सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 51/2013.
तक्रार दाखल दि.22-3-2013.
तक्रार निकाली दि. 27-7-2015.
1. श्री.विकास उर्फ विवेक वामनराव
गुंडगे.
2. सौ.प्रेरणा विकास गुंडगे सातारा.
दोघे रा.कोळकी, ता.फलटण, जि.सातारा .... तक्रारदार
विरुध्द
1. चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
फलटण तर्फे- चेअरमन,
श्री.रामचंद्र नारायण डोईफोडे.
रा.डोईफोडे बंगला, श्रीराम बझार,
शाखा मलठणचे पाठीमागे, पाण्याचे टाकीशेजारी,
मलठण, ता.फलटण, जि.सातारा.
2. श्री.रामचंद्र नारायण डोईफोडे, चेअरमन.
रा.डोईफोडे बंगला, श्रीराम बझार,
शाखा मलठणचे पाठीमागे, पाण्याचे टाकीशेजारी,
मलठण, ता.फलटण, जि.सातारा.
3. अमोल चंद्रकांत कुंभार, व्हा.चेअरमन.
चौंडेश्वरी नागरी सह.पतसंस्था मर्या.फलटण.
रा.मिनारचे पाठीमागे, कोळकी,
ता.फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे- अँड. एस.बळीप.
जाबदार 1 ते 3 - एकतर्फा.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला)
1 तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रारदार हे जाबदार क्र.1 या संस्थेचे ठेवीदार आहेत. जाबदार क्र.1 ही संस्था आहे. जाबदार क्र.2 संस्थेचे चेअरमन व जाबदार क्र.3 हे नमूद संस्थेचे व्हा.चेअरमन आहेत. नमूद संस्थेचा व्यवसाय कर्ज देणे, मुदत ठेवी स्विकारणे, त्यांची मुदतीत फेड करणे, सभासदांना कर्ज देणे ते मुदतीत वसूल करणे इ.कामे करीत असते. जाबदार क्र.1 या संस्थेचे कार्यालय, फलटण याठिकाणी आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 पतसंस्थेत खालीलप्रमाणे ठेवी ठेवलेल्या आहेत.
अ.क्र. | पावती क्र. | खातेदाराचे नाव | रक्कम रु. | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख |
1 | 000648 | विकास उर्फ विवेक वामनराव गुंडगे सौ.प्रेरणा विकास गुंडगे. | 10,000/- | 27-1-2004 | 27-12-2009 |
2 | 000649 | विकास उर्फ विवेक वामनराव गुंडगे सौ.प्रेरणा विकास गुंडगे. | 10,000/- | 27-1-2004 | 27-12-2009 |
सेव्हींग खाते क्र.159/71 वरील रक्कम रु.45,338/- |
सदर ठेवपावत्यांची मुदत संपलेली असल्यने व तक्रारदाराना रकमेची आवश्यकता असल्याने तक्रारदारानी जाबदार क्र.1 संस्थेकडे रकमेची मागणी केली असता पैसे परत देणेची टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे जाबदार संस्थेच्या कामाकाजावरील तक्रारदारांचा विश्वास उडाला आहे. तक्रारदारांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे तक्रारदारांची आर्थिक ओढाताण होऊन त्याना मानसिक धक्का बसला आहे, त्यास जाबदार संस्था जबाबदार आहे. तशी नोटीस जाबदाराना तक्रारदारानी दि.3-8-2012 रोजी पाठवून रकमेची मागणी करुनही तक्रारदाराना रक्कम मिळालेली नाही. सदर नोटीस जाबदाराना मिळाली आहे. या तक्रारीशिवाय दुस-या कोणत्याही कोर्टात अर्ज वा फिर्याद दाखल केलेली नाही. सबब तक्रारदारानी खालीलप्रमाणे विनंती मे.मंचाला केलेली आहे- तक्रारदारांच्या ठेवपावत्या रक्कम रु.20,000/- व सेव्हींग खाते क्र.159/71 वरील रक्कम रु.45,338/- त्यावरील व्याजासह अधिक मानसिक त्रासापोटी रु.20,000/- अशी एकूण रक्कम रु.85,338/- अधिक व्याज तक्रारदाराना जाबदारांकडून वसूल होऊन मिळावेत. याप्रमाणे तक्रारअर्ज दाखल केलेला आहे.
2. सदर कामी जाबदार क्र.1,2 व 3 यांना नोटीसा मिळूनही ते हजर झाले नाहीत, किंवा त्यांनी म्हणणेही दिलेले नाही. त्यामुळे दि.6-8-13 रोजी जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित झाला आहे, तसेच जाबदार क्र.3 विरुध्द दि.11-12-14 रोजी एकतर्फा आदेश पारित झालेला आहे त्यामुळेच प्रस्तुत कामी जाबदार क्र.1,2 व 3 यांचे म्हणणे नाही.
3. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदार क्र.1 चे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे तक्रारदार क्र.2 चे प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे तक्रारदाराचे वकीलपत्र, नि.6 कडे कागदयादी, नि.7 कडे रु.10000/-ची तक्रारदार क्र.2 यांचे नावाची मूळ मुदतठेव पावती, नि.8 कडे रु.10000/-ची तक्रारदार क्र.1 यांचे नावाची मूळ मुदतठेव पावती, नि.9 कडे तक्रारदार क्र.1 यांचे जाबदार पतसंस्थेचे बचत खात्याचे पासबुक, नि.10 कडे अँड.बळीप यानी दि.3-8-12 रोजी जाबदारास पाठविलेल्या रजि.नोटीसची स्थळप्रत, नि.11 कडे रजि.पोस्टाच्या पावत्या, नि.12 कडे जाबदार क्र.1,3 व 2 यांच्या पोहोचपावत्या, नि.13 कडे जाबदाराना मंचाकडून पाठविलेली नोटीस, नि.13/1 कडे जाबदार क्र.3 याना पाठविलेले नॉट नोनच्या शे-याने परत आलेला नोटीसचा लखोटा, नि.13/2 कडे जाबदार क्र.2 ची पोहोचपावती, नि.14 कडे जाबदार क्र.3 याना फेरनोटीसीसाठीचा तक्रारदाराचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.15 कडे मंचाची जाबदार क्र.3 याना नोटीस, नि.16 कडे तक्रारदारांचा जाबदार क्र.3 यांचे नाव दुरुस्तीसाठी दिलेला अर्ज, अर्ज मंजूर. नि.17 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.18 कडे मंचाची पाठविलेली नोटीस, नि.19 कडे तक्रारदाराचा जाबदार क्र.3 याना फेरनोटीसीसाठी अर्ज, नि.20 कडे जाबदार क्र.3 याना मंचाची फेरनोटीस, नि.20/1 कडे जाबदार क्र.3ची पोहोचपावती, नि.21 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.22 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि.23 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस इ.कागदपत्रे दाखल आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, तक्रारदारांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व
सेवापुरवठादार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांची रक्कम देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन-
5. मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. जाबदार पतसंस्था ही लोकांचे पैसे विविध खात्यांवर ठेवून घेते व त्यावर व्याज देते. तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्यावर व्याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्यवहार-व्यापार चालतो. तक्रारदारांनी नि.7 कडे तक्रारदार क्र.2 हिचे नावे रु.10,000/- व नि.8 कडे तक्रारदार क्र.1 यांचे नावे रु.10,000/- च्या मुदतठेव पावत्या जाबदार पतसंस्थेत ठेवलेल्या आहेत. तसेच तक्रारदार क्र.1 यांचे जाबदार पतसंस्थेत सेव्हींग खाते असून त्याचा क्र.159/79 (नि.9) आहे. सदर पासबुकवर दि.16-10-2010 रोजी रक्कम रु.45,338/- (नि.9) शिल्लक असलेचे दिसते. तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक असून त्यांचा व जाबदार पतसंस्थेचा व्यवहार होता हे यावरुन सिध्द होते. तसेच जाबदार पतसंस्था रकमा ठेवून घेते व त्यावर व्याज देते त्यामुळे जाबदार पतसंस्था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्था ठरते. तक्रारदारानी जाबदारांकडे वारंवार रकमांची मागणी करुनही आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही यावरुन जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते. जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या रकमा त्यांना सव्याज परत केल्या पाहिजेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. जाबदार हेच संस्थेचे सर्वेसर्वा असतात व सर्व कारभार तेच पहात असतात म्हणूनच तक्रारदारांचे पैसे परत करणेस co-operate corporate veil नुसार जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र.2 व 3 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. येथे आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
6. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार क्र.2 यांना त्यांचे पावती क्र.000648 वरील रक्कम रु.10,000/- व त्यावर दि.27-01-2004 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील नमूद व्याजाप्रमाणे होणारे व्याज अशी एकूण रक्कम जाबदार क्र. 1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
3. तक्रारदार क्र.1 यांना त्यांचे पावती क्र.000649 वरील रक्कम रु.10,000/- व त्यावर दि.27-01-2004 पासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावतीवरील नमूद व्याजाप्रमाणे होणारे व्याज अशी एकूण रक्कम जाबदार क्र. 1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
4. तक्रारदार क्र.1 याना त्यांच्या बचत खाते क्र.159/79 वरील रक्कम रु.45,338/- व त्यावर दि.16-10-2010 पासून आदेश पारित तारखेपर्यंत बचत खात्यावरील मिळणा-या व्याजाप्रमाणे होणारे एकूण व्याजासह रक्कम जाबदार क्र. 1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
5. वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 ते 3 यानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावयाचे आहे. तसे न केलेस आदेश पारित तारखेपर्यंत होणा-या एकूण रकमेवर तक्रारदारांचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6% दराने व्याज द्यावे लागेल.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारांना त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 नुसार मंचाकडे दाद मागणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 27– 7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.