::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/02/2017 )
आदरणीय अध्यक्षा, सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारदार हे पती पत्नी असून शेतकरी आहेत व ते मौजे अरक, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथील रहिवाशी आहेत. विरुध्द पक्ष क्र. 3 हे सोयाबिन बियाण्याचे उत्पादक आहेत व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे विक्रेते आहेत. तक्रारदार यांची मौजे अरक, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथे शेत सर्व्हे नं. 48, 190, 193 मध्ये शेतजमीन आहे. तक्रारदाराकडून विरुध्द पक्ष यांनी पाच एकरामध्ये पेरणीसाठी, पाच बॅग ( 30 किलो प्रतिबॅग ) सोयाबीन बियाणे ज्याची जात जे-एस 335 लॉट नं. 2161 बिल क्र. 5297 प्रमाणे दिनांक 01/06/2015 रोजी मोबदला स्विकारुन भेसळयुक्त बनावटी बियाणे दिले होते. सदर बियाणे तक्रारदाराने शेतीची परिपूर्ण मशागत करुन खरीप हंगाम 2015 मध्ये दिनांक 19/06/2015 रोजी पेरले होते. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष यांचे शिफारसी प्रमाणे शेनखत, रासायणीक खते, कोळपणी, खूरपणी,तणनाशक, किटकनाशक फवारणी, सिंचन सूविधा वेळोवेळी तक्रारदारांतर्फे करण्यात आली होती. त्यासाठी व मजूरदार इ. साठी एकरी 15 हजार प्रमाणे पाच एकराचा 75,000/- खर्च आला. तसेच भेसळयुक्त बियाण्यामुळे तक्रारदारांचे प्रती एकरी 10 क्विंटल प्रमाणे 50 क्विंटलचे रुपये 3,800/- प्रती क्विंटल प्रमाणे रुपये 1,90,000/- चे नुकसान झाले. असे एकंदरीत 2,65,000/- चे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास लेखी नोटीस देवूनही त्याची दखल विरुध्द पक्षांनी घेतली नाही. तक्रारकर्त्याला झालेल्या या नुकसानीस विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 हे वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या जबाबदार आहेत.
म्हणून, प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, तक्रारदारांनी विनंती केली की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 कडून वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या नुकसान भरपाई रुपये 2,65,000/- दयावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास दयावेत. वरील संपूर्ण रक्कमेवर दरसाल, दरशेकडा 18 % प्रमाणे व्याज आकारण्यात यावे तसेच योग्य, इष्ट व न्यायोचीत दाद तक्रारदारांचे हितात द्यावी.
दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 12 कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब व अतिरीक्त निवेदन :-
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी लेखी जबाब दाखल करुन थोडक्यात नमूद केले की, ते व्यावसायीक पार्टनर नाहीत तर ईगल सिड्स एन्ड बायोटेक लिमी. चे किरकोळ विक्रेते आहेत. त्यांनी कोणेतेही आमिष अथवा खोटे आश्वासन तक्रारदारास दिलेले नाही. तक्रारकर्त्याचे मागणीनुसार सोयाबीन जेएस-335 प्रमाणित बियाणे 5 बॅग, कंपनीचे सिलबंद टॅग व लेबलसहीत तक्रारदारास पुरविले. दिनांक 14/09/2015 ला प्रत्यक्ष पाहणीच्या दिवशी हजर राहून, तक्रारदारास सहकार्य केले. फळधारणा का झाली नाही ही बाब तांत्रीक असून ती या विरुध्द पक्षाच्या अंतर्गत येत नाही. विरुध्द पक्षाने कोणत्याही अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. एवढेच नव्हे तर दिनांक 05/02/2016 ला व्यवस्थापक, ईगल सिड्स अॅंन्ड बायोटेक लि. ला माहिती दिली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मधून वगळण्यात यावे. तसेच अतिरीक्त निवेदन दाखल करुन नमूद केले की, विरुध्द पक्ष क्र. 1 हे विक्रता/मालक असून ईगल कंपनीचे सोयाबीन बियाणे जेएस-335 प्रमाणित बियाणे मे. रामकृष्ण कोरपे अॅंन्ड सन्स अकोला येथून खरेदी केले असून त्यास महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांचा मुक्तता अहवाल क्र. 4711 दिनांक 20/04/2015 व लॉट नंबर 2161 आहे. सदर सिलबंद व प्रमाणीत बियाण्याचा पुरवठा तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार केला. त्यामुळे सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 दोषी ठरु शकत नाही. विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा प्रकार केलेला नाही व कोणतीही फसवणूक तक्रारदाराची केलेली नाही. पाहणीस्थळ दिनांक 14/09/2015 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी उपस्थित राहून तक्रारदाराला सहकार्य केले. सदर तक्रार बिज परीक्षण व गुणवत्ता विभागाशी संलग्न आहे, त्याचा अहवाल तक्रारदारांनी घेणे गरजेचे होते. तक्रारदारांनी सोयाबीन हेच पिक मागील वर्षी घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच प्रकारची तक्रार क्र.सिपीअे/6/ अकोला/2006, बाळकृष्ण रामदास महानकर + 14 विरुध्द मोनसॅन्टो इंडीया लि. मुंबई, निकाल दि. 24 जुलै 2006 ची सत्यप्रत सोबत जोडली आहे. या निर्णयानुसार विक्रेता हा जबाबार नाही. करिता योग्य निर्णय घेण्यात यावा.
3) विरुध्द पक्ष क्र. 3 यांचा लेखी युक्तीवाद :-
विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी लेखी युक्तीवाद दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली व नमुद केले की, तक्रारकर्त्याने सोयाबीन बियाण्याच्या 5 बॅग खरेदी केल्या परंतु तक्रारकर्त्याकडे एकूण तिन गट क्र. असलेली जमीन आहे, तक्रारकर्त्याने कोणत्या जमिनीमध्ये किती बियाणे पेरले, पैकी कोणत्या जमिनीमध्ये बियाणे उगविले व किती उगविले, याची स्पष्टता येत नाही. तसेच तालुका तक्रार निवारण समितीने सुध्दा मोघम व एकतर्फी अहवाल दिला आहे. पेरणीपासून तब्बल 70 ते 80 दिवसांनी बियाण्याची उगवणशक्ती कमी झाली असा अहवाला कोणत्या शास्त्रीय व बियाणे कायद्याच्या आधारावर दिला हे ही स्पष्टपणे नमूद नाही. उगवण शक्तीला पाण्याचा खाडा, ट्रॅक्टरव्दारे पेरणी, प्रतिकुल वातावरण इ. बाबी कारणीभूत असतात. तक्रारकर्त्याच्या तक्रारी शिवाय इतर दोन शेतक-यांच्या शेतावर ज्यांनी याच लॉटचे बियाणे पेरले आहे, अशा शेताची पाहणी करुन नंतरच आपला निर्णय देणे गरजेचे असतांना दि. 14/09/2015 रोजीचा दोषपूर्ण अहवाल तयार केला, तो शासकीय परिपत्रकानुसार नाही. बियाण्याचा नमुना हा प्रयोगशाळेमध्ये परिक्षणासाठी पाठविला नाही. त्यामुळे तो अहवाल रद्द करण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 01/06/2015 रोजी बियाणे खरेदी केले व दिनांक 19/06/2015 रोजी पेरणी केल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ की, तक्रारकर्त्याने सदरचे बियाणे हे 18 दिवस कोणत्या परिस्थितीत ठेवले, याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. तक्रार निवारण समितीने बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे कोणत्याही तरतुदीचे पालन केले नाही. त्यांनी फक्त दर्शनी पाहणी करुन अहवाल सादर केला. म्हणून हा अहवाल दोषपुर्ण आहे. विरुध्द पक्षाने पुढे मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे बियाणे विषयक न्यायनिवाडे व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदींचा ऊल्लेख केला. महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा अकोला यांनी सदर बियाणे लॉट नं. 2161 चे बियाणे ला मुक्तता अहवाल दिलेला आहे, त्यातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार दोष आहे. परंतु तक्रारकर्ता वगळता कुठलीही व कुणाचीही तक्रार आजपर्यंत या बियाण्याबाबत आलेली नाही. याचाच अर्थ असा की, बियाण्यामध्ये दोष नसून त्यांच्या पेरणीमध्ये दोष आहे, त्यांनी चुकीच्या पध्दतीने सोयाबीनची पेरणी केली.
वास्तविक पाहता, चौकशी समितीने अहवाल देतांना, बियाणे कायदा कलम 23-अ 1 चे कोणतेही पालन केलेले नाही, ते कलम खालीलप्रमाणे आहे.
“ Sec. 23-A – Action to be taken by the Seed Inspector if a complaint is lodged with him. (1) If farmer has lodged a complaint in writing that the failure of the crop is due to the defective quality of seeds of any notified kind or variety supplied to him, the Seed Inspector shall take in his possession of the marks or labels, the seed containers and a sample of unused seeds to the extent possible from the complainant for establishing the source of supply of seeds and shall investigate the causes of the failure of his crop by sending samples of the lot to the Seed Analyst for detailed analysis at the State Seed Testing Laboratory. He shall thereupon submit the report of his finding as soon as possible to the competent authority.”
वरील बियाणे हे प्रमाणित बियाणे असून बियाणेच्या उगवण शक्तीसाठी बिज प्रमाणिकरण संस्थाही जबाबदार असते. या प्रकरणामध्ये बिज प्रमाणिकरण संस्थेला कसलीही नोटीस दिली नाही किंवा पक्ष म्हणून सामील केले नाही. म्हणून आवश्यक पक्ष जोडले नाही म्हणून ही तक्रार सुध्दा चालू शकत नाही. करिता तक्रारकर्त्याची तक्रार ही कायदयाच्या चौकटीत नसून, पुर्णत: खोटी व बनावटी दाखल केली असल्यामुळे खर्चासह खारिज व्हावी.
4) का र णे व नि ष्क र्ष :::
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, विरुध्द पक्ष क्र. 3 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर, तक्रारकर्त्यामार्फत दाखल साक्षीदारांचे प्रतिज्ञालेख, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद तसेच विरुध्द पक्ष क्र. 3 तर्फे दाखल न्यायनिवाडे, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला.
उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते क्र. 1 यांनी त्यांच्या मालकीचे शेत सर्व्हे नं. 48, 190, 193 मध्ये पेरणीसाठी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडून, विरुध्द पक्ष क्र. 3 उत्पादीत सोयाबीन बियाणे जे-एस 335 लॉट नं. 2161 दिनांक 01/06/2015 रोजी मोबदला देवून, पावतीनुसार खरेदी केले होते. यावरुन, तक्रारकर्ता क्र. 1 हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारदार क्र. 2 ही तक्रारकर्ता क्र. 1 ची पत्नी आहे, असे कथन आहे व तिच्या नावे शेती आहे असे सात-बारा ऊतारा यावरुन दिसून येते, त्यामुळे तक्रारदार क्र. 2 ही ग्राहक/ लाभार्थी सेवेत मोडते असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, सदर बियाण्यांची पेरणी केल्यानंतर सोयाबीन चे झाडांना कोणतीही फळधारणा झाली नाही, त्यामुळे ऊत्पादन झाले नाही. विरुध्द पक्षाने भेसळयुक्त बोगस बियाणे विक्री केली, त्यामुळे तक्रारदारांना एकूण 2,65,000/- रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीस विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 जबाबदार आहेत. म्हणून शारीरिक, मानसीक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व प्रकरणाचा न्यायिक खर्च मा. मंचाने मंजूर करावा.
यावर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 हेच दुकानाचे मालक तथा ईगल सिड्स अॅंन्ड बायोटेक लिमी. चे किरकोळ विक्रेते आहे. तक्रारदाराने सदर बियाणे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 च्या दुकानातून सिलबंद टॅग व लेबलसहीत विकत घेतले. त्यावेळी तक्रारकर्त्याने कोणतीही तक्रार केली नाही तसेच सदर तक्रार मुदतबाहय बियाणे विकल्याची नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची सेवा न्युनता म्हणता येणार नाही, ऊलट विक्रेता- प्रतिनिधी म्हणून ते स्थळ पाहणीस हजर राहीले होते. फळधारणा झाली नाही या बाबीशी, विक्रेत्याचा संबंध येत नाही. शिवाय हे बियाणे त्यांनी मे. रामकृष्ण कोरपे अॅंन्ड सन्स अकोला येथून खरेदी केलेले आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी रेकॉर्डवर सदर बियाणेबाबत खरेदी बील, महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांचा मुक्तता अहवाल व मा. ग्राहक मंचाचा, बाळकृष्ण रामदास महानकर + 14 विरुध्द मोनसॅन्टो इंडीया लि. + ईतर मधील न्यायनिवाडा प्रत इ. दस्त दाखल केले आहे.
विरुध्द पक्ष क्र.3 चा युक्तीवाद असा आहे की, तक्रारदाराने एकूण 5 बॅग बियाणे खरेदी केल्या, परंतु त्याच्याकडे तीन गट क्रमांक असलेली जमीन आहे. त्यामुळे कोणत्या जमिनीमध्ये किती बियाणे पेरले, याचे स्पष्टीकरण नाही. तालुका तक्रार निवारण समितीने सुध्दा अहवाल एकतर्फी दिला आहे व तो शासन परिपत्रकानुसार नाही, तो त्रुटीपूर्ण आहे. कारण 70 ते 80 दिवसांनी बियाण्याची उगवणशक्ती कमी झाली असा अहवाल, कोणत्या शास्त्रीय व बियाणे कायद्याच्या आधारावर दिला हे स्पष्टपणे नमूद नाही. बियाणे उगवणशक्तीस ईतरही फॅक्टर जबाबदार असतात. समितीने तुलनात्मक पाहणी केली नाही. सदरचे बियाणे तक्रारदाराने 18 दिवस ठेवले होते, ते कशा परीस्थितीत ठेवले याचाही विचार होणे आवश्यक आहे. कृषी अधिका-याने हे बियाणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे योग्य होते. जमिनीची सुपीकता, पाणी, हवामान, मशागत इ. बाबींची तपासणी होणे आवश्यक असते. बियाणे कायदा कलम 23-अ चे पालन झाले नाही. म्हणून तक्रार खारिज करावी.
विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी खालीलप्रमाणे न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
- 2011 STPL ( CL ) 1031 NC
- 2009 STPL ( CL ) 1073 NC
- 2010 STPL ( CL ) 602 NC
- 2013 STPL ( CL ) 2601 NC
- 2014 STPL 5836 NC
अशाप्रकारे, उभय पक्षांचा युक्तीवाद एैकल्यानंतर, मंचाचे असे मत आहे की, रेकॉर्डवर सदर बियाण्यांचा महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांचा मुक्तता अहवाल हा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 / बियाणे विक्रेते यांनी दाखल केला. परंतु त्यात नमूद Source of Seed / Source of Lot No. हा वेगळया लॉटचा नमूद आहे, असे दिसते. वादातील लॉट नंबर वेगळा आहे, त्यामुळे तो दस्त मंचाने विचारात घेतला नाही. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त जसे की, तक्रारदाराची बिज निरीक्षक कडे केलेली तक्रार, व तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा यावरुन असे दिसते की, तक्रारदाराची ही तक्रार सोयाबीन पिकाच्या वाणात भेसळ या स्वरुपाची आहे, बियाणे उगवण बद्दल नाही, यात विक्रेत्याची साक्ष सहीनिशी नमूद आहे व समितीचे निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.
‘‘ पाहणी केलेल्या शेत सर्व्हे नं. 48 मध्ये 42 % व शेत सर्व्हे नं. 190, 193 मध्ये 44 % सोयाबीनचीच ओळखु न येणा-या वानाची झाडे ऊशिरा फुले व शेंगा येणारी, कमी शेंगाची व उंच होती. जे.एस. 335 वानाची झाडे बुटकी असल्याने ती बरेच अंशी दबल्या गेली होती. व जे.एस. 335 च्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत होत्या व भेसळीच्या झाडांना फुले व शेंगा लागणे सुरु होते.
जमिन व्यवस्थापनाच्या आधारावर शेतक-याला हेक्टरी 20 क्वींटल सोयाबीनचे उत्पादन अपेक्षीत होते. परंतु शेतक-याचे जवळपास 30 टक्के, म्हणजेच 1.85 हेक्टर क्षेत्रावर 11.10 क्वींटल नुकसान झाले आहे, म्हणजेच रुपयात 33,300/- तेहतीस हजार तिनशे रुपयाचे नुकसान झाले आहे. ’’
विरुध्द पक्ष क्र. 3 चा बचाव हा बियाणे न उगविण्याच्या तक्रारीचा आहे. तसेच दाखल न्यायनिवाडयांमधील तथ्ये सुध्दा हातातील प्रकरणात लागू पडत नाही, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 चा बचाव तांत्रीक कारणाचा आहे असे मानुन, तो मंचाने ग्राहय धरला नाही. उलट तक्रारकर्त्याची तक्रार 100 टक्के पिक नुकसानीची असतांना समितीने स्वयंस्पष्ट निष्कर्ष काढून तक्रारदाराचे 30 टक्के नुकसान झाले, असे नमूद केले आहे. म्हणून सदर प्रकरणातील तालुका तक्रार निवारण समितीच्या पंचनामा अहवालात मंचाला कोणतीही संदिग्धता आढळत नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांची सेवा न्युनता सिध्द होत नाही व ते मुळ विक्रेते नव्हते म्हणून त्यांच्या विरुध्द तक्रार खारिज केली. तक्रारदाराची तक्रार विरुध्द पक्ष क्र. 3 विरुध्द अंशतः मंजूर करुन पुढीलप्रमाणे अंतीम आदेश पारित केला.
:: अंतीम आदेश ::
1) तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र. 3 / जनरल मॅनेजर, ईगल सिड्स अॅंन्ड बायोटेक लिमी. यांनी तक्रारदारांना सर्व प्रकारची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 50,000/- ( अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त ) द्यावी व प्रकरणाचा न्यायिक खर्च रुपये 3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) द्यावा.
3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 वर प्रकरणात कोणतीही जबाबदारी येत नाही.
4) विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
5) उभय पक्षास आदेशाच्या प्रती विनामुल्य दयाव्यात.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
svgiri