जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.26/2008. प्रकरण दाखल दिनांक – 03/01/2008. प्रकरण निकाल दिनांक – 04/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.किशनराव पि.लक्ष्मणराव जाधव, अर्जदार. वय वर्षे 65,धंदा शेती, रा.सातेगांव पो.सांगवी ता.नायगांव (खै) जि.नांदेड. विरुध्द. 1. श्री.गजानन कृषी सेवा केंद्र, गैरअर्जदार. शेती उपयोगी बी-बीयाणे औषधी व रासायनिक खतांचे विक्रेते,शिवाजी चौक, नायगांव (बा) ता.नायगांव जि.नांदेड. 2. अंकुर सिडस प्रा.लि, 27,नवीन कॉटन मार्केट ले-आऊट, नागपुर. अर्जदारा तर्फे. - अड. व्ही.व्ही.नांदेडकर. गैरअर्जदार क्र.1 ते 2 - अड. एस.एच.बारबतकर. निकालपत्र (द्वारा मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार किशनराव लक्ष्मणराव जाधव यांची थोडक्यात तक्रार अशी की, त्यांचे सातेगांव येथे शेती जमीन आहे तेथे पिक आहे. त्यांना एकरी दहा क्विंटल कापुस होत. दि.20/06/2007 रोजी खरीप हंगामात पेरणीसाठी विक्रेते गजानन कृषीसेवा केंद्र यांच्याकडुन पाच बॅग कापसाचे बियाणे जे निर्माते गैरअर्जदार क्र. 2 यांनी तयार केलेले आहे. लॉट नं.25185 हे रु.1,750/- ला विकत घेतले व पुढे त्या पिकाची पेरणी केली. सदरच्या शेतात त्यांनी दोन बॅग बियाणे लावले या दोन बॅग पेरलेल्या बियाणा पासुन त्यांच्या शेतातील पिकाला बोंडे लागली नाही. त्यांनी वाट पाहीली, विक्रेत्यांना जाऊन सांगितले, त्यांनी वाट पहा असे सांगितले, शेवटपर्यंत बोंडे लागली नाही त्याबाबत त्यांनी दि.03/12/2007 रोजी कृषी अधिकारी, यांचेकडे तक्रार दिली. कृषी अधिकारी यांनी दि.09/12/2007 रोजी अर्जदाराच्या शेतास भेट देऊन पंचनामा तयार केला. दोन बॅग बियाणे न निघाल्यामुळे एकरी दहा क्विंटल त्यांचे विस क्विंटल कापसाचे नुकसान झाले ते रु.46,000/- चे आहे. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल केली आणि तीद्वारे रु.46,000/- उत्पन्न, शेताचा खर्च आणि मानसिक त्रासाबद्यल रु.20,000/- असे मिळुन एकुण रु.72,000/- नुकसानीची मागणी केली आणि दावा खर्चही मागीतला. यात गैरअर्जदारांना नोटीस देण्यात आली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी नोटीस घेण्यात इन्कार केला म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरणांत एकतर्फा आदेश पारीत करुन चालविण्यात आले. यात गैरअर्जदार क्र.2 यांनी आपला जबाब दाखल केला आणि विपरीत विधाने त्यांनी नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, गैरअर्जदाराच्या बियांणामुळे अर्जदाराचे नुकसान झाले नाही. सदरची तक्रार ही मंचा समक्ष् चालु शकत नाही ते खारीज होण्यास पात्र आहे. पंचनामा अयोग्य आहे त्यावर खोडातोड आहे, बियाणे खराब असल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाही पंचनामा एकतर्फी आहे त्यांना कोणतीही सुचना देण्यात आली नाही आणि म्हणुन तो विचारात घेण्या जोगा नाही. यास्तव तक्रार खारीज करावी. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्ज सोबत बियाणे विकत घेतल्याची पावती,शेताचा 7/12,टुथफुल लेबल,कृषी अधिकारी यांना दिलेला अर्ज, कृषी अधिकारी यांनी केलेला पंचनामा आणि शपथपत्र दाखल केलेल आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत कोणतेही दस्तऐजव दाखल केलेले नाही त्यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदारा तर्फे वकील व्ही.व्ही.नांदेडकर आणि गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील एस.एच.बारबतकर यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 1 ने हजर होऊन आपला कोणताही जबाब दाखल केला नाही व बचाव केला नाही. गैरअर्जदार क्र.2 ने जे जबाब दाखल केला आहे त्याबाबत अर्जदार जाधव यांचे तर्फे वकीलांनी असा आक्षेप घेतला की, सदरच्या जबाबावर कापसे यांनी सही केलेली आहे. मात्र ते कोणत्या क्षमतेत सही केली याचा कोणताही उल्लेख जबाबात नाही , त्यांचा कोणतेही अधिकारपत्र गैरअर्जदार क्र.2 ने दाखल केले नाही. या प्रकरणांत जे वकीलपत्र दाखल केले आहे ते सुध्दा कापसे यांचे नाही, कापसे हे या प्रकरणांत प्रतिपक्ष नाही, यासंबंधात गैरअर्जदार क्र.2 चे वकीलांनी युक्तीवादाचे वेळेस एक अधिकारपत्र दाखल केले आहे. सदर अधिकारपत्र हे कोणत्या तारखेचे आहे याबाबत त्या अधिकारपत्रात कुठेही उल्लेख नाही ते जबाब दाखल केल्यानंतर दाखल करण्यात आलेले असल्यामुळे अर्जदाराने, विचारात घेऊ नये असा युक्तीवाद केला. अर्जदाराचे या आक्षेपात तथ्य दिसुन येते आणि त्यामुळे गैरअज्रदार क्र. 2 यांनी या प्रकणांत जो जबाब दाखल केलेला आहे तो विचारात घेण्या योग्य नाही असे आमचे मत आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे गैरअर्जदार हे दर्शवु शकले नाही की, अर्जदाराने त्यांचे विरुध्द का खोटी तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने पाच बॅग कापसाचे बियाणे घेतले मात्र त्यांनी केवळ दोन बॅग कापसाचे बियाणाची पेरणी त्यांचे शेतात केली हे आढळुन येत नाही. यासंबंधात अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज जे त्यांनी बियाणे विकत घेत्याची पावती दाखल केली. बियाणबाबतचे लेबल दाखल केलेले आहे. स्वतः दि.03/12/2007 रोजी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची प्रत दाखल केलेली आहे त्यांनी त्यामध्ये त्यांच्या कापसाला बोंडे लागलेली नाही असे नमुद केलेले आह. याबाबत कृषी अधिका-यांनी जो पंचनामा तयार केला त्यामध्ये नमुद केले आहे की, लॉट नंबर 25185 चे बियाणे जे कापसाचे बियाणे (जे अर्जदाराने विकत घेतल्याची पावतीवरुन दिसुन येते) ती दि.30/06/2008 रोजी पेरणी केल्याचे दिसुन येते, उगवण बरोबर झाले, फळ धारणा कमी झाल्याची तक्रार केली आहे. पेरणीनंतर त्यांना कापसास फळ धारणा कमी झालेले दिसुन आले. बोंडांची संख्या 7.8 प्रती चौ.मी. आढळुन आले आणि त्यामुळे शेतक-याचे आर्थिक नुकसान झालेले आहे असे नमुद केलेले आहे, त्यावर पंचाच्या सहया आहेत ही बाब लक्षात घेता सदर अर्जदार यांचे तक्रारीत तथ्य दिसुन येते. गैरअर्जदार यांनी असा आक्षेप घेतलेला आहे की, सदर प्रकरणांत कृषी अधिका-यांची साक्ष घेण्यात आलेली नाही यासंबंधात त्यांनी हिमालच प्रदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी दिलेला निकाल II (1997) सी.पी.जे.250, या ठिकाणी प्रकाशीत झालेला यावर भिस्त ठेवली व असा युक्तीवाद केला की, संबंधीत व्यक्तिचे साक्ष घेण्यात आलेले नाही आणि म्हणुन त्यांचा पुरावा विचारात घेऊ नये. सदर प्रकरणांत डॉक्टरांची साक्ष घेण्यात अलेले नव्हते. आमच्या समोरील प्रकरण बियाणा संबंधीचे आहे, यासंबंधात शासनाने नियुक्त केलेल्या कृषी अधिका-यांनी तपासणी करुन जो अहवाल दिलेला आहे तो आमच्या मते ग्राहय आहे. गैरअर्जदारांनी आपली भिस्त राष्ट्रीय आयोगाने दिलेले निकाल II (2007) सी.पी.जे. 148 (एन.सी), या ठिकाणी प्रकाशीत झालेल्या निकालावर ठेवली. यात असे नमुद केले आहे की, अहवालामध्ये बियाणांच्या गुणवत्तेसंबंधी काही लिहीलेले नाही आणि म्हणुन तो विचारात घेण्या जोगा नाही. हे खरे आहे की, आमच्या समोरी प्रकरणांत जो अहवाल आहे त्या बियाणांच्या गुणवत्तेसंबंधी कृषी अधिकारी काही लिहीलेले नाही मात्र त्याच वेळी हे सत्य आहे की, सदर ठिकाणी कापसाचे फळ धारणा अतीशय कमी झाल्याचे नमुद केलेले आहे. यात कृषी अधिका-यांनी जो पंचनामा केलेला आहे तो अत्यंत दयनिय आहे, असे दिसते की, हे पंचनामा चक्रमुद्रीत केलेल्या नमुन्यातील रिकाम्या जागा भरुन केलेला आहे, हाच पंचनामा ज्वारी, कापुस या सर्वांना लागु पडतो, असे दिसुन येते. तो केवळ ज्वारीची उगवण वा बियाणांची उगवण यासंबंधी केल्याचे दिसुन येते, मुळात हा नमुना ज्वारी सी.एच.9 यासाठीचा आहे. कृषी अधिका-यांचा असे दिसते की, संबंधीत शेतक-यांच्या शेतीचे योग्य तो पंचनामा करण्यास कोणासही सवड नाही वा जणु काही त्यांचे कर्तव्य नाही. या पंचनामात बियाण्या सबंधीचा कोणताही मजुकर वा रिकामी जागा ठेवलेली नाही आणि त्यामुळे संबंधी कृषी अधी-यांनी माहीती लिहीलेली नाही हे सगळे दुर्दैवी प्रकार आणि त्यावर कृषी अधिकारी, जिल्हा परीषद,नांदेड यांनी आपल्या स्वाक्षरीने तो पंचनामा ग्राह ठरविलेला आहे. विवीध कंपन्या आपले स्वंसंशोधीत व तथाकथीत उच्च दर्जाचे बियाणे मार्केटमध्ये सत्यदर्शक लेबल लावुन विकतात आणि त्यासंबधात अनेक तक्रारीही होतात. मात्र त्याबाबत कृषी अधिकारी हे याप्रकरणी दर्शविल्याप्रमाणे कीती निष्काळजीपणा करतात हे उघड आहे. परंतु अशा कृषी अधिका-याच्या चुकीमुळे शेतक-यांचे नुकसान होता कामा नये असे आम्हास वाटते. आमच्या समोरील प्रकरणांत अर्जदारास त्यास काहीच कारण नसतांना तक्रार केली व ती बराव्या महिन्यात प्रथम कृषी अधिका-याकडे तक्रार केली ही बाब लक्षात घेता तसेच त्यांनी पाच बॅग पैकी फक्त दोन बँग कापसाचे बियाणा बाबत तक्रार केली ही बाब लक्षात घेता त्यास सदरील बियाणां पासुन कमी उत्पन्न आलेले आहे हे उघड आहे आणि त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे आम्हास वाटते. सदर निकालाच एक प्रत कृषी आयुक्त पुर्ण यांना पाठवावी त्यासोबत या प्रकरणांतील पंचनाम्याची एक प्रतही पाठवावी त्यांना अशा सुचना करण्यात येतात की, या प्रकरणांची दखल घेऊन संबंधीतास मार्गदर्शक सुचना द्यावेत. तसेच यापुर्वी शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे योग्य अंमलबजावणी करण्यास सांगावे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता अर्जदारास कमी उत्पन्न झालेले आहे मात्र अर्जदाराने आपली मागणी अतीशय अवास्तव अशी केलेली आहे असे दिसुन येते. अर्जदारास अंशीक उत्पन्न झालेले आहे हे पंचनाम्यावरुन स्पष्ट होते आणि अर्जदार हे प्रती वर्षी एकरी दहा क्विंटल कापसाचे उत्पन्न घेत होता हे दर्शवीणारा पुरावा दाखल केला नाही त्यामुळे अर्जदार यांचे जास्तीत जास्त प्रति एकरी तीन क्विंटल एवढे कापसाचे उत्पन्नाचे नुकसान झाले असावे असा निष्कर्ष आम्ही काढीत आहोत आणि प्रती क्विंटल रु.2,000/- याप्रमाणे एकुण सहा क्विंटल कापसाचे नुकसान भरपाई दाखल त्यांना एकुण रु.12,000/- देण्यात यावे असे आम्हास वाटते. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर. 2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास कापसाचे उत्पन्नाचे नुकसानी बद्यल रु.12,000/- त्यावर तक्रार दाखल तारीख दि.03/01/2008 पासुन प्रत्यक्ष रक्कम अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याजासह मिळुन येणारी रक्कम द्यावे. 3. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास बियाणांची किंमत रु.700/- परत करावे. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- एकत्रितरित्या व संयुक्तीकरित्या द्यावे. 5. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 6. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह राणे) (श्रीमती.सुजाता पाटनकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |