सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 124/2012
तक्रार दाखल दि.14-08-2012.
तक्रार निकाली दि.05-08-2015.
श्री. संजय घनःश्याम पवार,
रा. 558, गुरुवार पेठ,सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री. जावेद निजाम सय्यद,
2. श्री. वाहीद निजाम सय्यद,
3. श्री. शाहीद निजाम सय्यद,
4. यशया कन्सट्रक्शन तर्फे
प्रोप्रा.श्रीमती भारती रामचंद्र बनसोड,
नं.1 ते 3 रा. 29अ/2, मल्हारपेठ,सातारा
नं.4 रा.3, पारिजात सोसायटी,
अजिंक्य बझार रोड, गोडोली, सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.के.के. शहा
जाबदार क्र.1 तर्फे– अँड.डी.वाय.मुतालीक.
जाबदार क्र.2 व 3 तर्फे- एकतर्फा
जाबदार क्र. 4 तर्फे- अँड.एम.आर.गोरे
-ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदाराने हे गुरुवार पेठ,सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी असून जाबदार क्र. 1 ते 3 तर्फे मुखत्यार जाबदार क्र. 4 यांना सातारा मल्हारपेठ येथील सिटी सर्व्हे नं. 29 अ/2 क्षेत्र 287.19 चौ. मीटर ही मिळकत जाबदार क्र. 1 ते 3 यांचे मालकाची असून जाबदार क्र. 4 यांना विकसन करारनामा करुन दिली होती व आहे. सदर मिळकतीवर उभारण्यात आलेल्या ‘विपुल सहवास’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-4 क्षेत्र 690.93 चौ.फूट म्हणजेच 64.21 चौ.मी. व पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-3 क्षेत्र 66.19 चौ.मीटर म्हणजेच अंदाजे 712.26 चौ.फूट या दोन सदनिका अनुक्रमे रक्कम रु.5,60,000/- व रक्कम रु.5,80,000/- एवढया रकमेच्या मोबदल्यात विक्री करण्याचे निश्चित करुन नोंदणीकृत करारनामा दस्त क्रमांक 6387/2010 व 6386/2010 असे करुन दिले. प्रस्तुत करारनामेतील अटी व शर्थीनुसार जाबदार क्र. 4 यांना त्यांचे यशया कन्स्ट्रक्शन या फर्मचे नावाने वेळोवेळी चेकने रक्कम अदा केली आहे. दोन्ही खरेदीपत्रांची एकूण रक्कम रु.11,40,000/- (रुपये अकरा लाख चाळीस हजार मात्र) तसेच वीज कनेक्शन व इतर खर्चाचे प्रत्येक सदनिकेसाठी रक्कम रु.50,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.1,00,000/- (एक लाख फक्त) अशी रक्कम रु.12,40,000/- (रुपये बारा लाख चाळीस हजार मात्र) पैकी रक्कम रु.2,32,000/- (रुपये दोन लाख बत्तीस हजार मात्र) जाबदार क्र. 4 यांना नोंदणीकृत दस्ताने अदा केले असून उर्वरीत रक्कम रु.10,03,000/- (रुपये दहा लाख तीन हजार मात्र) वेळोवेळी चेकने यशया कन्स्ट्रक्शनतर्फे प्रोप्रायटर यांना अदा केले आहेत. अशाप्रकारे उपरोक्त दोन्ही सदनिकांची संपूर्ण खरेदी रक्कम जाबदार यांना तक्रारदाराने अदा केली असूनही जाबदाराने तक्रारदार यांना प्रस्तुत दोन्ही सदनिकांचे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस टाळाटाळ केली आहे व करत आहेत. त्यामुळे तक्रारदार याना जाबदाराने सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून संयुक्तीकरित्या तक्रार अर्जातील नमूद केले दोन्ही सदनिकेचे खरेदीपत्र करुन देणेबाबत आदेश व्हावेत, तक्रारदार यांना झाले मानसीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/5 कडे अनुक्रमे करारनाम्याची सत्यप्रत, नोटीसची स्थळ प्रत, नोटीस उत्तर, नोटीस उत्तरास प्रतिउत्तर, नि. 10 कडे लेखी युक्तीवाद, नि. 13 चे कागदयादीसोबत तक्रारदाराचे कॉसमॉस बँकेतील खातेउतारा, नि. 34 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 35 कडे तक्रारदारतर्फे साक्षीदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 36 चे कागदयादीसोबत नि. 36/1 ते 36/3 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 4 ने तक्रारदाराला सदनिका क्र.एफ-4 चे करुन दिलेले नोंदणीकृत साठेखत, जाबदार क्र. 4 ने तक्रारदाराला सदनिका क्र.एफ-3 या सदनिकेचे करुन दिलेले साठेखत, कॉसमॉस बँकेचा तक्रारदाराचा खातेउतारा, नि.37 कडे पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 यांनी नि.32 कडे त्यांची कैफीयत/म्हणणे, नि. 33 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.19 कडे जाबदार क्र. 4 यांनी त्यांचेविरुध्द झालेला म्हणणे नाही आदेश रद्द होणेसाठी केलेला अर्ज, नि. 20 कडे अँफीडेव्हीट, नि.21 कडे जाबदार क्र. 4 चे म्हणणे, नि.22 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत.
जाबदार क्र. 1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी प्रस्तुत तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
तक्रारदार हे जाबदार क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक नसून ते केवळ जाबदार क्र. 4 यांचेच ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांना खरेदीपत्र करुन देणेची जबाबदारी जाबदार क्र. 1 ते 3 यांची नसून जाबदार क्र. 4 यांची आहे. कारण विषयांकीत फ्लॅटचा करारनामा हा जाबदार क्र. 4 व तक्रारदार यांचेमध्ये झालेला आहे. तक्रारदाराने सदर जाबदार क्र. 1 ते 3 यांना कधीही नोटीस पाठवली नाही अथवा प्रस्तुत नोटीस जाबदाराला कधीही मिळालेली नाही. केवळ जाबदार क्र. 4 व तक्रारदार यांचेत नोटीस पाठवण्याचे व कारवाईचे प्रकार झाले आहेत. तसेच तक्रारदार हे जाबदार क्र.4 चे ग्राहक असलेने सदर तक्रार अर्ज जाबदार क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द फेटाळण्यास पात्र आहे असे म्हणणे जाबदार क्र. 1 ने दाखल केले आहे.
तसेच जाबदार क्र. 4 ने याकामी पुढील आक्षेप घेतले आहेत. - तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य नाही, जाबदार क्र. 4 हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांना सातारा येथील मल्हारपेठ येथील सि.स.नं.29 अ/2 क्षेत्र 287.19 चौ.मीटर जाबदार क्र. 1 ते 3 यांनी जाबदार क्र. 4 ला विकसनासाठी दिलेचे मान्य नाही. तसेच तक्रारदार यांचे जाबदार क्र. 4 सोबत ग्राहक या नात्याने कसलाही करारनामा कधीही केला नव्हता व नाही. तसेच तक्रारदाराचे म्हणण्यानुसार सदनिकेचे नंबर चुकीचे आहेत. तक्रारदाराची ओळख जाबदार क्र. 4 ने प्रस्तुत ‘विपुल सहवास’ या इमारतीचे बांधकामाचा ठेका महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे भागीदार श्री. सुभाष कांतीलाल शहा व श्री. बाळासाहेब नाईक यांनी करुन दिलेली होती. सदर जाबदार क्र. 4 ला पैशाची आवश्यकता असलेने जाबदार क्र. 4 यांना तक्रारदार यांनी रक्कम रु.22,50,000/- बांधकामासाठी दरमहा 3 टक्के व्याजदराने देणचे ठरले व सदर रकमेच्या परतफेडीची हमी म्हणून तक्रारदार यांनी जाबदार क्र. 4 हिस सदनिकेचे साठेखत करुन देणेस सांगितले व काही कोरे चेक सहया करुन देणेस सांगितले. तसेच तक्रारदाराने जाबदार क्र. 4 ला सुरुवातीस रक्कम रु.6,50,000/- दिले व ताबडतोब साठेखत करुन द्या अन्यथा पुढील रक्कम देणार नाही असे सांगीतले व साठेखत करुन देणेस जाबदार क्र. 4 चे मागे तगादा लावला. जाबदार क्र. 4 ने आर्थिक नडीपोटी दि. 29/9/2009 रोजी सदनिका, जी-1,एफ-2,एफ-3,एफ-4 या पाच सदनिकांचे साठेखत तक्रारदार यांचे नावे करुन देणेस जाबदार क्र. 4 ला भाग पडले व त्यावेळी तक्रारदाराने जाबदार क्र. 4 कडून बेकायदेशीरपणे कोरे चेक सहया करुन घेतले. तद्नंतर तक्रारदाराने रक्कम रु.45,000/- दि.11/10/2010 रोजी दिलेनंतर पुढील रक्कम देणेसाठी वर नमूद सदनिकेचे व सदर चेकचे तारण अपूर्ण राहीले असलेने एका सदनिकेचे साठेखत करुन द्या असे तक्रारदाराने जाबदार क्र. 4 ला सांगितले व जाबदार क्र. 4 चे आर्थिक परिस्थितींचा गैरफायदा घेवून त्यांचेकडे तारण म्हणून आणखी एका सदनिकेचे साठेखत करुन देणेबाबत तक्रारदाराने तगादा लावला. शेवटी जाबदार क्र. 4 ने तक्रारदारास त्यांचे 15/2ब, रविवार पेठ, सातारा येथील ‘विपुल सृष्टी’ या अपार्टमेंटमधील सदनिका एस.एफ.1 चे साठेखत तक्रारदाराचे नावे करुन दिले. अशाप्रकारे तक्रारदार व त्यांचे मित्र श्री महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे भागीदार यांनी जाबदार क्र.4 ची फसवणूक केली आहे व जाबदार क्र. 4 ही महिला असलेने तिचा गैरफायदा तक्रारदार व महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे भागीदार यांनी घेतला आहे. तक्रारदार व प्रस्तुत कन्ट्रक्शन व कंपनीचे भागीदार जाबदार क्र. 4 ला वारंवार शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी देत आहेत व बेकायदेशीरपणे पैसे लुबाडणे असा प्रकार सुरु ठेवला आहे. जाबदार क्र. 4 ने तक्रारदारविरुध्द मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो, सातारा येथील कोर्टात रे.फौ.खटला क्र. 387/2012 दाखल केला असून सदर खटला प्रलंबीत आहे. तसेच जाबदार क्र. 4 ने तक्रारदार यांचे विरुध्द मे. दिवाणी न्यायाधिश, सातारा यांचेकडे दिवाणी दावा क्र. 5/2013 दाखल केला आहे. सदरचा दावाही मे. कोर्टात प्रलंबलीत आहे. सबब तक्रारदार हे स्वच्छ हाताने मे. मंचात आलेले नाहीत. तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 4 ने दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व म्हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- मल्हारपेठ, सातारा येथील सिटी सर्व्हे नं.29 अ /2 क्षेत्र 287.19 चौ. मी. ही मिळकत जाबदार क्र. 1 ते 3 यांचे मालकीची असून सदर मिळकत विकसन करणेसाठी जाबदार क्र.4 यांना विकसन करारनामा करुन दिलेली होती व आहे. तसेच जाबदार क्र. 1 ते 3 तर्फे मुखत्यार म्हणून जाबदार क्र. 4 यांनी तक्रारदाराला सदर मिळकतीमधील ‘विपुल सहवास’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-4 क्षेत्र 690.93 चौ. फूट म्हणजूच 64.21 चौ.मीटर तसेच पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-3 क्षेत्र 66,19 चौ. मीटर म्हणजे 712.26 चौ. फूट या दोन सदनिका अनुक्रमे रक्कम रु.5,60,000/- व रक्कम रु.5,80,000/- एवढया रकमेच्या मोबदल्यात विक्री करणेचे निश्चित करुन तक्रारदार यांना नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.6387/10 व 6386/10 असे करुन दिलेले आहेत. म्हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून सर्व जाबदार यांचे ग्राहक असून सर्व जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत ही बाब प्रस्तुत कामी दाखल करारपत्रांच्या सर्टीफाईड प्रतीवरुन सिध्द होते. तसेच प्रस्तुत करारपत्र झालेचे जाबदाराने मान्य केले आहे यावरुन स्पष्ट व सिध्द होत आहे. प्रस्तुत करारपत्रांच्या मूळप्रती तक्रारदाराने नि.36/1 व 36/2 कडे दाखल केल्या आहेत.
प्रस्तुत करारपत्रात ठरलेप्रमाणे रकमेचा मोबदला जाबदार यांना देणेसाठी तक्रारदाराने वेळोवेळी चेकव्दारे रक्कम अदा केलेचे सिध्द करणेसाठी तक्रारदाराने नि. 36/3 कडे व नि. 13 चे कागदयादीसोबत कॉसमॉस बँकेतील तक्रारदाराचा खातेउतारा नि. 13/1 कडे दाखल केला आहे. प्रस्तुत कॉसमॉस बँकेतील तक्रारदाराचे खातेउता-यावरुन तक्रारदार यांनी जाबदार क्र. 4 च्या बांधकाम करणेसाठी नेमले कन्स्ट्रक्शन फर्म यशया कन्स्ट्रक्शन यांना चेकव्दारे रक्कम दिलेची व प्रस्तुत चेकची रक्कम तक्रारदाराचे खातेवरुन यशया कन्स्ट्रक्शन्स तर्फे जाबदार क्र. 4 ने काढून घेतलेचे स्पष्ट व सिध्द होत आहे. प्रस्तुत सदनिकांची खरेदीची रक्कम जाबदार यांनी स्विकारुनदेखील खरेदी करारपत्रात/साठेखतात ठरलेप्रमाणे अर्जात नमूद सदनिकांचे खरेदीपत्र तक्रारदार यांना जाबदार यांनी आजअखेर करुन दिलेले नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मे. मंचाचे मत आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यात घेतलेले आक्षेप सिध्द केलेले नाहीत. सबब जाबदार क्र. 1 ते 4 यांनी संयुक्तीकपणे तक्रारदार यांना त्यांच्या सातारा मल्हारपेठ येथील सि.स.नं.29 अ/2, क्षेत्र 287.19 चौ.मीटर या मिळकतीवर बांधलेल्या ‘विपुल सहवास’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका एफ-4 क्षेत्र 690.93 चौ.फुट म्हणजेच 64.21 चौ.मीटर व पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-3 क्षेत्र 66.19 चौ.मीटर म्हणजे अंदाजे 712.26 चौ.फूट या दोन्ही सदनिकांचे खुषखरेदीपत्र जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना करुन देणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना वर नमूद ‘विपुल
सहवास’ या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-4 व
एफ-3 या सदनिकांचे खुष खरेदीपत्र आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात
करुन द्यावे.
3. तकारदार यांस झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा
हजार फक्त) व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रुपये 5,000/- (रुपये पाच
हजार फक्त) जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना अदा करावेत.
4. वरील नमूद आदेशांची पूर्तता तक्रारदार व जाबदार यांनी आदेश पारीत
तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 05-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.