निकालपत्र
(1) मा.अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके. – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली म्हणून नुकसानभरपाई मिळणे करिता, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचा धुळे येथे भगत हिअरींग हेल्थकेअर क्लिनीक या नावाने हिअरींग हेल्थकेअरचा व्यवसाय असून विरुध्दपक्ष यांचा अल्फस इंटरनॅशनल प्रा.लि.या नावाने नवी दिल्ली येथे हिअरींग ऐड प्रोग्रामींग युनिट (हिप्रो) विकण्याचा व्यवसाय असून तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत. तक्रारदारांचे सोबत श्री.जी.एस.सुर्यवंशी हे देखील भगत हिअरींग हेल्थ केअर क्लिनीकचे काम पाहतात. तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचे व्यापारी संबंध असून ओळख परिचय आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून दि.07-11-2009 रोजी हिअरींग ऐड प्रोग्रामींग युनिट (हिप्रो) 1 नग क्र.294098,डी.एच.पावर 3 नग, अल्फ्स डिन पॉवर बी.टी.ई.2 नग, हिअरींग एड असेसरीज 1 नग, असे संयुक्त युनिट एकूण रक्कम रु.71,000/- इतक्या किमतीला इनव्हाईस क्र.4200, टेले ऑर्डर प्रमाणे बायहॅण्ड विकत घेतले व त्यासंबंधीची रक्कम विरुध्दपक्षास अदा केली.
(3) तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून विकत घेतलेले हिअरींग एड प्रोग्रामींग युनिट हिप्रो हे सुरु केल्यानंतर सदरचे युनिट फक्त सात दिवस व्यवस्थीतपणे चालले. त्यानंतर ते युनिट अचानकपणे बंद पडले. म्हणून तक्रारदाराने सदर बाबत विरुध्दपक्षास वारंवार दुरध्वनीद्वारे कळविली, परंतु विरुध्दपक्षाने त्यांची काही एक दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.27-01-2010 व दि.22-03-2010 रोजी विरुध्दपक्षास लेखी पत्र पाठवून सदर युनिट खराब झाल्याचे कळविले, व ते बदलून मिळण्यासाठी कळविले. विरुध्दपक्षाने तक्रारदारास दि.10-02-2010, दि.01-04-2010 आणि दि.28-04-2010 रोजी पत्र पाठवून खोटया सबबी सांगून सदरचे युनिट दुरुस्त करुन दिले नाही व बदलवूनही दिले नाही.
(4) तक्रारदाराने वेळोवेळी लेखी आणि तोंडी स्वरुपात सदर हिअरींग एड प्रोग्रामींग युनिट बद्दल तक्रार केली असता, दि.08-09-2010 रोजी विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी श्री.प्रदिप शेट्टी हे धुळे येथे तक्रारदारास भेटले व त्यांनी सदरचे युनिट घेऊन जाऊन नवीन युनिट आठ दिवसात बदलवून पाठवून देतो असे सांगितले. परंतु त्यानंतर विरुध्दपक्षाने सदरचे हिअरींग एड प्रोग्रामींग युनिट तक्रारदारास बदलवून पाठविले नाही किंवा त्यासंबंधी कोणताही खुलासा केला नाही. तक्रारदाराने दि.30-09-2010 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्षास नोटीस पाठविली. ती विरुध्दपक्षास दि.08-10-2010 रोजी प्राप्त झाली आहे. परंतु विरुध्दपक्षाने नोटिसी प्रमाणे वर्तण न करता, खोटया मजकूराचे रजि.नोटीस उत्तर तक्रारदारास पाठविले.
(5) विरुध्दपक्षाने तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या व्यवसायात अनेक अडचणी आल्या. विरुध्दपक्षाने फसवणूक व विश्वासघात केला आहे. सदोष सेवेमुळे तक्रारदारांचे आजतागायत जवळपास रु.15,000/- चे आर्थिक नुकसान झाले आहे. मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारदारास सदोष सेवा दिलेली असल्याने सदर तक्रार मे.न्यायमंचात दाखल करण्यास कारण घडलेले आहे.
(6) म्हणून तक्रारदाराने, विरुध्दपक्ष यांचेकडून, नविन हिअरींग एड प्रोग्रामींग युनिट हिप्रो मिळावे आर्थिक त्रासाबद्दल रक्कम रु.15,000/- व मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावेत तसेच इतर योग्य ते न्यायाचे हुकूम तक्रारदाराचे लाभात व्हावेत अशी शेवटी विनंती केली आहे.
(7) तक्रारदार यांनी नि.नं.3 वर शपथेवर कैफीयत दाखल केली असून, नि.नं. 5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार, नि.नं.5/1 वर विरुध्दपक्षाकडून खरेदी केलेल्या युनिटचे बिल, नि.नं.5/2 व नि.नं.5/3 वर विरुध्दपक्षास पाठविलेल्या पत्राची प्रत, नि.नं.5/4, नि.नं.5/5 व 5/6 वर विरुध्दपक्षाने तक्रारदारास पाठविलेल्या पत्राची प्रत, नि.नं.5/7 वर विरुध्दपक्षाने हिप्रो एस एन 294157 स्वीकारल्याच्या पत्राची प्रत व इतर कागदपत्रे दाखल केली आहेत.
(8) विरुध्दपक्ष यांनी या न्यायमंचाची नोटिस स्पीडपोष्टाद्वारे पाठविल्याचे व ती नोटीस त्यांना मिळाल्याचे संचिकेत दाखल असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. परंतु सदर नोटीसीचे ज्ञान होऊनही विरुध्दपक्ष हे सदर प्रकरणी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधी द्वारे स्वतःचे बचावार्थ काहीही म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांचे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले असून, त्यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(9) तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ःहोय. |
(ब)तक्रारदार मशिन बदलून मिळण्यास, मानसिक व शारीरिक त्रासाची रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? | ःहोय. |
(क)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(10) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी नि.नं. 5/1 वर रु.70,000/- किमतीचे हिअरींग एड प्रोग्रामींग युनिट हिप्रो हे विरुध्दपक्ष यांचेकडून दि.07-11-2009 रोजी खरेदी केल्याची पावती दाखल केलेली आहे. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून रु.70,000/- किमतीचे हिअरींग एड प्रोग्रामींग युनिट हिप्रो हे विकत घेतले आहे. सदर युनीट अल्पकाळ केवळ सात दिवस व्यवस्थित चालले व त्यानंतर बंद पडले. त्यामुळे तक्रारदाराने दुरध्वनीद्वारे व पत्राद्वारे विरुध्दपक्षास कळविले आणि युनिट बदलवून देण्याची विनंती केली. परंतु विरुध्दपक्षाने त्यांची दखल घेतली नाही. दि.08-09-2010 रोजी विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी सदरचे युनिट घेऊन गेले परंतू त्यांनी नविन युनिट अथवा दुरुस्त युनिट अद्यापही तक्रारदारास दिलेले नाही, हे तक्रारदारांच्या शपथपत्रावरुन स्पष्ट होते. त्यामुळे अशा व्यवसायास उपयोगी युनिट अभावी तक्रारदाराच्या व्यवसायाचे नुकसान होणे स्वाभाविक आहे.
(12) विक्री पश्चात सेवा देणे ही विरुध्दपक्षाची जबाबदारी असतांना त्यांनी तक्रारदारास पुरविलेल्या सदोष युनिट बाबत दीर्घकाळ पर्यंत दुरुस्ती अथवा बदलवून देण्याबाबत काहीही कारवाई केली नाही. तसेच त्यांच्या प्रतिनिधीने सदरचे सदोष युनिट ताब्यात घेऊनही नविन अथवा दुरुस्त युनिट तक्रारदारास पुरविलेले नाही. ही निश्चितच विरुध्दपक्षाने तक्रारदारास पुरविलेल्या सेवेतील कमतरता आहे असे या न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
(13) सदर युनिट मिळविण्यासाठी विरुध्दपक्षाशी वेळोवेळी पत्रव्यवहार, दुरध्वनीवरील संपर्कसाधून विनंती करणे यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास व शारीरिक त्रास होणे स्वाभाविक आहे. तसेच या न्यायमंचाची नोटिस मिळूनही विरुध्दपक्ष नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. यावरुनही विरुध्दपक्षाची बेपर्वा वृत्ती व सेवेतील न्युनता दिसून यते. तसेच त्यांनी स्वतःचे बचावपत्रही दाखल न केल्यामुळे त्यांना तक्रारदारांची तक्रार मान्य आहे असा अर्थ निघतो. ही बाब पाहता तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांच्याकडून खरेदी केलेल्या युनिटची रक्कम मिळण्यास पात्र आहेत तसेच शारीरिक, मानसिक त्रासासाठी व नुकसानीची रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(14) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर निकाल प्राप्त झाल्यापासून पूढील तीस दिवसांचे आत, विरुध्दपक्ष यांनी.
(1) तक्रारदारास नवीन हिअरींग ऐड प्रोग्रामींग युनिट (हिप्रो) द्यावे.
किंवा
(1) तक्रारदारास हिअरींग ऐड प्रोग्रामींग युनिट (हिप्रो) ची संपूर्ण किंमत रक्कम 70,000/- (अक्षरी रुपये सत्तर हजार फक्त) परत द्यावेत.
(2) तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त), मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
(3) उपरोक्त आदेश कलम 1 व 2 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे
दिनांक – 28-02-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.