Exh.No.20
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 03/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि.01/03/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि.07/01/2014
लक्ष्मण गोपाळ जाधव
वय 62 वर्षे, धंदा – व्यवसाय,
रा.सरंबळ, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग
सध्या राहणार
त्रिवेणी अपार्टमेंट,
बी-2, तिसरा माळा,
रुम नं.315, अंबाडी क्रॉस रोड,
वसई (वेस्ट), जि. ठाणे
पिन- 401 202 ... तक्रारदार
विरुध्द
श्री गुरुनाथ शाम नाईक
वय 35 वर्षे, धंदा- कंत्राटी कामे करणे
रा.सरंबळ, ता.कुडाळ,
जिल्हा- सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री संजय खानोलकर.
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री एस.के.मराठे
निकालपत्र
(दि.07/01/2014)
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः - तक्रारदार यांचेकडून बांधकामासाठी अॅडव्हांस रक्कम स्वीकारुनही विरुध्द पक्ष यांनी बांधकाम न करुन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळणेसाठी त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार हे गाव मौजे सरंबळ ता. कुडाळ येथील रहिवाशी आहेत. तसेच विरुध्द पक्ष श्री गुरुनाथ शाम नाईक (यापूढे संक्षिप्तेसाठी श्री गुरुनाथ असे संबोधण्यात येईल) हे ही त्याच गावचे रहिवाशी व बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना घराचे बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी श्री गुरुनाथ यांचेबरोबर दि.22/05/2011 रोजी बांधकामासंबंधात करार केला. त्यानुसार संपूर्ण बांधकाम रु.2,40,000/- मध्ये कराराच्या दिनांकापासून तीन महिन्याचे आत करण्याचे ठरले होते. तसेच बांधकामाचे वेगवेगळे टप्पे झाल्यानंतर रक्कमा देण्याचे मान्य करण्यात आले. सदर करार झाला त्याच दिवशी तक्रारदार यांनी गुरुनाथ नाईक यांना रु.50,000/- अॅडव्हांस दिला.
3) तक्रारदार यांचे पूढे असे म्हणणे आहे की, करारानुसार बांधकाम तीन महिन्यात पूर्ण करण्याचे ठरले असतांनाही श्री गुरुनाथ नाईक यांनी वर्ष होऊनही बांधकाम केले नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी त्यांची भेट घेऊन बांधकाम करणेविषयी विचारले, पंरतू त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. या कामासाठी तक्रारदारास 7 ते 8 वेळा मुंबईवरुन गावी यावे लागले. श्री गुरुनाथ यांच्या वर्तनामुळे तक्रारदार यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी अॅडव्हांस दिलेली रक्कम परत करण्याची मागणी केली, परंतू श्री गुरुनाथ यांनी रक्कम परत केली नाही.
4) तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, श्री गुरुनाथ यांना नोटीस पाठवून अॅडव्हांस दिलेली रक्कम रु.50,000/- व त्यावरील व्याज रु.5,000/-, कामाची खोटी केल्यामुळे रक्कम रु.5,000/- व नोटीसचा खर्च रु.1,000/- असे एकूण रु.61,000/- ची मागणी केली परंतू सदर नोटीस मिळून देखील श्री गुरुनाथ यांनी रक्कम परत दिलेली नाही. त्यामुळे त्यांना सदर तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
5) तक्रारदार यांनी शेवटी श्री गुरुनाथ यांनी कराराप्रमाणे बांधकाम न केल्यामुळे अॅडव्हांस म्हणून दिलेली रक्कम रु.50,000/-, व्याज रु.5,000/- सदर खोटी केल्यामुळे रु.5,000/-, नोटीस खर्च रु.1,000/-, मुंबईवरुन जाण्यायेण्यासाठी झालेला खर्च रु.10,000/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु. 86,000/- देण्याचा श्री गुरुनाथ यांना आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
6) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्र तसेच नि.4 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 3 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.4/1 वर करारपत्र व नकाशा, नि.4/2 वर पावती आणि नि.4/3 वर नोटीसची प्रत दाखल केली आहे.
7) विरुध्द पक्ष श्री गुरुनाथ यांनी आपले लेखी म्हणणे नि.10 वर दाखल करुन तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 व त्या अंतर्गत नियमावलीस धरुन नसल्यामुळे ती फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
8) श्री गुरुनाथ यांनी ते कंत्राटदार आहेत व सरंबळचे रहिवाशी आहेत हे मान्य केले आहे, परंतू 22/05/2011 च्या करारानुसार 3 महिन्यात काम पूर्ण करुन देण्याचे ठरले होते हे सर्वांशाने खरे नाही असे म्हटले आहे. तसेच तक्रारदार यांचे तक्रार अर्जातील इतर आक्षेपही त्यांनी अमान्य केले आहेत.
9) वस्तुस्थिती अशी आहे या सदरात श्री गुरुनाथ यांनी बांधकामाचा करार झाला आहे व रु.50,000/- त्यांना देण्यात आले हे मान्य केले आहे. तसेच घराच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी परवानगी तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीकडून घेऊन देणे आवश्यक होते. शिवाय बांधकामाकरीता लागणा-या सामानाची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याची सोय करणेची जबाबदारी तकारदाराची होती, परंतू तक्रारदाराने सदर परवानगी 9 महिन्यानंतर म्हणजे 15/03/2012 रोजी ग्रामपंचायतकडून घेतली. त्यामुळे करारात नमूद तीन महिन्यात बांधकाम करणे शक्यच नव्हते. तसेच श्री गुरुनाथ यांनी 6 ब्रास वाळू, 1500 चिरे, 25 पोती सिमेंट, अन्य लाकूड सामानाचे रु..20,000/- एवढया रक्कमेचे बांधकामासाठी लागणारे साहित्य त्यांचे स्वखर्चातून माहे मे 2011 मध्ये तक्रारदार यांचे घराजवळ आणून ठेवले होते; परंतू तक्रारदार यांच्या निष्काळजीपणामुळे 25 पोती सिमेंट व लाकूड खराब झाले व ते वापरणेस लायक राहिले नाही, त्यासाठी तक्रारदार जबाबदार आहे.
10) श्री गुरुनाथ यांनी पुढे असेही म्हटले आहे की, बांधकाम करावयाचे घराकडे जाणेसाठी कुडाळ –सरंबळ रस्त्यास जोडणा-या मूळ रस्त्यापासून जाधववाडी स्टॉपपासून सुमारे 200 मीटर एवढे पश्चिम दिशेस असल्याने सदर घराकडे जाणे येणेसाठी जमीन मालक श्रीमती शकुंतला जाधव, अशोक जाधव व श्रीमती सत्यभामा जाधव यांच्या मालकीच्या मिळकतीतून जावे लागते. तक्रारदार व त्यांच्यामध्ये वाटेसंदर्भात वाद निर्माण झाल्याने घराच्या बांधकामास आवश्यक असणा-या सामानाची ने- आण करणे श्री गुरुनाथ यांना अडचणीचे होऊ लागले, परंतु त्याबाबत तक्रारदार यांनी काहीही तजवीज केली नाही. उलट जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. यासंदर्भात तक्रारदार यांना विचारले असता मुंबईहून गावी आल्यानंतर जरुर ती तजवीज करील असे ते सांगत असत.
11) विरुध्द पक्ष यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी कराराप्रमाणे एकूण रु.2,40,000/- मध्ये बांधकाम करणेचे ठरले आहे. त्यापैकी फक्त रु.50,000/- त्यांना देण्यात आले आहेत. जोपर्यंत संपूर्ण रक्कम त्यांना मिळत नाही तोपर्यंत तक्रारदार त्यांचा ग्राहक होणार नाही. शेवटी तक्रारदार यांनी खोटी तक्रार केल्यामुळे त्यांना रु.10,000/- दंड करावा व ती रक्कम श्री गुरुनाथ यांना द्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
12) विरुध्द पक्ष यांनी सरतपासाचे शपथपत्र नि.14 वर दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांचा बांधकाम करणेसाठीचा अर्ज नि.19/1 वर आणि बांधकाम परवाना नि.19/2 वर दाखल केला आहे.
13) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचा खुलासा व कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? | होय; अंतीम आदेशानुसार. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
14) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम करण्याचे काम श्री गुरुनाथ यांना देण्यात आले होते व करार करतेवेळी रु.50,000/- अॅडव्हांस देण्यात आले याबद्दल वाद नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार करारानुसार तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचे ठरले होते, परंतू श्री गुरुनाथ यांनी बांधकामच केले नाही. तसेच तक्रारदार यांनी त्यांना नोटीस पाठवून व भेटून रक्कम परत करणेची विनंती केली असता रक्कमही परत केली नाही. या संदर्भात विरुध्द पक्ष यांनी म्हटले आहे की, बांधकाम करणेसाठी ग्रामपंचायतचा बांधकाम परवाना तक्रारदार यांनी जवळपास नऊ महिने उशीराने म्हणजे 15/03/2012 रोजी घेतला आहे. त्यामुळे बांधकाम चालू करता आले नाही. तसेच सदर बांधकामाचे ठिकाणी जाणेसाठी ज्या मालकांची जमीन आहे त्या जाधव कुटूंबीय व तक्रारदार यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे सदर जागेतून सामानाची वाहतूक करता आली नाही. त्यांनी तक्रारदारास त्याबाबत कळवले असता, तक्रारदार यांनी रस्त्याची काहीही तजवीज केली नाही तसेच विरुध्द पक्ष यांनी सिमेंट, वाळू, चिरे व अन्य लाकूड सामान इत्यादीचे रु.20,000/- चे सामान त्यांनी तक्रारदार यांचे घराजवळ पोहोचही केले आहे. व त्यातील सिमेंट व लाकूड खराब झालेले आहे. त्यामुळे त्यांनी बांधकामाबाबत काहीही त्रुटी ठेवलेली नाही, जो विलंब झाला त्यास तक्रारदार जबाबदार आहे.
15) तक्रारदारतर्फे युक्तीवाद करतांना अॅड.खानोलकर यांनी सदर जागेबाबत काहीही वाद नव्हता व त्यामुळेच विरुध्द पक्ष हे त्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य पोहोच करु शकले आहेत तर विरुध्द पक्षातर्फे अॅड. मराठे यांनी रस्त्याबाबत वाद होता हे तक्रारदार यांनी कुठेही नाकारलेले नाही, असे म्हटले आहे. यासंदर्भात विरुध्द पक्ष यांनी बांधकामाचे साहित्य त्याठिकाणी पोहोच केले आहे हे मान्य केले तर मग किमान अॅडव्हांस रक्कमेइतके बांधकाम विरुध्द पक्ष यांनी परवानगी मिळाल्यानंतर तरी सुरु का केले नाही असा प्रश्न उपस्थित होतो. विरुध्द पक्ष यांनी बांधकामाचे साहित्य पोहोच केले होते व परवानाही मिळाला होता. त्यामुळे विरुध्द पक्ष यांना अॅडव्हांस रक्कमेइतके तरी बांधकाम सुरु करणेस काहीच अडचण नव्हती असे आम्हांस वाटते.
16) या ठिकाणी दुसरी बाब म्हणजे सदर बांधकाम करणे शक्य नाही असे वाटल्यानंतर तक्रारदार यांनी रक्कम परत करणेची मागणी केल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी झालेला खर्च वजा करुन उर्वरित रक्कम तरी तक्रारदार याना परत करणे आवश्यक होते असे आम्हांस वाटते. परंतु या ठिकाणी विरुध्द पक्ष यांनी साहित्य पोहोच करुनही व बांधकाम परवाना मिळूनही किमान अॅडव्हांस रक्कमेइतके बांधकाम न करुन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
17) मुद्दा क्रमांक 2 व 3 - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना अॅडहांस दिलेली रक्कम रु.50,000/- व्याज रु.5,000/- सदर खोटी केल्यामुळे रु.5,000/-, मुंबईवरुन जाण्यायेण्यासाठी झालेला खर्च रु.10,000/-, नोटीस खर्च रु.1,000/-, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.86,000/- देण्याचा श्री गुरुनाथ यांना आदेश द्यावा अशी विनंती केली आहे. विरुध्द पक्ष यांनी करारानुसार बांधकाम करणेसाठी तक्रारदार यांचे घराजवळ रु.20,000/- चे साहित्य पोहोच केल्याचे व त्यातील सिमेंट व लाकूड खराब झाले आहे असे म्हटले आहे. तक्रारदार यांनी सदर बांधकामाचे साहित्य पोहोच केले किंवा नाही याबाबत आपल्या शपथपत्रात काहीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सदर साहित्य पोहोच केले होते हे प्रथमदर्शनी मान्य करावे लागले.
18) परंतू असे असले तरी बांधकामास उशीर होत असल्यामुळे सिमेंटच्या गोण्या विरुध्द पक्ष यांना तेथून परत घेऊन इतर कामासाठी वापरता येणे शक्य होते असे आम्हांस वाटते. कोणीही ठेकेदार सिमेंटच्या गोण्या निरुपयोगी होईपर्यंत त्याच ठिकाणी ठेवेल हे मान्य होण्यासारखे नाही. सदर सिमेंट खराब झालेबाबत कुठलाही पुरावा विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे साहित्याचे नुकसान झाले हे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे मान्य करता येणार नाही. परंतु सदर साहित्य पोहोच केल्याचे तक्रारदार यांनी अमान्य केले नसल्यामुळे सदर साहित्य पोहोच करणेसाठी झालेला खर्च तक्रारदाराचे अॅडव्हांस मधून वजा करावा लागेल असे आम्हांस वाटते. तसेच बांधकामाचे ठिकाणी असलेली वाळू व चिरे विरुध्द पक्ष यांना देण्याबाबत व त्याच्या वाहतूकीचा खर्च वजा होणे आवश्यक वाटते. वरील सर्व घटना पाहता विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.50,000/- वजा साहित्याच्या वाहतुकीचा खर्च अंदाजे रु.7,000/- वजा करुन एकूण रक्कम रु.43,000/- व त्यावर रक्कम दिल्याची तारीख दि.22/05/2011 पासून रक्कम अदा करेपर्यंत 12% दराने व्याज देण्याचा आदेश करणे आम्हांस योग्य व न्यायाचे वाटते. तसेच तक्रार दाखल खर्च व मानसिक त्रास यासाठी तक्रारदार रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष गुरुनाथ शाम नाईक यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.43,000/-(रुपये त्रेचाळीस हजार मात्र) व त्यावर दि.22/05/2011 पासून रक्कमेची पूर्ण फेड होईपर्यंत 12% दराने व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत दयावेत.
3) विरुध्द पक्ष गुरुनाथ नाईक यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रार अर्जाचा खर्च मिळून रक्कम रक्कम रु.2,000/- (रुपये दोन हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत द्यावेत.
4) विरुध्द पक्ष यांनी बांधकामाचे ठिकाणी ठेवलेली वाळू, चिरे, लाकूड इ. साहित्य परत घेऊन जावे.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 07/01/2014
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.