जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १३०/२०११
तक्रार दाखल दिनांक – १२/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – २२/०४/२०१४
ज्योसनाबाई चुनीलाल जैन (मयत)
तर्फे चुनीलाल शिवलाल जैन
वय ५० वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.कासारगल्ली, मु.पो.सोनगीर,
ता.जि. धुळे ..…........ तक्रारदार
विरुध्द
१) श्री अनिल शांताराम भांडारकर
वय ४०, व्यवसाय - एजंट
रा.गल्ली नं.२, मुल्लावाडा, धुळे
२) बिर्ला सन लाईफ इंन्शुरन्स कंपनी लि.
नोटीसीची बजावणी ब्रॅन्च मॅनेजर,
यांचेवर करणेत यावी.
पत्ता – शिनकर मातृ सदन, पहिला मजला,
देना बॅंकेच्या वरती, खोलगल्ली, धुळे. ........... सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.आर.आर. कुचेरिया)
(सामनेवाला नं.१ तर्फे – ------)
(सामनेवाला नं.२ तर्फे – अॅड.श्री.ए.ए. लाली)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री. एस.एस. जोशी)
१. पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या विम्याची रक्कम देण्यास सामनेवाले यांनी नकार दिला. सदरची रक्कम सामनेवालेंकडून मिळावी, यासाठी तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये ही तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या पत्नी ज्योत्स्नाबाई चुनीलाल जैन यांनी सामनेवाला नं.१ यांच्यामार्फत सामनेवाला नं.२ कंपनीची विमा पॉलीसी रूपये २,००,०००/- ची घेतली होती. त्याचा क्रमांक ००१५५६४९२ असा होता. विम्याचा कालावधी दि.२८/०३/२००८ ते दि.२८/०३/२०२३ असा होता. पॉलीसीचा वार्षिक हप्ता रूपये २५,०००/- होता. तो भरलेलाही आहे. या पॉलीसीत तक्रारदार वारसदार लावले आहेत. दि.२७/०२/२००९ रोजी विमाधारक ज्योत्स्नाबाई यांचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. त्यांनतर सामनेवाला नं.२ यांच्याकडे क्लेम फॉर्म भरून पाठविला. पण त्यांनी विमाधारक हिस मधुमेह होता असे कारण दाखवून विमा दावा नाकारला. सामनेवाले यांचे हे कृत्य बेकायदेशीर असून त्यांनी विमा दावा मंजूर करावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ निशाणी ५ सोबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे सादर केलेल्या क्लेम फॉर्मची पोहच, सामनेवाले यांनी दावा नामंजूर केल्याबाबत पाठविलेले पत्र, सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, नोटीस मिळाल्याची पोहच पावती, सामनेवाला यांनी नोटीसीला पाठविलेले उत्तर, सामनेवाला यांच्या उत्तराला तक्रारदाराने दिलेले प्रतिउत्तर, बजाज अलियांझ कंपनीचे पत्र, एलआयसीचे पत्र दाखल केले आहे.
४. सामनेवाला नं.१ व २ यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला. सामनेवाला नं.१ यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथन धादांत खोटे आहे. सामनेवाले नं.१ हे सामनेवाले नं.२ यांच्या कंपनीत विमा एजंट म्हणून कमिशन तत्वावर काम करतात. कंपनीच्या नियमानुसार पॉलीसीबाबतचा प्रपोजल फॉर्म तक्रारदाराने स्वतः भरायचा असतो. त्यात सामनेवाला नं.१ यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रारदार यांच्या पत्नीने दि.२८/०२/२००८ रोजी पॉलीसी घेतली होती. त्या दि.२७/०२/२००९ रोजी मयत झाल्या. त्यांना मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजार होते, हे त्यांनी सामनेवाला नं.१ व २ पासून लपवून ठेवले होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या डॉक्टरांच्या दाखल्यातही विमाधारकाच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सदरची तक्रार रदद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
५. सामनेवाले नं.२ यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, सामनेवाले नं.२ यांनी विमा कायदा १९३८ च्या कलम ४५ अन्वये सदरचा क्लेम रदद केला आहे. त्यामुळे तक्रारदाराला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी जाणीवपूर्वक महत्वाची माहिती मंचासमोर आणलेली नाही. विम्याचा अर्ज भरतांना अर्जदाराने त्याला माहीत असलेली सर्व माहिती अर्जात भरणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास विमा कंपनी सदर क्लेम विमा कायद्यातील कलम ४५ अन्वये रदद करू शकते. विमा कंपनीने केलेल्या अधिकच्या चौकशीत तक्रारदार यांनी दि.०८/०४/२००९ रोजी दिलेल्या जबाबात विमाधारक ही एक ते दीड वर्षांपासून मधुमेहाने आजारी होती, असे लिहून दिले आहे. ज्या डॉक्टरचे ती उपचार घेत होती, त्यांनीही तिच्या इंटर्नल ब्रेन हॅमरेजवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही महत्वाची बाब तक्रारदार यांनी सामनेवालेंपासून लपवून ठेवली. त्याचमुळे विमा कायद्यातील तरतुदीनुसार तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करण्यात आला आहे, असे सामनेवाले नं.२ यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
६. सामनेवाले नं.२ यांनी आपल्या खुलाशासोबत तक्रारदार यांनी सादर केलेला प्रपोजल फॉर्म, तक्रारदाराचा जबाब, तक्रारदाराचे पत्र, डॉ.सोनवणे यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे.
७. तक्रारदाराची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले नं.१ यांनी दाखल केलेला खुलासा, सामनेवाले नं.२ यांनी दाखल केलेला खुलासा आणि त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि सामनेवाले नं.२ यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर आमच्यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले नं.२ यांचे ग्राहक आहेत का ? होय
ब. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब
केला आहे का नाही
क. आदेश काय ? सविस्तर आदेशाप्रमाणे
विवेचन
८. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांच्या पत्नी मयत ज्योत्स्नाबाई चुनीलाल जैन यांनी सामनेवाले नं.२ यांच्याकडून विमा पॉलीसी घेतली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पॉलीसीत तक्रारदार यांना वारस लावले आहे. ही बाब सामनेवाले नं.२ यांना मान्य आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम २(ब) (५) नुसार एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याचा कायदेशीर वारस ग्राहक ठरतो. याच व्याख्येनुसार तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक ठरतात. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
९. मुद्दा ‘ब’- सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि सदोष सेवा दिली असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. हे म्हणणे सामनेवाले नं.१ आणि २ यांनी फेटाळून लावले आहे. मयत ज्योत्स्नाबाई चुनीलाल जैन यांनी विमा पॉलीसी घेतांना योग्य, खरी आणि पुरेशी माहिती दिली नाही, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. विमा पॉलीसी घेतांना विमाधारकाने त्याला माहीत असलेली खरी माहिती देणे बंधनकारक असते, अशी पुस्तीही सामनेवाला यांनी जोडली आहे. पॉलीसी घेतेवेळी विमाधारक ज्योत्स्नाबाई यांना मधुमेह किंवा रक्तदाबासारखा तत्सम आजार नव्हता, असे स्वतः विमाधारक यांनी त्यांच्या प्रपोजल फॉर्ममध्ये लिहिले आहे. तर तक्रारदार यांनी तक्रारीतही तसेच म्हटले आहे. विमाधारक यांना मधुमेहाचा आजार होता. दीड ते दोन वर्षापासून त्या त्यावर औषधी घेत होत्या. ही बाब विमाधारक आणि तक्रारदार यांनी सामनेवालेंपासून लपवून ठेवली. याच वरील आजाराच्या कारणांच्या आधारे तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्यात आला असे सामनेवाले नं.२ यांनी खुलाश्यात स्पष्ट केले आहे. सामनेवाला नं.२ यांनी या विमा प्रकरणाबाबत केलेल्या गोपनीय चौकशीच्या आधारे तक्रारदार चुनीलाल शिवलाल जैन यांनी दि.०८/०४/२००९ रोजी दिलेला लेखी जबाब आणि दि.०८/०४/२००९ रोजीच डॉ. अजय भरत सोनवणे यांनी दिलेले प्रमाणपत्र दाखल केले आहे. चुनीलाल जैन यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, ्‘ज्योत्स्नाबाई यांना सुमारे दीड वर्षापासून मधुमेह होता. त्याच्या संदर्भात एक-दोन वेळा त्यांच्या रक्ताची तपासणी केली होती. एक वर्षापासून त्या मधुमेहाची गोळी घेत होत्या.’ यावरून विमाधारक यांना मधुमेहाचा आजार होता आणि तो तक्रारदार यांना माहीत होता हे स्पष्ट होते.
सामनेवाले यांनी डॉ.अजय भरत सोनवणे यांनी दिलेले प्रमाणपत्र दाखल केले आहे. या प्रमाणपत्रात म्हटले आहे की, ‘सौ.ज्योत्स्नाबाई चुनीलाल जैन या माझ्या सुमारे तीन/ चार वर्षापासून रूग्ण होत्या. दि.२७/०२/२००९ रोजी रात्री १०.३० वा. त्यांच्या घरी मी त्यांना मृत घोषित केले. ब्रेन इंटर्नल हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असे माझे मत आहे.’ या प्रमाणपत्रावरून सौ.ज्योत्स्नाबाई तीन-चार वर्षांपासून रूग्ण होत्या हे स्पष्ट होते. त्याचबरोबर त्यांचा मृत्यू इंटर्नल ब्रेन हॅमरेजमुळे झाला असावा असे मत डॉ.सोनवणे यांनी व्यक्त केलेले आहे. त्यांनी त्याच कारणामुळे मृत्यू झाला असे स्पष्ट केलेले नाही.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ‘मेडिकल अटेंडन्टस् सर्टिफिकेट’ दाखल केले आहे. या दस्ताबाबत सामनेवाले नं.२ यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात काही मुददे उपस्थित केले. विमाधारक ज्योत्स्नाबाई चुनीलाल जैन यांचा मृत्यू दि.२७/०२/२००९ रोजी झाला. त्या दिवशी डॉ. अजय भरत सोनवणे यांनी ज्योत्स्नाबाई यांना तपासून मृत घोषित केले. याच डॉक्टरांनी वरील सर्टिफिकेट दिले आहे. त्यावर दोन ठिकाणी दि.१३/०२/२००९ अशी तारीख लिहिली आहे. मृत्यूपूर्वी म्हणजे दि.२७/०२/२००९ पूर्वी डॉक्टरांनी हे प्रमाणपत्र कसे लिहून ठेवले, असा प्रश्न सामनेवाले नं.२ यांच्या वकिलांनी उपस्थित केला. याच प्रमाणपत्रात डॉ.सोनवणे यांनी मृत्यूचे कारण ‘इंटर्नल ब्रेन हॅमरेज’ असे नमूद केले आहे. या वाक्यापुढे त्यांनी प्रश्नचिन्ह वापरले आहे. यावरून विमाधारक यांचा मृत्यू इंटर्नल ब्रेन हॅमरेजमुळेच झाला याची डॉक्टरांना खात्री नाही असे सामनेवाला नं.२ च्या वकिलांचे म्हणणे आहे.
या वकिलांनी युक्तिवादात डॉ.अजय भरत सोनवणे हे बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक) डॉक्टर आहेत, त्यामुळे एखाद्या गंभीर आजाराविषयी स्पष्ट मत व्यक्त करण्याची त्यांची क्षमता नसावी असाही मुददा उपस्थित केला.
या मुद्यांबाबत तक्रारदार यांनी खुलासा किंवा शंका निरसन केलेले नाही. तक्रारदार यांच्या वकिलांना युक्तिवादासाठी पुरेशी संधी देवूनही त्यांनी युक्तिवाद केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला नं.२ यांच्या वकिलांनी युक्तिवादात उपस्थित केलेले मुददे तक्रारदार व त्यांच्या वकिलांना मान्य आहेत, असे आमचे मत बनले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला नं.१ यांचा खुलासा, सामनेवाला नं.२ यांचा खुलासा, दाखल कागदपत्रे आणि त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पाहता, सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, हे सिध्द करण्यात तक्रारदार अपयशी ठरले असल्याचे मंचाचे मत बनले आहे. याच कारणामुळे मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही नाही असे देत आहोत.
१०. मुद्दा ‘क’– सामनेवाले नं.१ व २ यांनी नाकारलेला विमा दावा मंजूर करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. सामनेवाले नं.१ हे सामनेवाले नं.२ यांचे एजंट म्हणून कमिशन तत्वावर काम करतात. ते सामनेवाले नं.२ यांचे अधिकृत कर्मचारी नाही. विमाधारकाची विमा पॉलीसी सामनेवाले नं.१ यांच्यामार्फत घेण्यात आली असली तरी विमा दावा मंजूर करण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार सामनेवाले नं.१ यांना नाहीत. तक्रारदार यांचा विमा दावा सामनेवाले नं.१ यांनी नाकारलेला नाही. त्यामुळे सामनेवाले नं.१ यांच्याविरूध्द कोणताही आदेश करणे उचित होणार नाही, असे मंचाला वाटते.
सामनेवाले नं.२ यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, सदोष सेवा दिली अशी तक्रारदाराची तक्रार आहे. मात्र ती बाब तक्रारदार सिध्द करू शकलेले नाहीत. जी बाब सिध्द झालेली नाही, त्यासाठी कुणालाही दोषी ठरविता येणार नाही हे स्पष्ट आहे. याच कारणामुळे तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही असे या मंचाचे मत बनले आहे. म्हणूनच आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाही.
धुळे.
दि.२२/०४/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.