निकालपत्र ::
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारित दिनांक-07 मार्च, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) धनंजय कृषी सेवा केंद्र, मौदा, जिल्हा नागपूर या बियाणे विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) दफ्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा या बियाणे निर्माता कंपनी यांचे विरुध्द सदोष बियाण्या संबधाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याची मौजा मोहखेडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर येथे शेती असून त्याचे भूमापन क्रं-33/2, क्षेत्रफळ-1.45 हेक्टर आर तसेच भूमापन क्रं-32 क्षेत्रफळ-1.04 हेक्टर आर अशी शेती आहे आणि त्यावरच त्याची व कुटूंबियांची उपजिविका आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-29/06/2016 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-2) दफ्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे निर्माता कंपनीचे निर्मित सानीया-777-15-6006, प्रतीबॅग रुपये-1400/- प्रमाणे सोयाबिन बियाण्याच्या एकूण-02 बॅग्स एकूण किम्मत रुपये-2800/- मध्ये विकत घेतल्यात व बिल प्राप्त केले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो एक अनुभवी शेतकरी असून तो सव्वा एकर क्षेत्रात 20 क्विंटल सोयाबिनचे उत्पादन घेत असते, तो एक जागरुक शेतकरी असल्याने त्याने विकत घेतलेल्या बियाण्याच्या बॅगचे लेबल व बिल सांभाळून ठेवले आहे. त्याने आपल्या शेतात दिनांक-01/07/2016 रोजी सदर सोयाबिन बियाण्यांची पेरणी केली परंतु चार दिवसा नंतर पिकाची उगवण अत्यल्प आढळून आल्याने त्या बाबतची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता याचे कडे केली असता त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) निर्माता कंपनीतर्फे पाहणी करण्यात येईल असे आश्वासित केले. त्यानंतर तक्रारकर्त्याने तालुका कृषी अधिकारी, मौदा आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती मौदा यांचेकडे दिनांक-08/07/2016 रोजी लेखी तक्रारी केल्यात व पोच प्राप्त केल्यात. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती तर्फे दिनांक-27/07/2016 रोजी त्याचे शेताची प्रत्यक्ष्य मोका पाहणी केली व समितीने दिनांक-29/07/2016 रोजी अहवाल देऊन विरुध्दपक्ष क्रं-(2) दफ्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड बियाणे निर्मित सानीया -777 या सोयाबिन वाणाचे बियाणे सदोष असल्याने बियाण्याची उगवण 20 ते 25% एवढीच आढळून आली आणि तक्रारकर्त्याचे उत्पन्नात 70% ते 75% घट येण्याची शक्यता असल्यचे त्यात नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं-2)निर्मित सोयाबिन बियाणे दोषपूर्ण असल्याने तक्रारकर्त्याने त्या बियाण्याचा नमुना बिज परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर (Deptt. Of Agriculture Seed Testing Laboratory, Nagpur) यांचे कार्यालयात दिनांक-22/08/2016 रोजी परिक्षणासाठी सादर केला असता त्यांनी पुढील प्रमाणे अभिप्राय दिला-“Passed in Purity, Failed in Germination”. तक्रारकर्त्याने सदोष बियाण्या संबधी दोन्ही विरुध्दपक्षांना माहिती दिली परंतु त्यांनी दुर्लक्ष्य केल्यामुळे दिनांक-05/10/2016 रोजी दोन्ही विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षानीं कोणताही प्रतिसाद दिला नाही वा उत्तरही दिले नाही. तक्रारकर्त्याचे सव्वा एकर क्षेत्रात 20 क्विंटलचे उत्पादनाचे बाजारभावा प्रमाणे रुपये-53,000/- ते रुपये-57,000/- चे नुकसान झालेले आहे. म्हणून त्याने ही तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन पुढील प्रमाणे विरुध्दपक्षां विरुध्द मागण्या केल्यात-
(1) दोषपूर्ण सोयाबिन बियाण्यांमुळे 20 क्विंटल अपेक्षीत उत्पादनाची नुकसान झाल्याने भरपाई म्हणून रुपये-53,000/- ते रुपये-57,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावेत.
(2) सोयाबिन बियाण्याच्या पेरणी करीता तसेच मजूरी विज, पाणी इत्यादीसाठी आलेला खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा.
(3) तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-30,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) धनंजय कृषी सेवा केंद्र, मौदा या बियाणे विक्रेत्याला अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळाल्या बाबतची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं-1) मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्याने लेखी निवेदन सुध्दा दाखल केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-10/07/2017 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड या सोयाबिन निर्मित कंपनी तर्फे संचालक श्री रविंद्र फुलचंद दप्तरी यांनी लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-2) याने तक्रारकर्ता शेतकरी असल्याचे आणि त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित सानीया-777 या सोयाबिन वाणाच्या बियाण्याची पेरणी केल्याची बाब नाकबुल केली. तसेच तक्रारकर्त्याने सोयाबिन बॅगच्या लेबल, नमुना सांभाळून ठेवल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. तक्रारकर्त्याने खोटी तक्रार करुन संबधित कृषी अधिका-यांच्या संगनमताने खोटा अहवाल तयार केलेला आहे. तसेच बियाणे परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथे सुध्दा संगनमत करुन खोटा अहवाल तयार केलेला असल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष क्रं-2) याला तक्रारकर्त्या कडून कुठलीही नोटीस प्राप्त झालेली नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेला सोयाबिन दर विरुध्दपक्ष क्रं-2) याला मान्य नाही.या प्रकरणात सखोल चौकशीची आवश्यकता असल्याने ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकार क्षेत्रात ही तक्रार चालू शकत नाही. तक्रारकर्त्याने एकूण 02 बॅग बियाणे विकत घेतले, जे फक्त एक एकर जमीनीलाच पुरु शकते, सव्वा एकर शेतीला 02 बॅग बियाणे पुरु शकत नाही. एक तर तक्रारकर्त्याने कमी बियाणे खरेदी केले आणि त्यातही त्याने बियाण्याचा नमुना प्रयोग शाळेत तपासण्यास व संगनमत करुन बियाणे प्रयोगशाळे कडून अहवाल मिळविला. बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेला अहवाल सुध्दा खोटा आहे वस्तुतः त्यांनी महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दिनांक-27/03/1992 प्रमाणे योग्य त्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन अहवाल तयार करावयास हवा होता, तसेच तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या सोयाबिन बियाण्याच्या लॉटचे बियाणे ज्या शेतक-यांनी खरेदी केलेले असेल अशा आसपासचे शेतक-यांच्या शेतात जाऊन सुध्दा चौकशी करावयास हवी होती व नंतर अहवाल द्दावयास हवा होता. विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित सोयाबिन बियाण्याचे वाण अन्य शेतक-यांनी सुध्दा विकत घेतलेत परंतु त्यांची या वाणाच्या बियाण्या बद्दल कोणतीही तक्रार नाही. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी असून त्याचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याने तो कोणत्याही मागणीस पात्र नाही. तक्रारकर्त्याचे जर नुकसान झाले असते तर त्याने ते कमी करण्यासाठी वेळेत दुसरी लागवड करण्याचा सुध्दा प्रयत्न केला नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून सोबत नि.क्रं-3 यादी दस्तऐवजा नुसार शेतीच्या 7/12 उता-याच्या प्रती, बियाणे खरेदीचे बिल, बॅग लेबलची झेरॉक्स, बियाणे पिशवीचे छायाचित्र, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती यांचेकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती, बियाणे तक्रार निवारण समितीचा चौकशी अहवाल, निरिक्षणाचे फोटो, बिज परिक्षण प्रयोगशाळा यांचा अहवाल, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां कायदेशीर पाठविलेली नोटीसची प्रत अशा दस्तऐवजांच्या प्रतींचा समावेश आहे. दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्षा तर्फे उत्तरा सोबत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, लेखी युक्तीवाद, विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनीचे लेखी उत्तर आणि लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री बाळाप्रसाद वर्मा तर विरुध्दपक्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी तर्फे वकील श्री कोठारी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
08. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या 7/12 उता-यांच्या प्रतीं वरुन मौजा मोहखेडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर येथे शेती असून त्याचे भूमापन क्रं-33/2, क्षेत्रफळ-1.45 हेक्टर आर तसेच भूमापन क्रं-32 क्षेत्रफळ-1.04 हेक्टर आर असे असून ही जमीन त्याच्या व कुटूंबाच्या मालकीची दिसून येते.
09. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) बियाणे विक्रेता यांचे कडून दिनांक-29/06/2016 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे निर्माता कंपनीचे निर्मित सानीया-777-15-6006, प्रतीबॅग रुपये-1400/- प्रमाणे सोयाबिन बियाण्याच्या एकूण-02 बॅग्स एकूण किम्मत रुपये-2800/- मध्ये विकत घेतल्यात व बिल प्राप्त केले, सदर बिलाची प्रत तक्रारकर्त्याने पुराव्यार्थ दाखल केली, यावरुन त्याचे बियाणे खरेदी केल्या संबधीच्या कथनास पुष्टी मिळते.
10. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने आपल्या शेतात दिनांक-01/07/2016 रोजी सदर सोयाबिन बियाण्यांची पेरणी केली परंतु चार दिवसा नंतर पिकाची उगवण अत्यल्प आढळून आल्याने त्या बाबतची तक्रार दोन्ही विरुध्दपक्षांकडे केली आणि त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, मौदा आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती मौदा यांचेकडे दिनांक-08/07/2016 रोजी लेखी तक्रारी केल्यात व तालुका कृषी अधिकारी कार्यालया कडून पोच प्राप्त केल्यात, त्या तक्रारीच्या प्रती व पोच पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत.
11. तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती तर्फे दिनांक-27/07/2016 रोजी तक्रारकर्त्याचे शेताची प्रत्यक्ष्य मोका पाहणी करुन दिनांक-29/07/2016 रोजी अहवाल देऊन नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-(2) दफ्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड बियाणे निर्मित सानीया -777 या वाणाचे बियाणे सदोष असल्याने बियाण्याची उगवण 20 ते 25% एवढीच आढळून आली आणि त्यामुळे उत्पन्नात 70% ते 75% घट येण्याची शक्यता असल्याचे नमुद केले. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित सोयाबिन त्या बियाण्याचा नमुना बिज परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर (Deptt. Of Agriculture Seed Testing Laboratory, Nagpur) यांचे कार्यालयात परिक्षणासाठी सादर केला असता त्यांनी पुढील प्रमाणे अभिप्राय दिला-“Passed in Purity, Failed in Germination”. तक्रारकर्त्याने तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालाची प्रत तसेच बिज परिक्षण प्रयोग शाळा, नागपूर यांचे अहवाल पुराव्यार्थ सादर केले आहेत.
12. तक्रारकर्त्याने दिनांक-05/10/2016 रोजी दोन्ही विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षानीं प्रतिसाद दिला नाही वा नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही, या आपल्या कथनाचे पुराव्यार्थ कायदेशीर नोटीसची प्रत दाखल केली.
13. या उलट, विरुध्दपक्ष क्रं-2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड या सोयाबिन निर्मित कंपनी तर्फे संचालक श्री रविंद्र फुलचंद दप्तरी यांनी लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित सानीया-777 या सोयाबिन वाणाच्या बियाण्याची पेरणी केल्याची बाब नाकबुल करुन संबधित कृषी अधिका-यांच्या संगनमताने खोटा अहवाल तयार केलेला आहे. तसेच बियाणे परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथे सुध्दा संगनमत करुन खोटा अहवाल तयार केलेला असल्याचे नमुद केले, परंतु या त्यांचे कथना शिवाय अन्य कोणताही पुरावा त्यांनी दाखल केलेला नाही.
क्ष क्रं-2) बियाणे निर्माता कंपनी तर्फे तक्रारकर्त्याने संगनमत करुन तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती आणि बिज परिक्षण प्रयोग शाळा, नागपूर यांचे कडील अहवाल प्राप्त केल्याचे जरी नमुद केले असले, तरी या त्यांचे आक्षेपात आम्हाला कुठलेही तथ्य आढळून येत नाही आणि हे दोन्ही अहवाल निःपक्ष शासकीय यंत्रणे मार्फत केलेले असल्याने त्यावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन आम्हाला दिसून येत नाही. तक्रारकर्त्याने मोकास्थळाचे फोटोग्राफस सुध्दा दाखल केलेले आहेत, जर बियाणे चांगल्या प्रकारे उगवण झाले असते तर त्याला हे फोटो घेण्याची गरजच भासली नसती.
15. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचा तक्रारकर्त्याचे शेताची प्रत्यक्ष्य मोका पाहणी करुन दिनांक-29/07/2016 रोजी दिलेला अहवाल आणि बिज परिक्षण प्रयोगशाळा, नागपूर यांचे अहवाला वरुन तक्रारकर्त्याचे तक्रारीत सत्यता असल्याचे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) निर्मित सोयाबिन बियाणे दोषपूर्ण असल्याची बाब सिध्द होते. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने जो अहवाल दिलेला आहे, ते शासना मार्फतीने कृषी विभागातील तज्ञांचे उपस्थितीत
दिलेला आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवालात लागवड क्षेत्र 1.25 एकर एवढे नमुद असून, प्रती हेक्टरी झाडांची संख्या 4 ते 5 नमुद केलेली आहे आणि उवगण शक्ती-20% ते 25% एवढीच आढळल्याचे नमुद असल्याने तक्रारकर्त्याचे 75% पिकाचे उत्पन्नात घट आल्याचे दिसून येते आणि त्यामुळे त्या नुसार तो नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
16. अतिरिक्त ग्राहक मंच खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवीत आहे-
1) 2004-CTJ-697 (SC) “H. N.Shankara Shastry-
Versus- The Asstt. Director of Agriculture”
2) I (2004) –CPJ (NC) “National Seeds Corporation
Ltd.- Versus-M.Madhusudan Reddy”
3) I (1999) CPJ-451 Maharashtra State Commission
Mumbai “National Forum for Consumer Education
– Versus-Sanjay Krishi Seva Kendra”
4) 2008 (3) CPJ-96 (NC) “India Seed House-Versus-
Ramjilal Sharma”
5) AIR-2012) SC-1160 “National Seeds Coropration-
Versus- M.Madhusudan Reddy”
6) IV (2013) CPJ-241 (NC) “Maharashtra State Seeds
Corporation-Versus-Arvind Borkar”
7) II (2014) CPJ-703 (NC) “Dharam Pal & Sons-Versus-
Son Prakash”
8) IV (2008) CPJ-119 (NC) “Pratham Biotech Pvt.Ltd.-
Verus-Sayed Javed Sayed Amir”
9) I (2009) CPJ-99 (NC) “National Seeds Corporation-
Versus-P.V.Krishna Reddy”
10) II (2015) CPJ-587 (NC) “Seeds Works International
Pvt.Ltd.-Versus-Nampelly Sudhakar & others”
11) I (2015) CPJ-658 (NC) “Mahodaya Hybrid
Seeds Pvt.- Versus-Kishor Murumkar & others”
12) III (2003) CPJ-14 (NC) “Shri Rama Enterprises–
Versus-Venkat Reddy”
13) III (2009) CPJ-379 (NC) “Mahyco Monsanto Bio
Tech (I) Ltd.-Versus-Bodduluri Jeevan Kumar
& Anr.”
14) I (2015) CPJ-47 (Chha.) “C.G.State Seed &
Agriculture Dev.Corporation-Versus-Mohanlal Sahu
& Anr.”
15) II(2015) CPJ-23 (B) (CN) (Punj) “Nuziveedu Seeds
Ltd.-Versus-Mukaund Singh & others”
16) Revision Petition No.-3772/2009, Decided
on-08th Oct.2015 (NC) “Leadbetter Seeds Pvt.Ltd.-
Versus-Tanneru Rangaiah & others.
17) I (2002) CPJ-13 (NC) “N.S.C.Ltd.-Versus-
Guruswamy & Anr.”
18) I (2009) CPJ-225 (NC) “National Seeds Corportation
Ltd.-Versus-Abdul Aziz Fakir Mohd.Inamdar & Anr.”
19) II (2016) CPJ-224 (NC)”Ajeet Seeds Pvt.Ltd.-
Versus-Arjun Singh &Anr.”
20) (2017) CJ-782 (NC) “Shri Ram Bioseed
Genetics India Ltd.-Versus-Badri Prasad & Others”
आम्ही या मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले, त्या मध्ये चौकशी अहवाला अंतर्गत बियाणे तक्रार निवारण समितीने पंचनाम्या नुसार केलेली तपासणी ही योग्य असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच बियाणे दोषपूर्ण नसल्या बद्दल बियाणे कायद्दातील तरतुदी प्रमाणे त्या लॉटच्या बियाण्याची प्रयोग शाळेतून चाचणी करुन ते सिध्द करण्याची जबाबदारी सर्वस्वी बियाणे निर्माता कंपनीची आहे तसेच बियाणे कायदा हा स्वतंत्र कायदा असून तो बियाण्याच्या गुणवत्ते संबधी आहे, त्यामध्ये शेतक-यांसाठी नुकसान भरपाई देण्याची तरतुद नाही,ग्राहक संरक्षण कायदा हा एक वेगळा स्वतंत्र कायदा आहे अशी मते नोंदविलेली आहेत.
17. सर्वसाधारण परिस्थितीत एकरी 12 क्विंटल सोयाबिनचे अपेक्षीत उत्पादन येते. तक्रारकर्त्याच्या 1.25 एकर क्षेत्रा मध्ये एकूण 15 क्विंटल उत्पादन अपेक्षीत आहे परंतु त्याचे शेतात काही प्रमाणात 25% सोयाबिन उगवण झाल्याचे तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवालात नमुद आहे म्हणजेच 1.25 एकर करीता त्याचे 75% नुकसान हिशोबात घेतल्यास 1.25 एकरा मध्ये त्याचे 11.25 क्विंटल सोयाबिन उत्पादनाचे नुकसान झालेले आहे. सोयबिनचा दर प्रतीक्विंटल रुपये-3000/- प्रमाणे हिशोबात घेतल्यास नुकसान झालेल्या अपेक्षीत सोयाबिन एकूण-11.25 क्विंटल उत्पादनासाठी येणारे एकूण नुकसान हे रुपये-33,750/- एवढे येते व तेवढी नुकसान भरपाई मिळण्यास विरुध्दपक्ष क्रं-2) दप्तरी एग्रो कंपनी लिमिटेड या निर्माता कंपनी कडून मिळण्यास तो पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
18. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत शेतीची मशागत, नांगरणी, खते इत्यादीसाठी वेगवेगळा खर्च झाल्याने वेगवेगळी नुकसान भरपाई मागितलेली आहे परंतु आम्ही अपेक्षीत उत्पादनाची झालेली नुकसान भरपाई मंजूर करीत असल्याने, शेतीची मशागत, नांगरणी, खते अशी वेगवेगळी नुकसान भरपाई मंजूर करण्याची आवश्यकता नाही.
19. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री रविंद्र सहादेव खोब्रागडे यांची तक्रार, (2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, तालुका सेलू, जिल्हा वर्धा या बियाणे निर्माता कंपनी तर्फे संचालक श्री रविंद्र फुलचंद दप्तरी यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा या बियाणे निर्माता यांना आदेशित करण्यात येते की, त्यांचे व्दारा निर्मित सोयाबिन सानीया-777 या दोषपूर्ण बियाण्यामुळे तक्रारकर्त्याला अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसानी दाखल एकूण रुपये-33,750/-(अक्षरी रुपये तेहतीस हजार सातशे पन्नास फक्त) द्दावेत.
(03) तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा या बियाणे निर्माता कंपनीने तक्रारकर्त्याला द्दावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(1) धनंजय, कृषी सेवा केंद्र, मौदा, तालुका मौदा, जिल्हा नागपूर या बियाणे विक्रेता याचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(2) दप्तरी एग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा या बियाणे निर्माता तर्फे संबधितानी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे, विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास सदर नुकसान भरपाईची रक्कम रुपये-33,750/- निकाल पारीत दिनांक-07 मार्च 2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6% दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष क्रं-2 दप्तरी एग्रो कंपनी लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा बियाणे निर्माता जबाबदार राहिल.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.