(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांना सामनेवाले प्रोप्रायटरी फर्म श्री. दुर्गा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांचे सर्व्हे नं. 13, हिस्सा नं. 1, ग्राम पंचायत नांदीवली तलावाजवळ, हाजी मलंग रोड, नांदीवली बसस्टॉप जवळ, कल्याण पुर्व येथील इमारतीच्या बांधकामा बाबतची माहीती झाली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर मिळकतीत ‘हनुमान नगर’ या नावाच्या चाळीचे बांधकामाबाबत माहीती देवुन सदर इमारतीतील खोली विक्रीचे काम चालु असल्याचे सांगितले.
2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या सदर चाळीचे बांधकाम अधिकृत जागेवर असल्याची खात्री करुन घेण्यासाठी मिळकतीच्या पेपर्सची मागणी केली असता सामनेवाले यांनी जाणीवपुर्वक हनुमान चाळीच्या ऐवजी दुस-या जागेचे पेपर्स दिले होते. सामनेवाले यांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार इ्रमारतीचे बांधकाम अधिकृत असल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या मौ. नांदीवली येथील नांदिवली तलावाजवळ हाजी मलंग रोड, नांदीवली बस स्टॉप जवळ, कल्याण हनुमान चाळीतील चाळ नं. 2 येथील अंदाजे 200 चौ.फुट बिल्टअप रुम नं. 10 रक्कम रु. 2,30,000/- किमतीची ता. 30/04/2012 रोजी नोटरी समक्ष केलेल्या खरेदीखत करारानुसार विकत घेतली. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर खोली खरेदीपोटी संपुर्ण रक्कम रु. 2,30,000/- रोख स्वरुपात अदा केली असुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना फक्त रु.2,00,000/- एवढया रकमेच्या पोच पावत्या दिल्या आहेत. सामनेवाले यांनी उर्वरित रु.30,000/- रकमेची पावती नंतर देण्याचे आश्वासन दिले परंतु आजतागायत सदर रकमेची पावती दिली नही.
3. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या सदर खोलीच्या चाळीचे बांधकामाबाबत चौकशी करण्यासाठी प्रत्यक्ष साईट वर जावुन पाहणी केली असता नांदीवली ग्राम पंचायतीने चाळीचे बांधकाम अनाधिकृत जागेवर केल्याचे कारणास्तव पाडुन टाकल्याचे निदर्शनास आले.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दुस-या ठिकाणी खोली देण्याचे आश्वासन दिले. सामनेवाले यांनी दाखवलेल्या दुस-या जागा तक्रारदार यांना न आवडल्याने सामनेवाले यांचेकडे खोली खरेदी पोटी जमा असलेल्या रकमेची सातत्याने मागणी केली असता सामनेवाले यांनी अखेर शेवटी तक्रारदार यांना रक्कम रु. 2,00,000/- चेक द्वारे अदा केली. तथापी सदर चेक वटविण्यासाठी बँकेत जमा केला असता सदर चेक सामनेवाले प्रोप्रायटरी फर्मच्या खात्यामध्ये कमी रक्कम असल्याने न वटता परत आला. सदरची बाब सामनेवाले यांना ज्ञात असुनही त्यांनी दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी या संदर्भात सामनेवाले यांना ता. 20/07/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवुनही तक्रारदारांनी खोली खरेदी पोटी जमा केलेली रक्कम सामनेवाले यांनी परत केली नाही.
5. सामनेवाले यांनी पाठवलेली मंचाची नोटीस “Unclaimed” या शे-यासह परत आली असुन तक्रारदार यांनी सामनेवाले तक्रारीतील नमुद पत्यावर राहतात याबाबत सर्विस अफिडेव्हिट दाखल केले. सामनेवाले मंचाची नोटीस प्राप्त होवुनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याबाबतचा आदेश ता. 23/02/2017 रोजी पारित झाला आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्र, पुरावा शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे व पुरावा शपथपत्र हाच त्यांचा लेखी व तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुरशिस दिली. सबब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रकरण अंतीम आदेशासाठी नेमण्यात आले. यावरुन मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | सामनेवाले यांनी खोली खरेदीपोटी तक्रारदारांकडून रक्कम स्विकारुनही खोलीचा ताबा न देऊन अथवा खोली खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम परत न देऊन तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय? | होय |
2. | तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश? | निकालाप्रमाणे |
7. कारण मिमांसा
अ) तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले बाबु दामजी चव्हाण श्री. दुर्गा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे प्रोप्रायटर आहेत.
ब) तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये ता. 30/04/2012 रोजी रक्कम रु. 100/- स्टॅुंम्प पेपरवर नोटरी समक्ष ‘कायम खरेदीखत’ करार झाला आहे. सदर कराराची प्रत मंचात दाखल आहे.
क) वर नमुद केलेल्या ता. 30/04/2012 रेाजीच्या करारानुसार मौ. नांदिवली सर्व्हे नं. 13, हिस्सा नं. 1 मिळकतीत बांधकाम केलेल्या हनुमान नगर येथील चाळ नं. 3, रुम नं. 10, क्षेत्रफळ 200 चौ.फुट (बिल्ट-अप) रक्कम रु. 2,30,000/- एवढया किमतीची सामनेवाले यांनी तक्रारदारांना विक्री करण्याचे निश्चित केले आहे. सदर करारातील पान क्र. 12, परिच्छेद क्र. अ मध्ये नमुद केल्यानुसार सामनेवाले यांनी सदर खोलीची पुर्ण रक्कम रु. 3,30,000/- ता. 05/04/2012 रोजी प्राप्त झाल्याचे नमुद केले आहे.
ड) तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे सदर खोली खरेदीपोटी रक्कम जमा केल्याबाबतच्या पोचपावत्यांच्या प्रती खालीलप्रमाणे मंचात दाखल केल्या आहेत.
अनु. क्र. पावती क्र. तारीख रक्कम
1 353 18/03/2012 50,000/-
2 377 11/03/2012 50,000/-
3 142 25/03/2012 40,000/-
4 265 08/04/2012 40,000/-
5 317 06/05/2012 30,000/-
एकुण 2,00,000/-
तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार रोख रक्कम रु. 30,000/- सामनेवाले यांना सदर खोली खरेदीपोटी अदा करुनही त्यांनी सदर रकमेची पावती तक्रारदार यांना दिली नाही. सामनेवाले तर्फे आक्षेप दाखल नाही, तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे. तसेच सामनेवाले यांनी ता. 30/04/2012 रोजीच्या करारामध्ये तक्रारदार यांच्या कडुन सदर खोली खरेदी पोटी संपुर्ण रक्कम रु. 2,30,000/- ता. 05/04/2012 रोजी प्राप्त झाल्याचे नमुद केले आहे.
इ) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांना खोली खरेदीचे वेळी दुस-या ईमारतीच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे दाखवली. सामनेवाले यांनी दाखवलेल्या कागदपत्रांनुसार इमारतीचे बांधकाम अधिकृत होते. तथापी सामनेवाले यांनी बांधकाम केलेल्या हनुमान नगर येथील चाळीचे बांधकाम अनाधिकृत असल्याने संबंधित ग्रामपंचायतीने पाडुन टाकले आहे. सामनेवाले यांनी अन्य ठिकाणी तक्रारदार यांना खोली देण्याचे आश्वासन दिले. तथापी तक्रारदार यांना त्या जागा पसंद पडल्या नसल्याने खोली खरेदीपोटी जमा केलेल्या रकमेची सातत्याने मागणी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे कडे केली असता सामनेवाले यांनी रु. 2,00,000/- रकमेचा चेक तक्रारदार यांना दिला असुन तक्रारदार यांनी सदर चेक वटवण्यासाठी बँकेत टाकला असता न वटता परत आला. तक्रारदार यांनी या संदर्भातील माहीती सामनेवाले यांना ता. 20/07/2015 रोजी कायदेशीर नोटिस पाठवली. परंतु सामनेवाले यांनी सदर रक्कम तक्रारदार यांना अद्याप पर्यंत परत दिली नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठवलेल्या नोटिसची प्रत मंचात दाखल आहे. सामनेवाले यांनी सदर नोटिसची सुचना प्राप्त होवुन स्विकारली नाही सबब ‘IMT’ या ता. 23/07/2015 रोजीच्या शे-यासह न बजावता परत आल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांनी खरेदीखत करार नोंदणीकृत न करता तक्रारदार यांच्या कडुन मोठया प्रमाणावर रक्कमा स्विकारुन खोलीचा ताबा न देवुन तसेच तक्रारदार यांचा कष्टाचा पैसा परत न देवुन त्रृटींची सेवा दिल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता. 30/04/2012 रोजीच्या कराराप्रमाणे संपुर्ण रक्कम स्विकारुन ही खोलीचा ताबा अथवा खोली खरेदी पोटी स्विकारलेली रक्कम न दिल्यामुळे तक्रारदार यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सन 2012 नंतरच्या कालावधीत नविन खोलीच्या किंमतीमध्ये निश्चितच खुप जास्त भाववाढ झाली आहे. तसेच तक्रारदार यांच्या कष्टाचा पैसा (Hard Money) परत न दिल्यामुळे त्यांना नविन खोली घेणे शक्य झाले नसल्याचे तक्रारी मधील पुराव्यावरुन स्पष्ट होते. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता. 06/05/2012 पासून आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे व्याजदरासह खोली खरेदीपोटी स्विकारलेली रक्कम रु. 2,30,000/- परत देणे योग्य आहे तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या त्रृटीच्या सेवेमुळे झालेलया आर्थिक, शारिरीक व मानसिक नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 25,000/- तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देणे उचित आहे असे मंचाचे मत आहे.
ई) वरील परिस्थितीनुसार तक्रारदारांचा पुरावा मान्य करण्यास कोणतीही कायदेशिर अडचण दिसुन येत नाही. सामनेवाले यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही सबब तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे.
उ) तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदर खोली खरेदी पोटी एकुण रक्कम रु. 2,30,000/- अदा केल्याची बाब ता. 30/04/2012 रोजीच्या कायम खरेदीखत करारनाम्यावरुन तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्या रकमेच्या पोच पावत्या वरुन स्पष्ट होते.
ऊ) तसेच सामनेवाले यांनी ता. 30/04/2012 रोजीच्या करारनाम्यान्व्ये खोलीचा ताबा दिल्याचे नमुद करुन प्रत्यक्षात तक्रारदार यांना ताबा दिलेला नाही. ईमारतीचे बांधकाम अनाधिकृत असल्यामुळे पाडुन टाकण्यात आले असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना खोलीच्या रकमेपैकी रु.2,00,000/- रकमेचा ता. 05/03/2015 रोजीच्या चेक दिल्याचे तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठवलेल्या ता. 20/07/2015 रोजीच्या नोटिस मध्ये नमुद केल्याचे दिसुन येते. तथापी सदर चेक बँकेत न वटता परत असल्यामुळे तक्रारदारी यांना सदर रकमही परत मिळाली नसल्याचे दिसून येते त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 2,30,000/- परत देणे न्यायोचित आहे.
तक्रारदारांनी त्यांचे समर्थनार्थ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या -
Lata Construction and others
V/s.
Dr. Ramesh Chandra Ramniklal Shah
प्रकरणामध्ये ता. 12/08/1999 रोजी दिलेल्या न्यायनिवाडा प्रस्तुत तक्रारीमध्ये दाखल केला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचा वर नमुद केलेला न्यायानिवाडा प्रस्तुत तक्रारीमध्ये लागू होतो असे मंचाचे मत आहे.
8. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे. . “या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .”
आदेश
1. तक्रार क्र. 934/2015 अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना समझोता करारानुसार खोलीचा ताबा अथवा खोली खरेदी पोटी स्विरकालेली रक्कम परत न देऊन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 2,30,000/- (रक्कम रु. तीन लाख तीस हजार फक्त) ता. 06/05/2012 पासून ता. 31/05/2017 पर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजदराने द्यावी. विहीत मुदतीत सदर रक्कम अदा न केल्यास ता. 01/06/2017 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे 15% व्याज दराने द्यावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- (अक्षरी रु. पंचवीस हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) ता. 31/05/2017 पर्यंत द्यावी. विहीत मदतीत रक्कम अदा न केल्यास दि. 01/06/2017 पासून द.सा.द.शे 9% व्याज दराने द्यावी.
5. आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल विनाविलंब पाठविण्यात याव्यात.
6. संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.