आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा श्रीमती आर. डी. कुंडले 1. सदर तक्रार रिमांड होऊन दिनांक 31/05/2011 रोजी या मंचाला प्राप्त झाली. आदरणीय राज्य आयोगाने पुन्हा नव्याने युक्तिवाद ऐकून प्रकरण 3 महिन्याच्या आंत निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार दिनांक 31/05/2011 रोजी दोन्ही पक्षांना नोटीसेस काढण्याचा आदेश देण्यात आला. दोन्ही पक्षाचे वकील दिनांक 06/07/2011 रोजी हजर झाले. त्यांच्या संमतीने युक्तिवादासाठी दिनांक 11/07/2011 ही तारीख ठेवण्यात आली. पुन्हा या तारखेला दोन्ही पक्षाच्या वकिलांच्या विनंतीवरून दिनांक 18/07/2011 ही तारीख मुकर्रर केली. या तारखेला दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला व आदेशासाठी दिनांक 28/07/2011 ही तारीख देण्यात आली.
2. तक्रारकर्त्याने दिनांक 25/11/2005 रोजी विरूध्द पक्षाविरूध्द संगणकाचे प्रोसेसर पेन्टियम-III न देता सेलेरॉन कंपनीचे दिले पण बिलामध्ये मात्र पेन्टियम-III नमूद केले म्हणून किमतीतील फरक मिळावा व सेवेतील त्रुटीबद्दल नुकसानभरपाई मिळावी तसेच सेलेरॉन ऐवजी पेन्टियम-III प्रोसेसर द्यावे इत्यादी साठी तक्रार दाखल केली आहे. 3. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः- तक्रारकर्ता मेसर्स युनिटेक कॉम्प्युटर्स ही संस्था तुमसर येथे चालवितो. तक्रारकर्त्याला कॉम्प्युटर संस्था चालविणा-या संस्थेचे (तुमसर कॉम्प्युटर्स इन्स्टिट्युट –TCI) सभासद व्हायचे होते. त्यासाठी संस्थेजवळ (सभासदाजवळ) पेन्टियम-III प्रोसेसर असलेले 5 संगणक संच असणे आवश्यक होते. विरूध्द पक्ष भंडारा येथे "न्यूटेक कॉम्प्युटर्स" ही संस्था चालवितात. दिनांक 05/09/2004 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून पेन्टियम-III प्रोसेसर असलेले 5 संगणक संच रू. 67,700/- ला विकत घेतले. पैकी फक्त संगणक संचाची किंमत रू. 60,000/- होती. दिनांक 05/09/2004 रोजीच विरूध्द पक्षाने हे पाचही संगणक संच तुमसर येथे जाऊन लावून दिले. तक्रारकर्त्याने संपूर्ण किंमत विरूध्द पक्षाला नगदी दिली. तसे बिल आहे. विरूध्द पक्षाने संगणक संचासोबत पेन्टियम-III चेच प्रोसेसर दिले असे तक्रारकर्त्याला वाटले. परंतु डिसेंबर 2004 मध्ये तक्रारकर्त्याने जेव्हा पाचही संगणक संचाचे तज्ञाकडून परिक्षण करून घेतले तेव्हा संगणक संचासोबत पेन्टियम-III चे प्रोसेसर नसून ते सेलेरॉन चे असल्याचे निष्पन्न झाले. हे परिक्षण तुमसर कॉम्प्युटर्स इन्स्टिट्युटच्या (TCI ) तज्ञाने केले. TCI या संस्थेचे सभासद होण्यासाठी संगणकासोबत पेन्टियम-III चे प्रोसेसर असणे ही मुख्य पूर्वअट होती. संस्थेने परिक्षण केल्यानंतर तक्रारकर्त्याजवळच्या संगणक संचासोबत पेन्टियम-III चे प्रोसेसर्स नसल्याने तक्रारकर्त्याला TCI चे सभासदत्व दिले नाही. 4. यांनतर तक्रारकर्त्याने त्वरित विरूध्द पक्ष यांचेशी संपर्क साधला व पेन्टियम-III चे प्रोसेसर्स द्यावे म्हणून मागणी केली. विरूध्द पक्षाने तोंडी कबूल केले पण प्रोसेसर्स बदलून देण्यास टाळाटाळ केली. वारंवार मागणी करूनही विरूध्द पक्षाने प्रोसेसर्स बदलून दिले नाही. यावरून फसवणूक झाल्याचे तक्रारकर्त्याच्या लक्षात आले. म्हणून दिनांक 05 एप्रिल, 2005 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला नोटीस दिली व त्याद्वारे प्रोसेसर्स बदलून देण्याची व नुकसानभरपाई रू. 25,000/- देण्याची मागणी केली. ही नोटीस विरूध्द पक्षाला मिळाली. त्याला दिनांक 27/10/2005 रोजी विरूध्द पक्षाने उत्तर दिले पण प्रतिसाद दिला नाही. दिनांक 01/06/2005 रोजी तक्रारकर्त्याने तुमसर येथील पोलीस स्टेशनमध्ये 420 ची तक्रार दाखल केली. त्यावर विरूध्द पक्षाने पोलीसांसमोर पाचही प्रोसेसर्स 15 दिवसांच्या आंत बदलून देण्याचे मान्य केले. परंतु प्रत्यक्षात बदलून दिले नाहीत म्हणून मंचात दिनांक 25/11/2005 रोजी तक्रार दाखल केली. 5. तक्रारकर्ता पुढे तक्रारीत म्हणतो की, सेलेरॉन कंपनीचे प्रोसेसर्स बाजारात अत्यंत कमी किमतीत म्हणजेच रू. 3,000/- ते 4,000/- प्रति नग मिळतात. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून 5 संगणक संच प्रत्येकी रू. 12,000/- प्रमाणे एकूण रू. 60,000/- ला विकत घेतले. त्यासोबत बिलामध्ये नमूद केल्याप्रमाणे पेन्टियम-III चे प्रोसेसर्स असणे आवश्यक होते. परंतु त्याऐवजी विरूध्द पक्षाने सेलेरॉन कंपनीचे स्वस्त प्रोसेसर्स दिले. त्यामुळे तक्रारकर्त्याला TCI चे सभासद होता आले नाही. त्यामुळे त्याचे प्रचंड नुकसान झाले. जर TCI चे सभासदत्व मिळाले असते तर तक्रारकर्त्याला रू. 5,000/- ते रू. 10,000/- चे उत्पन्न झाले असते. विरूध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक लाभांपासून वंचित रहावे लागले. 6. तक्रारीस कारण प्रथम दिनांक 05/09/2004 ला व त्यानंतर डिसेंबर 2004 मध्ये (जेव्हा तक्रारकर्त्याला समजले की, प्रोसेसर्स पेन्टियम-III चे नसून सेलेरॉन कंपनीचे आहेत) घडले व प्रोसेसर्स बदलून न दिल्याने ते सतत घडत आहे. तक्रारकर्त्याने स्वतःची उपजिविका चालविण्यासाठी उपरोक्त संगणक संच खरेदी केले म्हणून तक्रारकर्ता "ग्राहक" ठरतो. 7. तक्रारकर्त्याची मागणी - पाचही संगणक संचामध्ये पेन्टियम-III चे प्रोसेसर्स लावून/बदलून द्यावे. विरूध्द पक्षाच्या अनुचित व्यापार प्रथेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून रू. 1,00,000/- द्यावे. मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 25,000/- द्यावे. 8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत – बिल, दोन तज्ञांचे अहवाल, पोलीस कम्प्लेन्टची प्रत, तक्रारकर्त्याच्या नोटीसची प्रत व विरूध्द पक्षाच्या नोटीसची प्रत याप्रमाणे 7 दस्त दाखल केले आहेत. त्याचबरोबर तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ खालील केस लॉ दाखल केलेले आहेत. 1) IV (2003) CPJ 183 – सदोष बियाण्याबद्दल आहे. लागू नाही. 2) III (2008) CPJ 205 (NC) – स्वयंरोजगारासाठी केलेला व्यवसाय (कमर्शियल परपज) मध्ये मोडत नाही. तक्रारकर्ता ‘ग्राहक’ ठरतो. लागू आहे. 9. विरूध्द पक्षाच्या उत्तरानुसार
प्राथमिक आक्षेप– संगणक व्यापारी तत्वावर नफा कमाविण्यासाठी घेतले म्हणून तक्रारकर्ता ग्राहक ठरत नाही. (फी आकारून विद्यार्थी प्रशिक्षित करणे). तक्रारकर्त्याने जुन्या संगणक संचाचीच मागणी केली होती. म्हणून त्यांना जुने संगणक संच पेन्टियम-III च्या प्रोसेसरसह विकण्यात आले. जुन्या संगणक संचावर कोणत्याही प्रकारची गॅरन्टी/वॉरन्टी नसते/नाही. विरूध्द पक्ष हे ट्रेडर नाही. तक्रारकर्त्याची दिनांक 05 एप्रिल 2005 ची नोटीस विरूध्द पक्षाला प्राप्त झाली. त्याला दिनांक 27/10/2005 रोजी उत्तर देऊन आरोप अमान्य केले. अधिकच्या कथनानुसार - तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडून 5 संगणक संच रू. 67,700/- मध्ये दिनांक 05/09/2004 रोजी विकत घेतले. त्यासाठी दिनांक 23/08/2004 रोजी रू. 25,000/-, दिनांक 28/08/2004 रोजी रू. 35,000/- आणि दिनांक 05/09/2004 रोजी रू. 3,000/- याप्रमाणे रक्कम दिली. बाकी रू. 4,700/- होते. विरूध्द पक्षाने दिनांक 05/09/2004 रोजीच सर्व पाचही संगणक संच पेन्टियम-III प्रोसेसरसहित तक्रारकर्त्याच्या संस्थेत तुमसर येथे स्वतः जाऊन लावून दिले. त्यावेळी तक्रारकर्त्याने कोणताही उजर दाखल केला नाही. हे संच सेकंड हॅन्ड असल्याने त्याबद्दल गॅरन्टी/वॉरन्टी नव्हती. संच ताब्यात घेण्यापूर्वी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाच्या संस्थेत ते पाहूनच मग खरेदी केले. बाकी रक्कम रू. 4,700/- ची मागणी विरूध्द पक्षाने वारंवार तक्रारकर्त्याला केली. पण तक्रारकर्त्याने ही रक्कम रू. 4,700/- विरूध्द पक्षाला दिली नाही. तक्रारकर्त्याने बराच काळ लोटल्यानंतर डिसेंबर 2004 मध्ये संगणक संचाची व प्रोसेसरची पाहणी तज्ञांकडून करून घेतली. त्याची सूचना विरूध्द पक्षाला दिली नाही. विरूध्द पक्षाच्या उपस्थितीत ही पाहणी करायला पाहिजे होती. ऑक्टोबर 2005 मध्ये उर्वरित रक्कम रू. 4,700/- परत करण्याचे आश्वासन तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाला दिले. पण तेथे गेल्यावर प्रत्यक्षात रक्कम न दिल्याने विरूध्द पक्षाने कारवाई करण्याचा इशारा तक्रारकर्त्याला दिला. यावरून चिडून जाऊन तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन, तुमसर येथे दिनांक 01/06/2005 रोजी विरूध्द पक्षाविरूध्द पोलीसात खोटी तक्रार दिली. विरूध्द पक्षाने दिनांक 27/10/2005 रोजी पोलीस अधिक्षक, भंडारा यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण प्रकरण अवगत केले. बाकी रक्कम रू. 4,700/- तक्रारकर्त्याला द्यायचे नव्हते म्हणून दिनांक 05 एप्रिल, 2005 रोजी खोटी नोटीस दिली. या नोटीसला विरूध्द पक्षाने दिनांक 27/10/2005 रोजी उत्तर दिले व त्यातूनही उर्वरित बाकी रकमेची (रू. 4,700/-) मागणी केली. हे उत्तर तक्रारकर्त्याला प्राप्त झाले. विरूध्द पक्षाने सुध्दा दिनांक 16/01/2006 रोजी तक्रारकर्त्याला बाकी रू. 4,700/- मिळण्यासाठी नोटीस दिली. ही नोटीस प्राप्त होऊनही तक्रारकर्त्याने त्याचे उत्तर दिले नाही अथवा रक्कमही दिली नाही. म्हणून बाकी रक्कम रू. 4,700/- च्या वसुलीसाठी विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याविरूध्द दिवाणी दावा नंबर 15/06 दाखल केला. विरूध्द पक्षानुसार तक्रारकर्ता ‘ग्राहक’ ठरत नाही. तक्रारीस कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केले दस्त क्रमांक 2 व 3 हे "तपासणी अहवाल" आहेत. ते विरूध्द पक्षाला मान्य नाहीत, कारण ते विरूध्द पक्षाच्या अनुपस्थितीत केले आहेत. या प्रकरणात तज्ञांद्वारे सखोल परिक्षण व साक्षी-पुराव्यांची गरज असल्याने हा मामला ग्राहक संरक्षण कक्षाच्या अखत्यारीत येत नसून त्यासाठी दिवाणी कोर्ट ही सक्षम authority आहे असे प्राथमिक आक्षेप विरूध्द पक्षाने घेतले आहेत. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष करतात. 10. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याची जाहिरात पत्रके, एका विद्यार्थ्याचे शपथपत्र (संस्था व्यापारी तत्वावर चालते हे दर्शविण्यासाठी) इत्यादी 8 दस्तऐवज दाखल केले असून लेखी युक्तिवाद सुध्दा दाखल केलेला आहे. त्याचबरोबर विरूध्द पक्षाने आपल्या कथनाच्या पुष्ठ्यर्थ खालील केस लॉ दाखल केलेले आहेत. 1. IV (2003) CPJ 524 – उत्पादनातील दोषाबद्दल आहे. इथे तो मुद्दा नसल्याने लागू नाही. 2. 2001 (3) CPR 142 - व्यापारी तत्वावरील उत्पादनाच्या संदर्भात आहे. हातातील केसला लागू नाही. 3. I 1995 CPJ 51 (NC) - कमर्शियल पर्पजचा मुद्दा आहे. हातातील केसला लागू नाही. 11. विरूध्द पक्षाचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 03/07/2006 रोजी प्रतिउत्तर दाखल केले. विरूध्द पक्षाने घेतलेले प्राथमिक आक्षेप तक्रारकर्त्याला मान्य नाहीत. तक्रारकर्त्याने संगणक संच स्वतःच्या उपजिविकेसाठी घेतले म्हणून तक्रारकर्ता ‘ग्राहक’ ठरतो, तक्रारीस कारण घडलेले आहे आणि ग्राहक संरक्षण मंचाला या तक्रारीवर निर्णय देण्याचा अधिकार आहे असे तक्रारकर्ते प्रतिउत्तरात म्हणतात. बाकी रकमेच्या संदर्भात (रू. 4,700/-) दिवाणी दावा प्रलंबित असल्याने (त्यावेळी) त्यावर तक्रारकर्त्याने भाष्य केले नाही.
12. मंचातील या प्रकरणाचा निकाल तक्रारकर्त्याच्या बाजूने दिनांक 08/08/2006 रोजी लागला. त्यावर मूळ विरूध्द पक्ष गिरीश लाडे यांनी राज्य आयोगाकडे अपील क्रमांकः A/06/1800 दाखल केले व स्थगनादेश प्राप्त केला. या अपिलाचा निकाल दिनांक 18/04/2011 रोजी लागला. त्यात मूळ तक्रारीवर दोन सदस्यांनी निर्णय दिल्याने सदर निकाल अवैध ठरविला आणि प्रकरण पुन्हा ऐकून निर्णय देण्यासाठी भंडारा मंचाकडे रिमांड केले.
13. दरम्यान विरूध्द पक्षाने उर्वरित रकमेच्या (रू. 4,700/-) वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा निर्णय दिनांक 28/03/2007 रोजी विरूध्द पक्षाच्या बाजूने लागला. त्या निर्णयाची प्रत विरूध्द पक्षाने दिनांक 18/04/2011 रोजी युक्तिवादादरम्यान मंचासमोर दाखल केली. 14. मंचाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील कागदपत्रे तपासली. मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणेः- -ः निरीक्षणे व निष्कर्ष ः- 15. तक्रारकर्त्याने स्वतःची उपजिविका चालविण्यासाठी संगणक संच घेतले होते म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 (1)(2) नुसार तक्रारकर्ता ग्राहक ठरतो. यासंबंधीचा विरूध्द पक्षाचा प्राथमिक आक्षेप फेटाळण्यात येतो. सदर तक्रार चालविण्यास ग्राहक संरक्षण कक्ष सक्ष्ाम आहे. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला पेन्टियम-III चे प्रोसेसर न देता सेलेरॉन या कंपनीचे स्वस्त प्रोसेसर्स दिले व फसवणूक केली म्हणून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
16. संपूर्ण प्रकरण तपासले असता असे लक्षात येते की, तक्रारकर्त्याला विरूध्द पक्षाचे बाकी रू. 4,700/- परत करावयाचे नसल्याने त्याने विरूध्द पक्षाविरूध्द अनेक कारवाया केल्या. तक्रारीनुसार संगणक संच विरूध्द पक्षाने दिनांक 05/09/2004 रोजी तुमसरला जाऊन लावून दिले. त्यापूर्वी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडेच त्यांची पाहणी केली होती व समाधान व्यक्त केले होते व म्हणूनच संच लावून दिल्यावर जवळजवळ तीन महिनेपर्यंत तक्रारकर्त्याने कोणतीही तक्रार विरूध्द पक्षाकडे केली नाही. परंतु डिसेंबर 2004 मध्ये तक्रारकर्त्याने पाचही संगणक संच TCI च्या तज्ञाकडून तपासले असता त्यासोबत असलेले प्रोसेसर्स बिलात नमूद केल्याप्रमाणे पेन्टियम-III चे नाहीत असे आढळले म्हणून तक्रारकर्त्याला TCI चे सभासद होता आले नाही. कारण पेन्टियम-III चे प्रोसेसर्स असणे ही पूर्वअट होती. त्यामुळे तक्रारकर्त्याचे रू. 5,000/- ते रू. 10,000/- महिना नुकसान झाले असे तक्रारकर्ता म्हणतो. मंचाला तक्रारकर्त्याच्या उपरोक्त कथनात अजिबात तथ्य वाटत नाही. कारण तक्रारकर्त्याने कोणत्या तारखेला हे संच तपासून घेतले हे नमूद केले नाही. तपासणी करणारा तज्ञ कोण, त्याचे क्वालीफिकेशन काय? हे नमूद केले नाही. या तज्ञाचा अहवाल रेकॉर्डवर दाखल नाही. तपासणी करण्यापूर्वी हजर राहण्यासाठी विरूध्द पक्षाला सूचना दिली नाही. तक्रारीसोबत या तज्ञाचे शपथपत्र तक्रारकर्त्याने दाखल केले नाही. TCI चे सभासद होण्यासाठी पेन्टियम-III चे प्रोसेसर्स आवश्यक असल्याबद्दलचे कोणतेही दस्त रेकॉर्डवर दाखल केले नाहीत. कोणताही तपशील नसल्याने मंचाचा निष्कर्ष आहे की, डिसेंबर 2004 मध्ये तक्रारकर्त्याने कोणतीही तपासणी करून घेतली नाही. 17. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, बिलामध्ये विरूध्द पक्षाने पेन्टियम-III च्या प्रोसेसर्सचा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात कमी किमतीचे सेलेरॉन प्रोसेसर्स दिले. यासंदर्भातही तक्रारकर्त्याने दिनांक 05/09/2004 (संगणक संच खरेदीची तारीख) रोजी पेन्टियम-III व सेलेरॉन या दोन कंपन्यांच्या प्रोसेसर्सची नेमकी किंमत किती व फरक किती हे दर्शविणारा एकही दस्त रेकॉर्डवर दाखल केला नाही. मोघमपणे पेन्टियम-III पेक्षा सेलेरॉन रू. 3,000/- ते रू. 4,000/- मध्ये बाजारात मिळतो या केवळ विधानावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. 18. तक्रारकर्त्याने प्रोसेसर्स पेन्टियम-III चे नसल्याबद्दल अनुक्रमे दिनांक 01/06/2005 व 12/03/2005 तारखा असलेले दोन तज्ञांचे अहवाल रेकॉर्डवर (Doc. 2 व 3, रेकॉर्ड Page 10 व 11) दाखल केले आहेत. हे दोन्ही अहवाल मंचाला ग्राह्य वाटत नाहीत, कारण विरूध्द पक्षाला तपासणीपूर्वी सूचना न देता विरूध्द पक्षाच्या अनुपस्थितीत तपासणी करण्यात आली. या तज्ञांपैकी एकाचेही शपथपत्र रेकॉर्डवर दाखल केले नाही. दिनांक 01/06/2005 चा अहवाल अॅड. मोटवानी यांच्या सांगण्यावरून व दिनांक 12/03/2005 चा अहवाल तक्रारकर्त्याच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचे त्यात नमूद आहे. संगणक संचासोबतचे प्रोसेसर्स पेन्टियम-III चे नसून सेलेरॉन चे आहेत असे दोन्ही अहवाल म्हणतात. हे अहवाल विरूध्द पक्षाला पाठविण्यात आले नाहीत. उपरोक्त कारणास्तव मंचाला एकतर्फी असलेले हे अहवाल ग्राह्य वाटत नाहीत. दिनांक 05/09/2004 रोजीच्या बिलामध्ये प्रोसेसर्स पेन्टियम-III चे असल्याबद्दल नमूद आहे. मंचाला हे बिल सर्वथा ग्राह्य वाटते. यावरून विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला पेन्टियम-III चेच प्रोसेसर्स दिले हे सिध्द होते असा मंचाचा निष्कर्ष आहे. 19. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितले की, पेन्टियम-III चे प्रोसेसर्स जलद आहेत. याउलट सेलेरॉन कंपनीचे प्रोसेसर्स संथ आहेत. मंचाचे मत आहे की, संगणकाची गती केवळ प्रोसेसर्सवर अवलंबून नसते. सन 2004 मध्ये संगणक क्षेत्र बरेच नवीन होते. त्यातही Branded संगणक खूप महाग असल्याने प्रशिक्षण देणा-या संस्था Assembled संगणक वापरत होते ही बाब सर्वश्रूत आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे भाग एकमेकांशी compatible नसल्यास संगणकाच्या गतीवर परिणाम होतो. Broadband च्या जोडणीमुळे संगणक जलद चालतात. हे कनेक्शन तक्रारकर्त्याने घेतले होते किंवा नाही याबद्दल रेकॉर्डवर काहीही उपलब्ध नाही. संगणकाला गती नाही यावरून पेन्टियम-III चे प्रोसेसर्स नाहीत असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. 20. दिनांक 27/10/2005 च्या उत्तर नोटीसमध्ये विरूध्द पक्षाने जुने संगणक खरेदी केल्याबद्दल उल्लेख केला आहे. तक्रारीवरील उत्तरात तसेच युक्तिवादाच्या दरम्यानही तक्रारकर्त्याने जुने संगणक खरेदी केल्याबद्दल म्हटले आहे. मंचाला ते ग्राह्य वाटते. कारण 5 संगणक संचाची किंमत रू. 60,000/- दोन्ही पक्षांना मान्य आहे. म्हणजेच एका संगणकाची किंमत रू. 12,000/- येते. सन 2004 मध्ये नवीन संगणक संचाची किंमत रू. 12,000/- एवढी कमी नव्हती. ती रू. 20 ते 25 हजारावर होती. शिवाय तक्रारकर्त्याच्या संगणक संस्थेमध्ये नवशिके विद्यार्थी संगणक संच हाताळणार होते म्हणून तक्रारकर्त्याने जुने संगणक संच घेतले असाच निष्कर्ष निघतो. 21. दिनांक 18 मार्च 2007 च्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाची हे मंच Judicial Notice घेते. हा दावा या तक्रारीतील विरूध्द पक्ष यांनी त्यांची उर्वरित रक्कम रू. 4,700/- वसूल करण्यासाठी दाखल केला होता. त्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला. त्यातही तक्रारकर्त्याने (त्यातील प्रतिवादी) जुने संगणक संच विकत घेतले असेच नमूद आहे. तक्रारकर्त्याने यावर अपील केले नाही. त्यामुळे संगणक संच जुनेच खरेदी केले व त्यासोबत पेन्टियम-III चेच प्रोसेसर्स होते हे निर्विवादपणे सिध्द होते. विरूध्द पक्षाच्या सेवेत त्रुटी नाही तसेच त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला नाही असा निष्कर्ष मंच नोंदविते. सबब आदेश. आदेश 1. पेन्टियम-III ऐवजी सेलेरॉन कंपनीचे प्रोसेसर्स दिले ही बाब तक्रारकर्त्याने सिध्द केली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3. आदरणीय राज्य आयोगाच्या निर्देशाप्रमाणे हे प्रकरण भंडारा मंचात रिमांड होऊन प्राप्त झाल्याच्या तारखेपासून (दि. 31/05/2011) तीन महिन्याच्या आंत निकाली काढण्यात आले.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |