Exh.No.24
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्रमांक- 34/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि. 31/10/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि. 27/01/2014
श्री प्रभाकर सिताराम राणे
वय सु.64 वर्षे, धंदा-सेवानिवृत्त,
रा.मु.पो.ओझरम, (पिंपळवाडी)
ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
श्री दशरथ गुरुनाथ कल्याणकर
वय 54 वर्षे, धंदा – बांधकाम ठेकेदार,
रा.तळेरे बाजारपेठ,
ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदार- स्वतः
विरुद्धपक्षातर्फे विधिज्ञ – श्री जी. आर. पारकर.
निकालपत्र
(27/01/2014)
श्रीमती उल्का अंकुश पावसकर, सदस्या:-
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचे घराचे बांधकाम मुदतीत पूर्ण न केलेमुळे नुकसान भरपाई, भाडयाने घर घेऊन राहावे लागत असल्याने भाडयाचे पैसे, आर्थिक व मानसिक त्रास तसेच नोटीसाचा खर्च मिळणेकरीता तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांचेविरुध्द सदरहू तक्रार दाखल केलेली आहे.
2) तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांना 18 x 20 फूट लांबी रुंदीचे घर बांधणेकरीता दिले. सदरहू घर विरुध्द पक्ष यांनी दोन महिन्यात बांधून देतो असे वचन तक्रारदारास दिले. व घराचा अंदाजित खर्च विरुध्द पक्ष यांनी 2,50,000/- सांगितला व त्याप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना दि.16/09/2011 रोजी 50,000/- व दि.3/10/2011 व 4/10/2011 रोजी प्रत्येकी रु.1,00,000/- आय.सी.आय.सी.आय. बँक शाखा कणकवलीच्या खात्यामधील चेकने अदा केले. परंतु विरुध्द पक्ष यांनी घराला भिंती व छप्पर घातले व उर्वरित बांधकाम अर्धवट ठेवले. त्यामुळे तक्रारदारास सदरहू घरात राहणेस मिळत नसलेने भाडयाने घर घेऊन राहावे लागत असलेने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी घराचे 1,00,000/- रुपयाचे बांधकाम केलेले असलेने उर्वरीत रक्कम रु.1,50,000/- विरुध्द पक्ष यांनी परत दयावेत तसेच भाडयापोटी रक्कम रु.26,000/-, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्क्म रु.20,000/- व नोटीस खर्च रु.1500/- ची मागणी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून केलेली आहे.
3) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसीची प्रत, विरुध्द पक्ष यांना नोटीस पोहोचल्याची पोच पावती हजर केलेली आहे. तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष यांना पाठवणेत आली त्याप्रमाणे त्यांनी नि.11 वर लेखी म्हणणे दाखल केले. तसेच नि.21 वर तक्रारदाराचे घर नं.538 चा घरपत्रकाचा उतारा, विरुध्द पक्ष यांचे कापड व्यवसायाचे व्यवसायकर उतारा, नावनोंदणी प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा ठराव, स.नं.27 हि.नं.16 च्या 7/12 ची सहीसुद नक्कल, बांधकाम परवानगीचा अर्ज, बांधकाम पूर्ण होऊन घर क्रमांक मिळणेकरीताचा अर्ज, घर नं.337 च्या घरपत्रकाचा उतारा, विरुध्द पक्ष यांनी तक्रादारास दिलेली पावती इत्यादी कागदपत्रे हजर केली.
4) विरुध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्यात आपण बांधकाम व्यवसाय करीत नसून कापड व्यावसायीक असून भवानी क्लॉथ सेंटर नावाचे कापड दुकान चालवितो व त्या व्यतिरिक्त कोणताही व्यवसाय करीत नाही असे नमूद केले आहे. याउलट तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून मैत्रीचे संबंध असल्याने रक्कम रु.2,60,000/- हात उसने घेतले व त्याची फेड म्हणून तक्रारदाराने रक्कम रु.1,00,000/- चा धनादेश लिहून दिला व उर्वरीत रक्कम तक्रारदाराने अद्यापपर्यंत दिली नाही. विरुध्द पक्ष हे कंत्राटदार नाहीत, त्यांनी तक्रारदाराचे घराचे बांधकामाचे कंत्राट घेतलेले नसलेने तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक नाहीत त्यामुळे सदरहू तक्रार काढून टाकून खोटी तक्रार दाखल केलेली असलेने खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हणणे दिलेले आहे. तक्रारदारने नि.12 वर पुराव्याचे शपथपथ दिलेले आहे. सदरहू शपथपत्राला नि.14 वर उलटतपासाची प्रश्नावली दिलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी नि.22 वर पुराव्याचे शपथपत्र दिलेले आहे. तसेच नि.23 वर लेखी युक्तीवाद दिलेला आहे. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक होतात का ? | नाही |
2 | विरुध्द पक्ष यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली आहे का ? | नाही |
3 | तक्रारदार हे नुकसानी व इतर खर्च मिळणेस पात्र आहेत का ? | नाही |
4 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
5) मुद्दा क्रमांक 1 तक्रारदाराने आपण विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहोत हे शाबीत करणे गरजेचे आहे. तक्रारदारने आपण विरुध्द पक्ष यांना घराचे बांधकाम करणेकरिता रक्कम रु.2,50,000/- दिलेले आहेत असे नमूद केलेले आहे. विरुध्द पक्ष हे बांधकाम क्षेत्रातील असून ते बांधकामाची कामे घेतात हे तक्रारदारने शाबीत करणे गरजेचे होते व त्याप्रमाणे तक्रारदारने घराचे बांधकामासंदर्भातील विरुध्द पक्ष यांचेशी झालेला करार हजर करणे आवश्यक होते परंतु तक्रारदारने तसा करार हजर केलेला नाही किंबहूना संपूर्ण तक्रारीत आपण कोणत्या मिळकतीत घर बांधत आहोत, त्यासाठी ग्रामपंचायतीची घेतलेली परवानगी किंवा तत्सम कोणतीही कागदपत्रे या कामी हजर केलेली नाहीत. याउलट विरुध्द पक्ष यांनी नि.12 वर पुराव्याचे शपथपत्र देऊन बांधकामाचा ठेका घेतल्याचे नाकारलेले आहे किंबहूना आपण कोणत्याही प्रकारची बांधकामाची कामे घेत नसून आपले कापडाचे दुकान असून त्या व्यतिरिक्त कोणताही व्यवसाय करीत नसल्याचे नमूद केलेले आहे. विरुध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.21/2 वर भवानी कृपा क्लॉथ सेंटर च्या नावाने नाव नोंदणी प्रमाणपत्र हजर केलेले आहे. सदरहू प्रमाणपत्र हे विरुध्द पक्ष यांचे नावाचे असून ते 14/08/1991 रोजी दिलेले आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी नि.21/8 वर तक्रारदारास कपडे दिल्याची दि.03/11/2010 ची पावती हजर केलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांचा कापड व्यवसाय आहे हे विरुध्द पक्ष यांनी शाबीत केलेले आहे. याउलट तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांनी घर बांधावयास दिले असलेबाबत कोणताही पुरावा या कामी हजर केलेला नाही. तक्रादाराने विरुध्द पक्ष यांना दिलेल्या पैशांचाही पुरावा हजर केलेला नाही. याकामी तक्रारदारने दि.12 वर पुराव्याचे शपथपत्र दिलेले आहे. त्यावर विरुध्द पक्ष यांनी उलटतपासासाठी प्रश्नावली दिली परंतू त्यास तक्रारदारने उत्तरावली दिली नाही. त्यानंतर तक्रारदारने नि.15 व 16 वर अर्ज देऊन उत्तरावली देणेसाठी मुदत मागीतली परंतु त्याप्रमाणे उत्तरावली दिलेली नाही. तक्रारदाराचे वकीलांनी नि.17 वर आपले वकीलपत्र रद्द करणेविषयी पुरसीस दिली. त्यानंतर तक्रारदार हे केव्हाही मंचात हजर झालेले नाहीत. विरुध्द पक्ष यांनी नि.21 वर तक्रारदार यांचा घर क्र.538, नि.21/7 वर घर नं.337 च्या घरपत्रकाचे उतारे हजर केलेले आहेत. तसेच तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीकडे घर बांधणेस परवानगीचा अर्ज नि.21/5 हजर केलेला व घर पूर्ण झालेल्याचा व घर नंबर मिळणेचा अर्ज नि.21/6 वर हजर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदारास अन्य राहणेस घर नाही हे तक्रारदाराचे म्हणणे ग्राहय धरण्याजोगे नाही. किंवा तक्रारदारने विरुध्द पक्ष यांना जे घर बांधावयास दिले ते घर हेच होते असेही कुठेही तक्रारीत नमूद केलेले नाही. मुळातच तक्रारदाराचे तक्रारीवर सविस्तर मुळाशी जाऊन विवेचन करणे हे, तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक होत असतील तर करणे योग्य आहे. परंतु तक्रारदारने तसा कोणताही पुरावा आणलेला नाही किंवा आपल्या घराचे बांधकाम विरुध्द पक्ष यांना करण्यास दिलेले होते हेही शाबीत केलेले नाही. याउलट विरुध्द पक्ष यांनी आपण बांधकाम व्यावसायीक नसून कापड व्यावसायीक आहोत हे शाबीत केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक नाहीत या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी होत आहोत.
6) मुद्दा क्र.2 व 3- मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी असलेने मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तरही नकारार्थी देत आहोत.
7) मुद्दा क्रमांक 4 – वर उल्लेख केल्याप्रमाणे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक होत नसलेने सदरहू तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे. वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 27/01/2014
Sd/- Sd/- Sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.