श्रीमती स्मिता नि. चांदेकर, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. सदर तक्रार तक्रारकर्त्याने वि.प.विरुध्द वि.प.ने सेवेत कमतरता ठेवली म्हणून दाखल केली आहे. वि.प. ही एक बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी असून नागपूरमध्ये विविध बांधकाम योजना राबवितात.
2. तक्रारकर्त्याने प्लॉट क्र. 19, ख.क्र.58/1, मौजा-बेसा, कुंदालाल नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चिंतामणी नगर, नागपूर येथे जुने घर विकत घेतले होते. सदर घराच्या खालच्या मजल्यावरील नुतनीकरण व पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्याकरीता वि.प.कडून माहिती घेतली. त्यानुसार तक्रारकर्ता व वि.प. यांच्यामध्ये बांधकामाबाबत बोलणी होऊन रु.12,51,000/- मध्ये काम करण्याचे ठरले. त्याबाबत तक्रारकर्त्याने दि.22.12.2015 ला वि.प.ला रु.21,000/- टोकन दिले व रु.2,50,000/- अग्रीम रक्कम दि.24.12.2015 ला देऊन करारनामा केला. सदर बांधकाम पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त काम निघाल्यास वाढीव रक्कम घेण्याची वि.प.ची मागणी तक्रारकर्त्याने मान्य केली होती. त्यानुसार तक्रारकर्त्याने दि.21.12.2015 ते 19.09.2016 दरम्यान वि.प.ला एकूण रु.12,46,500/- दिले. परंतू वि.प.ने संपूर्ण रक्कम घेऊनही तक्रारकर्त्याच्या घराचे ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने वारंवार पत्र पाठवून बांधकाम पूर्ण करण्याची विनंती केली. वि.प.ने सदर पत्रांची दखल घेतली नाही. वि.प.ने केवळ रु.6,54,837/- चे बांधकाम केले असून करारानुसार रु.6,51,158/- चे बांधकाम राहिलेले आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या विनंतीला प्रतिसाद न दिल्याने व घराची किल्ली स्वतःजवळ ठेवल्याने तक्रारकर्त्याने पोलिसांकडे वि.प.विरुध्द तक्रार नोंदविली व वकीलांमार्फत नोटीस पाठविली असता वि.प.ने नोटीसला उत्तर दिले नाही आणि करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार बांधकाम पूर्ण केले नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन वि.प.ने अतिरिक्त दिलेली रक्कम रु.6,51,158/- अग्रीम दिल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह वि.प.ने परत करावे, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. वि.प.वर मंचाद्वारे नोटीसची बजावणी केली असता वि.प.ने नोटीस घेण्यास नकार दिल्याने व मंचासमोर उपस्थित न झाल्याने त्याचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. मंचाने तक्रारकर्त्याचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष –
4. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीचे पुष्टयर्थ एकूण सात कागदपत्रे दाखल केलेले असून त्यात उभय पक्षांमध्ये झालेला करारनामा, वि.प.ने तक्रारकर्त्याला दिलेल्या रकमेच्या पावत्या, तक्रारकर्त्याने वि.प.विरुध्द पोलिसांमध्ये दिलेली तक्रार, कायदेशीर नोटीस, आणि आर्कीटेक्ट योगेश हिंगे यांचेकडून बांधकामाच्या मुल्यांकनाचा अहवाल इ. च्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या करारनाम्यानुसार उभय पक्षांमध्ये घराचे नुतनीकरण व बांधकामासंबंधी करार झाल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार एकूण अंदाजित खर्चाची रक्कम रु.12,51,000/- ठरविण्यात आली होती व तक्रारकर्त्याच्या घराच्या नियोजित रेखाचित्रानुसार वि.प. त्याला बांधकाम करुन देणार होता. त्या अनुषंगाने तक्रारकर्त्याने वि.प.ला रक्कम अदा केली होती. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने वि.प.ची बांधकाम करण्याकरीता मोबदला देऊन सेवा घेतली असल्याने तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
5. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने दि.21.02.2015 ते 19.09.2016 पर्यंत वि.प.ला एकूण रु.12,46,000/- रक्कम दिलेली आहे. परंतू वि.प.ने केवळ रु.6,54,837/- मुल्यांकनाचे काम केलेले असून रु.6,51,158/- चे काम राहिलेले आहे. सदर बांधकाम तक्रारकर्त्याने संपूर्ण रक्कम देऊनही व वारंवार विनंती करुन देखील वि.प.ने पूर्ण करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने वि.प.ला दिलेल्या रकमांच्या पावत्या अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. तसेच वि.प.ने करारनाम्यानुसार आजपर्यंत केलेल्या कामाचा तपशिल व उर्वरित बांधकामाबाबतचा सखोल अहवाल आर्किटेक्ट योगेश हिंगे यांच्याकडून सर्वेक्षण करुन अभिलेखावर दाखल केला आहे. सदर अहवालानुसार वि.प.ने एकूण रु.6,54,837/- चे बांधकाम केले असून उर्वरित बांधकामाची रक्कम रु.6,51,158/- एवढी आहे. सदर अहवालानुसार बांधकामाची एकूण किंमत रु.13,05,995/- होत असल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने वि.प.ला एकूण रु.12,46,000/- दिले असल्यामुळे वि.प.कडे एकूण रु.5,91,163/- ही तक्रारकर्त्याने दिलेली रक्कम जमा आहे. असे असतांनाही वि.प.ने तक्रारकर्त्याच्या घराचे संपूर्ण बांधकाम केले नाही व तक्रारकर्त्याच्या घराच्या किल्या स्वतःजवळ ठेवून त्याला त्याच्या घराचे उपभोगापासून वंचित ठेवले आहे. वि.प.ची सदर कृती सेवेतील त्रुटी दर्शविते असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
6. वि.प.ने मंचासमोर येऊन तक्रारकर्त्याचे दस्तऐवजासह असलेले कथन खोडून न काढल्याने तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन हे अबाधित आहे. त्याचप्रमाणे वि.प.ने तक्रारीसोबत दाखल दस्तऐवज व आर्किटेक्टचा अहवाल यावर आक्षेप नोंदविला नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार व दाखल अहवाल हा ग्राह्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. वि.प.ने करारनाम्यातील वर्णन केलेल्या बांधकामाची अंदाजित रक्कम रु.12,51,000/- सांगितली होती. परंतू आर्किटेक्टने दिलेल्या अहवालानुसार बांधकामाचा एकूण खर्च रु.13,05,995/- इतका येत असल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने वि.प.ला रु.12,46,000/- दिले असल्यामुळे तक्रारकर्त्याला उर्वरित बांधकामाची रक्कम रु.59,995/- देणे आहे व तक्रारकर्त्याने अतिरिक्त लागणारा खर्च देण्याचे करारपत्राचे वेळी मान्य केले होते असे तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारकर्त्याने उभय पक्षात ठरलेल्या कामानुसार काढण्यात आलेली रक्कम जवळपास पूर्णतः दिलेली आहे. वि.प.ने संपूर्ण रक्कम स्विकारलेली असल्याने करारनाम्यात ठरलेली कामे नमूद वैशिष्ट्यासह पूर्ण करण्यास वि.प. बाध्य आहे. प्रत्यक्षात मात्र वि.प.ने निम्या रकमेचे काम केलेले असल्याचे व उर्वरित रक्कम स्वतःजवळ ठेवून घेतली असल्याचे दाखल दस्तऐवजावरुन दिसून येते. वि.प.ची सदर कृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी असून वि.प.ने तक्रारकर्त्याला द्यावयाच्या सेवेत निष्काळजीपणा केल्याचे दर्शविणारी आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
7. वि.प.ने केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्याला त्याच्या मालकीच्या घराचा उपभोग घेता आला नाही. तसेच सदर तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे निश्चितच तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे, म्हणून तक्रारकर्ता झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे.
8. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.ने तक्रारकर्त्याला रु.5,91,163/- ही रक्कम दि.19.09.2016 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावी.
- 20,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.
3) सदर आदेशाची अंमलबजावणी वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.
4) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.