Exh.No.14
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.20/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि.01/08/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि.26/11/2013
श्री महादेव वसंत सुकी
वय 54 वर्षे, सेवानिवृत्त सैनिक,
भारतीय भू-दल पेंशनर,
ई-134- ड, शिल्पग्राम जवळ,
नवीन खासकीलवाडा, सावंतवाडी,
तालुका-सावंतवाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग
पिन-416510 ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री अरुण संभाजी चौगुले
मुख्य प्रशासक/सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, दोडामार्ग, ता.दोडामार्ग,
जि.सिंधुदुर्ग, पिन -416512
2) सदस्य, श्री कृ. ल. देसाई
मु.पो.बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
पिन- 416510
3) सदस्य, श्री एम.पी. पाटील
वसुली अधिकारी, जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण
बहुविकास बँक लि.सिंधुदुर्ग-ओरोस
4) समिती सदस्य सचिव,
श्री डी.बी. वाघमारे, उपलेखापरिक्षक,
सहकारी संस्था, वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग
5) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी
लि.बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
पिन क्र.416510 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदार- स्वतः
विरुद्ध पक्ष क्र.1 ते 4 – स्वतः
विरुध्द पक्ष क्र.5 एकतर्फा गैरहजर.
निकालपत्र
(दि.26/11/2013)
श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या, विरुध्द पक्ष यांच्या बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि, बांदा, ता.सावंतवाडीच्या सावंतवाडी शाखेमध्ये ठेवलेल्या ठेवींची मुदत संपूनही विरुध्द पक्षाने तक्रारदारास संपूर्ण रक्कमा अदा केल्या नाहीत, म्हणून रक्कमा व्याजासह वसूल होऊन मिळणेसाठी तक्रारदाराने तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेच्या सावंतवाडी शाखेमध्ये मुदत ठेवी स्वरुपात रक्कमा गुंतविलेल्या होत्या त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.
परिशिष्ट ‘अ’
पावती क्रमांक | दिनांक | रक्कम (रुपयात) | मुदत पूर्ण झाल्याचा दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम (रुपयात) |
825 | 05/07/2003 | 48,000/- | 05/01/2009 | 48,000/- + 13 % व्याज |
443 | 15/02/2005 | 50,000/- | 15/02/2011 | 1,00,000/- |
444 | 15/02/2005 | 50,000/- | 15/02/2011 | 1,00,000/- |
3) वरीलप्रमाणे रक्कमा ठेवी स्वरुपात तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचे सावंतवाडी शाखेकडे गुंतविल्या होत्या. सदर ठेवींची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी विरुध्द पक्ष यांच्या पतसंस्थेत जाऊन रक्कमांची मागणी केली तसेच लेखी अर्जाद्वारे देखील रक्कमांची मागणी केली; परंतु विरुध्द पक्ष यांनी सदर रक्कमांपैकी दि.08/10/2012 रोजी रक्कम रु.2,000/- व दि.03/10/2013 रोजी म्हणणे तक्रार दाखल केलेनंतर रक्कम रु.500/- असे एकूण रु.2500/- (रुपये दोन हजार पाचशे मात्र) तक्रारदार यांस दिले. उर्वरित रक्कम विरुध्द पक्षाने तक्रारदारास अदा केली नाही.
4) तक्रारदार हे भारतीय भूदलातून सेवानिवृत्त झालेले असून त्यांना दोन मुली आहेत. त्यांचे वय अनुक्रमे 23 वर्षे व 18 वर्षे असे आहे. त्यांचे शिक्षण व विवाह याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे. त्यामुळे त्यांनी मुदत ठेवीमध्ये विरुध्द पक्ष पतसंस्थेकडे ठेवलेल्या रक्कमांची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. मुदत ठेवींची मुदत संपून देखील व पैशाची आवश्यकता असूनही रक्कम मिळत नसल्याने त्यांनी शारीरिक व मानसिक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी विरुध्द पक्ष यांना कळवून देखील विरुध्द पक्षाने मुदत ठेवींच्या रक्कमा तक्रारदारास दिल्या नसल्यामुळे तक्रारदार यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
5) तक्रारदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ शपथपत्र तसेच नि.क्र.3 चे कागदाचे यादीलगत तीन ठेवपावत्या, माजी सैनिक असलेबाबत ओळखपत्र, विरुध्द पक्ष पतसंस्थेत दि.26/09/2009 व दि.05/07/2013 रोजी पाठविलेली नोटीसची स्थळप्रत व पोहोचपावती असे कागदपत्र दाखल केले आहेत.
6) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी आपले लेखी म्हणणे नि.10 वर दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रारदार यांची तक्रार चुकीची असल्यामुळे ती नाकारली आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.5 पतसंस्थेत मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतविली होती हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांनी वस्तुस्थिती या सदरात म्हटले आहे की, प्रशासक मंडळाचे कालावधीत वसुली रक्कमेतून ठेव वाटप धोरण ठरवून ठेवीदारांना ठेव वाटप सुरु आहे. त्या धोरणानुसार तक्रारदार यांना दि.7/10/2012 रोजी रु.2,000/- अदा करण्यात आलेले आहेत. प्रशासक मंडळाकडून कर्जवसूली करुन धोरणानुसार ठेव वाटप सुरु आहे. त्यामुळे एकाच ठेवीदाराची पूर्ण ठेव रक्कम अदा करणे तुर्तास शक्य होत नाही. या पुर्वी संस्थेने शासन अनुदानातून दि.11/2/2011 रोजी रु.50,000/- च्या आतील ठेवीदारांना प्रत्येकी रु.10,000/- अदा केले आहेत. त्यानंतर प्रशासक मंडळाचे नियुक्तीनंतर रु.50,000/- च्या आतील ठेवीदारांना प्रत्येकी रु.1,000/- व त्यावरील ठेव असणा-यांना प्रत्येकी रु.3,000/- व रु.5,000/- याप्रमाणे ठेव रक्कमा अदा केल्या आहेत. तसेच सध्या कर्जवसुलीचे काम सुरु असून वसुलीतून टप्याटप्याने ठेवीदारांची ठेव रक्क्म परत करण्याचे काम सुरु आहे.
7) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी त्यांचेविरुध्द केलेली कथने चुकीची आहेत जसजशी वसुली होईल तसतसे तक्रारदारासह अन्य ठेवीदारांच्या ठेवी टप्याटप्याने परत करण्यात येईल यामध्ये विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी कोणत्याही त-हेचा निष्काळजीपणा वा गलथानपणा केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांचेविरुध्दची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
8) विरुध्द पक्ष क्र.5 यांना नोटीसची बजावणी होऊनही ते हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
9) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे खुलासे व युक्तीवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? | अंतीम आदेशानुसार |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
- विवेचन –
10) मुद्दा क्रमांक 1- तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत नि.3 सोबत मुदत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. त्यावरुन तक्रारदार यांनी संस्थेकडे रक्कमा गुंतवल्या होत्या हे स्पष्ट आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी सदर बाब मान्य केली आहे. तक्रारदार यांनी सदर रक्कमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी रक्कमा दिल्या नाहीत.
11) वास्तविक कुठलाही ठेवीदार आपली रक्कम वेळेवर उपयोगी पडेल व पाहिजे त्यावेळी मिळेल या खात्रीने पतसंस्थेत रक्कम गुंतवत असतो. परंतु याठिकाणी तक्रारदार यांना संस्थेने त्यांच्या खात्यामध्ये रक्कम असतांनाही ती वेळेवर दिलेली नाही. आमच्या मते ही सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
12) मुद्दा क्रमांक 2 – तक्रारदार यांनी पतसंस्थेमध्ये गुंतवलेल्या रक्कमा विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 कडून वसूल होऊन मिळाव्यात अशी विनंती केली आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी सदर रक्कमा मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे सदर रक्कमा मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी आपल्या खुलाशात ते प्रशासकीय मंडळाचे सदस्य आहेत व त्यांनी नियमानुसार व धोरणानुसार वसुली व वाटपाचे काम चालू केले आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ सदर संस्था अडचणीत आल्यानंतर शासनाने त्यांना प्रशासक मंडळावर नियुक्त केले आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या रक्कम देण्यास जबाबदार ठरवता येणार नाही. तक्रारदार यांना ठेवीच्या रक्कमा देण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष 5 बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लि. ची आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 हे प्रशासकीय मंडळाचे सदस्य असल्याने संस्थेच्या वतीने संस्थेचे प्रतिनिधी म्हणून तक्रारदार यांची रक्कम देण्यास ते जबाबदार आहेत.
13) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांनी तक्रारदार यांची रक्कम कर्जदारांकडून वसूली केल्यानंतर देण्यात येईल परंतू तक्रारदाराने केलेली व्याजाची मागणी अवास्तव आहे असे म्हटले आहे. वरील म्हणणे पाहता तक्रारदाराने केलेल्या व्याजाची मागणी मान्य करता येणार नाही. तसेच सदर रक्कम देण्यास संस्थेस काही अवधी दयावा लागेल असे आम्हांस वाटते.
वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
अंतिम आदेश
- तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष 5 बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लि. बांदा यांनी तक्रारदार यांची निकालपत्राच्या परिच्छेद 2 मध्ये नमूद ठेवींची देय रक्कम व त्यावर देय दिनांका नंतर संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत 6% टक्के सरळव्याजदराने या आदेशाचे दिनांकापासून 90 दिवसांच्या आत तक्रारदारास दयावे.
3) विरुध्द पक्ष बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लि. यांनी तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल व प्रकरण खर्च मिळून रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार मात्र) या आदेशाचे दिनांकापासून 90 दिवसांच्या आत तक्रारदारास दयावी.
4) विरुध्द पक्ष बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लि. च्या वतीने तक्रारदारास यापूर्वी काही रक्कम व व्याज दिले असल्यास सदरची रक्कम त्यामधून वजा करण्यात यावी.
5) सदर आदेशाची अंमलबजावणी बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लि. व त्यांचे वतीने प्रशासकीय मंडळ/संचालक मंडळ यापैकी जे कोणी कार्यरत असतील यांनी करावयाची आहे.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 26/11/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.