्रमांक 3855 ची रक्कम मुदती ठेवी खाते क्र.4216/2 मध्ये व मुदती ठेवी खाते क्र.3859 मधील रक्कम मुदती ठेवी खाते क्र.4220 मध्ये पुनर्गूंतवणूक करण्यांत आली असे कळविले. वास्तविक वरील दोन्ही मुदती ठेवी खाते अनुक्रमे क्र.3855 व क्र. 3859 चा मुदती ठेवी खाते अनुक्रमे क्र.4216/2 व क्र. 4220 शी कोणताही संबंध नसून वरील चारही मुदती ठेवींकरीता तक्रारकर्त्याने स्वतंत्ररीत्या रकमा जमा केल्या होत्या शिवाय अशी कोणतीही पुनर्गूंतवणूक करण्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष बॅंकेला कधीही सुचना वा संमती दिली नव्हती. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मुदती ठेवी खाते क्रमांक 3855 ची रक्कम मुदती ठेवी खाते क्र.4216/2 मध्ये व मुदती ठेवी खाते क्र.3859 मधील रक्कम मुदती ठेवी खाते क्र.4220 मध्ये पुनर्गूंतवणूक करण्यांत आली असे दर्शवून वरील दोन्ही खात्यातील रक्कम तक्रारकर्त्याला न देता गैरफायदा मिळविण्याचा विरूध्द पक्ष प्रयत्न करीत आहे.
3. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांना मुदती ठेव खाते क्रमांक 3855 व 3859 या मुदती ठेवींची रक्कम तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा करण्याची वारंवार विनंती केली तसेच या दोन्ही मुदती ठेवींचे रेकॉर्डची मागणी केली. परंतु विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या वरील दोन्ही मुदती ठेवींची रक्कम त्यावरील मासीक प्राप्तीयोजने अंतर्गत व्याजासह तक्रारकर्त्याला दिली नाही, तसेच ठेवींचा रेकॉर्डसुद्धा पुरविला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांना दिनांक 23/5/2017 रोजी अधिवक्त्या मार्फत नोटीस पाठविली, परंतु विरूद्ध पक्षाने कुठलीही दखल घेतली नाही. सबब तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये मागणी केली की विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे अनुक्रमे मुदत ठेव खाते क्रमांक 3855 व 3859 या मुदती ठेवींची व्याजासह देय रक्कम त्यावरील मुदतीनंतरचे कालावधीचे मुदती ठेवीचे व्याज दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्यावी तसेच विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू. 30,000/- व तक्रार खर्च रू.20,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली.
4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध नोटीस काढण्यात आली. विरुद्ध पक्ष हजर होऊन त्यांनी आपले लेखी कथन दाखल करून त्यामध्ये नमूद केले की तक्रारकर्त्याच्या सुचनेनुसारच, त्याच्या विरुद्ध पक्ष बँकेमधील मुदती ठेवी खाते क्रमांक 3855 मधील रक्कम रू.70,000/- वळती करून मुदती ठेवी खाते क्र.4216/2 मध्ये व मुदती ठेवी खाते क्र.3859 मधील रक्कम रू.75,000/- वळती करून मुदती ठेवी खाते क्र.4220 मध्ये पुनर्गूंतवणूक करण्यांत आली. शिवाय वरील खात्यांवर जमा होणारे मासीक प्राप्ती योजनेअंतर्गत व्याज त्याच्या विरूध्द पक्ष बॅंकेतील बचत खाते क्र.437 मध्ये नियमीतपणे जमा करण्यांत आले आहे. वरील खात्यांचा खाते उतारा व्याजाचे उता-यासह दाखल करण्यांत येत असून त्यानुसार विरूध्द पक्षाने वरील दोन्ही मुदतीठेवी खात्यातील रक्कम तक्रारकर्त्याच्या सुचनेनुसारच नवीन मुदती ठेवी खात्यांत पुनर्गूंतवणूक केली तसेच त्यावर व्याजदेखील तक्रारकर्त्याच्या विरूध्द पक्षाकडील बचत खात्यात जमा केले हे दिसून येते. मात्र सदर खात्यांच्या परिपक्वतेनंतर तक्रारकर्ता सदर नवीन खात्यांचे प्रमाणपत्र घेवून विरूध्द पक्षाकडे आला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर खात्यांतील रक्कम न मिळण्यांस विरूध्द पक्ष जबाबदार नाहीत. सदर बाब विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 11/4/2017 रोजी च्या पत्रान्वये कळविली तसेच सदर पत्रासोबत विरुद्ध पक्ष यांचेकडील मुदत ठेव खात्यांची विवरणे सुद्धा पाठविली. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला विरुद्ध पक्षाने उत्तर दिलेले असून सदर उत्तरा सोबत दिनांक 11/4/2017 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत जोडली आहे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही न्यूनतापूर्ण सेवा दिली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असल्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अंतर्गत रू. 20,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याने शपथपत्र दाखल न केल्याने दि.25/10/2018 रोजी नि.क्र.1 वर आदेश पारीत करून प्रकरण वि.प.यांच्या पुराव्याकरिता मुकर्रर करण्याचा आदेश पारीत, तसेच विरूध्द पक्षाचे लेखी म्हणणे, शपथपत्र, आणि उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. तक्रारकर्त्याचे विरुद्ध पक्ष यांचेकडे क्रमांक 437 हे बचतखाते असून ही बाब विरुद्ध पक्षाने मान्य केली असल्याने तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारकर्त्याच्या विरुद्ध पक्ष यांचेकडे वेगवेगळ्या रकमेच्या इतरही मुदती ठेवी होत्या व त्यांची रक्कम तक्रारकर्त्याला प्राप्त झालेली आहे, मात्र तक्रारकर्त्याचा वाद हा विरुद्ध पक्ष बँकेतील अनुक्रमे क्रमांक 3859 व 3855 या दोन मुदती ठेवी खात्यासंबंधी आहे. तक्रारकर्त्याने निशाणी क्रमांक 4 वर दाखल व विरुद्ध पक्ष यांनी निशाणी क्रमांक 12 वर दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचे कडे दिनांक 13/9/2009 रोजी मुदती ठेवी खाते क्रमांक 3859 मध्ये 36 महिन्यांकरीता रू.75,000/- व दिनांक 13/9/2009 रोजी मुदती ठेवी खाते क्रमांक 3855 मध्ये रू.70,000/- ही रक्कम 36 महिन्यांच्या मुदतीकरीता जमा केली. वरील खात्यांचा खाते उतारा व्याजाचे उता-यासह विरूध्द पक्षाने प्रकरणात दाखल केला असून त्यानुसार विरूध्द पक्षाने वरील दोन्ही मुदतीठेवी खात्यातील रक्कम तक्रारकर्त्याच्या निर्देशानुसारच नवीन मुदती ठेवी खात्यांत पुनर्गूंतवणूक केली तसेच त्यावर व्याजदेखील तक्रारकर्त्याच्या विरूध्द पक्षाकडे असलेल्या उपरोक्त बचत खात्यात जमा केले सदर दोन्ही मुदती ठेव खात्याच्या तक्रारकर्त्याने दिलेल्या निर्देशासहच्या नक्कल प्रति नि.क्र.12वर दस्त क्र14 व ब16वरआणि बचत खात्याचे विवरण दस्त क्र. ब 13वर दाखल आहे. यावरून तक्रारकर्त्याने दोन्ही मुदती ठेवी खाते क्रमांक 3859 व 3855 ठेवी खात्यांत पुनर्गूंतवणूक केली हे स्पष्ट होते.मात्र सदर खात्यांच्या परिपक्वतेनंतर तक्रारकर्ता सदर नवीन खात्यांचे प्रमाणपत्र घेवून विरूध्द पक्षाकडे गेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर खात्यांतील रक्कम न मिळण्यांस विरूध्द पक्ष जबाबदार नाहीत. .सबब विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनता पूर्ण सेवा दिली नाही हे सिद्ध होत असल्याने मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते .
7. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांच्याकडे दिनांक 10/4/2117 च्या पत्रान्वये वरील दोन्ही खात्याबद्दल माहिती मागितली असता विरुद्ध पक्ष यांनी सदर बाब विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 11/4/2017 रोजी च्या पत्रात्तरात कळविली तसेच सदर पत्रासोबत विरुद्ध पक्ष यांचेकडील मुदत ठेव खात्यांची विवरणे सुद्धा पाठविली. याउपरही तक्रारकर्त्याने दिनांक 23/5/2017 रोजी पाठविलेल्या नोटीसला सुद्धा विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 12/6/2017 रोजी उत्तर दिले असून त्या मध्ये सुद्धा तक्रारकर्त्याला संपूर्ण माहिती तसेच दस्तावेजांच्या प्रति पाठवण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. परंतु असे असूनही तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्तावर ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 नुसार खर्च बसवून तक्रार खारीज करण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात येते.
2. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल ग्राहक संरक्षण कायद्याचे
कलम 26 अंतर्गत तक्रारकर्त्यावर रू.5000/-खर्च बसविण्यात येत असून सदर
रक्कम तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष यांना द्यावी.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.