::निकालपत्र ::
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारित दिनांक-25 एप्रिल, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द त्याने कब्जापत्रा प्रमाणे प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न दिल्या संबधाने दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्या तर्फे दाखल तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
विरुध्दपक्षाचे मालकीची शेत जमीन मौजा चिखली (खुर्द), तालुका जिल्हा नागपूर येथे असून त्याचा खसरा क्रं 18/4 व पटवारी हलका क्रं-39-अ असा आहे. विरुध्दपक्षाने सदर शेतजमीनीवर ले आऊट टाकून त्यातील दोन ते तीन प्लॉट विकलेले आहेत. तक्रारकर्त्याला स्वतःचे राहण्यासाठी निवासाची आवश्यकता होती म्हणून त्याने विरुध्दपक्षाचे मौजा चिखली खुर्द येथील भूखंड क्रं-22-अ, एकूण क्षेत्रफळ 1250 चौरसफूट दिनांक-17/12/1999 रोजी एकूण रुपये-12,500/- मध्ये नगदी रक्कम देऊन विकत घेतला. विरुध्दपक्षाने साक्षीदारांच्या सहीसह सदर भूखंडाचे कब्जापत्र तक्रारकर्त्याला लिहून दिले आणि तेंव्हा पासून सदर भूखंड हा तक्रारकर्त्याचे ताब्यात व कब्ज्यात आहे. भूखंड कब्ज्यात घेतल्या नंतर त्याने त्यावर जानेवारी-2000 मध्ये घर बांधले व तेंव्हा पासून तो आपल्या कुटूंबियांसह त्या घरामध्ये राहत आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाने काही तांत्रिक अडचणीमुळे नंतर विक्रीपत्र नोंदवून देण्यात येईल असे सांगितले. पुढे त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडाचे दस्तऐवजांची वेळोवेळी मागणी केली परंतु टाळाटाळ करण्यात आली तसेच विक्रीपत्र नोंदवून देण्यास सांगितले असता भूखंड ताब्यात असल्याने काळजी करण्याची गरज नसल्याचे विरुध्दपक्षा तर्फे सांगण्यात आले. पुढे त्याचे असे लक्षात आले की, ले-आऊट मधील भूखंडे विरुध्दपक्षाने त्रयस्थ व्यक्ती श्री अशोक रेवतकर यांना विकलेत, त्यावर सदर्हू भूखंडां बाबत दैनिक नवभारत मध्ये दिनांक-25.02.2011 रोजी जाहिर सुचना देऊन त्याव्दारे भूखंडाचे करारनामे विरुध्दपक्षा सोबत झाले असल्याचे जाहिर केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-14.06.2011 रोजी अशोक रेवतकर, मनोहर हिवराळे व दिक्षीत यांनी त्याला सदर्हू घर रिकामे करण्याची धमकी दिल्याने त्याने हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक-14.06.2011 रोजी रिपोर्ट दिला परंतु योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्दपक्षाने त्याला दिनांक- 21.05.2011, 09.06.2011, 18.06.2011 अशा दिनाकानां घर रिकामे करण्या बाबत नोटीस दिली, त्यावर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-17.06.2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे वारंवार भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास विनंती केली परंतु काहीही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे नावे तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे मौजा चिखली (खुर्द), तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-22-अ एकूण क्षेत्रफळ-1250 चौरसफूटाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आदेशित व्हावे.
(02) उपरोक्त वर्णनातीत भूखंडाचा ताबा तक्रारकर्त्याला अगोदरच मिळालेला असल्याने तो कायम करण्याचे आदेशित व्हावे.
(03) विरुध्दपक्ष व त्याचे प्रतिनिधी यांना वादातीत भूखंडाचा कब्जा हा तक्रारकर्त्याचे नावे राहिल या संबधाने कायम मनाई हुकूम देणे.
(04) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्षाने लेखी उत्तर मंचा समक्ष सादर करुन त्यामध्ये असे नमुद केले की, तक्रारी मध्ये भूखंडाचा ताबा, मनाई हुकूम अशा मागण्या तक्रारकर्त्याने केलेल्या असल्याने तक्रार ही दिवाणी न्यायालयातच चालविण्या योग्य असून तक्रार ही ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात चालविता येत नाही. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार केलेली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी दिनांक-17.12.1999 रोजी भूखंडाचे कब्जापत्र केल्याचे नमुद केले परंतु पुढे
त्याने काय प्रयत्न केले या बाबत उलगडा केलेला नाही. विरुध्दपक्षाने खसरा क्रं 4 वर ले आऊट टाकल्याची बाब मान्य केली. मौजा चिखली खुर्द, खसरा क्रं 18/4, पटवारी हलका क्रं-39-अ मधील भूखंड क्रं-22-अ, एकूण क्षेत्रफळ-1200 चौरसफूट दिनांक-17.12.1999 रोजी रुपये-12,500/- साक्षदारा समक्ष कब्जापत्रासह तक्रारकर्त्यास दिल्याची बाब अमान्य केली. सदर कब्जापत्रावर तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष व साक्षीदारांच्या स्वाक्ष-या असल्याची बाब अमान्य केली. जानेवारी-2005 मध्ये तक्रारकर्त्याने त्या भूखंडावर तीन खोल्याचे घर बांधल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कब्जापत्रावरील विरुध्दपक्षाच्या स्वाक्ष-या या खोटया आहेत, त्यामुळे त्याचेवर कार्यवाही व्हावी. विरुध्दपक्षाने कधीही त्याला कोणत्याच भूखंडाचे कब्जापत्र करुन दिलेले नाही वा त्याचेशी कोणताही व्यवहार केलेला नाही. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार विरुध्दपक्षाने नामंजूर केली. दिनांक-25.02.2011 रोजी वकील श्री परेश जोशी यांनी दैनिक नवभारत मध्ये दिलेली जाहिर सूचना व विरुध्दपक्षाची जमीन अशोक रेवतकर यांना विकण्याच्या करारा संबधीचा मजकूर विरुध्दपक्षास मान्य आहे परंतु त्या व्यवहाराशी तक्रारकर्त्याचा कोणताही संबध नाही. तक्रारकर्त्याला घर खाली करण्यास सांगितले तसेच पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे रिपोर्ट देण्यात आला या बाबी नाकबुल केल्यात.
विरुध्दपक्षाने आपल्या विशेष कथनात असे नमुद केले की, मौजा चिखली खुर्द येथील भूखंड क्रं-18-ए, 19 ते 22 आणि 22-ए असे एकूण 9600 चौरसफुटाचे प्लॉट त्याने कोणासही विकलेले नाहीत ते आजही त्याचेच मालकीचे आहेत. दिनांक-29.04.2011 रोजी तो स्वतःचे जमीनीचे निरिक्षण करण्यासाठी गेला असता त्याचे असे लक्षात आले की, त्याचे मालकीचे मौजा चिखली खुर्द, पटवारी हलका क्रं 39, खसरा क्रं 18/4 यातील भूखंड क्रं-18-ए, 19 ते 22 आणि 22-ए वर काही व्यक्ती श्री अनिल कडू, श्री अवधबिहारी पांडे, श्री सरजू शर्मा आणि श्री राम नरेश पांडे हे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यावरुन त्याने हुडकेश्वर पोलीस स्टेशन, नागपूर येथे तक्रार केली परंतु सदर्हू व्यक्ती सुचना देऊनही पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत. दिनांक-09.06.2011 तसेच दिनांक-18.06.2011 रोजी हुडकेश्वर पोलीस स्टेशन तर्फे तक्रारकर्ता व इतरानां चौकशीसाठी बोलाविण्यात आले परंतु ते हजर झाले नाहीत. तक्रारकर्त्या विरुध्द पोलीस स्टेशन हुडकेश्वर, नागपूर येथे खोटे दस्तऐवज तयार करुन विरुध्दपक्षाच्या खोटया सहया करण्या बाबत गुन्हे
नोंदविण्यात आलेले आहेत. केवळ 20/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दर्शविलेल्या कब्जापत्रास कायदेशीररित्या काहीही मान्यता नाही. सदर प्रकरण हे गुंतागुंतीचे असून त्यामध्ये व्यापक प्रमाणावर पुरावा असणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दिनांक-17.12.199 चे कब्जापत्र हे विरुध्दपक्षाने हस्ताक्षर परिक्षकां कडून तपासून घेतले, हस्ताक्षर तज्ञानीं दिनांक-24.02.2012 रोजी दिलेला अहवाल तो तक्रारी सोबत दाखल करीत असून त्यानुसार त्यावर विरुध्दपक्षाच्या खोटया सहया असल्याचे नमुद आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षाने केली.
04. उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच विरुध्दपक्षा तर्फे दाखल लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याला संधी देऊनही त्याने प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला नाही. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री संजय कस्तुरे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षाला संधी देऊनही त्याचे तर्फे कोणीही मौखीक युक्तीवाद केला नाही. मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
05. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने दिनांक-17/12/1999 रोजी विरुध्दपक्षाचे मौजा चिखली खुर्द येथील भूखंड क्रं-22-अ, एकूण क्षेत्रफळ 1250 चौरसफूट एकूण रुपये-12,500/- नगदी रक्कम देऊन विकत घेतला. विरुध्दपक्षाने साक्षीदारांच्या सहीसह सदर भूखंडाचे कब्जापत्र त्याचे नावे लिहून दिले आणि तेंव्हा पासून सदर भूखंड हा त्याचेच ताब्यात व कब्ज्यात आहे. त्या नंतर त्याने त्यावर जानेवारी-2000 मध्ये घर बांधले व तेंव्हा पासून तो आपल्या कुटूंबियांसह त्या घरामध्ये राहत आहे. विरुध्दपक्षाने काही तांत्रिक अडचणीमुळे नंतर विक्रीपत्र नोंदवून देण्यात येईल असे त्याला सांगितले. पुढे त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडाचे दस्तऐवजांची वेळोवेळी मागणी करुनही विक्रीपत्र नोंदवून दिले नाही म्हणून त्याने ही तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
06. तर विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्त्याशी त्याचा कोणताही भूखंड विक्री बाबत व्यवहार झालेला नाही, त्याने तक्रारकर्त्यास कोणतेही भूखंडाचे कब्जापत्र करुन दिलेले नाही, जे कब्जापत्र तक्रारकर्त्याने दाखल केलेले आहे, ते खोटे असून त्यावर विरुध्दपक्षाची खोटी सही केलेली आहे. त्याने आपल्या विशेष कथनात असे नमुद केले की, मौजा चिखली खुर्द, पटवारी हलका क्रं 39, खसरा क्रं 18/4 यावरील भूखंड क्रं-18-ए, 19 ते 22 आणि 22-ए असे एकूण 9600 चौरसफुटाचे प्लॉट त्याने कोणासही विकलेले नाहीत ते आजही त्याचेच मालकीचे आहेत. दिनांक-29.04.2011 रोजी तो स्वतःचे जमीनीचे निरिक्षण करण्यासाठी गेला असता त्याचे असे लक्षात आले की, त्याचे मालकीचे मौजा चिखली खुर्द येथील भूखंड क्रं-18-ए, 19 ते 22 आणि 22-ए वर काही व्यक्ती श्री अनिल कडू, श्री अवधबिहारी पांडे, श्री सरजू शर्मा आणि श्री राम नरेश पांडे हे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यावरुन त्याने हुडकेश्वर पोलीस स्टेशन, नागपूर येथे तक्रार केली परंतु सदर्हू व्यक्ती सुचना देऊनही पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत. दिनांक-09.06.2011 तसेच दिनांक-18.06.2011 रोजी हुडकेश्वर पोलीस स्टेशन तर्फे तक्रारकर्ता व इतरानां चौकशीसाठी बोलाविण्यात आले परंतु ते हजर झाले नाहीत. तक्रारकर्त्या विरुध्द पोलीस स्टेशन हुडकेश्वर, नागपूर येथे खोटे दस्तऐवज तयार करुन विरुध्दपक्षाच्या खोटया सहया करण्या बाबत गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
07. विरुध्दपक्षाने आपल्या उपरोक्त म्हणण्याच्या पुराव्यार्थ पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर येथे दिनांक-22.07.2011 रोजी तक्रारकर्त्या विरुध्द नोंदविलेल्या एफ.आय.आर.ची प्रत दाखल केली, ज्यामध्ये भूखंड क्रं-22-ए संबधाने जे रुपये-20/- च्या स्टॅम्प पेपर वर विरुध्दपक्षाचे सहीचे कब्जापत्र तक्रारकर्त्याचे नावे दिलेले आहे, त्या स्टॅम्प पेपर वरील विरुध्दपक्षाची सही खोटी आहे. एफ.आय.आर. मध्ये पुढे असेही नमुद केलेले आहे की, रामनरेश पांडे, अवधबिहारी पांडे, अनिल कडू आणि सरजू शर्मा यांनी प्लॉट क्रं-19 ते 22 आणि क्रं-22-ए संबधाने बनावट दस्तऐवज तयार करुन त्यावर विरुध्दपक्षाची बनावट स्वाक्षरी केलेली असल्याने त्यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही व्हावी. विरुध्दपक्षाने श्री उल्हास आठले, हस्ताक्षर तज्ञ, नागपूर यांचा दिनांक-24.02.2012 रोजीचा अहवाल अभिलेखावर दाखल केला, त्यामध्ये कब्जापत्र दिनांक-06.09.1993, 15.12.1999, 17.12.1999 आणि दिनांक-11.05.2000 आणि अन्य दस्तऐवज यावरील नि.क्रं-डी-1 ते डी-10 प्रमाणे विरुध्दपक्षाच्या सहया आणि विरुध्दपक्षाने नि.क्रं-एस-1 ते एस-19 प्रमाणे दिलेल्या नमुन्या स्वाक्ष-या या एकमेकांशी जुळत नाही/ताळमेळ होत नाहीत.
08. मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्षाने श्री उल्हास आठले, हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल स्वतःहून प्रकरणात दाखल केलेला आहे, मंचाचे मार्फतीने हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल मागविण्यात आलेला नाही.
09. दुसरी महत्वाची गोष्ट मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, अतिरिक्त जिल्हा ग्राहक मंच, नागपूर समोर याच विरुध्दपक्षा विरुध्द आणखी एक तक्रार प्रकरण सुरु असून त्याचा क्रमांक-RBT/CC/12/163 असा असून त्यामधील तक्रारकर्ता श्री अरुण तुकारामजी मोहुर्ले हा असून त्या तक्रारी मधील विरुध्दपक्षाची मालमत्ता मौजा चिखली खुर्द, पटवारी हलका क्रं 39-अ, खसरा क्रं 18/4 भूखंड क्रं-18-अ या ले-आऊट मधील आहे आणि प्रस्तुत तक्रार क्रं-RBT/CC/11/348 या तक्रारीतील विवादीत मालमत्ता ही सुध्दा विरुध्दपक्षाचे मौजा चिखली खुर्द, पटवारी हलका क्रं-39, खसरा क्रं-18/4 ले आऊटशी संबधित आहेत. थोडक्यात दोन्ही तक्रारीं मधील विरुध्दपक्षाचे ले-आऊट हे एक सारखेच आहेत.
10. फरक एवढाच आहे की, ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/12/163 यामध्ये विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता श्री अरुण तुकारामजी मोहुर्ले यास विवादीत मालमत्तेचे कब्जापत्र करुन दिल्याची बाब मान्य केलेली आहे मात्र विवाद हा तक्रारकर्त्याने जास्तीच्या जमीनीवर अतिक्रमण केल्या बाबत विरुध्दपक्षाने उपस्थित केलेला आहे. तर प्रस्तुत ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/11/348 तक्रारकर्ता सरजु बालकृष्ण शर्मा याचे प्रकरणात कब्जापत्र व त्यावरील विरुध्दपक्षाची असलेली स्वाक्षरी नाकारलेली आहे.
11. मंचा तर्फे दोन्ही प्रकरणां मधील कब्जापत्रावरील विरुध्दपक्षाचे सहीचे सखोल अवलोकन केले असता दोन्ही प्रकरणातील कब्जापत्रावरील विरुध्दपक्षाच्या सहया या एकमेकांशी ताळमेळ खात आहेत.
12. त्याच बरोबर तिसरी महत्वाची बाब मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्षाने ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/11/348 तक्रारकर्ता सरजु बालकृष्ण शर्मा या प्रकरणात मंचा समोर सादर केलेल्या उत्तरात त्याने त्याचे मालकीचे सदर चिखली खुर्द ले आऊट मधील भूखंड क्रं-18-ए, 19 ते 22 आणि 22-ए असे एकूण 9600 चौरसफुटाचे प्लॉट त्याने कोणासही विकलेले नाहीत ते आजही त्याचेच मालकीचे आहेत असे उत्तरात नमुद केलेले आहे परंतु ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/12/163 मधील तक्रारकर्ता श्री अरुण तुकारामजी मोहुर्ले यांना विरुध्दपक्षाने कब्जापत्र करुन दिलेला भूखंड हा मौजा चिखली खुर्द, पटवारी हलका क्रं 39-अ, खसरा क्रं 18/4 मधील भूखंड क्रं-18-अ असून त्याचे कब्जापत्र करुन दिल्याची बाब विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात मान्य केलेली आहे, यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष हा दोन्ही तक्रारीं मध्ये विवादीत भूखंडा संबधाने वेगवेगळी विधाने करीत असून त्याचे बोलण्यात मंचास सत्यता दिसून येत नाही.
13. चौथी महत्वाची बाब मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, दोन्ही प्रकरणात विरुध्दपक्षाने तक्रारदारांना केवळ कब्जापत्रच करुन दिलेले आहे, मात्र विक्रीपत्र नोंदवून देण्यास काही-ना-काही कारण समोर दर्शवून टाळाटाळ केल्याची बाब स्पष्ट होते. विरुध्दपक्षाची कार्यपध्दती ही संबधित ग्राहकास भूखंडाचे कब्जापत्र करुन देण्याची आणि पुढे विक्रीपत्रास टाळाटाळ करण्याचीच या दोन्ही प्रकरणां वरुन दिसून येते.
14. तक्रारकत्याने पुराव्या दाखल केलेल्या कब्जापत्रा मध्ये विरुध्दपक्षाने त्याचे मौजा चिखली खुर्द येथील भूखंड क्रं-22-अ, एकूण क्षेत्रफळ 1250 चौरसफूट दिनांक-17/12/1999 रोजी एकूण रुपये-12,500/- मध्ये नगदी रक्कम देऊन तक्रारकर्त्यास विक्री केल्याची बाब कब्जापत्रात मान्य केलेली असून भूखंडाची संपूर्ण रक्कम मिळाल्याची बाब त्यात मान्य केलेली आहे आणि कब्जापत्र दिल्या पासून सदर भूखंड हा तक्रारकर्त्याचेच ताब्यात व कब्ज्यात आहे. त्या नंतर तक्रारकर्त्याने त्या भूखंडावर जानेवारी-2000 मध्ये घर बांधले असून तेंव्हा पासून तो आपल्या कुटूंबियांसह त्या घरामध्ये राहत आहे. तक्रारकर्त्याने सदर भूखंडावर घर बांधून तो आपल्या कुटूंबियां समवेत तेथे राहत असल्या बद्दल पुराव्या दाखल फोटोग्राफ्स सुध्दा दाखल केलेले आहेत. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने कब्जापत्रात नमुद केल्या प्रमाणे बरेच वर्षां पासून तक्रारकर्त्यास भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
15. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री सरजु बालाप्रसाद शर्मा याची, विरुध्दपक्ष हरी अजाबराव बोरकर याचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात येते की, त्याने दिनांक-17/12/1999 रोजी तक्रारकर्त्यास करुन दिलेल्या भूखंड कब्जापत्रा प्रमाणे त्याचे मालकीची शेती मौजा चिखली (खुर्द), तालुका जिल्हा नागपूर खसरा क्रं 18/4 व पटवारी हलका क्रं-39-अ येथील भूखंड क्रं-22-अ, एकूण क्षेत्रफळ 1250 चौरसफूट या भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून द्दावे. भूखंडाची विक्री नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्काचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा. तसेच करारात नमुद केलेल्या अन्य रकमांचा खर्च तक्रारकर्त्याने स्वतः सहन करावा.
(3) विरुध्दपक्षास आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्यास यापूर्वीच मौजा चिखली खुर्द, तालुका जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-22-अ चा ताबा दिलेला असल्यामुळे तो ताबा कायम करण्यात येतो. त्याच बरोबर तक्रारकर्त्याने त्याला दिलेल्या कब्जापत्रानुसार असलेल्या जागे व्यतिरिक्त अन्य जागेवर अतिक्रमण करु नये.
(4) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास अदा करावेत.
(5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध
करुन देण्यात याव्यात.