(द्वारा मा. सदस्य – श्री. ना.द.कदम)
1. प्रस्तुत प्रकरणातील सामनेवाले 1 हे इमारत बांधकाम व्यावसायिक आहेत. सामनेवाले 2 व 3 यांना वगळण्यात आले आहे. तक्रारदरांनी सामनेवाले 1 यांच्याशी केलेल्या खोली खरेदी व्यवहारातुन प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले 1 यांच्या मालकीची, ग्राम पंचायत म्हारळ गांव येथील पाण्याच्या टाकीजवळील चाळीमधील खोली क्र. 4, क्षेत्रफळ 280 चौ.फुट, ही खोली तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांचे कडुन रु. 6 लाख किंमतीस विकत घेण्याचा व्यवहार करुन रु. 2 लाख सामनेवाले 1 यांना दिली व उर्वरित रक्कम रु. 4 लाख दि. 08/04/2014 रोजी देवुन खोलीचा ताबा देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले व याबाबतचा नोटराईज्ड करारानामा दि. 09/01/2014 रोजी करण्यात आला. त्यानुसार, तक्रारदारांनी दि. 08/04/2014 रोजी उर्वरित रक्कम न दिल्यास तक्रारदारांनी दिलेली बुकींग रक्कम रु. 2 लाख परत दिली जाणार नाही ही बाब तक्रारदारांनी मान्य केली होती. शिवाय, सदर खोली दि. 08/04/2014 पुर्वी सामनेवाले यांनी अन्य व्यक्तिस विकल्यास, तक्रारदाराची रक्कम रु. 2 लाख व नुकसान भरपाई रु. 2 लाख सामनेवाले यांनी तक्रारदारांना देण्याचे मान्य केले होते. सदर शर्ती व अटी उभय पक्षांनी मान्य केल्या असतांना, सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकलेली खोली पद्मावती गवळी या महिलेस विेकली. या गोष्टींचा जाब विचारण्यास तक्रारदार आपल्या पतीसह गेल्या असता, त्यांना शिवीगाळ करण्यात आली व तक्रारदाराची रक्कम रु. 2 लाख ही परत करण्यास नकार दिला. यानंतर सामनेवाले विरुध्द पोलीसांमध्ये तक्रार केली त्याबाबतची फोजदारी केस अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. सामनेवाने यांना अनेक वेळा मागणी करुनही खोली दिली नाहीच, शिवाय, रक्कम रु. 2 लाख ही परत केलेली नसल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांचेकडुन रक्कम रु. 2 लाख व नुकसान भरपाई रु. 2 लाख व तक्रार खर्च मिळावा अशा मागण्या प्रस्तुत तक्रारीद्वारे केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना पाठविलेली तक्रारीची नोटिस ‘अनेक्लेम्ड’ या पोस्टल शे-यासह मंचामध्ये परत असल्यानंतर तक्रारदारांनी सर्विस अफिडेव्हीट दाखल केले. सामनेवाले यांना यानंतर अनेकवेळा संधी देवुनही त्यांनी लेखी कैफियत दाखल न केल्याने, तक्रारदारांनी सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यासाठी अर्ज दाखल केला. तक्रारदाराचा अर्ज मंजुर करुन सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद केला. तोंडी युक्तिवादाची पुर्सिस दिली. तक्रारदाराची तक्रार, शपथेवर दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणामध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ)तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल केलेला, सामनेवाले 1 यांचे बरोबर दि.09/01/2014 रोजी केलेल्या खोली खरेदी विक्रीचा साठे करारानाम्याचे सखोल वाचन मंचाने केले. त्यावरुन असे स्पष्ट होते की, ग्रामपंचायत म्हारळ गांव, पोष्ट वरप, ता. कल्याण येथील एका चाळीमधील सामनेवाले 1 यांच्या मालकीची 280 चौ.फुट क्षेत्रफळाची खोली तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांचे कडुन रु. 6 लाख या किमतीस विकत घेवुन रु. 2 लाख बयाना रक्कम दि. 09/01/2014 रोजी सामनेवाले यांना दिली व त्याची पोच सामनेवाले यांनी करारनाम्यात दिली आहे. उर्वरित रक्कम रु. 4 लाख, दि.08/04/2014 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना देवुन त्याच वेळी खोलीचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदारांना देण्याचे उभय पक्षी करारनाम्याद्वारे मान्य करण्यात आले होते.
ब) सदर करारनाम्यातील अन्य तरतुदीनुसार, तक्रारदारांनी नमुद कालावधीमध्ये उर्वरित मुल्य रु. 4 लाख न दिल्यास बयाना रु. 2 लाख रद्द करण्याचा सामनेवाले यांना अधिकार आहे, तर, सामनेवाले यांनी ताबा न दिल्यास बयाना रक्कम रु. 2 लाख व नुकसान भरपाई 2 लाख देण्याचे सामनेवाले यांनी मान्य केले आहे.
क) तक्रारदाराच्या कथनानुसार, उर्वरित रक्कम सामनेवाले यांना देवु करुन, खोलीचा ताबा मागितला असता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकलेली खोली अन्य व्यक्तिस विकल्याने, त्यांनी ताबा देण्यास नकार दिला. एवढेच नव्हेतर, तक्रारदारांची बयाना रक्कमही परत देण्यास नकार दिला. त्याशिवाय तक्रारदार व त्यांच्या पतीना शिवीगाळ केल्याची बाब तक्रारदारांनी शपथेवर नमुद केली आहे.
ड) उपलब्ध कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराशी खोली विक्री व्यवहार करुन रु. 2 लाख स्वीकारुन तसचे लिखित विक्री करारनामा करुनही तक्रारदारांना विकलेली खोली अन्य व्यक्तिस विकुन पर्यायाने तक्रारदारास खोली न देवुन तसेच बयाना रक्कम परत करण्यास नकार देवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. त्यावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
5. सामनेवाले यांना नोटिस प्राप्त होवूनही ते गैरहजर राहिल्याने तक्रारदाराची सर्व कथने अबाधित राहतात.
आदेश
1) तक्रार क्रमांक 166/2015 अंशतः मान्य करण्यात येते.
2) सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांशी केलेल्या खोली विक्री व्यवहारामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले 1 यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम रु. 2,00,000/- (रक्कम रु. दोन लाख फक्त) दि.09/01/2014 पासून 12% व्याजासह दि. 30/04/2017 पुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी. आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 09/01/2014 पासून 15% व्याजासह सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावी.
4) तक्रार खर्चाबद्दल रु. 10,000/- (अक्षरी रू. दहा हजार फक्त) सामनेवाले 1 यांनी दि. 30/04/2017 पुर्वी तक्रारदारांना द्यावी.
5) सामनेवाले 2 व 3 यांचे विरुध्द कोणतीही आदेश नाहीत.
6) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल विनाविलंब पाठविण्यात याव्यात.