निकालपत्र :- (दि.28.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 4, 7 ते 12 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र.3, 6 व 15 यांनी स्वतंत्रपणे म्हणणे दाखल केले आहे. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदार पतसंस्थेने सामनेवाला पतसंस्थेकडे कॉल डिपॉझिट रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | दि.31.10.09 रोजी होणा-या व्याजासह देय रककम | 1. | 001423 | 10000/- | 08.12.2004 | 16425/- | 2. | 001429 | 100000/- | 09.12.2004 | 164247/- | 3. | 001444 | 50000/- | 03.01.2005 | 82123/- | 4. | 01445 | 60000/- | 04.01.2005 | 98548/- | 5. | 01446 | 50000/- | 08.01.2005 | 82123/- | 6. | 01447 | 50000/- | 08.01.2005 | 82123/- | 7. | 1448 | 50000/- | 08.01.2005 | 82123/- | 8. | 001449 | 50000/- | 08.01.2009 | 82123/- | 9. | 001457 | 50000/- | 15.02.2005 | 82123/- | 10. | 001458 | 50000/- | 15.02.2005 | 82123/- | 11. | 001461 | 60000/- | 21.02.2005 | 98548/- |
(3) सदर रक्कमा तक्रारदारांचे ठेवीदारांचा व सभासदांचा विश्वास तक्रारदार संस्थेच्या स्थैर्यावर रहावा म्हणून व खेळत्या भांडवलाच्या गुंतवणीची तरतूद म्हणून आणि तक्रारदारांची ठेवीदारांना ज्या-त्यावेळी ठेवी व्याजासह परत करणेस मदत व्हावी म्हणून भविष्यकालीन तरतुदीसाठी गुंतवणुक म्हणणे सामनेवाला क्र.1 संस्थेमध्ये ठेवल्या होत्या व आहेत. तक्रारदार संस्थेस खेळत्या भांडवलाचा तुटवडा होवू लागल्याने आणि सभासदांच्या ठेवी व्याजसह परत करणे अडचणीचे होवू लागल्याने वेळोवेळी तक्रारदारांनी वरील ठेव रक्कमा व्याजासह परत मागितल्या असता सामनेवाला यांनी आज देतो, उद्या देतो असे वायदे सांगून सदर ठेवी व्याजसह परत देणेस टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी दि.02.011.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. सदर नोटीसीस सामनेवाला क्र.3 व 15 यांनी खोटे उत्तर देवून ठेवी परत केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदार पतसंस्थेने व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सन 2009-10 चा दोष दुरुस्ती अहवाल, वार्षिक सभा क्र.11 ठरावक्र.2 चा उतारा, व्यवस्थापन समिती सभा क्र.12 ठराव क्र.11 चा उतारा, सहाय्यक निबंधक यांना दिलेला अर्ज व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.2, 4, 7 ते 12 यांनी त्यांच्या एकत्रित म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार यांच्या ठेवी हया सन 2004 व 2005 चे दरम्यान ठेवलेल्या आहेत, ज्यावेळी रक्कमा ठेव म्हणून ठेवल्या त्यावेळी प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला क्र.1 चे संचालक होते. दि.31.05.2005 रोजी सदर संचालक मंडळ बरखास्त होवून सामनेवाला क्र.1 कडे प्रशासक म्हणून सामनेवाला क्र.15, ए.एस्.कुंभार हे नियुक्त झाले आहेत. सहकार कायद्यानुसार संचालक मंडळ सत्तेवर आहे तोपर्यन्त ते संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवत असते. प्रस्तुत सामनेवाला हे संचालक असताना तक्रारदारांना दर तीन महिन्याला व्याज दिले आहे. जर प्रस्तुत सामनेवाला यांचेकडे संस्था असती तर तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह परत केल्या असत्या. परंतु, दि.31.05.2005 रोजी प्रस्तुत सामनेवाला यांना कर्तव्यातून मुक्त केलेने सदर रक्कमा देणेची जबाबदारी त्यांचेवर येत नाही. यातील तक्रारदार यांनी स्वत:चे फायद्याकरिता रक्कमा दुसरीकडून घेवून सामनेवाला संस्थेकडे ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संज्ञेत बसत नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.15 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये त्यांची दि.12.04.2009 रोजी सामनेवाला संस्थेवर प्रशासक म्हणून नेमणुक झालेली आहे. सामनेवाला संस्थेकडील थकबाकी पाहता वसुली होणे फार कठीण आहे. 101 प्रकरणे करुन वसुली अधिकारी नेमणुक करुन वसुली करुन सदर संस्थेची ठेव रक्कम हप्त्याहप्त्याने देणेची व्यवस्था करीत आहे. तक्रारदार संस्थेने ठेवलेली ठेव ही सामनेवाला क्र.1 ते 14 यांचे कार्यकाळात ठेवली असल्याने सदर ठेव रक्कमेस तत्कालिन संचालक मंडळ जबाबदार आहे. प्रस्तुत सामनेवाला हे शासकिय कर्मचारी असून संस्था सुरळित चालण्यासाठी संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे सदर दाव्यातून नांव वगळणेत यावे अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.3 व 6 यांनी सारखेच म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रार अर्जात नमूद संचालक मंडळ हे दि.31.05.2005 रोजी बरखास्त झाले आहे. त्यामुळे सामनेवाला यांचा सदर संस्थेतील कार्यभाग अथवा हस्तक्षेप संपलेला आहे व तक्रारदारांचे देणे लागत नाहीत. तक्रारदारांचे नोटीसीस सामनेवाला क्र.3 यांनी उत्तर देवून त्यांची कोणत्याही प्रकारे जबाबदारी नसल्याचे कळविले आहे. तरीसुध्दा तक्रारदारांनी पैसे उकळण्याच्या व त्रास देणेच्या उद्देशाने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला संस्थेवर प्रशासकांची नेमणुक झाली असल्याने तक्रारदारांच्या रक्कमा भागविण्याची जबाबदारी प्रशासक यांची आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. (8) उपरोक्त तक्रारीतील ठेवीं या कॉल डिपॉझिटच्या आहेत व सदरच्या ठेव रक्कमा व्याजासह देणेचे आदेश व्हावेत अशी तक्रारदार संस्थेने विनंती केली आहे. सामनेवाला पतसंस्थेने तक्रारदार पतसंस्थेचा उद्देश हा फायदा कमाविणे आहे याबाबतचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तक्रारदार पतसंस्था ही महाराष्ट्र राज्य सहाकारी कायदा, 1961 यातील तरतुदीस अनुसरुन असलेली सहकार तत्त्वावरील पतसंस्था आहे. त्यामुळे सहकार तत्त्वाचा विचार करता सहकारी संस्थेचा उद्देश हा फायदा कमावणे हा नसतो. तसेच, तक्रारदार पतसंस्था ही विधिमान्य व्यक्ती (Juristic Person) आहे व तकारदार पतसंस्थेने सामनेवाला पतसंस्थेकडे ठेव ठेवली आहे. इत्यादी मुद्दयांचा विचार करता तक्रारदार पतसंस्था ही सामनेवाला पतसंस्थेची ग्राहक होते व प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होतो. सबब, सदरचा वाद या मंचासमोर चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. सामनेवाला संस्थेवर प्रशासक असल्याने प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरणेची गरज नाही असे सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात कथन केले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या ठेव रक्कमा या सामनेवाला संचालक हे संचालक पदावर कार्यरत असताना ठेवलेल्या असल्याने सामनेवाला संस्थेवर प्रशासक असल्याने प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरणेची गरज नाही अशा प्रकारची कथने करुन त्यांची वैयक्तिक जबाबदारी टाळू शकत नाही. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 12 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.13 व 14 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने व सामनेवाला क्र.15 हे शासकिय अधिकारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावत्यांच्या स्वरुपात रक्कम ठेवली आहे. म्हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्यांची रक्कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्कम व्याजासह देणे आवश्यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी सदर कॉल डिपॉझिट पावत्यांची रक्कम ही त्यांनी प्रथमत: सामनेवाला यांचेकडे दि. 02.11.2009 रोजीच्या वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसीने मागणी केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार पतसंस्था ही सदर कॉल ठेव रक्कमा ठेव तारखेपासून 02.11.2009 रोजीपर्यन्त ठेव पावत्यांवर नमूद म्हणजेच द.सा.द.शे.14 टक्के व्याजासह व त्यानंतर द.सा.द.शे.6 टक्के व्याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदार पतसंस्थेने ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार संस्था ही मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदार पतसंस्थेची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.13 ते 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील कॉल डिपॉझिटच्या रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव तारखेपासून दि. 02.11.2009 रोजीपर्यन्त द.सा.द.शे.14 टक्के व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 001423 | 10000/- | 2. | 001429 | 100000/- | 3. | 001444 | 50000/- | 4. | 01445 | 60000/- | 5. | 01446 | 50000/- | 6. | 01447 | 50000/- | 7. | 1448 | 50000/- | 8. | 001449 | 50000/- | 9. | 001457 | 50000/- | 10. | 001458 | 50000/- | 11. | 001461 | 60000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.13 ते 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदार पतसंस्थेला मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |