(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक – 04 ऑक्टोबर, 2011)
यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
यातील तक्रारदाराची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी त्यांचे 3.5 एकर शेतात 4 बॅग कपाशीचे पिक लावले होते. गैरअर्जदार नं.1 यांचेकडून त्यांनी रिअल 500 मिलीलिटर एक बॉटल, 28—28—0 2 किलो (प्रति 1000 ग्रॅम X 2 पॉकीटे) व स्ट्रेप्टोसायक्लीन 6 ग्रॅम X 10 पॉकीटे हे औषध दिनांक 29/8/2010 ला विकत घेतले. तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे सूचन्रेप्रमाणे फवारणी करतांना 10 ग्लास (अंदाजे 3 लीटर) पाण्यात एक पॉकीट 28—28—0 2 + 30 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन याचे द्रावण तयार करुन सदर द्रावण पॉवर स्प्रेच्या टाकीत (15 लीटर) 1 ग्लास अंदाजे 200 मिली + रिअल 20 मिली असे 20 पंपाद्वारे 3.5 एकर शेतात कपाशीवर फवारणी केली. मात्र फवारणीच्या दुस-याच दिवशी कपाशीची पाने वाळल्यासारखी दिसू लागली आणि 8 दिवसांत कपाशीची झाडे जळाल्यासारखी झाली. याबाबत तक्रारदाराने दिनांक 4/10/2010 ला याबाबतची रितसर लेखी तक्रार तहसिलदार नरखेड व कृषि अधिकारी नरखेड यांना सादर केली. त्यानुषंगाने सबंधित अधिका-यांनी तक्रारदाराचे शेताची प्रत्यक्ष पहाणी केली. त्यानंतर सदर तक्रार बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीकडे पाठविण्यात आली. त्यांनी तक्रारदाराचे शेतास भेट देऊन सदर सदोष औषधांच्या फवारणीमुळे तक्रारदाराचे नुकसान झाले असा निष्कर्ष निघाला. तक्रारदाराने संबंधितांकडे नुकसान भरपाची मागणी केली, मात्र त्यांनी याबाबत दखल घेतली नाही. पुढे तक्रारदाराने नोटीस दिल्या, त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणुन शेवटी तक्रारदार श्री भिमराव झाडे यांनी सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे कपाशीच्या नुकसान भरपाईची रुपये 1,40,000/- एवढी रक्कम 10% व्याजासह मिळावी, त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 25,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 7,500/- मिळावेत अशा मागण्या केल्या आहेत.
सदर प्रकरणी गैरअर्जदार नं.1 यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला. तक्रारदाराने औषधांची किंमत दिली नाही म्हणुन तो ‘ग्राहक’ ठरत नाही असा आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने सदरचा माल योग्यरित्या पाहूनच खरेदी केलेला असल्यामुळे याबाबतची नुकसानीची जबाबदारी त्यांची मुळीच येत नाही. संबंधित द्रव्य कसे वापरावे याची सूचना मालाच्या लेबलवरच दिली असते आणि त्यानुसारच त्याचा वापर करणे गरजेचे आहे, मात्र त्यांनी संबंधित सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही. या प्रकरणात त्यांचा कोणताही दोष नाही म्हणुन सदर तक्रार खारीज करण्चयात यावी असा उजर घेतला.
सदर प्रकरणात गैरअर्जदार नं.2 व 5 यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, मात्र ते मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत, वा आपला लेखी जबाब सुध्दा दाखल केला नाही. म्हणुन त्यांचेविरुध्द सदर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक 30/5/2011 रोजी पारीत केला.
गैरअर्जदार नं.3 यांनी त्यांचेविरुध्दचा एकतर्फी आदेश रद्द करण्याचा अर्ज केला. सदर अर्जावर अर्जदाराचे म्हणणे घेण्यात आले असून गैरअर्जदाराचा सदर अर्ज नामंजूर करण्यात आला.
यातील गैरअर्जदार नं.4 यांनी आपल्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराने केलेली सर्व विपरीत विधाने नाकबूल केली आणि त्यांचेविरुध्द ही तक्रार चूकीची व गैरकायदेशिर आणि खोटी तक्रार दाखल केली म्हणुन ती खारीज व्हावी असा उजर घेतला.
यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत 7/12 चा उतारा, खरेदी केलेल्या मालाचे बिल, कृषि अधिकारी व तहसिलदार यांचेशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती, पंचनाम्याची प्रत, पिकांची छायाचित्रे, चौकशी अधिकारी यांचा चौकशी अहवाल व त्यासंबंधित कागदपत्रे, सर्व गैरअर्जदार यांना पाठविलेल्या नोटीसाच्या प्रती, पोस्टाच्या पावत्या, वरिष्ठ न्यायालयांचे निर्वाळे आणि प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार यांनी दस्तऐवजांच्या यादीसोबत दस्तऐवज व वरिष्ठ न्यायालयांचे निर्वाळे मंचासमक्ष दाखल केलेले आहेत.
सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा तोंडी युक्तीवाद मंचाने ऐकला.
सदर प्रकरणात तक्रारदार यांना हे माहित नाही की, नेमके त्यांचे शेतातील कपाशीच्या पिकाचे नुकसान कोणत्या औषधामुळे व कोणत्या कारणाने झालेले आहे. तक्रारदाराची तक्रार मुख्यतः अशी आहे की, फवारणीनंतर त्यांचे शेतामधील संपूर्ण कपाशीचे पिक वाळण्यास सुरुवात झाली. या प्रकरणात तज्ञ व्यक्तीच्या अहवालाची गरज होती. यात कृषि अधिकारी यांनी दिलेल्या अहवालाचे काळजीपर्वक वाचन केले असता, सदर अहवाल हा अत्यंत निरर्थक अहवाल आहे हे स्पष्ट होते. बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीने तक्रारदाराचे शेताला भेट दिल्यानंतर कपाशिची झाडे का वाळली याबाबतची चाचणी इत्यादी करणे गरजेचे होते. याउलट समितीने ‘तिन्ही औषधांचे एकत्र मिश्रण करुन त्याचे द्रावण केले व नंतर पाण्यात मिळसवून फवारणी केली, मात्र त्या द्रावणाची तिव्रता व ही रसायने एकमेकांशी सुसंगत नसल्यामुळे कपाशीच्या पिकावर आम्लीक क्रिया होऊन कपाशिची झाडे वाळली असावी’ असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र यातील नेमक्या कोणत्या औषधामुळे असे झाले हे त्यांनी स्पष्ट नमूद केले नाही, वा त्यांचे निरीक्षणाला कोणता आधार आहे हेही नमूद केलेले नाही. संबंधित प्रकरणात कोणत्याही गैरअर्जदारास दोषी ठरविता येत नाही.
तक्रारदाराचे पुढे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार नं.1 चे सांगण्यावरुन त्यांनी या औषधांची फवारणी केली, मात्र तक्रारदाराने दिनांक 4/10/2010 रोजी केलेल्या बियाणे जिल्हा तक्रार निवारण समितीच्या प्रती मंचासमक्ष दाखल केल्या आहेत त्यामध्ये त्यांनी गैरअर्जदार नं.1 यांचे सांगण्यावरुन या औषधांची फवारणी केली याचा उल्लेख केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदाराचा यासंबंधिचा आरोप, जो गैरअर्जदार नं.1 यांनी नाकारला आहे, हा पश्चातबुध्दिने केलेला आहे असे दिसून येते. एक शक्यता आहे की, तक्रारदाराने ज्या फवारणी यंत्राद्वारे फवारणी केली, त्याद्वारे आधी तणनाशकाची फवारणी करण्यात आली असावी अशी असू शकते व त्यामुळे परीणामी या पिकाचे नुकसान झाले असू शकते. याबाबत स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही. तक्रारदाराचे मोठे नुकसान झाले ही बाब सत्य असली, तरी ते नेमके कोणत्या कारणामुळे व कोणत्या गैरअर्जदाराकडून झाले याबाबत निश्चित असा पुरावा नसल्यामुळे आम्हाला ही तक्रार निकाली काढावी लागत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-000 अं ती म आ दे श 000-
1) तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
या निकालाची प्रत बियाणे जिल्हा तक्रार निवारण समिती यांना पाठविण्यात यावी, जेणेकरुन तक्रार निवारण समितीचा स्पष्ट अहवाल मिळू शकेल.