तक्रारदार स्वतः सामनेवाले क्र. 1 साठी वकील श्री.ए.डी.कर्णिक. सामनेवाले क्र.2 यांना वगळले आहे. सामनेवाले क्र. 3 व 4 साठी वकील श्रीमती.भावना तांडेल. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. 1. तक्रारदार क्र.2 यांची तक्रार थोडक्यात अशी की, सामनेवाले क्र.1 यांचे मालाड येथे न्यू लाईफ अटो गॅरेज आहे. त्याचा गाडया दुरुस्त करण्याचा व्यवसाय आहे. तारीख 16/12/1999 रोजी तक्रारदार क्र.2 यांनी त्यांची 118 NE फीयाट कार दुरुस्त करण्यासाठी सामनेवाले क्र.1 यांचेशी विचार विनिमय केला. त्यांनी त्या गाडीची पहाणी करुन दुरुस्तीचा खर्च अंदाजे रुपये 14,500/- येईल असे सांगीतले व तसे दुरुस्तीच्या खर्चाबाबत एस्टीमेट दिले. तक्रारदार क्र.2 यांनी ते मान्य केले व त्याच दिवशी गाडी गॅरेज पर्यत चालवत घेऊन जावून सामनेवाले क्र.1 यांच्या ताब्यात दिली.जस जसे दुरुस्तीचे काम होईल तसतसे दुरुस्तीच्या खर्चाचे पैसे हप्त्या हप्त्याने द्यावयाचे ठरले. दिनांक 24/12/99 पर्यत गाडी दुरुस्त करुन द्यावयाची होती. तक्रारदार क्र.2 यांनी तारीख 03/01/2000 पर्यत हप्त्या हप्त्याने रक्कम रुपये 15,000/- सामनेवाले क्र.1 यांनी दिली. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 ला गाडी देण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदार क्र.2 यांनी समतानगर पोलीस स्टेशनला तोंडी व लेखी तक्रारी केल्या, परंतु सामनेवाले क्र. 3 व 4 यानी तक्रार नोंदवून घेतली नाही व काहीही कारवाई केली नाही म्हणून त्यांनी गृह मंत्र्यांकडे तक्रार केली. त्यांनी ती तक्रार पोलीस उपायुक्तयांच्याकडे पाठविली.त्यानंतर पोलीसांनी मध्यस्थी केल्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी गाडी बांधून ओढून पोलीस स्टेशनला आणली. ती चालु स्थितीत नव्हती. तीची स्थिती अतिशय वाईट होती म्हणून त्यांनी ( म्हणजे तक्रारदार क्र.2 यांनी ) तीचा ताबा घेण्यास नकार दिला. त्यांनी सामनेवाले क्र.1 यांना ती गाडी दुरुस्त करुन चालु स्थितीत करुन द्यावी असे सांगीतले. फौजदारी कारवाईच्या भितीने सामनेवाले क्र.1 यांनी तारीख 22/06/2003 रोजी तक्रारदार क्र.2 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली व तक्रारदार क्र. 2 यांनी त्यांच्याकडून देय असलेली रक्कम रुपये 16,500/- पैकी फक्त 12,000/-रुपये दिले आहे असे कळविले व रुपये 39,760/- म्हणजे देय रकमे पैकी राहीलेली रक्कम व पार्किग चार्जेस ची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार क्र.2 यांनी 15/04/2003 व 17/11/2003 रोजी पोलीसांना पत्र लिहून सामनेवाले क्र.1 यांच्या विरुध्द ताबडतोड कारवाई करण्यास सांगीतले. परंतु पोलीसांनी काहीही कारवाई केलेली नाही व तक्रारदार क्र.2 ने दाद मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे जावे अशा आशयाचे पत्र पाठविले. तक्रारदारांचा आरोप की, स्वतःच्या वापरासाठी बेकायदेशीरपणे 5 वर्षे गाडी स्वतःकडे ठेवून तक्रारदार क्र.2 कडे पार्किग चार्जेसची मागणी करणे, तसेच दुरुस्तीच्या खर्चाची सर्व रक्कम देऊनही रु.4500/- त्यांच्याकडे बाकी दाखविणे ही सामनेवाले क्र. 1 यांची तक्रारदार क्र.2 यांचेकडून पैसे उकळण्याची क्लुप्ती आहे. 2. तक्रारदार क्र.2 यांचे म्हणणे की, सामनेवाले क्र.3 व 4 हे त्यावेळी समतानगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नाही व सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्द काहीही कारवाई केलेली नाही. त्यांनी सामनेवाले क्र.1 व सामनेवाले क्र. 2 (वगळलेले) यांचेविरुध्द कारवाई केली असती तर सामनेवाले क्र.1 हे त्यांची गाडी ताब्यात ठेवण्यास यशस्वी झाले नसते. सामनेवाले क्र. 3 व 4 यांचे कृत्य हे सामनेवाले क्र.1 च्या कृत्याशी संबंधित आहे म्हणून ते व्यक्तिशः जबाबदार आहेत. 3. तक्रारदार क्र. 2 यांनी तारीख 23/11/2005 रोजी तक्रार दुरुस्तीचा अर्ज दिला. गाडी बरीच वर्षे सामनेवाले क्र.1 च्या ताब्यात असताना ती खुप खराब झाली आहे, ती रस्त्यावर चालविण्याच्या स्थितीत नाही म्हणून गाडी परत मागण्याऐवजी त्यांनी गाडी सामनेवाले क्र.1 च्या ताब्यात दुरुस्तीसाठी दिली त्यावेळी त्याची किंमत रुपये 1,00,000/- होती असे सांगून ती किंमत व त्यावर द.सा.द.शे.10 दराने व्याज मिळावे अशी तक्रारीच्या विनंती कलमामध्ये दुरुस्ती मागीतली. तसेच सामनेवाले क्र.1 ला दुरुस्तीसाठी दिलेली रक्कम रु.15000/- त्यांनी परत करावी व त्यावर द.सा.द.शे.10 दराने व्याज द्यावे अशी मागणी करणारी दुरुस्ती मागीतली. पूर्वीची रु.40,000/-नुकसान भरपाईची मागणी व खर्चापोटी रु.25,000/- नुकसान भरपाईची मागणी व त्यावर द.सा.द.शे. 18 दराने व्याजाची मागणी त्यांनी कायम ठेवली. तक्रारदाराचा सदरहू अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु त्याप्रमाणे तक्रारदाराने तक्रारीत दुरुस्ती केलेली नाही. युक्तीवादाच्या वेळेस सदर बाब मंचाच्या लक्षात आल्यानंतर तक्रारदार क्र2 ला सदरहू दुरुस्ती करण्यास सांगीतले असता तक्रारदार क्र.2 यांनी म्हटले की, "Forum is going more techinicality " व त्यांनी ती दुरुस्ती केली नाही. मात्र दुरुस्ती अर्ज मंजुर झालेला असल्याने सदरच्या या तक्रारीत तक्रारदार क्र.2 च्या खालील मागण्या आहेत असे दिसून येते. a) सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्याच्या गाडीची किंमत रु.1,00,000/- द्यावी व त्यावर द.सा.द.शे.10 दराने डिसेंबर, 1999 पासुन सदर रक्कम देईपर्यत व्याज द्यावे. b) तक्रारदार क्र.2 यांनी सामनेवाले क्र. 1 व सामनेवाले क्र.2 (वगळलेले) यांना गाडीच्या दुरुस्तीसाठी दिलेली रक्कम रु.15,000/-व त्यावर द.सा.द.शे.10 दराने ता. 3 जानेवारी, 2000 पासुन सदर रक्कम देईपर्यत व्याज द्यावे. c) सामनेवाले यांनी तक्रारदार क्र.2 ला मानसीक त्रास झाल्याबद्दल रुपये 4,00,000/- नुकसान भरपाई द्यावी. d) सामनेवाले यांनी तक्रारदार क्र.2 ला त्याला 5 वर्षाचे काळात त्याची गाडी नसल्यामुळे टॅक्सी भाडयाने करावी लागली, त्यासाठी झालेला खर्च रुपये 25,000/- व त्यावर द.सा.द.शे.18 दराने व्याज द्यावे. e) मंचास योग्य वाटतील ते इतर आदेश द्यावेत. 4. सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे म्हणणे देऊन तक्रारदारांचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, सदर तक्रार ही खोटी व बनावट केलेली आहे. त्यांच्याविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार केलेली होती. त्यावेळी सामनेवाले क्र. 3 व 4 हे पोलीस अधिकारी होते. त्यांनी तक्रारदार क्र.2 ला वाद समजुतीने मिटविण्याचा सल्ला दिला होता. मात्र तक्रारदार क्र.2 ला त्याचा बदला घ्यावयाचा असल्याने पोलीसांनी दिलेला सल्ला त्यांनी मानला नाही. सामनेवाले क्र.1 चे म्हणणे की, त्यांनी गाडी दुरुस्त झाल्याबरोबर तक्रारदार क्र.2 ला पुष्कळवेळा संपर्क करुन त्यांना दुरुस्तीच्या खर्चाची राहीलेली रक्कम देऊन गाडी घेऊन जाण्यास सांगीतले होते. जर त्यांनी गाडी नेली नाहीतर पार्किंग चार्जेस द्यावे लागतील असेही त्यांनी कळविले होते. तक्रारदार क्र.2 यांनी त्यावेळी गाडी घेऊन जावयास पाहिजे होती परंतु तसे न करता तक्रारदार क्र.2 सामनेवाले क्र.1 वर बेफाम व काल्पनिक आरोप करत आहेत. त्यांनी तक्रारदार क्र.2 ला तारीख 22/06/2003 रोजीची वकीलामार्फत नोटीस पाठविली होती. त्यात त्यांनी तक्रारदार क्र.2 ला कळविले होते की, सांगीतल्याप्रमाणे कार दुरुस्त केलेली आहे. तरी राहीलेली रक्कम रु.39,760/- ( म्हणजे रु.4,600/- दुरुस्ती खर्चाची राहीलेली रक्कम + 35,160/- पार्किंग चार्जेस) देऊन गाडी घेऊन जावी.. परंतु तक्रारदार क्र.2 हे गाडी घेऊन गेले नाही व स्वतःच्या चुकीचा फायदा घेत आहेत. तक्रारदार क्र.2 पोलीस स्टेशनला जाऊन सामनेवाले क्र.1 यांना अटक होण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र पोलीसांना सामनेवाले क्र.1 यांची चूक दिसली नाही म्हणून ते त्यांच्या दबावाखाली आले नाही व त्यांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई केली नाही. तरी तक्रारदार क्र.2 यांनी त्यांच्याकडे बाकी राहीलेली रक्कम देऊन गाडी घऊन जावी अन्यथा ते तक्रारदारांना नोटीस न देता गाडी विकून टाकतील. 5. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांना या तक्रारीतुन वगळले असल्यामुळे त्यांनी दिलेले म्हणणे येथे नमुद करावयाची गरज नाही. 6. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी त्यांचे म्हणणे देऊन तक्रारदारांचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, संबंधित वेळी ते पोलीस ऑफीसर होते व त्यांची सर्व कायदेशीर कर्तव्यं करत होते. त्यांनी तक्रारदार क्र.2 कडून मोबदला घेऊन सेवा दिली असे नाही. तक्रारदार क्र.2 हे त्यांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे या मंचाला त्यांच्या विरुध्दची ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. जर तक्रारदार क्र.2 ला त्यांच्या विरुध्द काही तक्रार करावयाची असेल तर त्यांनी योग्य त्या कोर्टात दाद मागावयास पाहिजे होती. त्यांचे म्हणणे की, तक्रारदार क्र.2 ने पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीत जो आरोप केला होता, त्यावरुन फौजदारी गुन्हा उघड होत नव्हता, तो दिवाणी स्वरुपाचा होता म्हणून त्यांनी दखलपात्र तक्रार रजिस्टर करण्याऐवजी अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली. तक्रारदार क्र. 2 च्या मागणीप्रमाणे त्यांनी सामनेवाले क्र.1 व 2 (वगळलेले) यांना त्रास देण्यास व त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याची धमकी देण्यास नकार दिला. त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी कायदा हातात घेतला नाही या सर्व गोष्टीचा तक्रारदार क्र.2 ला राग आल्यामुळे त्याचा सुड उगविण्यासाठी सदर तक्रार त्यांच्या विरुध्द केली आहे. 7. सामनेवाले क्र. 3 व 4 यांचे म्हणणे की, तारीख 15/04/2003 रोजी तक्रारदार क्र. 2 ने केलेल्या तक्रारीची त्यांनी दाखल घेतली होती व तसेच गाडीचा ताबाही सामनेवाले क्र.1 यांच्याकडून घेतला होता. त्या तक्रारीची चौकशी करुन त्यांनी तक्रारदार क्र.2 व सामनेवाले क्र. 1 व 2 यांना त्यांचा वाद आपसांत मिटविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तसेच वाद आपसांत मिटला नाही तर तक्रारदार क्र.2 यांनी योग्य त्या दिवाणी कोर्टात दाद मागावी असे सांगीतले होते. कारण त्यांचा वाद दिवाणी स्वरुपाचा होता. परंतु तक्रारदार क्र.2 हे खूप निग्रही होते. सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द फौजदारी कारवाई सुरु करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी वेग वेगळया युक्त्या करीत होते. ते वाद आपसात मिटविण्यास तयार नव्हते व गाडीही परत घ्यावयास तयार नव्हते. तक्रारदार क्र.2 चे समाधान होईपर्यत त्यांनी त्यांच्या तक्रारीची चौकशी केली होती. शेवटी 20/11/2003 रोजीचे पत्र पाठवून त्यांनी तक्रारदार क्र.2 ला ग्राहक मंचात जाण्यास सांगीतले. सामनेवाले क्र.1 हे तक्रारदार क्र.2 ला गाडी चालु स्थितीत परत देण्यास तयार होते. परंतु तक्रारदार क्र.2 ने ती घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी ती सामनेवाले क्र.1 यांना परत दिली. त्यांनी तक्रारदार क्र.2 व सामनेवाले यांचे जबाब घेतले होते. तक्रारदार क्र.2 स्वच्छ हाताने मंचात आलेले नाहीत. ते त्यांच्या चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर तक्रार ही खोटी, बनावट असून ती रद्द करण्यात यावी व तक्रारदार क्र.2 यांनी त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास त्यांना अडथळा निर्माण केल्यामुळे नुकसान भरपाई द्यावी. 8. आम्ही तक्रारदार क्र.2 चा तोंडी युक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.3 व 4 तर्फे वकील श्रीमती. भावना तांडेल यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 यांनी फक्त लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केलेला नाही व तोंडी युक्तीवादाच्यावेळीही त्यांच्यातर्फे कुणीही हजर नव्हते. सामनेवाले क्र.2 यांना या तक्रारीतून वगळले आहे. आम्ही या तक्रारीची कागदपत्रं वाचली. 9. तक्रारदार क्र.2 ची गाडी सामनेवाले क्र.1 च्या गॅरेजमध्ये तारीख 16/12/1999 रोजी दुरुस्तीला टाकली होती. तक्रारदार क्र.2 ने तक्रारीच्या निशाणी 2 ला सामनेवाले क्र.1 यांनी दिलेल्या दुरुस्तीच्या खर्चाचे इस्टीमेट दाखल केले आहे. त्यावरुन दुरुस्तीच्या खर्चाचे एस्टीमेट रुपये 14,500/-होते असे दिसते. सामनेवाले क्र.1 ने जरी म्हटले आहे की, दुरुस्ती खर्चाचे कोटेशन 16,600/- चे होते, परंतु त्याबद्दल त्यांनी मंचासमोर लेखी पुरावा दाखल केलेला नाही. त्यांनी पोलीसांकडे रु.16,600/- च्या इस्टीमेटची कॉपी दाखल केली होती. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी त्याची प्रत मंचात दाखल केली आहे. या इस्टीमेटवर तक्रारदाराने सही केलेली दिसत नाही. तक्रारदार क्र.2 ने दुरुस्तीच्या खर्चापैकी फक्त रुपये 12,000/- दिले असे सामनेवाले क्र.1 यांचे म्हणणे आहे. मात्र तक्रारदार क्र.2 यांचे म्हणणे की, त्यांनी रुपये 15,000/- दिले होते. तक्रारदार क्र.2 ने पोलीसांकडे ज्यावेळी तक्रार दाखल केली होती त्याच्या चौकशीच्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, सामनेवाले क्र.1 यांना तक्रारदार क्र.2 यांनी रुपये 12,000/- दिले होते हे सामनेवाले क्र.1 यांनी कबुल केले आहे. दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजित रुपये 14,500/- ठरलेले असताना तक्रारदार क्र.2 यांनी रुपये 15,000/- का दिले असा प्रश्न उपस्थित होतो ? तक्रारीच्या निशाणी 2 या इस्टीमेटवर पेमेंट बद्दल रिमार्कस् आहेत. तक्रारदार क्र.2 चे म्हणणे की, या रिमार्कच्याखाली सामनेवाले क्र.1 व वगळलेले सामनेवाले क्र.2 यांच्या सहया आहेत. मंचाने हे रिमार्क्स पाहिल्यावर असे दिसून येते की, त्या सहयांच्यावर जे पेमेंट बद्दल लिहिले आहे ते सहयांच्यावर नंतर अडजेस्ट केलेले दिसून येते. सर्व पेमेंटची एकूण बेरीज रु.15,000/- होत असताना त्या इस्टीमेटवर खालील प्रमाणे रिमार्क आहे. " Total rupees 1500/- " कारण लगेच सही असल्याने पूर्ण 15,000/- हा आकडा लिहिण्यास जागा नाही.त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार क्र.2 ने सामनेवाले क्र.1 यांना फक्त रुपये 12,000/- दुरुस्तीच्या खर्चापोटी दिले होते, रुपये 15,000/- दिलेले नाहीत. 10. सामनेवाले क्र.1 यांनी गाडी परत देण्यास नकार दिला असा तक्रारदार क्र.2 चा आरोप आहे. सामनेवाले क्र.1 यांचे म्हणणे की, त्यांचे पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी राहीलेल्या पैशाची मागणी केली यात त्यांची चूक नाही. तक्रारदार क्र.2 यांचे म्हणणे की, तारीख 03/01/2000 पावेतो त्यांनी ठरलेल्या रक्कमेपेक्षा रु.500/- जास्त दिले. तक्रारदार क्र.2 ने सामनेवाले क्र.1 यांनी त्यांची गाडी परत देण्यास नकार दिल्याबद्दल एकही पत्र/नोटीस पाठविल्याचे दिसत नाही. सामनेवाले क्र.1 यांनी पाठविलेल्या तारीख 22/06/2003 च्या नोटीसची कॉपी तक्रारीच्या निशाणी 4 ला दाखल आहे. त्यात तक्रारदार क्र.2 ची गाडी दुरुस्त करुन ठेवली असून 3 वर्षापासुन तक्रारदार क्र.2 राहीलेले पैसे देत नाही व गाडी नेत नाही असा आरोप सामनेवाले क्र.1 यांनी केला आहे. या नोटीसीव्दारे तक्रारदार क्र.2 यांना कळविले आहे की, तक्रारदार क्र.2 यांनी राहीलेल्या दुरुस्ती खर्चाची रक्कम व पार्किग चार्जेस देऊन दुरुस्त केलेली गाडी घेऊन जावी. यावरुन सामनेवाला क्र.1 हे त्यावेळी गाडी देण्यास तयार होते असे दिसून येते. 11. तक्रारदार क्र.2 यांनी या नोटीसीला दिनांक 03/07/2003 रोजी उत्तर पाठविले होते. ते तक्रारीच्या निशाणी 4 A ला दाखल आहे. त्यात त्यांनी सामनेवाले क्र.1 चे आरोप नाकारले असून ते पार्किग चार्जेस देण्यास जबाबदार नाहीत, कारण सामनेवाले क्र.1 यांचे पार्किग स्टेशन नसून गॅरेज आहे असे त्यांनी म्हटले आहे. या उत्तरावरुन असेही दिसून येते की, तक्रारदार क्र.2 यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 15/04/2003 रोजी तक्रार दाखल केली होती. जवळ जवळ तीन सव्वातीन वर्षे तक्रारदार क्र.2 व सामनेवाले क्र.1 यांच्यामध्ये काहीही लेखी पत्रव्यवहार झालेला दिसून येत नाही. तक्रारदार क्र.2 ने इस्टीमेट पेक्षाही जास्त रक्कम जर सामनेवाले क्र.1 यांना दिली होती तर तीन सव्वातीन वर्षे ते शांत का राहीले असाही प्रश्न उपस्थित होतो. तक्रारदार क्र.2 व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांचे म्हणणे की, त्यांना गाडीची आवश्यकता असते. त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी सामनेवाले क्र.1 यांना गाडी पोलीस स्टेशनला आणावयास सांगीतली होती असे सामनेवाले क्र.3 व 4 यांनी दाखल केलेल्या पोलीस रेकॉर्डवरुन दिसून येते. त्याप्रमाणे सामनेवाले क्र.1 यांनी दुरुस्तीच्या करारानुसार दुरुस्ती करुन व रंगकाम करुन गाडी दिनांक 08/11/2003 रोजी पोलीस स्टेशनला आणली होती. परंतु तक्रारदार क्र.2 त्या दुरुस्तीविषयी समाधानी नसल्यामुळे ती गाडी ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे सामनेवाले क्र.1 हे गाडी पोलीस स्टेशनलाच ठेऊन निघून गेले. त्यानंतर पोलीसांनी पत्र देऊन त्यांना ती गाडी घेऊन जाण्यास सांगीतले तेव्हापासून आतापर्यत सामनेवाले क्र1 कडे गाडी आहे. दिनांक 08/11/2003 रोजी गाडीची दुरुस्ती समाधानकारक नव्हती असे तक्रारदार क्र.2 ला जर वाटले होते तर गाडी पडून राहील्यामुळे गाडीची पुढे होऊ शकणारी स्थिती लक्षात घेता त्या वेळच्या गाडीच्या स्थितीचा दोन पंचासमक्ष पोलीसांकडून पंचनामाकरुन घेऊन गाडीच्या नुकसानीबाबतचा हक्क कायम ठेवून गाडी ताब्यात घेण्यास तक्रारदार क्र.2 ला काहीच अडचण नव्हती असे झाले असते तर 2003 पासुन तो आजपावेतो गाडीचे झालेले तथाकथीत नुकसान टाळता आले असते. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, दिनांक 08/11/2003 पासुन गाडीचे जे काही नुकसान झाले त्याला सामनेवाले क्र.1 तदवतच तक्रारदार क्र.2 हेसुध्दा जबाबदार आहेत. तसेच गाडी दुरुस्तीसाठी ता.16/12/99 रोजी सामनेवाले क्र.1 यांच्या ताब्यात दिल्यानंतर तारीख 15/04/2003 रोजी तक्रारदाराने पोलीस स्टेशनला तक्रार करेपर्यत म्हणजे जवळ जवळ तीन ते सव्वातीन वर्षे तक्रारदार क्र. 2 व सामनेवाले क्र.1 हे दोघेही शांत राहीले व गाडी ताब्यात घेण्यासाठी/देण्यासाठी काहीही हालचाल केली नाही. या तीन सव्वातीन वर्षाच्या कालावधीत गाडी पडून राहील्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. त्यासाठीसुध्दा तक्रारदार क्र.2 व सामनेवाले क्र.1 जबाबदार आहेत. मंचाच्या मते सामनेवाले क्र.1 हे पार्किग चार्जेस तक्रारदार क्र. 2 यांच्याकडून मागू शकत नाहीत कारण कराराप्रमाणे गाडी दुरुस्त झाली आहे किंवा नाही असे सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 यांना लेखी कळवून राहिलेल्या रक्कमेची त्यांनी मागणी केली नाही ही सुध्दा त्यांच्या सेवेत न्यूनता आहे. त्या न्यूनतेपोटी तक्रारदार क्र.2 ला योग्य ती नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले क्र.1 जबाबदार आहेत. वर म्हटल्याप्रमाणे मंचाच्या मते तक्रारदार क्र.2 यांना सामनेवाले क्र.1 यांनी दुरुस्तीपोटी रु.12000/-दिलेले होते. परंतु सामनेवाले क्र.1 यांनी गाडीमध्ये काही दुरुस्त्या केलेल्या होत्या हे पोलीसांच्या रिपोर्टवरुन दिसून येते. त्यामुळे सदरहू रक्कम तक्रारदार क्र.2 यांना परत करण्यास सामनेवाले क्र. 1 जबाबदार नाहीत. 12. तक्रारदार क्र.2 यांनी सामनेवाले क्र.3 व 4 यांच्याविरुध्द व्यक्तिगत आरोप केलेले आहेत. त्यांचे म्हणणे की, त्यांनी सामनेवाले क्र.1 यांच्याविरुध्द काहीही कारवाई न केल्यामुळे सामनेवाले क्र.1 हे बेकायदेशीरपणे त्यांची गाडी ताब्यात ठेवू शकले. तक्रारदार यांच्या या आरोपात मंचाला तथ्य दिसून नाही. सामनेवाले क्र.3 व 4 हे त्यावेळी समतानंगर पोलीस स्टेशनला पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. तक्रारदार क्र.2 यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दखलपात्र गुन्हा उघड न झाल्यामुळे त्यांनी दखलपात्र गुन्हयाची नोंद केली नाही. तक्रारदार क्र.2 व सामनेवाले क्र.1 यांच्यातील वाद दिवाणी स्वरुपाचा होता. म्हणून त्यांनी फक्त अदखलपात्र तक्रार नोंदविली व तरीसुध्दा त्या तक्रारीची त्यांनी चौकशी केली. सामनेवाले क्र.1 यांना पोलीस स्टेशनला गाडी आणावयास सांगीतली व गाडीचा ताबा घेताना, दोघांना आपसात तडजोड करण्याचा सल्ला दिला. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी देखील चौकशी बाबतची कागदपत्रं मंचात दाखल केली आहेत. त्याची कॉपी तक्रारदार क्र.2 ला देण्यासाठी त्यांनी मंचात दाखल केली आहे. परंतु सदरहू कागदपत्रं सामनेवाले क्र.3 व 4 यांनी दिनांक 26/03/2008 रोजीच्या त्यांच्या लेखी युक्तीवादाचे वेळी मंचात दाखल केलेली आहे व त्यानंतर ता.29/9/10 रोजी ते त्यांना देत आहेत. म्हणून तक्रारदार क्र2 ने सदरहू प्रति घेण्यास आता त्यांना स्वारस्य नाही असे सांगून ती प्रत घेतली नाही. तक्रारदार क्र.2 यांनी त्यांच्या पोलीसांनी घेतलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे की, सदरहू घटनेत पोलीसांनी केलेल्या कारवाई बद्दल ते तुर्तास समाधानी आहेत. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी चौकशीची सर्व कागदपत्रे पब्लीक प्रॉसेक्यूटरकडे पाठवून त्यावर त्यांचे मत मागविले होते. त्याबरोबर तक्रारदार क्र.2 ने सांगीतल्यानुसार त्यांच्या तारीख 17/11/203 चे पत्र ही पाठविले होते. त्यानंतर असिस्टंट डायरेक्टर अड पब्लीक प्रॉसेक्यूटर यांनी त्यांचे मत कळविले होते. सदरहू मत रेकॉर्डला दाखल आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदार क्र.2 व सामनेवाले क्र.1 यांच्यामध्ये जो वाद आहे तो फौजदारी स्वरुपाचा नसून तो ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रात येतो. म्हणून दोन्ही पक्षकारांना त्याबाबत कळवून त्यांना दाद मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे जावे असे कळवावे त्याप्रमाणे पोलीसांनी तक्रारदार क्र.2 ला त्याबाबत कळविले होते , व गाडीचा ताबा सामनेवाले क्र.1 यांना परत दिला. वरील परीस्थिती पहाता सामनेवाले क्र. 3व 4 यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली असे म्हणता येणार नाही, किंवा सामनेवाले क्र.1 यांचेशी त्यांनी हात मिळवणी केली होती असेही म्हणता येत नाही. विशेष म्हणजे तक्रारदार क्र.2 हे सामनेवाले क्र. 3 व 4 यांचे ग्राहकच नाहीत. त्यांनी कोणतीही वस्तु तक्रारदार क्र.2 ला विकली नाही, कींवा त्यांच्याकडून मोबदला घेऊन त्यांना सेवा देण्याचे कबुल केले असे नाही. वरील सर्व कारणास्तव सामनेवाले क्र.3 व 4 विरुध्दची सदरहू तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. 13. वरील सर्व विवेचन लक्षात घेता मंचाचे मत असे आहे की, तक्रारदार क्र.2 ने त्यांची गाडी स्वतःच्या खर्चाने सामनेवाले क्र.1 यांचेकडून आणून घ्यावी व सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 ला रुपये 15000/- नुकसान भरपाई द्यावी, ज्यात तक्रारदार क्र.2ला मानसीक त्रास झाला त्या बद्दलचीही नुकसान भरपाई अंतर्भुत आहे. तक्रारदार क्र.2 ने रुपये 25000/- नुकसान भरपाई त्याला 5 वर्षात टॅक्सी भाडयापोटी दिलेल्या खर्चाबाबत मागणी केली आहे. मंचाच्या मते वरील सर्व परिस्थितीचा विचार करता तक्रारदाराला सदरहू रक्कम मंजूर करणे योग्य वाटत नाही. त्याकामी तक्रारदार क्र.2 यांनी काही लेखी पुरावापण दिलेला नाही. मंचाच्या मते न्यायाच्या हिताच्या दृष्टीने खालील आदेश योग्य आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 44/2005 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1यांनी तक्रारदार क्र.2 ला रु.15,000/- नुकसान भरपाई द्यावी. 3. तक्रारदार क्र.2 यांनी त्यांची गाडी सामनेवाले क्र.1 कडून स्वतःच्या खर्चाने परत आणून घ्यावी. 4. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला या तक्रारीचा खर्च रु.3000/- द्यावा व स्वतःचा खर्च सोसावा. 5. सामनेवाले क्र.3 व 4 विरुध्दची तक्रार रद्द करण्यात येते. तक्रारदार क्र.2 यांनी सामनेवाले क्र.3 व 4 यांना तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.5000/- द्यावा. 7. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT | |