::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 19/07/2019)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये तिचे आम मुखत्यार श्री.अरूण लोणारे यांचेमार्फत दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्तीचे विरुद्ध पक्ष यांचेकडे क्रमांक 7654चे बचत खाते असून तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांचेकडे वेगवेगळया रकमेचे वेगवेगळे मुदती ठेव खाते होते व त्या सर्व खात्यांची परिपक्वता रक्कम तक्रारकर्तीला प्राप्त झाली आहे.परंतु तक्रारकर्तीने अनुक्रमे दिनांक 29/12/2012 व दि20/12/2012 रोजी अनुक्रमे मुदती ठेवी खाते क्रमांक 9393 व मुदती ठेवी खाते क्रमांक 9395 मध्ये प्रत्येकी रू.1 लाख 39 महिन्यांच्या मुदतीकरीता जमा केले. परंतु विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या वरील दोन्ही मुदती ठेवींची परिपक्वता रक्कम प्रत्येकी रू.1,42,287/- प्रमाणे एकुण रू. 2,84,574/- तक्रारकर्तीला दिली नाही. विरुद्धपक्ष यांनी तक्रारकर्तीच्या वर नमूद मुदती ठेवी खाते क्रमांक 9395 ची परिपक्वता रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारकर्तीच्या वरील बचत खात्यात जमा न करता ठेवी खात्यात जमा नोंद दाखवून पुन्हा विड्रॉल दाखवली, परंतु सदर मुदत ठेवीची रक्कम तिला मिळाली नाही. विरुद्ध पक्ष यांनी वरील मुदत ठेवी खाते क्रमांक 9393 ची रक्कम आज पर्यंत तक्रारकर्तीच्या खात्यात जमा केले नाही. तक्रारकर्तीने एकाच तारखेला विरुद्ध पक्ष यांचे बँकेमध्ये ठेव क्रमांक 9393 व ठेवक्रमांक 9395 मध्ये प्रत्येकी रू. 1 लाख जमा केले. तक्रारकर्तीने परिपक्वता तिथी नंतर सदर 9393 या खात्याचे प्रमाणपत्र विरुद्ध पक्ष यांच्याकडे जमा केल्यानंतरही सदर ठेवीची रक्कम तक्रारकर्तीच्या खात्यात जमा झाली नाही, तसेच विरुध्द पक्ष यांनी खाते क्रमांक 9395 मध्ये रक्कम रू.1,42,287/- ची जमा नोंद दाखवून त्याच तारखेत उचल दाखविली, परंतु तक्रारकर्तीने सदर रकमेची उचल केलेली नाही.
त्यामुळे तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांना खाते क्रमांक 9395 व 9393 या मुदती ठेवींची रक्कम तक्रारकर्तीच्या खात्यात जमा करण्याची वारंवार विनंती केली तसेच या दोन्ही मुदती ठेवींचे रेकॉर्डची मागणी केली. परंतु विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या वरील दोन्ही मुदती ठेवीतील एकूण रक्कम रू. 2,84,574/- तक्रारकर्तीला दिली नाही, तसेच ठेवींचा रेकॉर्डसुद्धा पुरविला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने विरुद्ध पक्षांना दिनांक 23/ 5 /2017 रोजी अधिवक्त्या मार्फत नोटीस पाठविली, परंतु विरूद्ध पक्षाने कुठलीही दखल घेतली नाही. सबब तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करून त्यामध्ये मागणी केली की विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीचे अनुक्रमे मुदत ठेव खाते क्रमांक 9393 मधील रक्कम रू. 1,42,287/- व खाते क्रमांक 9395 मधील रक्कम रू.1,42,287/- त्यावर मुदती ठेवीचे व्याज दराने व्याजासह तक्रारकर्तीला द्यावे तसेच विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीस शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू. 30,000/- व तक्रार खर्च रू.20,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध नोटीस काढण्यात आली. विरुद्ध पक्ष हजर होऊन त्यांनी आपले लेखी कथन दाखल करून त्यामध्ये नमूद केले की तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांचे बँकेमध्ये बचत खाते क्रमांक 9393 कधीही उघडले उघडले नाही व या क्रमांकाचे खाते कधीही तक्रारकर्तीच्या नावावर नव्हते. सदर बाब विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीस दिनांक 11/4/2017 रोजी च्या पत्रान्वये कळविली तसेच सदर पत्रासोबत विरुद्ध पक्ष यांचेकडील मुदत ठेव क्रमांक 9395 ची परिपक्वता रक्कम तिच्या बचत ठेव खात्यात दिनांक 29/3/2016 रोजी जमा केल्याची पावती सुद्धा पाठविली. परंतु खाते क्रमांक 9393 हे तक्रारकर्तीचे नावे नसल्याने त्या बाबतची माहिती तक्रारकर्तीस दिली नाही कारण सदर खाते हे आनंदाबाई नारायण निरटवार यांनी दिनांक 29/12/2012 रोजी रू.12,000/- मुदती खात्यात जमा करून उघडले असून अशा अन्य खातेदाराची माहिती नियमानुसार दुसऱ्या खातेदारांना देता येत नाही.
विरुद्ध पक्ष बँकेतील 9393 या क्रमांकाचे मुदती ठेव खाते कधीही तक्रारकर्तीचे नावे नव्हते व त्यामध्ये तक्रारकर्तीने कधीही रू. 1 लाख रक्कम जमा केली नव्हती. त्यामुळे मुदतीपूर्वी किंवा मुदतीनंतर सदर खात्यातील रक्कम तक्रारकर्तीस देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मात्र तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांचेकडे मुदती ठेव खाते क्रमांक 9395 मध्ये रू. 1 लाख गुंतविले होते व देय तिथी दिनांक 29/3/2016 रोजी रू.1,42,287/- तक्रारकर्तीस देय होते. विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 29/3/2016 रोजी नियमाप्रमाणे सदर रक्कम तक्रारकर्तीचे लेखी सूचनेनुसार तक्रारकर्तीचे बचत खाते क्रमांक 7654 मध्ये वळती केली. तक्रारकर्तीचे विरुद्ध पक्ष बँकेकडे 9393 या क्रमांकाचे मुदती ठेव खाते नाही तसेच 9395 क्रमांकाच्या मुदती ठेवी खात्यातील परिपक्वता रक्कम तिला प्राप्त झालेली आहे. असे असूनही रक्कम मिळाली नाही असे खोटे कथन करून तक्रारकर्ती पुन्हा सदर रकमेची मागणी करीत आहे. तक्रारकर्तीने पाठविलेल्या नोटीसला विरुद्ध पक्षाने उत्तर दिलेले असून सदर उत्तरा सोबत दिनांक 11/4/2017 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत जोडली आहे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीस कोणतीही न्यूनतापूर्ण सेवा दिली नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खोटी असल्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अंतर्गत रू. 20,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्तीने शपथपत्र दाखल न केल्याने दि.25/10/2018 रोजी नि.क्र.1 वर आदेश पारीत करून प्रकरण वि.प.यांच्या पुराव्याकरिता मुकर्रर करण्याचा आदेश पारीत, तसेच विरूध्द पक्षाचे लेखी म्हणणे, शपथपत्र, आणि उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरूध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5) तक्रारकर्तीचे विरुद्ध पक्ष यांचेकडे क्रमांक 7654 चे बचतखाते असून ही बाब विरुद्ध पक्षाने मान्य केली असल्याने तक्रारकर्ती ही विरुद्ध पक्षाची ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारकर्तीच्या विरुद्ध पक्ष यांचेकडे वेगवेगळ्या रकमेच्या इतरही मुदती ठेवी होत्या व त्यांची रक्कम तक्रारकर्तीला प्राप्त झालेली आहे, मात्र तक्रारकर्तीचा वाद हा विरुद्ध पक्ष बँकेतील अनुक्रमे क्रमांक 9393 व 9395 या दोन मुदती ठेवी खात्यासंबंधी आहे. तक्रारकर्तीने निशाणी क्रमांक 5 वर दाखल व विरुद्ध पक्ष यांनी निशाणी क्रमांक 8 वर दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांचे कडे असलेल्या उपरोक्त बचत खात्यामध्ये दिनांक 29/12/2012 रोजी रू.1,00,000/- जमा केले व त्याच दिवशी सदर खात्यातून रक्कम काढून मुदत ठेव खाते क्रमांक 9395 काढले. सदर मुदती ठेव खात्याची परीपक्वता दिनांक 29/3/2016 व परीपक्वता रक्कम रू. 1,42,287/- होती. सदर परिपक्वता रक्कम दिनांक 29/3/2016 रोजी तक्रारकर्तीने दिलेल्या निर्देशान्वये तिच्या उपरोक्त बचत खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.तशा नोंदी तक्रारकर्तीचे बचत खात्याच्या विवरणामध्ये असून सदर विवरण नि.क्र.8वरील दस्त क्र2वर व सदर मुदती ठेव खात्याची तक्रारकर्तीने दिलील्या निर्देशासहची प्रत नि.क्र.5वरील दस्त क्र.3 वर दाखल आहे यावरून क्रमांक 9395मुदती ठेव खात्याची परिपक्वता रक्कम तक्रारकर्तीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे हे सिद्ध होते. अन्य मुदती ठेव खाते क्रमांक 9393 चे विरुद्ध पक्ष यांनी निशाणी क्रमांक 8दस्त क्रमांक 3वर दाखल केलेल्या सदर खात्याची नक्कल प्रत या दस्तावेजा वरून सदर मुदती ठेव खाते तक्रारकर्तीच्या नावावर नसून सदर खाते हे आनंदाबाई नारायण निट्टेवार यांच्या नावावर आहे हे स्पष्ट होते. सदर खाते हे तक्रारकर्तीच्या नावावर आहे असे दर्शवणारा कोणताही दस्तावेज वा पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही.यावरून विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीप्रती कोणतीही न्युनता पूर्ण सेवा दिली नाही हे सिद्ध होते .सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते .
6) तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांच्याकडे दिनांक 10/4/2117 च्या पत्रान्वये वरील दोन्ही खात्याबद्दल माहिती मागितली असता विरुद्ध पक्ष यांनी लिखित स्वरूपात सदर माहिती तक्रारकर्तीला दिलेली आहे. याउपरही तक्रारकर्तीने दिनांक 23/5/2017 रोजी पाठविलेल्या नोटीसला सुद्धा विरुद्ध पक्ष यांनी दिनांक 12/6/2017 रोजी उत्तर दिले असून त्या मध्ये सुद्धा तक्रारकर्तीला संपूर्ण माहिती तसेच दस्तावेजांच्या प्रति पाठवण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. परंतु असे असूनही तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीवर ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 नुसार खर्च बसवून तक्रार खारीज करण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7) मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्यात येते.
2. तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम
26 अंतर्गत तक्रारकर्तीवर रू.5000/-खर्च बसविण्यात येत असून सदर रक्कम
तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष यांना द्यावी.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.