द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// नि का ल प त्र //
(1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी करारात कबुल केल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण केले नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्री कल्याणराव गावडे यांनी जाबदार श्री अनिल कालगांवकर यांना त्यांच्या मालकीच्या जागेत नवीन इमारत बांधण्याचे कंत्राट दिले होते. दिनांक 04/12/2007 रोजी उभयपक्षकारांचे दरम्यान करार होऊन रक्कम रु 6,70,000/- मात्रला इमारतीचे बांधकाम करुन देण्याचे जाबदारांनी कबूल केले होते. इमारत कशा प्रकारे बांधायची व त्याच्यामध्ये काय सुविधा असाव्यात तसेच कशा पध्दतीने रक्कम अदा करायची याचा तपशील करारामध्ये नमूद केलेला होता. करारा पासून सहा महिन्याच्या आत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन जाबदारांनी दिले होते. करारात ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी जाबदारांना संपूर्ण रक्कम अदा केली. मात्र कबूल केल्याप्रमाणे जाबदारांनी आपले बांधकाम पूर्ण केले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. संपूर्ण रक्कम प्राप्त झालेली असून कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण झालेले नाही अशा आशयाचा उल्लेख असलेला पुरवणी करार दिनांक 14/11/2008 रोजी उभयपक्षकारांचे दरम्यान झाला. जाबदारांनी अर्धवट बांधकाम सोडून दिल्यामुळे उर्वरित बांधकाम तक्रारदारांनी अन्य बांधकाम व्यावसायीका कडून करुन घेतले. यासाठी रक्कम रु 3,50,000/- मात्र तक्रारदारांनी नवीन कंत्राटदाराला दिले. जाबदारांनी कराराचा भंग करुन अर्धवट बांधकाम सोडल्यामुळे आपल्याला हा खर्च करावा लागला आहे याचा विचार करिता आपण अदा केलेली रक्कम रु 3,50,000/- मात्र व्याज व इतर अनुषंगीक रकमांसह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तसेच करारापेक्षा आपण जाबदारांना अदा केलेली ज्यादा रक्कम रु 2,350/- आपल्याला मिळावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 4 अन्वये एकुण 3 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत. तसेच विलंबाने निशाणी 7 अन्वये तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्रासह विलंबमाफीचा अर्ज दाखल केला आहे.
(2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाची नोटीस बजावल्याची पावती निशाणी 6/1 अन्वये या कामी दाखल आहे. मात्र तरी सुध्दा जाबदार गैरहजर राहील्याने त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारित करण्यात आला.
(3) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ निशाणी 16 अन्वये जाबदारांनी नोटीस न स्विकारल्याचा शेरा असलेले पाकीट व दोन साक्षिदारांची प्रतिज्ञापत्रे मंचापुढे दाखल केली. तसेच तक्रारदारांनी आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला. यानंतर तक्रारदारां तर्फे अड श्री घोणे यांचा युक्तिवाद ऐकूण सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले.
(4) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दिनांक 3/01/2011 रोजी दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला साधारण दोन महिने विलंब झालेला आहे याचा विचार करिता झालेला विलंब माफ होवून मिळावा असा स्वतंत्र अर्ज तक्रारदारानी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रासह मंचापुढे दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी निशाणी 12 अन्वये दाखल केलेल्या डिसचार्ज कार्डचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या घशाची शस्त्रक्रिया झाली होती ही बाब सिध्द होते. ज्या कारणास्तव तक्रारदारांना सदरहू तक्रारअर्ज दाखल करण्यास विलंब झाला आहे त्याचा विचार करिता झालेला विलंब माफ होण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. सबब सदरहू तक्रारअर्ज दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यात येत आहे.
(5) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्जाचे अवलोकन केले असता जाबदारांना दिलेले बांधकामाचे कंत्राट त्यांनी संपूर्ण रक्कम स्विकारुनही अर्धवट सोडले अशी तक्रारदारांची तक्रार असल्याचे लक्षात येते. तक्रारदारांनी वस्तुस्थिती बाबत केलेली ही तक्रार जाबदारांनी हजर होवून नाकारलेली नाही. सबब या अनुषंगे त्यांचे विरुध्द प्रतिकूल निष्कर्ष निघतो. या बरोबरच तक्रारदारांनी निशाणी 4/2 अन्वये दाखल केलेल्या नोटराइज कराराचे अवलोकन केले असता “आज अखेर दिनांक 14/11/2008 रोजी रु 6,72,350/- मला मिळाली आहे. परंतु माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे घराचे काम करु शकलो नाही” असे जाबदारांनी यामध्ये नमूद केलेले आढळते. जाबदारांच्या या निवेदनावरुन सुध्दा त्यांना कराराप्रमाणे संपूर्ण रक्कम प्राप्त होवून सुध्दा त्यांनी बांधकाम अर्धंवट सोडले या तक्रारदारांच्या तक्रारीला पुष्टी मिळते. अशा प्रकारे करारात कबूल केल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण न करण्याची जाबदारांची कृती त्यांच्या सेवेत त्रूटी उत्पन्न करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांचा तक्रारअर्ज मंजूर करण्यात येत आहे. जाबदारांनी अर्धवट सोडलेले बांधकाम तक्रारदारांनी श्री महेंद्र होळकर यांच्याकडून पूर्ण करुन घेतलेले असून यासाठी रक्कम रु 3,10,000/- मात्र मिळाल्याचे श्री होळकर यांनी लिहून दिलेले आहे. तसेच वादग्रस्त बांधकाम दिनांक 25/01/2009 रोजी पूर्ण झाले असाही उल्लेख या निवेदनात आढळतो. आपल्या या निवेदनाच्या पुष्टयर्थ श्री होळकर यांनी निशाणी 16/3 अन्वये मंचापुढे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या कराराला साक्षिदार म्हणून सही केलेले साक्षिदार श्री चौत्रे यांचेही प्रतिज्ञापत्र तक्रारदारानी निशाणी 16/1-I अन्वये मंचापुढे दाखल केलेले आहे. जाबदारांनी संपूर्ण रक्कम स्विकारुनही बांधकाम अर्धवट सोडले म्हणून तक्रारदारांना श्री होळकर यांचेकडून काम पूर्ण करुन घ्यावे लागले याचा विचार करिता तक्रारदारांनी श्री होळकर यांना अदा केलेली रक्कम रु 3,10,000/- मात्र दुस-या कराराच्या तारखे पासून म्हणजे दिनांक 14/11/2008 पासून 9 % व्याजासह अदा करण्याचे जाबदारांना निर्देश देणे योग्य व न्याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्याप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. तसेच कराराप्रमाणे रक्कम रु 6,70,000/- देणे आवश्यक असताना तक्रारदारांकडून रक्कम रु 6,72,350/- जाबदारांनी स्विकारलेली आहेत. सबब करारापेक्षा जास्ती अदा केलेली रक्कम रु 2,350/- मात्र तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे परत करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत.
(6) सदरहू तक्रारअर्ज दाखल करण्यापूर्वी तक्रारदारांनी जाबदारांना नोटीस पाठवून आपल्या तक्रारीचे निवारण करुन घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र जाबदारांनी ही नोटीस न स्विकारल्यामुळे तक्रारदारांना सदरहू तक्रारअर्ज दाखल करावा लागला याचा विचार करिता तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई व सदरहू तक्रारअर्जाचा खर्च म्हणून त्यांच्या मागणी प्रमाणे एकत्रित रक्कम रु 10,000/- देण्याचा आदेश करण्यात येत आहे. जाबदारांनी करारात कबूल केलेल्या मुदतीत म्हणजे दिनांक 04/06/2008 पर्यन्त बांधकाम न केल्यामुळे एक वर्ष कालावधी करिता तक्रारदारांच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण राहीले याचा विचार करिता जाबदारांना अदा केलेल्या रकमेवर आपल्याला 12 % दराने व्याज मजूर करण्यात यावे अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांच्या या तक्रारीस व मागणीस दाखल पुराव्यांचा आधार मिळतो. सबब तक्रारदारांनी जाबदारांना अदा केलेल्या रकमेवर म्हणजे रक्कम रु. 6,72,350/- वर दुस-या कराराच्या तारखे पासून म्हणजे दिनांक 14/11/2008 पासून इमारत तयार झाली त्या तारखेपर्यंन्त म्हणजे दिनांक 25/01/2009 पर्यंन्त तक्रारदारांना व्याज अदा करण्याचे जाबदारांना निर्देशदेण्यात येत आहेत.
(7) प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी रक्कम रु 3,50,000/- देवविण्यात यावेत अशी जरी विनंती केली असली तरी त्यांनी नवीन कत्राटदाराला रु 3,10,000/- अदा केले होते ही बाब निशाणी 16/3 अन्वये दाखल प्रतिज्ञापत्रा वरुन सिध्द होत असल्यामुळे तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे रक्कम मंजूर न करता त्यांनी प्रत्यक्ष अदा केलेली रक्कम रु 3,10,000/- मात्र मंजूर करण्यात येत आहे.
वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब आदेश की,
// आदेश //
(1) तक्रारअर्ज अंशत: मंजूर करण्या येत आहे.
(2) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु 3,10,000/-
( रु. तीन लाख दहा हजार) मात्र दिनांक 14/11/2008
पासून संपूर्ण रक्कम प्राप्त होई पर्यन्त 9 % व्याजासह अदा
करावी.
(3) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु 2,350/-
( रु. दोन हजार तीनशे पन्नास) परत करावेत.
(4) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु. 6,72,350/-
( रु सहा लाख बाहत्तर हजार तीनशे पन्नास) वर
दिनांक 14/11/2008 पासून दिनांक 25/01/2009 पर्यंन्त
7 % दराने व्याज अदा करावे.
(5) यातील जाबदारांनी तक्रारदारांना शारीरिक व मानसिक
त्रासाची नुकसानभरपाई व सदरहू तक्रारअर्जाचा खर्च म्हणून
रक्कम रु 10,000/- मात्र अदा करावेत.
(6) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत
मिळाले पासून 30 दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदया अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
(7) निकालपत्राची प्रत उभयपक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.