-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-15 सप्टेंबर, 2017)
01. उभय तक्रारदार हे नात्याने अनुक्रमे पती व पत्नी असून त्यांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड या पतसंस्थे मध्ये त्यांनी मुदती ठेवी मध्ये गुंतविलेल्या रक्कमा अंतिम परिपक्वता तिथी पासून व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून, विरुध्दपक्ष क्रं-1) हे सदर पतसंस्थेचे अध्यक्ष असून, विरुध्दपक्ष क्रं-2) हे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-3) हे पतसंस्थेचे सचिव आहेत आणि विरुध्दपक्ष क्रं-4) हे पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. उभय तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्थे मध्ये काही रक्कमा मुदतीठेवी मध्ये जमा केलेल्या आहेत.
तक्रारदारांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी पतसंस्थे मध्ये मुदती ठेवीं मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. त्यांनी विरुध्दपक्षानां कायदेशीर नोटीस पाठवूनही प्रतिसाद मिळाला नाही.
तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, मुदतठेवी अंतर्गत अंतिम परिपक्वता तिथीस देय रक्कमा त्यावरील व्याजासह मिळण्यासाठी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मागणी करुनही देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं त्यांना देय मुदतीठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून शेवटी त्यांनी विरुध्दपक्ष संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, उभय तक्रारदारांनी प्रत्येकी रुपये-74,000/- प्रमाणे मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या मूळ रक्कमा अंतिम परिपक्वता तिथी दिनांक-13/06/2015 रोजी देय रक्कम प्रत्येकी रुपये-77,178/- प्रमाणे अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो व्याज यासह येणारी रक्कम प्रत्येकी रुपये-80,356/- प्रमाणे परत कराव्यात तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल प्रत्येकी रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/-विरुध्दपक्षानां देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापक यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारदारानीं पतसंस्थेला प्रतिपक्ष बनविले नसल्याने तक्रार कायदेशीर तरतुदी प्रमाणे चालू शकत नसल्याने खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त्यांचे पतसंस्थेत रकमा वार्षिक 9.50 टक्के व्याज दराने मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केल्या होत्या, पुढे त्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती या बाबी मान्य केल्यात. वाढवून दिलेल्या कालावधीसाठी वार्षिक व्याजदर हा 7.50 टक्के एवढा आहे. ते परिपक्वता तिथीस मुदत ठेवीची रक्कम देय व्याजासह देण्यास तयार होते परंतु तक्रारदारानीं केलेल्या विनंती नुसारच मुदतठेवींची मुदत वाढवून देण्यात आली होती. तक्रारदार हे कधीही विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदत ठेवीच्या रकमा परत मिळण्यास आले नाहीत अणि त्यांनी खोटी नोटीस पाठविली. ते मुदत ठेवीवर वाढवून दिलेल्या कालावधीसाठी वार्षिक 7.50 टक्के दराने व्याजासह रकमा देण्यास तयार होते व आजही तयार आहेत परंतु तक्रारदारांनी वाढवून दिलेल्या कालावधीसाठी सुध्दा वार्षिक 9.50 टक्के दरासह मुदती ठेवींच्या रकमा परत मागितल्यात आणि खोटी तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केली. ते आजही उभय तक्रारदारांना दोन्ही मुदती ठेवी पोटी एकूण रुपये-1,54,356/- एवढी रक्कम देण्यास तयार आहेत. त्यांनी लेखी युक्तीवादात असाही आक्षेप घेतला की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष संस्थेचे सभासद आहेत आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. सबब तक्रारदारांची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षा तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची सत्यापनावरील तक्रार, तसेच मुदतीठेव पावत्यांच्या प्रती, कायदेशीर नोटीस व नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती, पोचच्या प्रती, प्रतीउत्तर, तसेच विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. उभय तक्रारदारानीं विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदत ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने पुराव्या दाखल मुदती ठेव पावतींच्या प्रती दाखल केल्यात त्यानुसार मुदती ठेवींचा तपशिल परिशिष्ट-अ प्रमाणे खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 482 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Shri Pramod H. Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
2 | 486 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Sau. Shubhangi Pramod Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
06. सदर मुदत ठेव पावत्यांच्या प्रती या विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेले असून पावत्यांवर विरुध्दपक्ष सहकारी पत संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. तसेच परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे उभय तक्रारदार यांनी त्यांचे नावे रक्कम गुंतवणूक केल्याची बाब सुध्दा पुराव्या दाखल मुदती ठेव पावतींच्या प्रतीं वरुन सिध्द होते. यामध्ये तक्रारदारानीं पुर्नगुंतवणूक केलेल्या व्याज दरा संबधी उभय पक्षां मध्ये विवाद असल्याचे दिसून येते. तक्रारदार हे मुदतीठेवीच्या रकमांवर 9.50 टक्के व्याज दराने परिपक्वता तिथी पर्यंत व्याज मागत आहेत. तर विरुध्दपक्षांचे म्हणण्या नुसार मुदतीठेवीच्या पावत्यांवर प्रथम गुंतवणूक कालावधीतील व्याजदर हा 9.50 टक्के होता आणि पुर्नगुंतवणूकीवरील कालावधीतील व्याज दर हा 7.50 टक्के एवढा होता व त्यानुसार ते आजही रकमा देण्यास तयार आहेत. मुदतीठेवींच्या पावत्या या तक्रारदारांनी स्वतः दाखल केलेल्या असून त्यानुसार प्रथम गुंतवणूक कालावधीतील व्याज दर हा 9.50 टक्के आणि पुर्नगुतंवणूक कालावधीतील व्याज दर हा 7.50 टक्के एवढा असल्याचे त्यावरुन दिसून येते. तक्रारदारांना जर पुर्नगुंतवणूक कालावधीतील व्याज दर मान्य नव्हता तर त्यांनी त्या संबधी लेखी आक्षेप त्याच वेळी नोंदवावयास हवा होता परंतु तसे त्यांनी केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे मुदती ठेवींवर नमुद केलेल्या व्याजदराने अंतिम परिपक्वता तिथी पर्यंत आणि तेथून प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो आदेशित व्याज यासह रकमा परत मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे मत आहे.
07 तक्रारदारानीं त्यांची मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी दिनांक-18/09/2015 रोजीची कायदेशीर नोटीस त्याच दिनांक रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत पुराव्या दाखल नोटीस प्रत, रजिस्टर पोस्टाच्य पावत्या तसेच पोच पुराव्या दाखल सादर केलेल्या आहेत. यावरुन असे सिध्द होते की, तक्रारदारानीं मागणी करुनही त्यांच्या मुदत ठेवींच्या रकमा देय लाभ व व्याजासह विरुध्दपक्ष पतसंस्थेनी परत केलेल्या नाहीत, त्यामुळे विरुध्दपक्षांचा बचाव की ते तक्रारदारांना मुदती ठेवीच्या रकमा परत करण्यास तयार होते व आहेत यात कोणतेही तथ्य ग्राहक मंचास दिसून येत नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष पतसंस्थेने मुदतीठेवीच्या अंतिम परिपक्वता दिनांकास देय रकमा तक्रारदारानां परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सुध्दा सिध्द होते. तक्रारदारानां त्यांनी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेल्या देय रकमा वेळेवर न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येते. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता उभय तक्रारदार हे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतीठेवीच्या रक्कमा अंतिम परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याज यासह विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-2500/- प्रमाणे एकूण रुपये-5000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
08. या ठिकाणी आणखी एका महत्वाच्या बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे की, यातील तक्रारदारानीं विरुध्दपक्ष क्रं-4) म्हणून पतसंस्थेच्या व्यवस्थापकानां तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्यवस्थापक हे पद संस्थेचे पदाधिकारी या मध्ये मोडत नसून ते पगारी कर्मचा-याचे पद असल्याने त्याची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी येत नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-4) ला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
09. विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे दाखल युक्तीवादा मध्ये असाही आक्षेप घेण्यात आला की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष संस्थेचे सभासद आहेत आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. या आक्षेपा संदर्भात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्यानीं विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या मुदती ठेवी मध्ये रकमा गुंतविलेल्या असल्याने ते विरुध्दपक्ष पतसंस्थेचे “ग्राहक” होतात आणि विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेनी त्यांना देय असलेल्या रकमा परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे ग्राहक न्यायमंचाला प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते अशा आशयाचे अनेक निकालपत्र मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले असल्याने विरुध्दपक्षाचे सदर आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) उभय तक्रारदार अनुक्रमे क्रं-1) श्री प्रमोद एच. रघुते आणि क्रं-2) सौ.शुभांगी प्रमोद रघुते यांची तक्रार, विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष, विरुध्दपक्ष क्रं-2) उपाध्यक्ष आणि विरुध्दपक्ष क्रं-3) सचिव यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(4) व्यवस्थापक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड हे पद पगारी कर्मचा-याचे पद असून ते पदाधिकारी मध्ये मोडत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-4) याला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे उभय तक्रारदारानीं त्यांचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमा अंतिम परिपक्वता तिथीस देय रकमा, अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणा-या रक्कमा प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारदारानां परत कराव्यात.
(04) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-2500/- प्रमाणे एकूण रुपये-5000/-(अक्षरी एकूण रुपये पाच हजार फक्त) तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) ते क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) तक्रारदारांना द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) ते क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.