निकालपत्र :- (दि.11/11/2010) ( श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 13 व 14 यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र. 2 ते 12 हे वकीलांमार्फत हजर झाले. परंतु त्यांना संधी देऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले नाही. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराने स्वत: युक्तीवाद केला. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत लक्षाधिश ठेव पावती क्र.9735 व 9736 अन्वये प्रत्येकी रक्कम रु.2,501/- दि.01/01/2001 रोजी 25 वर्षे 7 महिने कालावधीकरिता ठेवले होते. सदर ठेवीची मुदत दि.01/08/2025 अखेर होती. मुदतीनंतर रक्कम रु.1,00,000/- प्रत्येकी मिळणार होते. तसेच संजय देवगोंडा पाटील यांचे 4 मुदत बंद ठेवपावत्या मोडून त्याची रक्कम त्यांचे बचत खाते क्र.948 वर रक्कम रु.95,266/- व श्रेणीक देवगोंडा पाटील यांचे बचत खाते क्र.1402 वर रक्कम रु.80,921/- वर्ग केली. सदर वर्ग झालेल्या रक्कमा बचत खात्यावरुन काढणेस प्रतिबंध केला. तसेच लक्षाधिश ठेव पावतीवरीलही रक्कम मुदतपूर्व मागणी केली असता ती दिली नाही. तक्रारदारांनी दि.25/09/2009 रोजी सामनेवाला यांचेकडे लेखी मागणी केली तरीही सामनेवाला संस्थेतर्फे उत्तरही दिले नाही किंवा तक्रारदारांना त्यांच्या रक्कमाही परत केलेल्या नाहीत. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची ठेवीची व बचत खातेवरील रक्कम व्याजासह परत न करता आर्थिक, मानसिक नुकसान केले आहे. यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्या लक्षाधिश ठेव रक्कमा व बचत खातेवरील रक्कमा व्याजासहीत परत करण्यास जबाबदार आहेत.सबब तक्रारदारांनी ठेवीची रक्कम रु.2,501/- प्रत्येकी व त्यावरील व्याज तसेच श्री संजय देवगोंडा पाटील यांचे बचत खाते क्र.948 वरील रक्कम रु.95,266/- व श्री श्रेणीक देवगोंडा पाटील यांचे बचत खाते क्र.1402 वरील रक्कम रु.80,921/- व्याजासहीत मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रु.15,000/-व कोर्टखर्च,पत्रव्यवहार, प्रवासखर्चासाठी रक्कम रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळणेकरिता या मंचासमोर सदरील तक्रार अर्ज दाखल केला आहे. (03) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत लक्षाधिश ठेव पावत्यांच्या प्रती, बचत खात्याच्या पासबुकाच्या उता-याची प्रत, सामनेवाला यांना रक्कम मागणीबाबत दिलेले पत्र, विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था,कोल्हापूर यांचेकडील सामनेवाला यांचे संचालकांची यादी इ.कागदपत्रे जोडलेली आहेत व शपथपत्र दाखल केलेले आहे. (04) सामनेवाला क्र.1, 13 व 14 यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. तसेच सामेनवाला क्र.2 ते 12 हे सदर कामी वकीलामार्फत हजर झाले आहेत. परंतु त्यांना संधी देऊनही त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या लक्षाधिश ठेव पावतीची मुदतपूर्व मागणी करुनही तसेच बचत खातेवरील रक्कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच सामनेवाला क्र.2 ते 12 यांनी सदर प्रकरणी आपले म्हणणे वेळेत दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांचा तक्रार अर्ज मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब सामनेवाला क्र. 1 ते 13 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 हे सामनेवाला संस्थेचे जनरल मॅनेजर म्हणजे सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या मुदत बंद ठेव पावत्यांवरील रक्कम व बचत खातेवरील शिल्लक व्याजासह परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (05) तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा साकल्याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे लक्षाधिश ठेव स्वरुपात रक्कम ठेवल्याचे निदर्शनास येते. तथापि, सदर ठेव पावत्यांवरील रक्कमेची मुदत पूर्व मागणी करुनही तसेच बचत खातेवरील शिल्लक रक्कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कम परत न केल्याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (06) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टी प्रित्यर्थ दाखल केलेल्या लक्षाधिश ठेव पावत्यां क्र.9735 व 9736 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्यांची मुदत दि.01/08/2025 रोजी संपणार असलेचे दिसून येते.म्हणजेच सदर ठेव पावत्यांच्या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्या नाहीत असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमांची मुदतपूर्ण मागणी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमा या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची लेखी मागणी केलेली तारीख 25/09/2009 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या रिझर्व बँकेच्या प्रचलित व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजा जाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (07) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कम असल्याचे दिसून येते. सबब तक्रारदार श्री संजय देवगोंडा पाटील यांचे सेव्हींग खाते क्र.948 वर रुपये 95,266/- इतकी रक्कम दि.30/09/09 अखेर जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर सेव्हींग खात्यावरील रक्कम दि.30/09/09 पासुन ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदार श्री श्रेणीक देवगोंडा पाटील यांचे सेव्हींग खाते क्र.1402 वर रुपये 80,921/- इतकी रक्कम दि.30/09/09 अखेर जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर सेव्हींग खात्यावरील रक्कम दि.30/09/09 पासुन ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व सदर रक्कम सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.14 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र. 1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना लक्षाधिश ठेव पावत्यां क्र.9735 व 9736 वरील प्रत्येकी रक्कम रु.2,501/-(रु.दोन हजार पाचशे एक फक्त प्रत्येकी) त्वरीत अदा करावी व सदर रक्कमांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची लेखी मागणी केलेली तारीख 25/09/2009 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या रिझर्व बँकेच्या प्रचलित व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजा जाता होणारे व्याज अदा करावे. तदनंतर म्हणजे दि.01/10/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांचे बचत खाते क्र.948 वरील रक्कम रु.95,266/-(रु.पंच्यान्नव हजार दोनशे सासष्ट फक्त) व बचत खाते क्र.1402 वरील रक्कम रु.80,921/-(रु.ऐंशी हजार नऊशे एकवीस फक्त) त्वरीत अदा करावी. सदर रक्कमांवर दि.30/09/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज अदा करावे. 4) सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |