::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य) (पारीत दिनांक-12 मे, 2014 ) 01. उभय तक्रारदारांनी त्यांचे विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थे मधील त्यांचे संयुक्त नावे असलेल्या बचत खात्यातील तसेच मुदतठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खालील प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. 02. तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे- विरुध्दपक्ष क्रं 1 ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत संस्था आहे . विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 हे वि.प.क्रं 1 संस्थेवर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा आहे. उभय तक्रादारांचे विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेमध्ये बचतखाते क्रं 72 असून त्यामध्ये जवळपास रुपये-2,25,000/- जमा आहेत तसेच विरुध्दपक्ष सहकारी संस्थेमध्ये दि.16.09.2002 रोजी मुदत ठेव क्रं 1437 अन्वये रुपये-3,00,000/-, दि.25.02.2013 रोजी मुदत ठेव क्रं 1469 अन्वये रुपये-2,00,000/- आणि दि.02.03.2013 रोजी मुदत ठेव क्रं-1470 अन्वये रुपये-3,00,000/- गुंतविलेले आहेत. अशाप्रकारे तक्रारदार वि.प.क्रं 1 सहकारी संस्थेचे ग्राहक आहेत. उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, मुदत ठेव क्रं 1469 रक्कम रुपये-2,00,000/- आणि मुदत ठेव क्रं-1470 रक्कम रुपये-3,00,000/- या ठेवींची त्यांना पुर्नगुंतवणूक करावयाची नव्हती परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 संस्थे तर्फे सध्या संस्थे मध्ये पैसे नसल्याने पुर्नगुंतवणूक करण्यास सांगण्यात आले त्यानुसार तक्रारदारानीं मुदतठेवीचीं पुर्नगुंतवणूक केली. तक्रारकर्ता क्रं 1 यांनी, विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेकडे दि.20.05.2013 रोजी अर्ज करुन त्याव्दारे मुला व मुलीचे लग्न आणि घराचे बांधकाम करावयाचे असल्याने तिन्ही मुदत ठेवींची रक्कम आणि बचत खाते क्रं 72 मधील जमा रक्कम देण्यात यावी तसेच असेही नमुद केले की, मुदतपूर्व मुदत ठेवी मधील रक्कम काढण्यास जे काही शुल्क दंड इत्यादी लागेल ते देण्यास तक्रारकर्ता जबाबदार आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 संस्थे तर्फे मुदतठेवींची रक्कम आणि बचत खात्या मधील रक्कम देण्यात आली नाही म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे दि.30.05.2013 रोजी अर्ज सादर केला व त्याची प्रत वि.प.क्रं 3 जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर केली परंतु योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तक्रारदारानां शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून उभय तक्रारदारानीं विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीव्दारे, विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेनी तक्रारदारांची तिन्ही मदुत ठेवी क्रं 1437, 1469 आणि 1470 ची रक्कम तसेच बचत खाते क्रं 72 मध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह तक्रारदारांना देण्याचे आदेशीत व्हावे. विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी, वि.प.क्रं 2 चे माध्यमातून विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही होण्याचे आदेशित व्हावे. उभय तक्रादारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- देण्याचे आदेशित व्हावे अशा मागण्या केल्यात. 03. विरुध्दपक्ष क्रं 1 भारतीय स्वतंत्र धनवृक्ष नागरी पतसंस्थे तर्फे आनंद डी.चकोले, अध्यक्ष यांनी प्रतिज्ञालेखावरील उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार ते भारतीय स्वतंत्र धनवृक्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. सदर संस्था पूर्वी ब्रुक बॉन्ड को-ऑप. सोसायटी या नावाने नोंदणीकृत होती परंतु ब्रुक बॉन्ड कंपनी बंद झाल्याने वरील संस्था ही धनवृक्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे नावाने परावर्तीत करण्यात आली. सदर संस्थे तर्फे ठेवी गोळा करण्याचे काम केल्या जाते परंतु काही काळा पासून संस्थेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ठेवीदारांची रक्कम वेळेवर परत करणे संस्थेस अशक्य झाले आहे. संस्थेकडे फंड उपलब्ध नसल्याने संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिका-यांनी संस्थेचे मालकीची ईमारत विकून ठेवीदारांची रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली आहे व त्याची किंमत रुपये-1 कोटी आहे. या संबधाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे दि.13.09.2013 रोजीचे अर्जाव्दारे परवानगी मागितलेली आहे. संबधित विभागाकडून परवानगी मिळताच तक्रारदारांची रक्कम परत करण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 संस्था तयार आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 संस्थेला ठेवीदारांची रुपये एक कोटी रक्कम देणे आहे या शिवाय वि.प.क्रं 1 संस्थेचे राखीव निधी अंतर्गत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कामठी येथे रुपये-82,00,000/- जमा आहे व ती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचे नियंत्रणात आहे. जिल्हा उपनिबंधकाची परवानगी मिळताच ती रक्कम सुध्दा ठेवीदारांची रक्कम परत करण्याचे कामी येऊ शकते व यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 सस्थेचे प्रयत्न सुरु आहे. वरील स्थितीत त्यांनी तक्रारदारांची कोणतीही फसवणूक केली नाही वा संस्थेमध्ये गैरव्यवहार झालेला नाही त्यामुळे तक्रारदारांची शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाईची मागणी अमान्य करण्यात येते. 04. विरुध्दपक्ष क्रं 2 सहायक निबंधक, सहकारी संस्था कामठी तर्फे चैतन्य हरिभाऊ नासरे, सहायक निबंधक, सहकारी संस्था कामठी यांनी प्रतिज्ञालेखावरील उत्तर दाखल केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्था ही सहकारी कायद्दा खालील नोंदणीकृत आहे. वि.प.क्रं 1 सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार त्यांचे वरिष्ठ कार्यालयास आहेत. तक्रारकर्त्याचे दि.30.05.2013 रोजीचे तक्रारीचे अनुषंगाने त्यांनी अहवाल त्यांचे वरिष्ठ कार्यालयास म्हणजे विरुध्दपक्ष क्रं 3 यांचेकडे दि.22.11.2013 रोजीचे पत्रा नुसार सादर केलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 संस्थेनी केलेल्या व्यवहारा बाबत तीच संस्था जबाबदार आहे. सबब त्यांना प्रस्तुत तक्रारीतून मुक्त करण्यात यावे अशी विनंती वि.प.क्रं 2 यांनी केली. 05. तक्रारदारांनी दस्तऐवज यादी नुसार बचत ठेव खाते पुस्तीका, 03 मुदत ठेवीच्या प्रती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 संस्थेकडे मुदतठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी केलेला अर्ज , तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे वि.प.क्रं 1 संस्थे विरुध्द केलेली तक्रार अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. 06. विरुध्दपक्ष क्रं 1 संस्थे तर्फे लेखी उत्तर आनंद डि. चकोले, अध्यक्ष यांनी प्रतिज्ञालेखावर सादर केले. सोबत विरुध्दपक्ष क्रं 3 यांचेकडे संस्थेची ईमारत विक्री करुन फंड उभारण्या बाबत दिलेले पत्र, ईमारतीची आखीव पत्रिका अशा प्रती सादर केल्यात. 07. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर सादर केले.तसेच वि.प.क्रं 3 जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांनी वि.प.संस्थेस ईमारत विक्री करुन फंउ उभारण्यासाठी दिलेल्या परवानगी पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली. 08. तक्रारदारां तर्फे वकील श्री महेश फालेकर यांचा तर विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थे तर्फे वकील श्री मेश्राम यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 09. तक्रारदारांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांची प्रतिज्ञालेखा वरील लेखी उत्तरे, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्दे उत्तर (1) वि.प.क्रं 1 संस्थेनी तक्रादारांची संयुक्त मुदतठेवीची व संयुक्त बचतखात्यातील रक्कम अदा न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?......................................... होय. (2) काय आदेश?.............................................अंतिम आदेशा नुसार तक्रार अंशतः मंजूर. ::कारण मिमांसा :: मु्द्दा क्रं 1 व 2बाबत- 10. प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. उभय तक्रादारांचे तक्रारी नुसार त्यांचे विरुध्दपक्ष क्रं 1 (“विरुध्दपक्ष क्रं-1 सहकारी संस्था” म्हणजे भारतीय स्वतंत्र धनवृक्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कामठी, जिल्हा नागपूर असे समजण्यात यावे) भारतीय स्वतंत्र धनवृक्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कामठी नोंदणी क्रं-एस.ई.एस./1668/1960 या सहकारी संस्थेमध्ये संयुक्त बचतखाते क्रं 72 आहे. तक्रारदारानीं दाखल केलेल्या बचतखाते पुस्तीकेच्या प्रतीवरुन दि.28.05.2013 रोजी रुपये-2,24,351/- जमा असल्याची नोंद आहे. तसेच विरुध्दपक्ष सहकारी संस्थेमध्ये उभय तक्रारदारांचे संयुक्त नावाने दि.16.09.2002 रोजी मुदत ठेव खाते क्रमांक 1437 अन्वये रुपये-3,00,000/- एक वर्षा करीता तसेच दि.25.02.2013 रोजी मुदत ठेव खाते क्रं 1469 अन्वये रुपये-2,00,000/- एक वर्षा करीता आणि दि.02.03.2013 रोजी मुदत ठेव खाते क्रं-1470 अन्वये रुपये-3,00,000/- एक वर्षा करीता गुंतविलेले असल्याचे आणि सदर मुदतीठेवीं वर एक वर्षा करीता व्याजाचा वार्षिक दर 10% असल्याचे सदर तीन्ही मुदत ठेवींचे प्रतींवरुन दिसून येते.
11. तक्रारकर्ते श्री रमेश राहाटे यांनी विरुध्दपक्ष संस्थेच्या अध्यक्षांना दि.20.05.2013 रोजी सदर तीन्ही मुदतठेवींची रक्कम परत मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत अभिलेखावर दाखल आहे, सदरचे पत्र वि.प.संस्थेला मिळाल्या बाबत त्यावर पोच म्हणून सही व शिक्का आहे. सदरचे पत्रात मुला मुलीचे लग्नासाठी तसेच घर दुरुस्तीसाठी रकमेची आवश्यकता आहे तसेच असेही नमुद आहे की, मुदतठेव खाते क्रं 1469 आणि 1470 चे नविनीकरण करण्यास ते ईच्छुक नव्हते परंतु संस्थेची आर्थिक स्थिती नसल्याने अध्यक्षांचे सांगण्या वरुन नविनीकरण केले. तक्रारकर्ते श्री रमेश रहाटे यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 सहायक निबंधक, सहकारी संस्था कामठी यांचेकडे विरुध्दपक्ष संस्थेनी मुदत ठेवींची रक्कम परत न केल्या बाबतची तक्रार दि.30.05.2013 रोजी केल्या बाबत तक्रारीची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. 12. या उलट विरुध्दपक्ष सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी दाखल केलेल्या लेखी उत्तरा मध्ये काही काळा पासून संस्थेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ठेवीदारांची रक्कम वेळेवर परत करणे संस्थेस अशक्य झाले आहे. संस्थेकडे फंड उपलब्ध नसल्याने संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिका-यांनी संस्थेचे मालकीची ईमारत विकून ठेवीदारांची रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली आहे व त्याची किंमत रुपये-1 कोटी आहे. या संबधाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचेकडे दि.13.09.2013 रोजीचे अर्जाव्दारे परवानगी मागितलेली आहे. सदर पत्राची प्रत विरुध्दपक्षा तर्फे अभिलेखावर दाखल करण्यात आली. संबधित विभागाकडून परवानगी मिळताच तक्रारदारांची रक्कम परत करण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 संस्था तयार आहे. या शिवाय वि.प.क्रं 1 संस्थेचे राखीव निधी अंतर्गत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कामठी येथे रुपये-82,00,000/- जमा आहे व ती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचे नियंत्रणात आहे. जिल्हा उपनिबंधकाची परवानगी मिळताच ती रक्कम सुध्दा ठेवीदारांची रक्कम परत करण्याचे कामी येऊ शकते व यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 सस्थेचे प्रयत्न सुरु असल्याचे नमुद केले.
13. विरुध्दपक्ष क्रं 2 सहायक निबंधक, सहकारी संस्था कामठी यांनी लेखी उत्तरा सोबत वि.प.क्रं 3 जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांनी वि.प.संस्थेस ईमारत विक्री करुन फंउ उभारण्यासाठी दिलेल्या परवानगी पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली. सदर पत्राचे प्रतीवरुन सदर ईमारतीचे शासकीय मुल्यांकन रुपये-29,08,000/- असल्याचे नमुद आहे आणि सदर पत्राव्दारे कायदेशीर अटींचे अधीन राहून ईमारत विक्रीची परवानगी विरुध्दपक्ष संस्थेस दिली असल्याचे दिसून येते.
14. मंचाचे मते उभय तक्रारदारांची संयुक्त बचत खात्यामधील जमा असलेली रक्कम आणि तीन्ही मुदतीठेवीं मधील जमा रक्कम विरुध्दपक्ष संस्थेस मान्य आहे. परंतु विरुध्दपक्ष संस्थेची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते सद्दस्थितीत तक्रारकर्त्यांची रक्कम परत करु शकत नसल्याचे विरुध्दपक्षाचे म्हणणे आहे. विरुध्दपक्ष संस्थेच्या ईमारतीची विक्री करुन निधी उभारण्यास विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी कायदेशीर अटींचे अधिन राहून परवानगी दिलेली आहे. कोणताही ग्राहक हा एखाद्दे संस्थेमध्ये रक्कम गुंतवणूक करताना विश्वासाने रक्कम गुंतवितो आणि अडचणीचे वेळी सदर रक्कम आपल्याला वेळेवर मिळेल अशी त्याची माफक अपेक्षा असते. विरुध्दपक्ष संस्थेची आर्थिक स्थिती हलाखीची झाल्यास त्यासाठी तक्रारदारानां वेठीस धरुन त्यांचे जमा असलेल्या रकमे पासून वंचित ठेवता येणार नाही. विरुध्दपक्ष संस्थेने तक्रारदारांची जमा असलेली रक्कम मागणी करुनही परत न केल्यामुळे दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे मंचाचे मत आहे. उभय तक्रारदार त्यांचे संयुक्त बचत खात्यातील रक्कम आणि तीन्ही मुदतठेवींची रक्कम व्याजासह विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थे कडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेचे दोषपूर्ण सेवेमुळे उभय तक्रारदार त्यांना झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासा बद्दल रुपये-3000/-आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- मिळण्यास पात्र आहेत. विरुध्दपक्ष क्रं-2 सहायक निबंधक, सहकारी संस्था, कामठी आणि वि.प.क्रं 3 जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर हे शासकीय कार्यालय असून सहकार कायद्दा अंतर्गत असलेल्या संस्थांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे एवढी मर्यादित जबाबदारी असल्याने व त्यांचे तर्फे कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्यास दिल्याचे दिसून न आल्याने त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात येते. 15. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: उभय तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-1 भारतीय स्वतंत्र धनवृक्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कामठी, जिल्हा नागपूर तर्फे अध्यक्ष आनंदराव दशरथ चकोले यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. (1) विरुध्दपक्ष क्रं -1 सहकारी संस्थेस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी उभय तक्रारदारांचे संयुक्त नावे असलेली मुदतठेव खाते क्रं-1437 अन्वये जमा रक्कम रुपये-3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्त), मुदतठेव खाते क्रं -1469 अन्वये जमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) आणि मुदत ठेव खाते क्रं-1470 अन्वये जमा रक्कम रुपये-3,00,000/- (अक्षरी रुपये- तीन लक्ष फक्त) मुदत ठेव जमा दिनांक अनुक्रमे-16.09.2012, 25.02.2013 आणि 02.03.2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.10% दराने व्याजासह तक्रारदारांना परत करावी. (2) विरुध्दपक्ष क्रं-1 सहकारी संस्थेस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी उभय तक्रारदारांचे असलेल्या संयुक्त बचत ठेव खाते क्रं-72 मध्ये दि.28.05.2013 रोजी जमा असलेली रक्कम रुपये-2,24,351/- (अक्षरी रुपये दोन लक्ष चोविस हजार तीनशे एक्कावन फक्त) दि.28.05.2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.10% दराने व्याजासह तक्रारदारांना परत करावी. (3) विरुध्दपक्ष क्रं-1 सहकारी संस्थेनी तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रार खर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तक्रारदारांना द्दावेत.
(4) विरुध्दपक्ष क्रं 2 आणि क्रं 3 यांना मुक्त करण्यात येते. (5) विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेनी सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्थेनी विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदारानां त्यांची बचतखाते आणि मुदती ठेवीं मधील रक्कम द.सा.द.शे.10% ऐवजी द.सा.द.शे.12% दराने दंडनीय व्याजासह देण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 सहकारी संस्था जबाबदार राहिल. (6) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |