::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 30/11/2017)
१. विरुद्ध पक्षांनी तक्रारदारांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांना एकत्र कुटुंबाकरिता घर बांधावयाचे होते. त्याकरिता त्यांना मोठा अकृषक भुखंड विकत घ्यावयाचा होता. विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ यांचा भुखंड विक्रीचा व्यवसाय आहे. विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ यांची खास मौजा शेनगाव ता. व जि. चंद्रपूर येथे भुमापन क्र. ७१८ आराजी १.०० हेक्टर आर शेतजमीन होती. उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर यांनी विरुध्दपक्षांनी सदर शेतजमीन अकृषक करण्याकरिता केलेल्या अर्जावर दि. २०.०५.२०१० रोजी आदेश पारित करुन उपरोक्त शेतजमीन निवासी प्रयोजनार्थ अटी व शर्तीनुसार अकृषक रुपांतरीत करण्याकरिता परवानगी दिलेली होती. त्यानंतर विरुध्द पक्षांनी उपरोक्त जमिनीवर एकूण ३५ भुखंड पाडले. सदर जमीन अकृषक करतेवेळी विरूध्द पक्षांनी स्वखर्चाने अभिन्यासातील पाणी, विद्युत, रस्ते, नाल्या, खुली जागा विकसित करुन ग्राम पंचायतला हस्तांतरित करुन द्यायचे होते. तक्रारदारांने विरुध्द पक्षांकडून एकत्र कुटुंबाकरिता घर बांधण्याकरिता वर नमूद ले आउट मधील भुखंड क्र. ३२, ३३ व ३४ ज्याची आराजी अनुक्रमे १८३.५० चौ. मि., १७०.०० चौ. मि. व १७०.०० चौ. मि. असे एकूण ३ भुखंड विकत घेण्याचा करार केला. तेव्हा विरूध्द पक्षांनी ने सदर भुखंड लवकर विकसित करणार असून पाणी, विद्युत, रस्ते, नाल्या या सर्व सोई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने उपरोक्त भुखंड क्र. ३३ व ३४ दि. १७.०५.२०१२ व भुखंड क्र. ३२ दि. ०४.०७.२०१२ रोजी विरुध्द पक्षांकडून पंजीबद्ध खरेदी खतान्वये खरेदी केले. सदर भुखंडाच्या मोबदल्यात तक्रारदारकडून विरुध्द पक्षांनी प्रती भुखंड रक्कम रु. २,००,०००/- घेतली. परंतु विक्रीपत्रात मोबदला फक्त रु. ३०,०००/- दाखवला आहे. याशिवाय तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना त्यांचे मागणीप्रमाणे रक्कम रु. १,७०,०००/- सदर लेआऊटच्या विकास कामाकरिता दिले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला सदर लेआऊटच्या विकास कामाबद्दल विचारले असता विरुध्द पक्षांनी संपूर्ण भुखंडाची विक्री झाल्यानंतर एकाच वेळी सर्व काम करणार असे कळवून वेळ काढला. विरुध्द पक्षांनी सदर लेआऊट विकसीत न करता तक्रारकर्त्याला सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले व तक्रारकर्त्याचे मागणीनंतर सुध्दा सदर भुखंड विकसित न करुन तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. २०.०४.२०१६ रोजी अधिवक्त्यामार्फत विरुध्द पक्षांना नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षांनी उत्तर पण दिले नाही व पूर्तता सुध्दा केली नाही. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुद्ध मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली कि, विरुध्द पक्षांनी भुमापन क्र. ७१८ च्या मंजूर अभिन्यासातील पाणी, विद्युत, रस्ते, नाल्या, खुली जागा विकसित करुन ग्राम पंचायतला हस्तांतरित करुन द्यावे किवा त्याकरिता तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रु. १,७०,०००/- व्याजासह तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षांनी परत करावे. याशिवाय तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु. १०,०००/- व तक्रार खर्च रक्कम रु. ५,०००/- विरुध्द पक्षांनी देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली.
३. विरुद्ध पक्ष क्र. १ ते ३ यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर मंचासमक्ष हजर राहून त्यांनी आपले लेखी कथन दाखल करुन त्यामध्ये मान्य केले कि, त्यांची मौजा शेनगाव ता. व जि. चंद्रपूर येथिल भुमापन क्र. ७१८ आराजी १.०० हेक्टर आर शेतजमीन होती व सदर शेतजमीन ही मा. उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांनी विरुध्द पक्षांनी सदर शेतजमीन अकृषक करण्याकरिता केलेल्या अर्जावर दि. २०.०९.२०१० रोजी आदेश पारित करुन उपरोक्त शेतजमीन निवासी प्रयोजनार्थ आटि व शर्तीनुसार अकृषक रुपांतरीत करण्याकरिता परवानगी दिलेली होती. त्यानंतर विरुध्द पक्षांनी उपरोक्त जमिनीवर एकूण ३५ भुखंड पाडले. त्यापैकी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून दि. ०४.०७.२०१२ रोजी भुखंड क्र. ३२ व दि. १७.०५.२०१२ रोजी भुखंड क्र. ३३ व ३४ असे भुखंड विकत घेतले. परंतु तक्रारदारचे उर्वरित कथन विरूध्द पक्ष यांनी नाकबूल केले असून पुढे नमूद केले कि, उपरोक्त जमीन अकृषक करुन त्यावर एकूण ३५ ले आउट भुखंड पाडून रस्ते व नाल्याचे सीमांकन मौक्यावर केले होते. तसेच मौक्यावर मुरूम गिटटीचा रस्ता व नालीचे खड्डे खोदले होते. परंतु काही काळ सदर ले आउट भुखंडची विक्री न झाल्यामुळे मौक्यावर गवत व कचराची वाढ झाली. त्यामुळे तयार केलेला रस्ता व नाली दिसत नव्हते. हे भुखंड विकत घेणाऱ्या सर्वाना माहिती होते. सदर रस्ता व नाली दिसत नसल्यामुळेच सदर भुखंड कमी किमतीत विकण्यात आले होते. तक्रारदारने सदर भुखंड विकत घेताना प्रत्यक्ष जागेवर जावून खात्री केल्यानंतरच भुखंड विकत घेतले होते. सदर जागेवर वाढलेले गवत व कचरा काढून विरुध्द पक्षांनी तयार केलेले रस्ते, खुली जागा व नाल्या करण्याची जबाबदारी ही खरेदी करणार यांचेवर होती व यामुळेच सदर भुखंड कमी किमतीत विकण्यात आले होते. विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारकडून रस्ते, खुली जागा व नाल्या विकसित करण्याकरिता कोणतीही रक्कम घेतलेली नाही व तसा खरेदीखतामध्ये उल्लेखही नाही. विरूध्द पक्षांनी ने तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला उत्तर दिले व त्यामध्ये तक्रारकर्त्याने सदर भुखंड खरेदीवेळी दिलेली रक्कम रु. ३०,०००/- त्यास परत करून दि. ०३.०७.२०१२ रोजीचे खरेदी खत रद्द करण्यास तयार आहे असे सूचित केले. तक्रारकर्त्याने सदर तक्रार विरुध्द पक्ष. ना त्रास देण्याचे हेतूने दाखल केली आहे. सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
४. तक्रारकरत्याची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तीवाद व परस्पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात येतात त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे..
मुद्दे निष्कर्ष
(१) तक्रारकर्ता विरुद्ध पक्ष क्र. १ ते ३ यांचा ग्राहक आहे
काय? होय
(२) विरुद्ध पक्ष क्र.१ ते ३ यांनी तक्रारकर्त्याप्रती न्यूनता पूर्ण सेवा
दिली आहे काय ? होय
(३) तक्रारदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
(४) अंतीम आदेश काय ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ बाबत :-
५. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ यांच्याकडून मौजा शेनगाव ता. व जि.चंद्रपूर भुमापन क्र.718 मधील भुखंड क्र.32,33 व ३४ ज्याची आराजी अनुक्रमे 183.50 चौ.मी. 170.00 चौ.मी. व 170.00 चौ.मी. असे भुखंड क्र. ३२ चे दि. ०४.०७.२०१२ रोजी व भुखंड क्र.33,34 चे दिनांक 17/5/2012 रोजी प्रत्येकी रक्कम रु. ३०,०००/- मोबदला देऊन विरुध्द पक्षांकडून पंजीबद्ध खरेदी खतान्वये खरेदी केले. सदर दस्त कागदोपत्री दाखल आहे.
तक्रारदारने तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारने सदर तीन भुखंड हे व्यावसायिक कारणाकरिता विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ यांच्याकडून खरेदी केले, असे विरुध्द पक्षांचे म्हणणे नाही. तसेच तक्रारकर्ता हे भुखंड विक्रीचा व्यवसाय करतात व नफा मिळविण्याकरिता त्यांनी एकापेक्षा जास्त भुखंड विकत घेतले यासंदर्भात विरुध्द पक्ष क्र. १ ते ३ ने कोणताही दस्तावेज / पुरावा दाखल केलेला नाही. मा. राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी दि. ०२.०१.२०१७ रोजी First Appeal No. 237/2015 AKSHAY SOOD V/S M/S PAL INFRASTRUCTURE AND DEVELOPERS PVT. LTD. AND ANOTHERS या न्यायनिर्णयामध्ये विषद केलेल्या न्यायतत्वानुसार,
“Mere purchase of more than one flat would not per se be sufficient to hold that, purchase was for commercial purposes.”
सदर न्यायतत्व प्रस्तुत प्रकरणास लागू होते. सबब, मंचाचे मते तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ चा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. २ व ३ बाबत :
6. तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि.उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर यांनी दि .२०/०५/२०१० रोजी पारित केलेल्या आदेशान्वये मौजा शेणगाव स.न.७१८ आराजी १.०० हे .आर शेत जमीन निवासी प्रयोजनार्थ अकृषक करण्याकरिता एकूण २९ अटीवर विरुध्द पक्षांना परवानगी दिली. सदर अटींमध्ये अट क्र.३ मध्ये अभिन्यासातील भूखंड विक्री करण्यापूर्वी अर्जदाराला सदर आदेशापासून एक वर्षाचे आत स्वखर्चाने अभिन्यासातील पाणी,विद्युत,रस्ते ,नाल्या,खुली जागा विकसित करुन त्या ग्रामपंचायतला हस्तातरण करावे लागतील, असे नमूद आहे.तरी सुद्धा विरुध्द पक्षांनी नमूद अटीची पूर्तता न करताच उपरोक्त भूखंडाची २ विक्रीपत्रान्याये विक्री केली व तक्रारकर्त्याने मागणी केल्यावर सुद्धा वर नमूद अटी प्रमाणे सदर लेआउट मध्ये रस्ते ,नाल्या व इतर नमूद सुविधा करून दिल्या नाहीत. विरुध्दपक्षांनी उपरोक्त दि. २०/०५/२०१० रोजीच्या उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशामध्ये नमूद अट क्र.3 नुसार रस्ते,नाल्या. ई. ची पूर्तता केली हे दस्तावेज / पुरावा दाखल करुन सिध्द केलेले नाही. यावरून मौजा शेनगाव भूमापन क्र.७१८ मध्ये पाणी, विद्युत रस्ते इ. सोयी पुरवून विकसीत करुन दिलेला नाही. विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ ने तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, कराराप्रमाणे, सेवासुविधा पुरविण्यात कसूर करून तक्रारकर्त्याप्रती न्यूनता पूर्ण सेवा दिली हे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने तक्रारकर्ता विरुध्द पक्ष. क्र. १ ते ३ कडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ४ बाबत :-
8. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १०५/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते.
२. विरुद्ध पक्ष क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारकर्त्यास, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, कराराप्रमाणे, सेवासुविधा पुरविण्यांत कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. विरुद्ध पक्ष क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारकर्ता यांच्या मौजा शेनगाव ता. व जि.चंद्रपूर येथिल भुमापन क्र. ७१८ च्या मंजूर अभिन्यासातील पाणी, विद्युत, रस्ते, नाल्या, खुली जागा ,या आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत विकसीत करुन ग्राम पंचायतला हस्तांतरित करुन द्यावे.
४. वि. प. क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे, तक्रारदारास, मानसीक, शारिरीक त्रास व तक्रार खर्चापोटी एकत्रित नुकसान भरपाई रक्कम रू. १०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावी.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) ) ( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.