जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे. मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी ---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १४२/२०११ तक्रार दाखल दिनांक – ०१/०८/२०११ तक्रार निकाली दिनांक – ३०/०७/२०१३ श्री.विठ्ठल सुखदेव माळी ----- तक्रारदार. उ.व.६५, धंदा-शेती. रा.बाजारपेठ,सोनगीर,ता.जि.धुळे. विरुध्द (१)म.गटविकास अधिकारी ----- सामनेवाले. पंचायत समिती,वाडीभोकर रोड, देवपुर,धुळे. (२)The Manager Seminis Mosanto Holdings Private Limited Ahura Centre,5th Floor,96,Mahakali Caves Road, Andheri (E)Mumbai-400 093 (३)प्रो.रविंद्र सुरेश महाजन रा.द्वारा गायत्री अॅग्रो एजन्सी, पारोळा ता.पारोळा,जि.जळगांव. न्यायासन (मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी ) (मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन) (मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी) उपस्थिती (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एम.ए.माळी) (सामनेवाले क्र.१ व ३ – गैरहजर) (सामनेवाले क्र.२ तर्फे – वकील श्री.जे.यू.कोठारी) ------------------------------------------------------------------------ निकालपत्र (द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी) (१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून सदोष बियाण्यापोटी नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. (२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाले क्र.३ कडून, सामनेवाले क्र.२ या कंपनीचे कोबीचे बियाणे गिरीजा आणि हंसा या प्रकारचे बियाण्याचे पाकीटे विकत घेतले. तक्रारदार यांनी त्यांचे शेतात सदर बियाण्याची रोपे तयार करुन लावली. परंतु संपूर्ण शेतामध्ये योग्यवेळी त्या पिकास कोबीची फुले लागलेली नाहीत. त्या बाबत तक्रार पंचायत समिती, धुळे यांचेकडे अर्ज करण्यात आला. त्याप्रमाणे समितीने पंचनामा केला आहे, त्यामध्ये असा उल्लेख केला की, शेतक-यांची फसवणूक झालेली आहे व शेतक-यांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. त्या बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याशी संपर्क केला व दि.०४-०७-२०११ रोजी नोटिस पाठविली आहे. सदर नोटिसीस सामनेवाले यांनी खोटया मजकूराचे उत्तर पाठवून नुकसान भरपाई देणे टाळले आहे. म्हणून सदरचा तक्रार अर्ज हा रक्कम रु.१,५०,०००/- उत्पन्न न आल्याने नुकसान भरपाई मिळणेकामी दाखल केलेला आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, तक्रारदाराला मिळणारे उत्पन्न व इतर खर्च रु.१,७४,२३०/- व शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.२५,०००/- व्याजासह मिळावेत. (३) सामनेवाले नं.२ यांनी त्यांचा लेखी खुलासा देऊन सदर तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, कोबीच्या पिकावर हवामान व रोगराई याचा खुप जास्त परिणाम होत असतो. तक्रारदार यांनी पिकाचे संपूर्ण वय पुर्ण झाल्यानंतर जवळपास ५० ते ५६ दिवसानंतर पंचायत समितीकडे अर्ज केलेला असल्याने, तक्रारदारास त्याचे उत्पन्न मिळाले असण्याची शक्यता आहे. समितीने त्यांचा अहवाल आवश्यक त्या बाबीची पुर्तता करुन दिलेला दिसत नाही. अहवालात सामनेवाले नं.२ यांनी उत्पादीत केलेले बियाणे हे दोषपूर्ण आहे असा निष्कर्ष नमूद केलेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तसेच प्रयोग शाळेच्या अहवालाशिवाय बियाणे दोषपूर्ण आहे असे सिध्द होऊ शकत नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. (४) सामनेवाले नं.१ व ३ यांना या न्यायमंचाची रजिष्टर्ड पोष्टाद्वारे पाठविलेले नोटिस मिळाल्याचे दाखल पोहोच पावतीवरुन स्पष्ट होत आहे. परंतु सामनेवाले नं. १ व ३ हे सदर प्रकरणी स्वत: अथवा अधिकृत प्रतिनिधी मार्फत हजर झालेले नाही. तसेच त्यांनी त्यांचे बचावपत्रही दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.१७-०४-२०१३ रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला आहे. (५) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, कागदपञ तसेच सामनेवाले नं.२ यांचा खुलासा, शपथपत्र, कागदपत्र पाहता तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. मुद्देः | निष्कर्षः | (अ)तक्रारदार हे सामनेवाले नं.१ ते ३ यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. | (ब)सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : नाही. | (क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन (६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सदर बियाणे खरेदी केल्याची पावती दाखल केलेली आहे. सदर पावती पाहता ती विठ्ठल सुखदेव माळी यांच्या नांवे असून त्यावर “ गिरीजा व हंसा ” याचे १० ग्रॅम पॅकींगचे एकूण ५ व ६ नग, एकूण रक्कम रु.२,५५०/- किमतीस विकत घेतल्याची नोंद आहे. सदर पावतीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर बियाण्याची रोपे तयार करुन योग्य त्या पध्दतीने लागवड स्वत:चे शेतात केल्यानंतर त्याचे उत्पादन आले नाही त्या बाबत कृषिअधिकारी पंचायत समिती, धुळे यांचेकडे दि.०२-०६-२०११ रोजी तक्रार अर्ज केला आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांनी दि.०९-०६-२०११ रोजी पिक परिस्थितीचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनामा पान नं. १२ वर दाखल आहे. सदर पंचनामा पाहता यामध्ये असे नमूद आहे की, फुलकोबीच्या रोपांवर फुले उगवलेली नाहीत. कोणत्याही रोपावर फुलकोबीचा गड्डा वाढत असलेला आढळला नाही. त्यामुळे शेतक-याचे १०० टक्के नुकसान झाले आहे असे मत मांडले आहे. परंतु त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, बियाणे विक्रेत्याच्या सल्ल्याप्रमाणे सदर बियाणे हे उन्हाळी हंगामात येत असल्याचे सांगितले आहे व त्याप्रमाणे शेतक-यांनी लागवड केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात उत्पन्न आलेले नाही. सदर फुलकोबीचे बियाणे हे रब्बी हंगामासाठी शिफारस केलेली आहे व सदरचे पिक हे उन्हाळी हंगामात घेतल्यामुळे शेतक-यास अपेक्षीत उत्पन्न आलेले नाही, असे समितीने स्पष्टपणे मत व्यक्त केलेले आहे. (८) यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी सदर पिकाच्या लागवडीसाठी, रब्बी हंगामासाठी असलेले बियाणे हे उन्हाळी हंगामात घेतलेले आहे. त्यामुळे त्या पिकास उत्पन्न आलेले दिसत नाही. तक्रारदारांनी बियाण्याची पाकीटे दाखल केलेली आहेत. सदर पाकीटे पाहता त्यावर लागवड ही “रब्बी हंगामाकामी उपयुक्त” असे नमूद केलेले आहे. असे असतांना देखील तक्रारदार यांनी विक्रेत्यावर विश्वास ठेवून बियाणे खरेदी केलेले आहे व रब्बी हंगामाचे बियाणे हे उन्हाळी हंगामात घेतलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांना उत्पन्न आले नाही ही बाब स्पष्ट होत आहे. यावरुन तक्रारदारांनी योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाही. यासाठी तक्रारदारांनी इतरांना जबाबदार धरणे योग्य होणार नाही. (९) सदर पंचनामा विचारात घेता, त्यामध्ये सामनेवाले यांनी उत्पादीत केलेले बियाणे हे दोषयुक्त आहे असा कुठेही निष्कर्ष नमूद केलेला नाही. तसेच या बियाण्यामध्ये दोष आहे या बाबतचा कोणताही पुरावा किंवा प्रयोगशाळेचा दाखला दाखल केलेला नाही. त्यामुळे हे बियाणे दोषयुक्त आहे हे सिध्द होऊ शकत नाही. तसेच या पंचनाम्यावर बियाणे विक्रेता व कंपनी प्रतिनिधी हजर नसून त्यांची साक्ष नोंदविलेली नाही. या बाबीचा विचार करता सदर पंचनाम्यावरुन बियाण्यात दोष असल्याचे सिध्द होत नाही. (१०) या सर्व विवेचनाचा विचार करता, तक्रारदार यांना उत्पन्न आले नाही हे स्पष्ट होते. परंतु त्यास, केवळ बियाणे दोषयुक्त आहे हे एकच कारण असू शकत नाही. कारण पिक येणेकामी त्यासाठी आवश्यक असलेला हंगाम, वातावरण, पाऊस, जमीन, खते, फवारणी व किड किंवा रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी सर्व बाबी योग्य असणे आवश्यक आहे. या सर्व बाबी योग्य आवश्यक त्या परिस्थितीत असेल व बियाणे दोषयुक्त असल्याबाबतचा पुरावा आला असल्यास सदर बियाणे हे दोषयुक्त आहे असे सिध्द होऊ शकते. परंतु या बाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदर पंचनामा लक्षात घेता बियाणे दोषयुक्त होते हे स्पष्ट होत नाही. यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव हा योग्य व रास्त असून सामनेवाले यांच्या बियाण्यात दोष सिध्द होत नसल्याने सामनेवाले यांच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होत नाही, असे आमचे मत आहे. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. (११) सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ वरीष्ठ न्यायालयाचे एकूण २६ न्यायनिवाडे दाखल केले आहेत. परंतु सर्वच न्यायनिवाडयांचा उल्लेख करणे शक्य नसल्याने त्यातील काही महत्वाच्या न्यायनिवाडयांचा सदर प्रकरणी उल्लेख करीत आहोत. सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत. · 2 (2013) CPR 703 (NC) Banta Ram Vs Jai Bharat Beej Company & Anr. · II (2012) CPJ 373 (NC) Mahyco Seeds Ltd. Vs Sharad Motirao Kankale & Anr. · II (2012) CPJ 297 (NC) Mahyco Vegetable Seeds Ltd.Vs G.Sreenivasa Reddy & Ors. · 2008 (2) CPR 193 (NC) The Secretary Vs The Area Manager · 2008 (3) CPR 59 (NC) M/s India Seed House Vs Ramjilal Sharma & Anr. · II (2007) CPJ 148 (NC) Indo American Hybrid Seeds & Anr. Vs Vijayakumar Shankarao & Anr. · 2006 (3) CPR 408 (NC) Maharashtra Hybrid Seeds Co.Ltd.Vs Gowri Peddanna & Anr. · 3 (2006) CPJ 269 (MSCDRC) Khamgaon Taluka Bagayatdar Shetakari Vikri sahakari sanstha Vs Daba Kuti Deniel. · II (2005) CPJ 94 (NC) Sonekaran Gladioli Growers Vs Babu Ram · IV (2005) CPJ 47 (NC) Hindustan Insecticides Ltd. Vs Kopolu Sambasiva Rao & Ors. · III (2004) CPJ 17 (NC) Ganesh Ram & Ors Vs Prop.Kisan agro sales & Anr. (१२) सदर न्यायनिवाडयात पिकाच्या वाढीसाठी फक्त बियाणेच कारणीभूत नसून, पाऊस, पिकाची काळजी, हवामान, खतांची मात्रा, रोगाचा प्रादुर्भाव या बाबी तेवढयाच जबाबदार असतात या बाबत उहापोह केलेला आहे. त्यामुळे सदर निवाडयांचा या तक्रारीचे कामी आधार घेण्यात आला आहे. (१३) वरील सर्व बाबीचा विचार होता, तक्रारदारांची तक्रार रद्द करणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश (अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे. (ब) अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. धुळे. दिनांकः ३०/०७/२०१३ (श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य) |