जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी. मा.सदस्या-श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक - ९७/२०१२
तक्रार दाखल दिनांक - २६-०६-२०१२
तक्रार निकाली दिनांक - १५-०५-२०१३
भारती छगन चव्हाण. ----- तक्रारदार.
उ.व. ,कामधंदा-घरकाम.
रा.प्लॉट नं.१३,ओसवाल नगर.
देवपुर,धुळे.
विरुध्द
दिपक रामदास नरवाडे. ----- सामनेवाले.
रा.कदमबांडे नगर,नगाव बारी,
देवपुर,धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.वाय.शिंपी.)
(सामनेवाले तर्फे – गैरहजर.)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्या - श्रीमती.एस.एस.जैन.)
(१) सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे सदोष व अपूर्ण बांधकाम करुन, तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केल्याने तक्रारदार यांनी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, सामनेवाले हे बांधकामाचे ठेकेदार असून, तक्रारदार हिने दुकान बांधण्यासाठी सामनेवाले यांना ठेका दिला होता. सदरचे बांधकाम एकूण रु.६५,०००/- एवढया रकमेत पूर्ण करण्याचे ठरले होते. बांधकामाबाबत लेखी स्वरुपात ठरल्याप्रमाणे खालील प्रमाणे काम करावयाचे ठरले होते.
(A) ८ बाय ९ चे शॉप – शॉपच्या बाहेरुन मोडचा जिना,जिन्याची पडदी वर पर्यंत बनवणे. संपूर्ण बांधकाम नर्मदा रेतीने प्लास्टर करुन देणे,शॉपचे शटर बनवणे.
(B) शॉपचे खाली ४ फूट खोल ६ X ७ फुट रुंदीची पाण्याची टाकी बनविणे. सिमेंटच्या एका गोणीत ३२ पाटी रेती कालवणे.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाले यांना दि.०८-१०-२०११ रोजी रु.३,०००/-, दि.०९-११-२०११ रोजी रु.४,०००/-, दि.११-११-२०११ रोजी रु.८,०००/-, दि.०५-१२-२०११ रोजी रु.१५,०००/- आणि दि.१८-०२-२०१२ रोजी रु.५,०००/-, अशा रोख स्वरुपात रकमा दिल्या व रु.१,९००/- ची रेती टाकून दिली.
(३) तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदारास करुन दिलेल्या बांधकामात खालील प्रमाणे चुका व ञृटी आहेत.
(A) शॉपच्या खाली असलेल्या टाकीचे झाकण आतल्या बाजूने केल्याने त्यात पाणी भरणे किंवा काढणे शक्य नाही. त्यामुळे सदर टाकी पूर्णपणे निरुपयोगी ठरली आहे.
(B) दुकानाच्या भिंती कमी उंचीच्या घेतल्याने घराचा स्लॅब व दुकानाचा स्लॅब यात मोठे अंतर आहे. तसेच घराच्या खिडक्याही त्यामुळे उघडत नाहीत. परिणामी घरात हवा व प्रकाश येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. भिंतींना प्लॅस्टर नाही.
(C) स्लॅब हा निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यास जडे गेले आहेत. तो पडावू झाला आहे.
(D) जिन्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने जिन्याला बिम व कॉलमचा आधार नसल्याने जिना धोकादायक आहे. सदरचा जिना कोणत्याही क्षणी पडू शकतो.
(४) या प्रमाणे सामनेवाले यांना, तक्रारदारांनी रु.३६,०००/- देऊनही सामनेवाले यांनी केवळ ८ ते १० हजाराचे काम, तेही अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे करुन अपूर्णावस्थेत बांधकाम सोडून गेले आहेत. या बाबत तक्रारदाराने सामनेवाले यांच्याशी संपर्क केला असता, उर्वरीत रक्कम रु.२०,०००/- द्या तरच कामावर येतो अन्यथा दुस-या ठेकेदाराला काम द्या असे सांगून सामनेवाले यांनी तक्रारदाराची फसवणूक केली आहे. शेवटी तक्रारदाराने दि.०७-०५-२०१२ रोजी सामनेवाले यांचे विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला असता, सामनेवाले यांनी पोलिसांना सदरील काम करतो असे सांगूनही आजपावेतो अपूर्ण काम पूर्ण करुन दिलेले नाही. म्हणून तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना वकीलामार्फत दि.२५-०५-२०१२ रोजी ररजिष्टर्ड नोटिस पाठविली. सदर नोटिस सामनेवाले यांनी दि.२८-०५-२०१२ रोजी स्वीकारुनही बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही.
(५) तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून सदोष असलेले बांधकाम पाडून नविन बांधकाम करुन मिळावे, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून घेतलेली रक्कम रु.३६,०००/- १८ टक्के व्याजासह परत मिळावी, मानसिक ञासापोटी रु.३०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.५,०००/- मिळावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
(६) तक्रारदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ तक्रारदार व सामनेवाले यांच्यातील बांधकाम विषयीच्या लेखी दस्ताची छायांकीत प्रत, सामनेवाले यांना पाठविलेल्या रजिष्टर्ड नोटिसीची छायांकीत प्रत, सामनेवाले यांनी नोटिस स्वीकारल्याची पावती, बांधकामाचे अपूर्ण अवस्थेतील फोटो, इ.कागदपञे दाखल केली आहेत.
(७) सामनेवाले यांना मंचाची नोटिस मिळूनही, ते सदर प्रकरणी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वत: अथवा अधिकृत प्रतिनिधी द्वारे स्वत:चा खुलासाही दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(८) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपञे पाहता तसेच त्यांच्या विद्वान वकीलांनी केला युक्तिवाद ऐकता आमच्यासमोर खालील मुद्दा उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे : | निष्कर्षः |
(अ)सामनेवाले यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत ञृटी केली आहे काय ? | : नाही. |
(ब)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(९) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी, सामनेवाले यांनी केलेल्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल व इतर ञृटी संबंधी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सामनेवाले यांनी केलेल्या बांधकामात प्रामुख्याने खालील ञृटी आहेत.
(A) शॉपच्या खाली असलेल्या टाकीचे झाकण आतल्या बाजूने केल्याने त्यात पाणी भरणे किंवा काढणे शक्य नाही. त्यामुळे सदर टाकी पूर्णपणे निरुपयोगी ठरली आहे.
(B) दुकानाच्या भिंती कमी उंचीच्या घेतल्याने घराचा स्लॅब व दुकानाचा स्लॅब यात मोठे अंतर आहे. तसेच घराच्या खिडक्याही त्यामुळे उघडत नाहीत. परिणामी घरात हवा व प्रकाश येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. भिंतींना प्लॅस्टर नाही.
(C) स्लॅब हा निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यास जडे गेले आहेत. तो पडावू झाला आहे.
(D) जिन्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने जिन्याला बिम व कॉलमचा आधार नसल्याने जिना धोकादायक आहे. सदरचा जिना कोणत्याही क्षणी पडू शकतो.
(१०) हे खरे आहे की, सामनेवाले यांनी सदर प्रकरणी प्रत्यक्ष हजर होऊन तक्रारदारांचे म्हणणे नाकारलेले नाही. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले यांनी केलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे व सदोष आहे ही वस्तुस्थिती स्पष्ट करणेसाठी कोणत्याही तज्ज्ञ बांधकाम अभियंत्याचा अथवा आर्किटेक्टचा अहवाल मे.मंचात दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाले यांनी केलेल्या अपूर्ण बांधकामाचे मुल्यांकन तक्रारीसोबत दाखल केलेले नाही. तक्रारदारांचे म्हणणे की, सामनेवाले यांनी केवळ ८ ते १० हजारांचे काम तेही अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे केले आहे हे पुराव्या अभावी सिध्द होत नाही.
(११) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत एकंदरीत बांधकाम रु.६५,०००/- एवढया रकमेत पूर्ण करण्याचे ठरले होते. परंतु त्यांनी केवळ रु.३६,०००/- सामनेवाले यांना दिल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदाराने सामनेवाले यांच्याशी लेखी स्वरुपात ठरलेल्या गोष्टींची पुर्तता केलेली नाही म्हणजेच ठरल्याप्रमाणे संपूर्ण रक्कम दिलेली नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कदाचित उर्वरीत पैसे न मिळाल्याने सामनेवाले यांनी बांधकाम अपूर्ण स्वरुपात ठेवले असावे अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत.
वरील विवेचनावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी केलेले बांधकाम अपूर्ण अवस्थेतील व सदोष आहे हे सिध्द केलेले नाही या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१२) वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज, रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दिनांकः १५/०५/२०१३
(श्रीमती.एस.एस.जैन.) (श्रीमती.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.