-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-06 जानेवारी, 2017)
01. उपरोक्त नमुद तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष श्री चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C.R./557/1996, गायत्री टॉवर, क्वेटा कॉलिनी, नागपूर या सहकारी संस्थे कडून घेतलेले कर्ज व केलेली परतफेड याबाबत दोषपूर्ण सेवा दिल्याने दाखल केलेली आहे.
02. नमुद तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष श्री चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ही एकसहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून तिचा नोंदणी क्रमांक-N.G.P./ C.T.Y / R.S.R./C.R./557/1996, गायत्री टॉवर, क्वेटा कॉलिनी, नागपूर असा आहे. तक्रारकर्त्याने दिनांक-22/10/2002 रोजी विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मधून रुपये-30,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले. सदर कर्ज त्याने प्रतीदिवस रुपये-50/- या प्रमाणे परतफेड करावयाचे असे उभय पक्षां मध्ये ठरले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष संस्थेमध्ये दिनांक-07.01.2004 पर्यंत त्याचे बचत खात्यात कर्ज परतफेडीपोटी एकूण रुपये-6580/- जमा केले. त्यानंतर त्याने दिनांक-31.03.2004 पर्यंत बचत खात्यात कर्ज परतफेडीपोटी रुपये-2870/- जमा केलेत. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने रुपये-9450/- जमा केलेत.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने पुढे कर्ज परतफेडीपोटी पुढील प्रमाणे विरुध्दपक्ष संस्थे मध्ये रकमा जमा करुन पावत्या प्राप्त केल्यात.
अक्रं | पावती दिनांक | दिलेली रक्कम |
1 | 25/03/2007 | 2500/- |
2 | 30/11/2007 | 3500/- |
3 | 24/12/2007 | 4000/- |
| | |
| एकूण | 10,000/- |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्यानंतर त्याच्यात आणि विरुध्दपक्ष संस्थे मध्ये कर्ज परतफेडी संबधाने समझोता दिनांक-24/12/2007 झाला व त्यानुसार सदर कर्ज खाते हे रुपये-29,000/- देऊन बंद करण्याचे ठरले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने कर्ज परतफेडी पोटी विरुध्दपक्ष संस्थे मध्ये पुढील प्रमाणे रकमा जमा केल्यात.
अक्रं | पावती दिनांक | दिलेली रक्कम |
6 | 31/01/2008 | 5000/- |
7 | 08/03/2008 | 5000/- |
8 | 15/04/2008 | 5000/- |
9 | 02/05/2008 | 4000/- |
| एकूण | 19,000/- |
तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्या व्यतिरिक्त त्याने रुपये-7500/- शेअर्सपोटी विरुध्दपक्ष संस्थे मध्ये जमा केले. त्याचे असेही म्हणणे आहे की, त्याने समझोत्या प्रमाणे कर्जाची संपूर्ण परतफेड करुनही त्यास ना-देय-प्रमाणपत्र विरुध्दपक्ष संस्थेने दिले नाही, या उलट, दिनांक-07/12/2011 रोजी वसुली अधिका-या समक्ष हजर राहण्यास नोटीस देऊन त्याव्दारे त्याचे कर्ज खात्यावर रुपये-41,284/- प्रलंबित दाखविले. विरुध्दपक्ष संस्थेनी संपूर्ण कर्जाचे रकमेची वसुली करुनही व मागील 02 वर्षात कुठलीही सूचना अथवा नोटीस न देता एकाएकी वसुली अधिका-या मार्फत नोटीस दिली त्यामुळे त्यास मानसिक त्रास झाला. विरुध्दपक्ष संस्थेनी अशाप्रकारे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन दोषपूर्ण सेवा दिली.
म्हणून त्याने विरुध्दपक्ष संस्थे विरुध्द तक्रार दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष संस्थे तर्फे त्याला दिलेली वसुलीची नोटीस रद्द करुन त्याने आपसी समझोत्या प्रमाणे संपूर्ण कर्ज रकमेची परतफेड केलेली असल्याने त्यास ना-देय-प्रमाणपत्र विरुध्दपक्ष संस्थे कडून देण्याचे आदेशित व्हावे. तसेच त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये-10,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष संस्थे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) संस्थे तर्फे लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संस्थे कडून रुपये-30,000/- रकमेचे कर्ज घेतले होते व ते प्रतीमाहसमान हप्ता (Equal Monthly Installment) रुपये-1950/- मध्ये परतफेड करावयाचे असल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याला कर्जाची रक्कम ही दिनांक-22/10/2002 रोजी देण्यात आली. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रती या अभिलेखाचा भाग असून तो तपासणी अंती मान्य करण्यात येईल. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष संस्थे मध्ये कर्ज परतफेडी संबधाने दिनांक-24/12/2007 रोजी आपसी समझोता झाल्याची बाब नामंजूर केली. संपूर्ण कर्जाची परतफेड झाल्या नंतर शेअरची रक्कम परत करण्यात येते. त्यांच्यात आणि तक्रारकर्त्या मध्ये कर्ज परतफेडी संबधाने कोणताही समझोता झालेला नाही. तक्रारकर्त्या कडे अद्दापही कर्ज परतफेडीपोटी रुपये-21,284/- प्रलंबित आहेत. तक्रारकर्त्याची तक्रार विहित मुदतीत नाही तसेच त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. कर्ज परतफेडी संबधीचे वाद हे महाराष्ट्र सहकारी संस्था-1960 च्या कायद्दातील तरतुदीव्दारे सोडविल्या जातात, त्या संबधाने ग्राहक न्यायमंचास अधिकार क्षेत्र येत नाही, सबब तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1) व क्रं-2) संस्थे तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्या तर्फे पुरसिस दाखल करुन त्यांची तक्रार आणि दस्तऐवजालाच लेखी आणि मौखीक युक्तीवाद समजण्यात यावा असे नमुद केले. विरुध्दपक्ष संस्थे तर्फे सुध्दा त्यांचे लेखी उत्तरालाच लेखी आणि मौखीक युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष संस्थेचे उत्तर आणि तक्रारकर्त्याने दाखल केलेल् दस्तऐवजाच्या प्रती यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष श्री चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून तिचा नोंदणी क्रमांक-N.G.P./C.T.Y/R.S.R./C.R./557/1996 असा असून कार्यालयीन पत्ता हा गायत्री टॉवर, क्वेटा कॉलिनी, नागपूर असा आहे. (“विरुध्दपक्ष” म्हणजे उपरोक्त नमुद सहकारी पतसंस्था असे समजण्यात यावे.)
07. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संस्थे कडून रुपये-30,000/- रकमेचे कर्ज घेतले होते व त्या कर्जाची रक्कम त्याला दिनांक-22/10/2002 रोजी देण्यात आली होती या बद्दल उभय पक्षांमध्ये विवाद नाही. तक्रारकर्त्याने कर्ज रकमेच्या परतफेडीच्या रकमा त्याच्या बचतखात्यात जमा केल्या संबधाने दाखल केलेल्या बचत खात्याच्या प्रती तसेच पावत्यांच्या प्रती या अभिलेखाचा भाग असल्याचे विरुध्दपक्ष संस्थेनी उत्तरात नमुद केले व त्या पावत्यांच्या प्रती तपासणी अंती (Subject to the verification of documents) मान्य करण्यात येईल असे विरुध्दपक्ष संस्थे तर्फे उत्तरात नमुद करण्यात आले.
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे, तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष संस्थे मध्ये कर्ज परतफेडी संबधाने दिनांक-24/12/2007 रोजी आपसी समझोता झाल्याची बाब विरुध्दपक्ष संस्थे तर्फे नामंजूर करण्यात आली. त्यांच्यात आणि तक्रारकर्त्या मध्ये कर्ज परतफेडी संबधाने कोणताही समझोता झालेला नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्या कडे अद्दापही कर्ज परतफेडीपोटी रुपये-21,284/- प्रलंबित असल्याचे नमुद केले.
09. विरुध्दपक्ष संस्थे तर्फे लेखी उत्तरात आक्षेप घेण्यात आला की, कर्ज परतफेडी संबधीचे वाद हे महाराष्ट्र सहकारी संस्था-1960 च्या कायद्दातील तरतुदीव्दारे सोडविल्या जातात, त्या संबधाने ग्राहक न्यायमंचास अधिकार क्षेत्र येत नाही.
10. तक्रारी मधील विवादास्पद मुद्दांना स्पर्श करण्यापूर्वी विरुध्दपक्ष संस्थे तर्फे घेण्यात आलेल्या या आक्षेपा संबधाने प्रथम विचार होणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्त्याच्या कर्ज परतफेडी संबधाने जर सहकारी कायद्दा-1960 चे कलम-101 खाली जर वसुलीचा दाखला निघाला असता तर ग्राहक मंचास या तक्रारीत अधिकारक्षेत्र नसते, त्या परिस्थितीत तक्रारकर्त्याला सहकार कायद्दाच्या तरतुदी प्रमाणे सहकार विभागात कलम-101 खालील वसुलीचे दाखल्या विरुध्द अपिल करावे लागले असते. परंतु तक्रारकर्त्यास जी विशेष वसुली अधिकारी, चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्थे तर्फे दिनांक-14.12.2011 रोजी वसुली अधिकारी यांचे समक्ष हजर होण्या संबधी जी नोटीस देण्यात आलेली आहे, ती विरुध्दपक्ष संस्थेच्या वसुली अधिका-याची नोटीस आहे, सहकार विभागातील नोटीस नाही, त्यामुळे ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्र या प्रकरणात येते. तक्रारकर्त्याने कर्ज घेतलेले असून ते कर्ज तो व्याजासह परतफेड करीत असल्याने तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष संस्था यांच्या मध्ये ग्राहक आणि सेवा देणारे असे संबध प्रस्थापित होत असल्याने ग्राहक मंचास या तक्रारीत अधिकारक्षेत्र आहे.
11. विरुध्दपक्ष चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या विशेष वसुली अधिकारी यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या दिनांक-07/12/2011 च्या नोटीस मध्ये थकीत वसूल मूळ रक्कम रुपये-11,168/- आणि दिनांक-31.03.2011 पर्यंतचे व्याज रुपये-11,404/- प्रोसेसिंग फी रुपये-1000/-, वसुलीचा खर्च रुपये-5385/-, दंड रुपये-2500/- आणि नोटीस फी रुपये-1000/- इतर रुपये-8827/- अशा रकमा दर्शवून एकूण रुपये-41,284/- अशी रक्कम दर्शविलेली आहे. सदरच्या नोटीस मध्ये दर्शविलेल्या रकमा या कोणत्या आधारावर दर्शविलेल्या आहेत, ते समजून येत नाही. या रकमा जास्तीच्या रकमा दर्शविल्याचे दिसून येते. या उलट विरुध्दपक्ष संस्थेच्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्या कडून रुपये-21,284/- अद्दापही वसुल होणे बाकी असल्याचे नमुद केलेले आहे.
12. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष संस्थेमध्ये दिनांक-07.01.2004 पर्यंत त्याचे बचत खात्यात कर्ज परतफेडीपोटी एकूण रुपये-6580/- जमा केले. त्यानंतर त्याने दिनांक-31.03.2004 पर्यंत बचत खात्यात कर्ज परतफेडीपोटी रुपये-2870/- जमा केलेत अशाप्रकारे त्याने रुपये-9450/- जमा केलेत.
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे या व्यतिरिक्त त्याने पुढे कर्ज परतफेडीपोटी पुढील प्रमाणे विरुध्दपक्ष संस्थे मध्ये रकमा जमा करुन पावत्या प्राप्त केल्यात.
अक्रं | पावती दिनांक | दिलेली रक्कम |
1 | 25/03/2007 | 2500/- |
2 | 30/11/2007 | 3500/- |
3 | 24/12/2007 | 4000/- |
| | |
| एकूण | 10,000/- |
त्यानंतर त्याच्यात आणि विरुध्दपक्ष संस्थे मध्ये कर्ज परतफेडी संबधाने समझोता दिनांक-24/12/2007 झाला व त्यानुसार सदर कर्ज खाते हे रुपये-29,000/- देऊन बंद करण्याचे ठरले. त्याप्रमाणे पुढे तक्रारकर्त्याने कर्ज परतफेडी पोटी विरुध्दपक्ष संस्थे मध्ये पुढील प्रमाणे रकमा जमा केल्यात.
अक्रं | पावती दिनांक | दिलेली रक्कम |
6 | 31/01/2008 | 5000/- |
7 | 08/03/2008 | 5000/- |
8 | 15/04/2008 | 5000/- |
9 | 02/05/2008 | 4000/- |
| एकूण | 19,000/- |
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे कर्ज परतफेडीपोटी एकूण रुपये-29,000/- आपसी समझोत्या प्रमाणे जमा केलेत त्यामुळे आता त्याचे कडे कोणतेही कर्ज थकीत नाही.
13. परंतु तक्रारकर्त्याने त्याच्यात आणि विरुध्दपक्ष संस्थे मध्ये कर्ज परतफेडी संबधाने आपसी समझोता झाल्या बद्दल कोणतेही लेखी दस्तऐवज पुराव्या दाखल मंचा समोर दाखल केलेले नाही, त्यामुळे आपसी समझोत्या बद्दल तक्रारकर्त्याचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही. परंतु एकमात्र दिसून येते की, तक्रारकर्त्याने रुपये-30,000/- घेतलेल्या कर्जापोटी रुपये-29,000/- एवढी रक्कम कर्ज परतफेडीपोटी विरुध्दपक्ष संस्थे मध्ये जमा करुन पावत्या प्राप्त केलेल्या आहेत. तसेच त्याचे बचतखात्यात कर्ज परतफेडीपोटी दिनांक-07.01.2004 पर्यंत एकूण रुपये-6580/- जमा केले. त्यानंतर त्याने दिनांक-31.03.2004 पर्यंत बचत खात्यात कर्ज परतफेडीपोटी रुपये-2870/- जमा केलेत अशाप्रकारे त्याने बचत खात्यात एकूण रुपये-9450/- जमा केलेत. दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन त्याने रुपये-29,000/- आणि बचतखात्या मध्ये रुपये-9450/- जमा केल्याचे दिसून येते. अशाप्रकारे त्याने एकूण रुपये-38,450/- एवढी रक्कम जमा केल्याचे दिसून येते.
14. कर्ज घेते वेळी तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष संस्था यांच्या मध्ये काय व्याज दराने कर्जाची परतफेड करावयाची होती तो कर्ज करार उभय पक्षां तर्फे दाखल करण्यात आलेला नाही. एकमात्र दिसून येते की, विरुध्दपक्ष संस्थेने आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे कर्ज रकमेची वसुलीची नोटीस तक्रारकर्त्याला दिलेली आहे, त्यामुळे साहजिकच त्याला मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. तक्रारकर्त्याने कर्ज परतफेडीचा शेवटचा हप्ता दिनांक-02.05.2008 रोजी भरलेलेला असताना त्यास विरुध्दपक्ष चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वसुली अधिका-याने दिनांक-07/12/2011 नोटीस विरुध्दपक्ष संस्थेनी मनमानेल त्या प्रमाणे कर्ज रकमेच्या वसुलीची नोटीस शेवटचा कर्ज हप्ता भरल्याचे तारखे पासून जवळपास अडीच वर्षा नंतर दिलेली आहे व त्यातही बेहिशोबी रकमा दर्शविलेल्या आहेत आणि ही त्यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार पुढील निर्देशांसह अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे की, विरुध्दपक्ष संस्थेनी तक्रारकर्त्याचे कर्ज खात्याचे हिशोबाचा संपूर्ण उतारा द्दावा. तक्रारकर्त्यास दिनांक-21.10.2002 रोजी कर्जाची रक्कम रुपये-30,000/- दिल्या नंतर त्याने शेवटचा हप्ता दिनांक-02.05.2008 पर्यंत जी काही रक्कम कर्ज परतफेडीपोटी जमा केलेली आहे, त्यावर संस्थेच्या नियमा प्रमाणे व कर्ज करारा प्रमाणे दिनांक-21.10.2002 ते दिनांक-02.05.2008 पर्यंतच्या कालावधीचे व्याज याचा संपूर्ण हिशोब तयार करावा तसेच असा हिशोब तयार करताना त्यात कोणत्याही दंडाच्या वा अतिरिक्त रकमा लावण्यात येऊ नये व तो हिशोब विरुध्दपक्ष संस्थेवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या सहकार विभागातील सक्षम लेखा अधिका-यां कडून प्रमाणित करावा व त्यानंतर तो हिशोब तक्रारकर्त्याला द्दावा, व त्याने जास्तीची रक्कम भरली असल्यास त्यास जास्तीची रक्कम परत देण्यात यावी व त्याचे कडून काही रक्कम घेणे असल्यास त्या प्रमाणे मागणी करावी. तक्रारकर्त्या कडून हिशोबा प्रमाणे रक्कम मिळाल्या वर विरुध्दपक्ष चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने त्यास ना-देय-प्रमाणपत्र द्दावे. त्याच बरोबर तक्रारकर्ता हा शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष संस्थे कडून मिळण्यास पात्र आहे.
15. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही उपरोक्त नमुद दोन्ही तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री हिरालाल हरिशचंद्र सातनुरकर याची तक्रार, विरुध्दपक्ष श्री चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नोंदणी क्रमांक-N.G.P./ C.T.Y/ R.S.R./ C.R./557/1996 गायत्री टॉवर, क्वेटा कॉलिनी, नागपूर तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष व विरुध्दपक्ष क्रं-2) संचालक मंडळ यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) “विरुध्दपक्षानां” आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास कर्जाची रक्कम रुपये-30,000/- कर्ज दिल्याचा दिनांक-21.10.2002 पासून ते शेवटचा हप्ता दिनांक-02.05.2008 पर्यंत जी काही रक्कम कर्ज परतफेडीपोटी जमा केलेली आहे, त्यावर सहकार कायद्दातील तरतुदी नुसार/ कर्ज करारा प्रमाणे विरुध्दपक्ष संस्थेला घेणे असलेले व्याज याचा संपूर्ण हिशोब तयार करावा तसेच असा हिशोब तयार करताना त्यात कोणत्याही दंडाच्या वा अतिरिक्त रकमा लावण्यात येऊ नये व तो हिशोब विरुध्दपक्ष पतसंस्थेवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या सहकार विभागातील सक्षम लेखा अधिका-यां कडून/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कडून प्रमाणित करावा व त्यानंतर तो हिशोब तक्रारकर्त्याला द्दावा व त्याने जास्तीची रक्कम भरली असल्यास त्यास जास्तीची रक्कम परत करण्यात यावी व त्याचे कडून काही रक्कम घेणे असल्यास त्या प्रमाणे मागणी करावी. तक्रारकर्त्या कडून हिशोबा प्रमाणे येणे असलेली रक्कम मिळाल्या वर विरुध्दपक्ष चिंतेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेने त्यास ना-देय-प्रमाणपत्र द्दावे.
(03) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे नमुद पदाधिका-यांनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष पतसंस्था व तिचे पदाधिकारी यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) विरुध्दपक्ष पतसंस्थेवर सहकार विभागातील ज्या कार्यालयाचे नियंत्रण आहे, त्या विभागातील सक्षम लेखाधिकारी यांनी या प्रकरणात तक्रारकर्त्याने घेतलेली कर्ज रक्कम रुपये-30,000/- आणि परतफेडीचा कालावधी दिनांक-21.10.2002 ते दिनांक-02.05.2008 पर्यंत त्याने कर्ज परतफेडीपोटी भरलेली रक्कम व कर्ज करार/सहकार पतसंस्थेच्या नियमा प्रमाणे नमुद कालावधील देय व्याज या संबधीचा हिशोब प्रमाणित करुन द्दावा.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.