::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24/06/2013)
1) तक्रारदाराने तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणप्रमाणे.
2) अर्जदार हे बल्लारपुर जि. चंद्रपूर येथील रहिवासी असुन घरकाम करते. गैरअर्जदार हे व्यवसायाने प्लॉट विक्रते आहे. अर्जदार हिने दिनांक 11/10/2010 रोजी गैरअर्जदारकडुन मौजा गोंडपिपरी येथील येथील भु.क्र. 166 आराजी 4485 चौ.मी. यामधील प्लॉट क्र. 20 प्लॉटचे क्षेञ 30-50 एकुण प्लॉटचे क्षेञ 1500 चौ.फु. निवासी प्लॉट म्हणुन प्लॉटची विक्रीची किंमत रुपये 50,000/- घेण्याचे ठरले होते. याकरीता अर्जदार हिने इसार पञाकरीता रुपये 7000/- दिनांक 11/10/2011 साक्षीदार लिाराम खोब्रागडे व बबन मेश्राम यांच्या समक्ष दिले व दिनांक 28/01/2011 ला साक्षीदार श्री उल्लास मानकर व अखील भसारकर यांचे समक्ष रुपये 15000/- सुद्धा गैरअर्जदाराला दिले. गैरअर्जदाराने प्लॉटची विक्री उर्वरीत रक्कम घेऊन दिनांक 5 जुन 2011 ला किंवा त्यापुर्वी करुन देण्याची हमी इसार पञामध्ये लिहुन दिले होते. तसेच प्लॉट हे निवासी वापराचे असल्याने त्याला डेवलपमेंट ऐने शासकीय कार्यालयाकडुन लवकर रकरुन देण्यात येईल व प्लॉटची विक्री दिलेल्या वेळेत करुन देण्यात येईल असीही हमी गैरअर्जदाराने अर्जदाराला दिली होती परंतु बरेच दिवस प्लॉटची विक्री करण्यासंबधान वाट पाहिली असता तसेच गैरअर्जदार यांना बरेचदा भेट घेवुन रजिस्ट्री करुन देण्याबाबत विनंती केली परंतु गैरअर्जदाराने प्लॉटची विक्री करुन देण्यास टाळाटाळ केली. अर्जदाराने वकीलामार्फत गैरअर्जदाराला दिनांक 14/05/2012 रोजी नोटीस पाठविले होते त्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 30/05/2012 ला नोटीसाचे उत्तर खोटया स्वरुपाने व उडवाउडवीचे बनावटी उत्तर पाठविले. त्यामुळे अर्जदार हिने गैरअर्जदारविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने संबंधीत तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांना दिलेली रक्कम रुपये 22,000/- ही 18 टक्के व्याजासह परत मिळावी तसेच अर्जदाराला प्लॉटची विक्री चे इसार पञ करुन मागण्याकरीता अर्जदाराला जो शारिरीक व मानसिक ञास झाला आहे याकरीता रक्कम रुपये 50.000/- व तक्रार खर्च रक्कम रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
3) तक्रारदाराने तक्रारी सोबत निशानी 5 कडे एकुण 5 कागदपञे व निशानी 18 कडे एकुण 4 कागदपञ दाखल केली आहे व निशानी 19 कडे पुराव्याचे शपथपञ दाखल केले आहे.
4) त.क. ची तक्रार नोंदणीकृत करुन विरुद्ध पक्ष यांना नोटीस काढणेत आली त्याप्रमाणे विरुद्ध पक्ष हे त्यांचे विधिज्ञ मार्फत या कामी हजर झाले व निशानी 12 कडे त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. विरुद्ध पक्ष यांचे लेखीउत्तरामध्ये त्यांनी त.क. ची तक्रार व बहुतांशी कथने अमान्य केली आहे. विरुद्ध पक्ष यांचे मते अर्जदाराचे सगळे कथन व आरोप खोटे असून नाकबुल आहे ते व्यवसायाने प्लॉट विक्रीचा धंदा करीत नसुन शेतकरी आहे. या व्यतीरीक्त त्यांचा कोणताही धंदा नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन वरील नमुद प्लॉट खरेदी केलेला नाही तसेच या प्लॉटकरीता अर्जदाराने रुपये 7000/- दिनांक 11/10/2010 ला वरील नमुद साक्षीदारासमक्ष दिले नाही. अर्जदारांचे हेही म्हणणे आहे की, त्यांचे समक्ष कोणताही इसारपञ झालेले नाही व त्यांनी कोणतीही हमी दिलेली नव्हती. अर्जदाराचे पती सावकारी व्यवसाय करतात. त्यामधुन अर्जदाराचे पतीने खोटे विसारपञ करुन घेतले आहे.
5) विरुद्ध पक्ष यांनी त्यांचे लेखी म्हणणे सोबत कोणतेही कागदपञे दाखल केली नाही परंतु त्यांनी निशानी19 कडे पुराव्याचे शपथपञ दाखल केले आहे व निशानी 21 कडे लेखी युक्तीवाद केला आहे.
त.क. ची तक्रार व दाखल केलेली कागदपञे तसेच पुराव्याचे शपथपञ आणि विरुद्ध पक्ष यांनी दाखल केलेले लेखी उत्तर व पुराव्याचे शपथपञ या सर्वांचे अवलोकन करुन प्रस्तुत प्रकरण निकाली करणेसाठी ठेवण्यात आले. त.क. व विरुद्ध पक्ष यांचे वकिलांचा तोंडी व लेखी युक्तीवाद व उपलब्ध कागदपञावरुन खालिल मुद्दे (Points of Consideration) निघतात.
मुद्दे उत्तर
1) त.क. हे विरुद्ध पक्ष यांचे ग्राहक ठरतात का ? होय
2) विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांना दुषित व ञुटीची सेवा देऊ होय
केली आहे का ?
3) काय उत्तर ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्रमांक 1
6) त.क. यांनी आपली तक्रार प्रतिज्ञापञावर दाखल केली आहे आहे व निशानी 19 कडे पुराव्याचे शपथपञ दाखल केले आहे. अर्जदार (त.क.) यांनी विरुद्ध पक्ष यांचेकडुन गोंडपिंपरी येथील भु.क्र. 166 आराजी 4485 चौ.मी. यामधील प्लॉट क्र. 20 रुपये 50,000/- ला खरेदी करणेचा व्यवहार ठरला होता हे निशानी 5/1 कडील विसारपञावरुन दिसुन येते. माञ विरुद्ध पक्ष यांनी सदर विसारपञाचा घेतलेला स्टॅम्प हा विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांचे पतीकडुन ऊसनवार घेतलेल्या रुपये 7000/- चे व्यवहारापोटी घेतला होता व त्यांचा त.क. यांनी गैरवापर केला असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त.क. हे विरुद्ध पक्ष चे ग्राहक होऊ शकत नाही परंतु सदर निशानी 5/1 कडील स्टॅम्प व त.क. ने दाखल केलेला निशानी 18/1 कडील विरु्ध पक्ष यांनी श्री हनुमंत लभाते यांचे ठरलेला व्यवहाराचा विसारपञाचा स्टॅम्प यांचे अवलोकन करता विरुद्ध पक्ष यांचा प्लॉट खरेदी करुन तो गरजुंना विक्री करणेचा व्यवसाय असल्याचे दिसुन येतो व त्याप्रमाणे निशानी 5/1 कडील विसारपञाप्रमाणे विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांना एक प्लॉट विक्री करणेचा व्यवहार ठरला होता हे दिसुन येते त्यामुळे त.क. हे विरुद्ध पक्ष यांचे ग्राहक ठरतो त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2
7) त.क. यांनी निशानी 5/2 प्रमाणे विरुद्ध पक्ष यांचे पाडलेल्या प्लॉट चे ले आऊट चे अवलोकन करता विरुद्ध पक्ष यांचा जमिन खरेदी करुन त्यामध्ये प्लॉट पाडणेचा व तो गरजु व्यक्तींना विक्री करणेचा व्यवसाय असल्याचे दिसुन येते. सदर निशानी 5/1 प्रमाणे विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांचे कडुन रुपये 7000/- विसारा रक्कम स्विकारली होती हे दिसुन येते त्यानंतर विरुद्ध पक्ष यांनी साक्षीदारासमक्ष दिनांक 28/01/2011 रोजी रुपये 15000/- घेतले त्यानंतरही अनेक दिवस वाट पाहुनही व त्यानंतरही ठरले व्यवहाराप्रमाणे विरुद्ध पक्षाने प्लॉट ची विक्री करुन दिली नाही. त्यानंतर त.क. यांनी आपले वकीलामार्फत निशानी 5/3 प्रमाणे विरुद्ध पक्षांना नोटीस पाठविली व ती निशानी 5/4 प्रमाणे विरुद्ध पक्षांना मिळाली त्यावेळी विरुद्ध पक्ष यांनी निशानी 5/5 प्रमाणे उत्तर देऊन त.क. नी स्टॅम्पचा गैरवापर केला आहे व प्लॉट विक्रीचा व्यवहार ठरला नव्हता असे उत्तर दिले. विरुद्ध पक्ष यांनी सदर बाब पुन्हा आपले लेखी उत्तरामध्ये नमुद केली आहे परंतु विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांचेकडुन ऊसनवार पैसे घेतलेचा व ते परत केलेचा कोणताही कागदोपञी पुरावा किंवा साक्षीदार विद्यमान मंचात दाखल केला नाही त्यामुळे त.क. यांनी स्टॅम्पचा खोटा वापर केला तसेच प्लॉट विक्रीचा कोणताही व्यवहार ठरला नव्हता असा घेतलेला बचाव तथ्यहीत ठरतो तसेच निशानी 18/1ते4 कडील कागदपञाचे अवलोकन करताविरुद्ध पक्ष यांचा जमिन खरेदी करुन त्यावर प्लॉट पाडुन विक्री करणेचा व्यवसाय असल्याचा दिसुन येतो त्यामुळेनिशानी 5/1 प्रमाणे त.क. व विरुद्ध पक्ष यांचे मध्ये ठरले व्यवहाराप्रमाणे विरुद्ध पक्ष यांनी भु.मा.क्र.166 मधील प्लॉट क्रमांक 20 चे विक्रीबाबतचा व्यवहार पूर्ण केला नाही व त.क. यांना दुषित व ञुटीची सेवा दिली आहे हे सिद्ध होते त्यामुळे कागदपञाचेअवलोकन करता विरुद्ध पक्ष हे त.क. यांना सदर ठरले व्यवहाराप्रमाणे प्लॉट क्रमांक 20 चे खरेदीपञ करुन देणेस असमर्थ आहे असे दिसुन येते त्यामुळे त्यांनी त.क. यांचे कडुन स्विकारलेली रक्कम रुपये 22000/- व्याजासहपरत करणे गरजेचे व त्यांचेवर बंधनकारक असल्याचे या मंचास वाटते व त्याप्रमाणे विरुद्धपक्ष यांनी त.क. यांना सदर रक्कम रुपये 22000/- व त्यावर शेवटी स्विकारलेली रक्कम दिनांक 28/01/2011 पासुन संपुर्ण रक्कम रुपये 22000/- वर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज स्विकारलेल्या तारखेपासुन परत करावे या निर्णयाप्रत हे मंच आले आहे म्हणुन मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
तसेच त.क. यांनी आपली रक्कम गुंतवणुक करुनही त्यांना त्यांचे उपभोगापासुन वंचीत राहावे लागले यामुळे त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये5000/- व तक्रारी अर्ज खर्चापोटी रुपये2000/- मंजुर करणे या विद्यमान मंचास न्यायोचित वाटते.
अशात-हेने एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांना दुषित व ञुटीची सेवा दिली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1) त.क. ची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांचेकडुन स्विकारलेली रक्कम रुपये 22000/- व ती शेवटी स्विकारलेल्या तारखेपासुन म्हणजेच दिनांक 28/01/2011 पासुन संपुर्ण रक्कम रुपये 22000/- 12 टक्के दराने व्याजासह अदा करावी.
3) विरुद्ध पक्ष यांनी त.क. यांना मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रार अर्जाचा खर्चापोटी रुपये 2000/- अदा करावेत.
4) विरुद्ध पक्ष यांनी वरील आदेशाचे पालन आदेशापासुन 30 दिवसात करावे अन्यथा उपरोक्त कलम 2 मध्ये नमुद केलेल्या रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के ऐवजी 15 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
चंद्रपूर
दिनांक - 24 /06/2013