::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्रीमती रोहीणी कुंडले, मा.अध्यक्षा) (पारीत दिनांक –14 सप्टेंबर, 2012 ) त.क. व त्यांचे वकिल गैरहजर. लेखी युक्तिवाद रेकॉर्डवर दाखल आहे. विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री सोलट हजर. त्यांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तक्रारीवर निर्णय देण्यात येतो. 1) तक्रारकर्ते जयंत सुब्बाराव नियोगी यांनी वादग्रस्त प्लॉटचे खरेदी खत करुन मिळावे अथवा रक्कम परत मिळावी- यासाठी मंचात तक्रार दाखल केली आहे. 2) हे मंच सुरुवातीलाच आपला निष्कर्ष नोंदविते की, सदर तक्रार न्यायमंचात दाखल करण्यासाठी तक्रारकर्त्याला Locus नाही. तक्रार मुदतबाहय आहे. 3) तक्रार थोडक्यात तक्रारकर्त्याचे मित्राने (श्री जॉर्ज) विरुध्दपक्षाकडे संपूर्ण रक्कम रुपये-16,500/- प्लॉट खरेदीसाठी भरले. परंतु श्री जॉर्ज यांना पैशाची गरज असल्याने त.क.ने, त्यांना भरलेली रक्कम रुपये-16,500/- नगदी दिली व श्री जॉर्ज यांनी वि.प.ला लेखी सांगितले की, खरेदीखत त.क.चे नावे करुन द्यावे. 4) त.क.ने, वि.प.कडे वारंवार प्लॉट खरेदीसाठी तगादा लावला. नोटीस दिली. पण वि.प.ने दाद दिली नाही म्हणून मंचात तक्रार दाखल केली. 5) त.क.ने श्री जॉर्ज यांच्या नावे रक्कम (हप्ता) भरल्याचे पासबुक, श्री जॉर्ज यांच्या नावे असलेला करारनामा, त.क.ने वि.प.ला दिलेली नोटीस इत्यादी दस्त दाखल केले आहेत. 6) त.क.ची मागणी (1) श्री जॉर्ज यांनी वि.प.कडे भरलेली रक्कम रुपये-16,500/- च्या बदल्यात त.क.ला खरेदीखत करुन मिळावे. अथवा श्री जॉर्ज यांनी भरलेली रक्कम रुपये-16,500/- 18% व्याजासहित वि.प.ने त.क.ला परत करावी. (2) शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.-25,000/- मिळावी. (3) तक्रार खर्च रुपये-1000/- मिळावा. 7) वि.प.च्या उत्तरा नुसार- तक्रार अदखपात्र, निरर्थक, निराधार आणि मुदतबाहय असल्या बद्यल प्राथमिक आक्षेप आहेत. वि.प.म्हणतात उपरोक्त व्यवहार सन 1992 मध्ये झाला आहे, असे तक्रारी वरुन दिसते आणि 20 वर्षाच्या दिर्घ काळा नंतर त.क.ने तक्रार दाखल केली आहे, ती ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 24-अ अन्वये मुदतबाहय ठरते. तक्रारकर्ता हा वि.प.चा "ग्राहक" ठरत नाही कारण उभयतांमध्ये प्लॉटच्या संबधाने कोणताही लेखी/तोंडी/नगदी व्यवहार झालेला नाही. तक्रारकर्ता व वि.प.यांच्यात व्यवहार झाल्या बद्यल एकही दस्त त.क.ने अभिलेखावर दाखल केला नाही. तक्रार खोटी व बनावट आहे म्हणून ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 26 अंतर्गत त.क. कारवाईस पात्र ठरतो. वि.प.चा व्यवसाय भूखंड खरेदी विक्रीचा नाही. तक्रारकर्ता व त्याचा तथाकथीत मित्र श्री जॉर्ज यांच्यात झालेल्या व्यवहारा बद्यल वि.प.ला माहिती नाही. श्री जॉर्ज यांनी वि.प.शी भूखंड खरेदी बाबत कोणताही व्यवहार केला नाही वा रक्कम भरली नाही. वि.प.ला त.क. कडून कोणतीही नोटीस मिळाली नाही. या तक्रारीचे माध्यमातून तक्रारकर्ता, विल्सन जॉर्ज यांनी 1992 साली कथितपणे भरलेल्या रकमेची अथवा प्लॉटची मागणी करतो, ही बाब फारच अतर्क्य आहे. सबब तक्रार भारी खर्चासहित खारीज करण्याची विनंती वि.प. करतात. 8) मंचाने रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली. ::निरिक्षणे व निष्कर्ष:: 9) त.क.ने वादग्रस्त प्लॉट-संबधाने "बयाना पावती" दि.14.06.1992 दाखल केली आहे. त्यावरुन हा व्यवहार रुपये-5000/- बयाणा देऊन विल्सन जॉर्ज व विरुध्दपक्ष यांच्यात झाला असे दिसते. यातच परिच्छेद 3 मध्ये विल्सन जॉर्जने दरमहा रुपये-500/- प्रमाणे 20 किश्ती भराव्या, अशी संपूर्ण रक्कम भरल्या नंतर प्लॉटचे रजिस्ट्रेशन " तुमचे नावानी किंवा सांगाल त्या नावानी आम्ही करुन देऊ" असे नमुद आहे. पुढे त.क.ने दि.13.05.96 रोजीचे-विल्सन जॉर्जच्या सहीने कथित पत्र रेकॉर्डवर दाखल केले ते पुढील प्रमाणे- Dt-13.5.96 To M/s Nerkar Developer”s & Builders NAGPUR. D/Sir, “ I the undersigned plot holder of plot No.18 in KH.No.138 of village Kalkuhi Tah/Dist.Nagpur,hereby request you to make the registry of my above plot No.18 in the name of Mr.Jayant Subbarao Niyogi. I have received the full payments & nothing is due”. Thanking you. Yours faithfully, Wilson George दि.14.06.92 च्या विल्सन जॉर्ज व वि.प.यांच्यातील कथित व्यवहाराच्या बयाणा पावती मधील परिच्छेद 3- "प्लॉटचे रजिस्ट्रेशन" तुमचे नावानी किंवा सांगाल त्या नावानी आम्ही करुन देऊ" आणि दि.13.5.96 ही तारीख असलेले कथितपणे विल्सन जॉर्ज यांनी वि.प.ला त.क.च्या नावे प्लॉट खरेदी करुन द्यावा- असे विनंती पत्र- हे दोन्हीही मंचाला अजिबात ग्राहय वाटत नाहीत. मूळात-विल्सन जॉर्ज व विरुध्दपक्ष यांच्यात प्लॉट बाबत जरी काही व्यवहार 92 साली झाला असेल तरीही तक्रारकर्त्याला त्या आधारावर वि.प.कडून प्लॉट अथवा रक्कम-मागण्याचा अधिकार पोहोचत नाही. (Locus नाही) तक्रारकर्त्याने विल्सन जॉर्ज यांचे शपथपत्र रेकॉर्डवर दाखल केले नाही. विरुध्दपक्षाने उपस्थित केलेल्या प्राथमिक आक्षेपात मंचाला तथ्य वाटते. सन 92 सालचा कथित व्यवहार-ज्याच्याशी त.क.चा काहीही संबध नाही, त्यानंतर (चार वर्षानंतर) सन 96 सालचे कथित पत्र जे-विश्वासार्ह नाही-आणि या दोन्हीच्या आधारावर दि.24.01.2012 रोजी दाखल केलेली तक्रार-मंचाला अजिबात ग्राहय वाटत नाही. सबब आदेश ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार प्रथमतः त.क.ला Locus नाही म्हणून व पुढे मुदतबाहय म्हणून –ताबडतोब खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क देण्यात यावी. (श्रीमती रोहीणी कुंडले) | (श्रीमती अलका पटेल) | (श्रीमती गीता बडवाईक) | प्रभारी अध्यक्षा | प्रभारी सदस्या | प्रभारी सदस्या | अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर |
|